मस्त भटकंती
भटकंती हा तर अनेकांचा आवडता छंद. नेमके हेच हेरुन मस्त भटकंती या दिवाळी अंकाची निर्मिती करण्यात आली आहे. देश-विदेशातील अनेक सुंदर व प्रेक्षणिय स्थळांबद्दल यामध्ये माहिती लेख स्वरुपात देण्यात आली आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय थीम पार्क हा अजित पाटील यांचा लेख विशेष माहिती देणारा आहे. तसेच मिलिंद गुणाजी यांनी लिहिलेल्या अतिभव्य भोजेश्वर या स्थळाविषयीची माहिती अत्यंत चांगली अशीच आहे.  मायेच्या मातीशी नाळ जोडणारा प्रवास हा गौतमी यांचा लेख तसेच  भारतीय नायगरा (अनुजा मेस्त्री) यांनी लिहिलेला लेख खूपच वाचनीय झाला आहे. रम्य हिमालय तुमचा आमचा (वंदना कुलकर्णी), अखेर हामता नमला ( मिलिंद आमडेकर), कल्लोळ फुलांचा (उषप्रभा पागे ) आणि नयनरम्य बोगदे हे लेखही चांगले झाले आहेत. ल्लअतिथी संपादक- मिलिंद गुणाजी ल्लपुष्ठे -१६० ल्लमूल्य- ११० रु.
चारचौघी
संपूर्णपणे स्त्रियांना वाहिलेल्या या दिवाळी अंकाचे यंदाचे विसावे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कथा, कविता, मुलाखती, ललित लेख यांनी हा अंक सजलेला आहे. माधवी कुंटे, दि. र. पुरंदरे, मालती जोशी, डॉ. रेखा खानापुरे, गुरुनाथ तेंडुलकर यांच्या कथांचा यंदाच्या अंकात समावेश आहे. ‘कर्तबगार स्त्रिया घरात भयभीत का असतात?’ या विषयावर या अंकात परिसंवाद घेण्यात आला असून त्यात सुलभा सुब्रमण्यम, डॉ. ऊर्मिला क्षीरसागर, डॉ. अनुराधा सोवनी, योगिनी राऊळ, सतीश नागरगोजे, अनुप्रिता परांजपे यांनी आपली मते मांडली आहेत. ल्लसंपादिका : रोहिणी हट्टंगडी ल्लपुष्ठे : २४२ ल्लमूल्य : १०० रु.
अर्थवेध
‘आपला देश २०२०मध्ये जागतिक महासत्ता होऊ शकेल’, असा विश्वास डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपतिपदी असताना केला होता. त्यांच्या त्या विधानानंतर देशभरात मोठी वैचारिक घुसळण झाली होती. त्याचेच प्रतििबब ‘अर्थवेध’ या दिवाळी अंकात उमटले आहे. भारतात सद्यस्थितीला अनेक आघाडय़ांवर निराशाजनक स्थिती असताना कलाम यांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी काय करावे लागेल, याचा ऊहापोह यात करण्यात आला आहे आणि त्यासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर, संदीप वासलेकर, डॉ. जयंत नारळीकर, अझीझ प्रेमजी, डॉ. अनिल काकोडकर, अच्युत गोडबोले, वामनराव प, डॉ. दिलीप साठे आदी मान्यवरांना लिहिते करण्यात आले आहे. कलाम यांनी ज्या भाषणात हा विश्वास जागविला त्याचा मराठी अनुवादही यात वाचण्यास मिळतो. आपली ढासळती अर्थव्यवस्था, रुपयाचे अवमूल्यन यावरही यात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. ल्लकार्यकारी संपादिका- वैशाली दिलीप साठे ल्लपुष्ठे- १९८ ल्लमूल्य- ७५ रु.

धनंजय
साहस, गूढ, रहस्य, शोध अशा कथांनी सजलेला ‘धनंजय’चा दिवाळी अंक यंदाही वाचकांसाठी कथामेजवानी देणारा आहे. वाचताना रोमांच उभे करणाऱ्या आणि उत्कंठा जागवणाऱ्या त्रेपन्न कथांचा यंदाच्या अंकात समावेश करण्यात आला आहे. डॉ. बाळ फोंडके, अरुण डावखरे, डॉ. अरुण मांडे अशा विविध लेखकांच्या कथांचा या अंकात समावेश आहे. याशिवाय सुप्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर यांची अनुवादित कथाही यात समाविष्ट करण्यात आली आहे. ल्लसंपादिका : नीलिमा कुलकर्णी ल्लपुष्ठे : ४०८ ल्लमूल्य : १५० रु.
रुची
कथनात्मक आणि अकथनात्मक साहित्याची मौज यंदा ‘शब्द रुची’च्या अंकात लुटता येणार आहे. भवताली सुरू असलेल्या  दुर्घटना आणि माणूसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांवर उतारा सुधीर थत्ते यांच्या ‘सृजनशक्ती- अभावाकडून प्रभावाकडे’ या लेखातून मिळू शकेल. समाजातील चांगूलपणा वाढविण्यासाठी विज्ञानाच्या परिभाषेत मांडलेला हा लेख वैचारिक समृद्धीकडे नेणारा आहे. बौद्धिक संपदेविषयी परिपूर्ण ऊहापोह डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांच्या लेखातून झाला आहे. भारतात पेटंटबाबतच्या अंधश्रद्धांपासून ते अनास्थेकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. ल्लसंपादक : सुदेश हिंगलासपूरकर ल्ल पृष्ठे २२८ ल्लमूल्य : १०० रु.