महाराष्ट्राने गेल्या वर्षभरात अनेक थोर व्यक्ती गमावल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते अगदी कालनिर्णयकार जयंत साळगांवकर यांच्यापर्यंत.. यंदाच्या कालनिर्णय दिवाळी अंकाची सुरुवातच अशा थोर व्यक्तींना श्रद्धांजली वाहणाऱ्या विभागाने करण्यात आली आहे. यामध्ये, बाळासाहेब, गो.पु.देशपांडे, ज्योतिर्भास्कर साळगांवकर, नरेंद्र दाभोलकर, श्रीकांत लागू आदी व्यक्तींच्या स्मृतिचित्रांचा समावेश आहे. अंकात तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र, जागतिकीकरण – तेव्हा आणि आता, कला, कथा, कविता असे विभाग आहेत. आशीष जोशी यांचा ‘गुगलची दुनिया’ हा लेख माहितीपूर्ण आहे. पण या अंकाचे खरेखुरे वैशिष्टय़ मानता येईल असा लेख म्हणजे दीपक घैसास लिखित, ‘मानवाची कल्पनाशक्ती आणि प्रगती’. अनिल शिदोरे यांचा हरवत चाललेल्या ‘कट्टय़ांची’ उणीव व्यक्त करणारा ‘कुणी कट्टा देईल का, कट्टा’ हा लेखही वाचनीय झाला आहे. मामंजी यांनी पेरलेले विनोदही अगदी निरागस आणि निखळ!
संपादक-जयराज साळगांवकर
पृष्ठे – २१२ ल्लमूल्य – १००रु.

हेमांगी
परिवर्तन हा जीवनाचा शाश्वत पैलू आहे. ‘हेमांगी’ दिवाळी अंकाची हीच मध्यवर्ती संकल्पना आहे. पण परिवर्तनाची ही संकल्पना प्रामुख्याने कुटुंब संस्थेतील बदलांचा वेध घेणारी आहे. राजपूतांची कुटुंब व्यवस्था, ग्रामीण कुटुंब व्यवस्था, लिव्ह इन् रिलेशनशिप, कुटुब संस्था मोडकळीस आणणाऱ्या घटकांसमोर खरे आव्हान निर्माण करणारे मूल्य अशा विविध पैलूंचा वेध समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी घेतला आहे. याव्यतिरिक्त अंकामध्ये कन्नड लेखक मोगसाले यांच्या कादंबरीचा अनुवाद प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याबरोबरच, आठ दीर्घकथा, १७ कविता, प्रवास वर्णनं अशा विविध साहित्य प्रकारांचा समावेश आहे. डॉ. रुपा रेगे-नित्सुरे यांनी स्त्री आत्मवृत्तांवर लिहिलेला लेख निव्वळ अप्रतिम!
संपादक -प्रकाश कुलकर्णी
पृष्ठे -१९६ ल्लमूल्य – १२०रु.

तारांगण
‘तारांगण’ हे मासिक पूर्णपणे सिनेमा या विषयाला वाहिलेले आहे. ‘दुनियादारी’ या यंदाच्या गाजलेल्या चित्रपटामुळे विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री सई ताम्हणकर हिचे प्रसन्न छायाचित्र मुखपृष्ठावर असून तिच्याशी केलेल्या गप्पांबरोबरच दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी आपल्याला भेटलेली अलौकिक माणसं हा लेखही वाचनीय आहे. ‘श्यामची आई’ या चित्रपटाला ६० वर्षे पूर्ण होत असल्याची दखल अद्याप मराठी प्रसारमाध्यमांनी घेतलेली नसली तरी या अंकात या सुवर्णकमळ विजेत्या चित्रपटाची संपादकांनी आवर्जून दखल घेतली आहे. आशा भोसले यांच्यावरील युधामन्यू गद्रे यांचा वैशिष्टय़पूर्ण लेख, ऐतिहासिक चित्रपटांची वाटचाल असा वैविध्यपूर्ण मजकूर, देखणा ले-आऊट हे या अंकाचे वैशिष्टय़ आहे.
संपादक – मंदार जोशी
पृष्ठे – १३८ ल्ल मूल्य – १०० रु.

कॉमेडी कट्टा
खळाळून हसणे सध्या दुरापास्त झाले आहे. पण दिवाळी अंकाच्या माध्यामातून वाचकांना मनमोकळेपणाने हसविण्यासाठी कॉमेडी कट्टा तयार करण्यात आला आहे. या कट्टय़ावर आपणाला विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा भेटतात आणि हसवतातही. यामध्ये बॅटल ऑफ द रॉक (प्रवीण टोकेकर), ‘ढ’ वाहिनीचे ऑपरेशन चेंज (अशोक जैन), ये दोसती (सुधीर सुखटणकर) यांनी लिहिलेल्या व्यक्तिरेखा मनमुरादपणे हसवितात. निलेश जाधव यांनी साकारलेले मुखपुष्ठ आकर्षक आणि अप्रतिम.  विनोदांनी ठासून भरलेल्या या कट्टय़ावर जाण्यास काहीच हरकत नाही.
संपादक- सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी
पृष्ठे- १३६ ल्लमूल्य- १०० रु.

आहुति
अंबरनाथहून गेली ४७ वर्षे नियमितपणे प्रकाशीत होणाऱ्या साप्ताहिक आहुतिच्या यंदाच्या दिवाळी अंकात विविध विषयांवरील माहितीपूर्ण लेख आहेत. डॉ. अनिल काकोडकर यांनी ‘अणूऊर्जा भारतासाठी अपरिहार्य का’ हे सविस्तरपणे त्यांच्या लेखात नमूद केले आहे. आधुनिक काळात पाणी साठवणुकीचे साधे-सोपे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या जलवर्धिनी प्रतिष्ठानच्या डॉ. उल्हास परांजपे यांच्या कार्याची ओळख (थेंबे थेंबे तळे साचे), ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड तालुक्यात आदिवासींच्या हक्कांसाठी झटणाऱ्या श्रमिक मुक्ती संघटनेच्या अ‍ॅड. इंदवी तुळपुळे (आदिवासींची ताई) आदी व्यक्तिमत्त्वांचा परिचय अंकात आहे.
संपादक-गिरीश त्रिवेदी
पृष्ठे- १२० ल्लमूल्य-१०० रू.