आजच्या काही कवितांमधून भोवतीच्या कृत्रिम कोलाहलाला चिरून टाकणारा धारदार स्वर आहे. भोवतीच्या कानठळ्या बसवणाऱ्या शांततेत मराठी कवी बोलत आहेत. तो विवेकाचा स्वर आहे. तो क्षीण आहे, मंद आहे, अस्फुट आहे असे आपल्याला वाटते. कारण भोवतीच्या कोलाहलाने आपल्या कानात दडे बसलेले आहेत. कवीने काय काम करायचे असते? आपल्या भोवतीच्या जगण्यासंबंधीच्या आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करायच्या असतात. त्याचे लिहिणे हेच त्याचे बोलणे असते. सर्वत्र हरवत चाललेला विवेकाचा स्वर त्याच्या शब्दांतून ऐकू आला पाहिजे.

१.
‘साहित्य-संस्कृतीच्या प्रदेशातील विवेकाचा आवाज’ या विषयावर लिहिण्यासाठी थोडय़ा प्राथमिक गोष्टी आधी मांडल्या पाहिजेत. ‘साहित्य’ या शब्दाबरोबर जोडशब्द असल्यासारखा ‘संस्कृती’ हा शब्द येतो. कारण साहित्य ही मनुष्याच्या इतिहासाची आणि संस्कृतीची निर्मिती असते आणि अभिव्यक्तीही असते. इतिहास आणि संस्कृती असलेले मानवी जीवन साहित्यातून व्यक्त होते. साहित्याच्या, साहित्यकृतीच्या संदर्भात विचार करताना लेखक- संहिता किंवा पाठय़- वाचक या तीन प्रधान घटकांचा विचार केला जातो. लेखकांचे आणि वाचकांचे सांस्कृतिक संदर्भ, संहितेतून व्यक्त होणाऱ्या सामाजिक वास्तवाचे विविध संदर्भ लक्षात घेतले जातात. साहित्याच्या संदर्भात लेखकाइतकेच वाचकालाही महत्त्व असते. साहित्याच्या व्यवहारात (लिखिताचे मुद्रितात रूपांतर होत असल्याने) लेखक- वाचकाबरोबरच प्रकाशक, ग्रंथवितरक, पुस्तकविक्रेते, समीक्षक, पुरस्कार समिती, पाठय़पुस्तक अभ्यासक्रम समिती या घटकांचाही समावेश होतो. यांत आपण दूरचित्रवाणी मालिकांचे व चित्रपटांचे निर्माते यांचाही आज समावेश करू शकतो. तेथेही कोणत्या ना कोणत्या रूपात साहित्याचा संबंध असतोच. साहित्याचा विचार करताना त्या- त्या भाषेतली साहित्याची परंपरा आणि साहित्याशी निगडित लेखक-वाचकांची सांस्कृतिक भूमिका यांचाही विचार होतो. सदाशिवपेठी, मध्यमवर्गीय, जनवादी, दलित, विद्रोही, स्त्रीवादी, मार्क्सवादी या व अशा संज्ञा साहित्यविषयक सांस्कृतिक भूमिकेतून आलेल्या आहेत. फडके-खांडेकरांच्या काळातल्या ‘कलेसाठी कला’ वा ‘जीवनासाठी कला’ यादेखील सांस्कृतिक भूमिकाच होत्या. अलौकिकतावादी, लौकिकतावादी या भूमिकादेखील. याशिवाय नियंत्रण आणण्यासाठी घेतलेल्या भूमिकाही नतिक-सांस्कृतिक असतात.
साहित्यसर्जकाकडे त्याची स्वत:ची अशी साहित्यविषयक आणि सांस्कृतिक भूमिका असते, मानवी जीवनाविषयीची समज असते आणि ती त्याच्या साहित्यकृतींमधून व्यक्त होते.
गंभीर साहित्य, मनोरंजक साहित्य या साहित्याची प्रकृती दर्शवणाऱ्या संज्ञा आहेत. पुष्कळदा मनोरंजक साहित्याचा साहित्य म्हणून विचार केला जात नाही. मनोरंजक साहित्याची समाजाला नित्य गरज असते, हे लक्षात घेऊनही गांभीर्याने त्याविषयी लिहिले जात नाही. साहित्याच्या क्षेत्रात ते नेहमीच दुय्यम पातळीवर ठेवले जाते. वाचकवर्गापकी मोठा भाग हा मनोरंजक साहित्याचा भोक्ता असतो. दैनंदिन जीवनातील ताणतणावांचा निचरा करण्याचे काम असे साहित्य करते. गंभीर साहित्यात ललित आणि वैचारिक असे भेद आहेतच. सर्वसाधारणपणे साहित्य म्हटले की कविता, कथा, कादंबरी, ललित गद्य, नाटके हेच प्रकार डोळ्यांसमोर येतात. फारतर कधी कधी आठवणी, आत्मचरित्रे, स्वकथने यांनाही समाविष्ट केले जाते. निबंध हे वैचारिक गद्य असून तेही साहित्यच असते. मराठीतील प्रबोधनाच्या परंपरेशी निबंध हा साहित्यप्रकार जोडला गेला आहे.
गंभीर म्हटल्या जाणाऱ्या साहित्यातही प्रतवारी असते. साधारणपणे प्रयोगशील, नव्या वाटा धुंडाळणारे, तोपर्यंतच्या साहित्याच्या परंपरेला छेद देणारे, व्यक्ती आणि समाज यांच्याकडे निराळ्या परिप्रेक्ष्यातून पाहणारे साहित्य हे सर्वसाधारण साहित्याहून जरा वरच्या दर्जाचे मानले जाते. त्याचा वाचक त्याच्या निर्मितीच्या काळात फार नसतो. तो पुढल्या काळात हळूहळू वाढत जातो. या साहित्याच्या वाचकाची वाङ्मयीन समज आणि क्षमता चांगली असली पाहिजे हे गृहीत धरले जाते. हे साहित्य एकूणच साहित्याला पुढे नेणारे असते असे मानले जाते. गंभीर साहित्याच्या दुसऱ्या प्रकारातल्या साहित्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद असतो. या साहित्यात साधारणपणे परंपरा आणि नवता यांचा समन्वय साधलेला असतो. मनोरंजक साहित्याचा वाचक संमिश्र असतो. करमणूक, विरंगुळा, रंजन यासाठी हे साहित्य वाचले जाते. आपल्याकडच्या पौराणिक-ऐतिहासिक कादंबऱ्या या गंभीर साहित्यातील दुसरा प्रकार आणि मनोरंजक साहित्य यांचे मिश्रण असतात. आपल्या रोज प्रत्ययाला येणाऱ्या वास्तवापेक्षा पौराणिक-ऐतिहासिक कादंबऱ्यांतले वास्तव खूपच उन्नत, उदात्त असते. मिथकांचा अथवा इतिहासकाळाचा अर्थ लावणे, हे त्यांचे खरे काम असते. ते केले जात नाही.
आणखी एक प्रकार केला जातो, तो म्हणजे बालसाहित्याचा. बालांसाठी, कुमारांसाठी लिहिलेले साहित्य. ते प्रामुख्याने संस्कारांच्या भूमिकेतून लिहिले जाते. कुमारवयातून युवावस्थेकडे जाणाऱ्यांसाठी आपल्याकडे क्वचितच साहित्य लिहिले जाते. पुराकथा आणि विज्ञान यांच्या समन्वयातून लिहिले जाणारे साहित्य आज इतरत्र आहे. भाषांतरित साहित्य या प्रकारालाही आज विशेष महत्त्व आलेले आहे. त्यात तुलनेने मनोरंजक साहित्य अधिक असले तरी अपवादात्मकरीतीने का होईना, जागतिक महत्त्वाच्या साहित्यकृतीही मराठीत येऊ लागल्या आहेत. भाषांतरित साहित्याला आज मोठय़ा प्रमाणात वाचक लाभतो आहे, कारण आपली जीवनशैली बदलली आहे, अधिक मोठे जग आपल्याला परिचित होऊ लागले आहे. एकेकाळी मराठी वाचकांना अपरिचित वाटणारी व्यक्तिनामे, स्थलनामे बदलून त्यांचे मराठीकरण केले जात असे. त्याची आज गरज राहिलेली नाही. शिवाय आपल्या नित्य परिचयाच्या जगाऐवजी भाषांतरित साहित्यात एक निराळे जग आपल्यासमोर येते.
साहित्याचे हे जे प्रकार केलेले आहेत, त्यांच्या वाचकांची अभिरुची एकच एक नसते. बहुतांश वाचकांची साहित्यविषयक भूमिका नतिक कल्पनांनी बाधित झालेली असते. त्यामुळे कुणाच्या वाचनात कोणती साहित्यकृती कधी येईल, आणि त्यावर त्याची प्रतिक्रिया काय असेल, याचे कोष्टक मांडता येत नाही. एखाद्या काळात विशिष्ट साहित्यकृतीला चांगला प्रतिसाद मिळतो, तसा त्याच काळातल्या इतर साहित्यकृतींना मिळत नाही. कधी अगदी भिन्न प्रकृतीच्या साहित्यकृतींना एकाच काळात जवळजवळ सारखाच प्रतिसाद मिळतो. याचे कारण वाचकांच्या साहित्यविषयक अभिरुचीत आणि सांस्कृतिक भूमिकेत दडलेले असते. प्रत्येक वाचकाजवळ स्वत:ची अशी अभिरुची आणि भूमिका असते. साहित्यकृतींच्या वाचनातून, जगाच्या डोळस निरीक्षणातून, इतर कलांच्या परिचयातून ती प्रगल्भ होत असते. उदाहरणार्थ, जागतिक स्तरावरील जटिल, गुंतागुंतीचे वास्तव उलगडणारे चित्रपट पाहिलेल्या मराठी वाचकाला मराठी कादंबऱ्या थिटय़ा वाटण्याची शक्यता आहे.
२.
आता सुरुवातीच्या परिच्छेदात साहित्यव्यवहाराचे जे घटक सांगितले आहेत तिकडे पाहू. मुद्रणोत्तर काळात प्रकाशक हा महत्त्वाचा घटक ठरलेला आहे. मराठी प्रकाशन व्यवहार पाहिल्यास सर्व प्रकाशक सारख्याच प्रकारची पुस्तके प्रकाशित करीत नाहीत, हे दिसून येईल. काही प्रकाशकांचे लेखकदेखील निश्चित झालेले असतात. काही प्रकाशक उत्तम, दर्जेदार पुस्तके काढतात, तर काही खूप खपू शकणारी पुस्तके काढतात. खूपखप्या पुस्तकांचा एवढा बोलबाला केला जातो, की चांगली पुस्तके गठ्ठय़ांमध्ये दडून राहतात. सध्याच्या मराठी प्रकाशन व्यवहारात असे चित्र वारंवार दिसू लागले आहे. काही प्रकाशने विशिष्ट वाङ्मयीन प्रवाहांना प्राधान्य देणारी असतात, तर काही सर्वसमावेशक असतात. प्रकाशन हा व्यवसाय आहे. त्यात भांडवल गुंतवले जाते. त्यातून नफा मिळावा अशी अपेक्षा असते. किमान गुंतवलेले पसे परत मिळावेत, ही तरी वाजवी अपेक्षा असते. त्यातून पुढे आणखी पुस्तके काढता येतात. मराठी प्रकाशकांचा व्यवसाय तसा फार फायद्यात चालणारा नाही. कारण पुस्तक विकत घेऊन वाचणाऱ्यांची संख्या समाधानकारक नाही. त्यामुळे त्यांना दर्जेदार पुस्तकांबरोबरच खपू शकणारी पुस्तके काढावी लागतात. काही लोक अशी तडजोड करीत नाहीत. ते थोडीच, पण गुणवत्तापूर्ण पुस्तके काढतात, हेही खरेच आहे. आता इंटरनेट, किंडल, ई-बुक्स यांच्यामुळे कागदावर छापलेल्या पुस्तकांच्या विक्रीत घट झालेली आहे, असा एक निष्कर्ष आहे. मराठी प्रकाशन व्यवसायाला अद्याप याची फारशी बाधा झालेली नाही. पण भविष्यकाळात तसे होण्याची शक्यता आहे.
लेखकांप्रमाणे प्रकाशकांच्याही प्रतिमा तयार होतात. त्या लेखकांच्या मनात असतात तशाच वाचकांच्या मनातही असतात. प्रकाशकांच्या प्रतिमा तयार होण्यासाठी त्यांनी छापलेली दर्जेदार वा खपाऊ पुस्तके कारण असतातच; त्याचबरोबर इतर घटकांचाही सहयोग कारणीभूत ठरतो. त्यातला ग्रंथवितरक वा पुस्तकविक्रेता हा एक महत्त्वाचा घटक असतो. पुस्तक बाजारात आले तरच ते लोकांना दिसेल. आíथक क्षमता असलेला वाचक ते विकत घेईल. ते शाळा-महाविद्यालयांच्या वा सार्वजनिक ग्रंथालयात गेले तर वाचकांच्या हाती पडेल. म्हणूनच ग्रंथवितरण ही महत्त्वाची गोष्ट आहे. तोही व्यवसायाचाच भाग आहे. परंतु विक्रेता कोणती पुस्तके वाचकांना उपलब्ध करून देतो, कोणती शाळा-महाविद्यालयांच्या वा सार्वजनिक ग्रंथालयात देतो, हीदेखील साहित्याच्या व्यवहारातली सांस्कृतिक महत्त्वाची गोष्ट आहे. प्रकाशक- ग्रंथ वितरक- पुस्तक विक्रेते यांच्या संगनमताने विशिष्ट पुस्तकेच छापली, उपलब्ध करून दिली, त्यांचीच प्रसिद्धी केली आणि बाजारात तीच उपलब्ध होतील अशी व्यवस्था केली तर ते वाचकांच्या वाचनहक्कावरील आक्रमणच असते. कारण यात वाचकांचे वाचनविश्व संकुचित केले जाते. मराठी साहित्याच्या क्षेत्रात याविषयी विरोध व्यक्त झाला. मोठे, नामांकित प्रकाशक जी पुस्तके छापत नाहीत ती काढणाऱ्या प्रकाशन संस्था निघाल्या. आज डीटीपी मुद्रणामुळे लहान लहान गावांतही उत्तम मुद्रण आणि निर्मिती असलेली पुस्तके निघू लागली आहेत. तथापि, ही पुस्तके दूरदूरच्या वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या वितरकांची संख्या मात्र मर्यादित आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या एका भागात तयार होणारी पुस्तके दुसऱ्या भागात मिळत नाहीत, अशी तक्रार ऐकू येत असते. तिकडच्या लेखकांना आपण उपेक्षित आहोत असे वाटते. कोणत्या लेखकांना पुढे आणायचे, कोणाला मागे ठेवायचे, याची काही पद्धतशीर योजना आखली जाते असे नव्हे, पण तसे होत असते खरे.
साहित्यव्यवहाराच्या आणि ग्रंथव्यवहाराच्या बाबतीत समीक्षक हा एक महत्त्वाचा घटक आहे. मराठी साहित्याच्या प्रांतात त्याला विशेष महत्त्व नाही. एकंदरीत मराठीतला समीक्षाव्यवहार किरटा आहे. पुस्तकांविषयीच्या मजकुराला विशेष जागा दिली जात नाही. ग्रंथसमीक्षेला वाहिलेली साप्ताहिके, पाक्षिके वा मासिके मराठीत नाहीत. दैनिकांच्या रविवार आवृत्तीत थोडी जागा दिली जाते. बाकी वाङ्मयीन म्हटल्या जाणाऱ्या, फार वाचकांपर्यंत न पोचणाऱ्या नियत-अनियतकालिकांमध्ये पुस्तकांविषयीची चर्चा असते. तथापि वर्तमानपत्रे, मासिके यांतून येणारी परीक्षणे, लेख यांनी वाचकांची मते प्रभावित होतात हेही खरे आहे. आपल्या ग्रंथव्यवहाराचा आवाकाच मर्यादित असल्यामुळे सातत्याने विविध प्रकारच्या पुस्तकांची परीक्षणे आली पाहिजेत, त्यासाठी काही व्यवस्था असली पाहिजे, याची गरज प्रकाशकांना, वितरकांना, विक्रेत्यांना वाटत नाही. वर्तमानपत्रांतली थोडीशी परीक्षणे, पुस्तक प्रकाशनाच्या वेळी वक्त्यांनी केलेल्या भाषणांचा वर्तमानपत्रातला गोषवारा या काही गोष्टींमुळे कोणती पुस्तके आलेली आहेत, हे वाचकांना कळते. एकूण मजकूर छापण्याची जागाच कमी असल्याने आपोआपच पुस्तकांच्या निवडीवर नियंत्रण येते.
पुरस्कार ही साहित्याच्या क्षेत्रातली कायमच डोकेदुखीची गोष्ट राहिलेली आहे. कुठलीही पुरस्कार समिती असो, ती कधीही तटस्थ, नि:पक्षपाती नसते असा बहुसंख्य लेखकांचा दावा असतो. आपल्या जवळच्या, आपल्या हितसंबंधातल्या, आपल्या विचारांच्या लोकांना पुरस्कार दिले जातात असे म्हटले जाते. प्रकाशकांचीही त्यात काहीएक भूमिका असते असे सर्रास म्हटले जाते. पुरस्कार ही गोष्ट पुस्तकाच्या अर्थकारणाशी निगडित आहे. पुरस्कारामुळे तो ग्रंथ, त्याचा लेखक वाचकांच्या नजरेसमोर येतो. पुरस्कारप्राप्त पुस्तक हे गुणवत्तापूर्ण असणारच असा ग्रह तयार होतो. त्या लेखकाविषयीदेखील काहीएक प्रतिमा तयार होते. मराठीत आज विविध पुरस्कार आहेत आणि त्यांचा ग्रंथखरेदीवर प्रभाव पडतो आहे, हेही दिसते आहे. तथापि चांगल्या लेखकांची प्रतिमा पुरस्कारांमुळे तयार होत नसून त्यांच्या लेखनातील गुणवत्तेमुळे तयार होत असते हे प्रत्यक्षातले वास्तव आहे. असे वास्तव असले तरी पुरस्कारांची आस लेखकांना असते. ते मिळाले नाहीत तर ते खंतावतात. ते आपल्याला मिळावेत अशी धडपडही ते करताना दिसतात. हे मानवी स्वभावाला धरूनच आहे. शालेय पाठय़पुस्तकात लेखनाचा समावेश, विद्यापीठीय अभ्यासक्रमात पुस्तकाचा समावेश हाही लेखकांना हवाहवासा वाटणारा सन्मान आहे. त्याबाबतीतही ते प्रयत्नशील असतात.
साहित्याशी निगडित सामाजिक-सांस्कृतिक व्यवहाराचा हा भाग आहे. त्यामागे अर्थकारण आहेच; त्याचबरोबर लेखकांना हव्या असलेल्या मानसन्मानाचा भागही आहे. पुरस्कार मिळाले, पाठय़पुस्तकात वा अभ्यासक्रमात स्थान मिळाले की आपला सन्मान झाला असे लेखकांना वाटते.
dwi09अद्यापही आपल्या समाजात लेखकांना मान आहे, प्रतिष्ठा आहे. त्यांच्या शब्दांना किंमत आहे. समाजात घडणाऱ्या विविध गोष्टींबद्दल लेखकाने बोलावे, त्याने आपला विचार व्यक्त करावा अशी लोकांची अपेक्षा असते. समाजातील विविध क्षेत्रांत विविध बुद्धिजीवी असतात. तथापि, समाजातल्या विपरीत गोष्टींबद्दल लेखकानेच आवाज उठवावा, लेखक विचारवंत असतो, तो समाजाला मार्गदर्शन करू शकतो अशी सर्वसाधारणांची कल्पना असते. त्याने नुसते लेखन करू नये, सामाजिक-राजकीय चळवळींतही सहभागी व्हावे असा लोकांचा आग्रह असतो. दैनंदिन जीवनात नेता आणि अभिनेता यांना महत्त्व देणारा समाज लेखकाची एक भव्य प्रतिमा मनात जपत असतो. लेखकाला सामाजिक बांधिलकी असते, तो अन्यायग्रस्तांच्या बाजूने उभा राहतो, तो अन्याय करणाऱ्यांच्या विोधात बंड करतो- लेखकाविषयीच्या या कल्पना समाजात रूढ झालेल्या आहेत. एका बाजूला साहित्य ही एक कला आहे असे आपण समजतो, साहित्यिक हा कलावंत आहे असे म्हणतो. मात्र, इतर कलाक्षेत्रांत काम करणाऱ्या कलावंतांकडून अशा अपेक्षा केल्या जात नाहीत. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी झाली तर लेखकांनी (विचारवंतांनी, पत्रकारांनी) बोलावे, तसे गायकांनी, नटांनी, नर्तकांनी, शिल्पकारांनी, चित्रकारांनी बोलावे, असे म्हटले जात नाही. अलीकडे चित्रकारही मुखर झालेले आहेत आणि तेही बोलतात. एखाद् दुसरा अभिनेताही बोलतो. बाकी कलावंतांकडून अशी अपेक्षा नसते. सामाजिक-राजकीय संघटनांनी लादलेल्या सेन्सॉरशिपविषयी लेखकांच्या-पत्रकारांच्या बाजूला उभे राहून एखादा गायक वा शिल्पकार बोलतो आहे असे आढळत नाही. सर्व कलाक्षेत्रांतले कलावंत एकत्र आलेले आहेत असे दृश्य जवळजवळ दिसत नाहीच. महाराष्ट्रातली कलाक्षेत्रे आपापल्या वर्तुळात मग्न असतात. फारतर लेखक-कवींचा रंगकर्मीशी, चित्रकारांशी संवाद असतो. आपल्याकडच्या काही मोठय़ा गायकांचा, शिल्पकारांचा साहित्यक्षेत्राशी संबंध होता. चित्रपटक्षेत्रातही लेखकांना महत्त्व होते. ते दिवसेंदिवस कमी झालेले दिसते.
३.
प्रकाशक, ग्रंथवितरक, पुस्तक विक्रेते, समीक्षक, पुरस्कार समिती, पाठय़पुस्तक-अभ्यासक्रम समिती या सर्व घटकांबाबत लेखकांच्या मनात आणि वाचक-समाजाच्या मनातही ग्रह-पूर्वग्रह असलेले दिसतात. लेखक आणि वाचक यांच्यामधले हे दुवे असतात. ते कशा प्रकारे काम करतात यावर त्या भाषेची ग्रंथसंस्कृती आणि वाचनसंस्कृती ठरत असते. सुदैवाने एकाच काळात वेगवेगळ्या शक्ती काम करत असल्यामुळे भिन्न भिन्न प्रकृतीची पुस्तके प्रकाशित होतात, त्यांची कमी-अधिक प्रसिद्धी होते, ती वाचकांपर्यंत पोहोचतात. साठच्या दशकातील विविध वाङ्मयीन चळवळींमुळे हे शक्य झाले. लेखकाप्रमाणे वाचकही जागरूक असला तर तो चांगल्या पुस्तकांपासून वंचित राहत नाही.
वर दिलेल्या साहित्यव्यवहारातल्या विविध घटकांशी लेखकाचा संबंध असतो. ते सर्व घटक महत्त्वाचेच असतात. तथापि लेखकाचे स्थान त्यांच्याहून वेगळे असते असे समाज मानतो. महाराष्ट्रात काही लेखकांच्या अशा उत्तुंग प्रतिमा तयार झालेल्या आपण पाहिल्या आहेत. लेखकाने दुहेरी काम करावे अशी वाचक-समाजाची अपेक्षा असते. त्याने लेखन करावे : कविता, कथा, कादंबरी, नाटके, ललित गद्य, इत्यादी. त्यात समकालीन जगातल्या सामाजिक-राजकीय-धार्मिक-तात्त्विक प्रश्नांचा ऊहापोह असावा. त्याचबरोबर त्याने समाजात उत्पन्न होणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांविषयी, प्रश्नांविषयी, न्याय्य विषयांसंबंधी बोलावे, भाषणे द्यावी, सभांमध्ये, परिसंवादांमध्ये, चर्चामध्ये भाग घ्यावा आणि समाजाचे उद्बोधन करावे. कारण तो ज्या वाचकांसाठी लिहितो, त्या वाचकांच्या जगातले हे प्रश्न असतात. ते पुस्तकांतून मांडावेच, पण त्याच्या बाहेर येऊन समाजाला सन्मुखही व्हावे. अशा तऱ्हेने वेळोवेळी महाराष्ट्रातल्या लेखकांनी नेतृत्व केलेले आहे, विविध चळवळींमध्येही भाग घेतलेला आहे.
आज लेखकाची काय प्रतिमा आहे? आज लेखकाचे लिहिणे आणि समाजसन्मुख होणे, यात फारकत झाली आहे का? आपल्या लेखनातच तो स्वत:ला संपूर्णपणे व्यक्त करतो आणि भाषणे, सभा-संमेलने, चळवळी या गोष्टींची काही गरज नाही, असे असे समजतो का? एक लेखक, एक नागरिक म्हणून तो आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतो. मात्र, त्याला सार्वजनिक व्यक्तिमत्त्व व्हायचे नाही, असे काही आहे का? आजूबाजूला चाललेल्या विपरीत घटना-प्रसंगांत हस्तक्षेप करावा अशी इच्छा त्याला नसते का? असा हस्तक्षेप आपण करू शकतो, यावरचाच त्याचा विश्वास उडालेला आहे का? असे काही प्रश्न उपस्थित होतात. आपण सध्याच्या लेखक-कवींच्या पिढीचा विचार करू. त्यांच्या लेखनातून काय व्यक्त होते आहे, त्याचाही विचार करू. मग काय निष्कर्ष निघतात ते बघू.
४.
सध्या चळवळी जवळजवळ बंद पडलेल्या आहेत. मात्र, ठिकठिकाणी सामाजिक कार्य करणाऱ्या लहान-मोठय़ा संस्था आहेत, अशासकीय संघटना आहेत. खेडय़ापासून राजधानीपर्यंत असंख्य लोक राजकारणात आहेत आणि त्यात जाऊ इच्छिणारेही आहेत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, भूविकास बँका, साखर कारखाने यांच्या निवडणुकांत भाग घेणारे खूप आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांतले कार्यकत्रे म्हणून वावरणारे खूप आहेत. छोटय़ा छोटय़ा गावांमधून मोटरसायकलींवरून िहडणारे लोक आहेत. शहर, खेडेवजा शहर, मोठे खेडे यांतला फरक आता बऱ्याच अंशी कमी झालेला आहे. छोटी खेडी होती तिथे गृहनिर्माण संस्थांच्या वसाहती झाल्या आहेत. शेतजमिनीवर इमारती उभ्या राहिल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळा, महाविद्यालये आहेत, शिक्षण- संकुले आहेत. मल्टिनॅशनल, नॅशनल कंपन्यांच्या खाद्यपदार्थाची बंद पाकिटे छोटय़ा छोटय़ा बसथांब्यांवर दिसत आहेत. पूर्वीच्या बसस्टँडवरची भज्यांची, मिसळींची, आलूबोंडय़ांची हॉटेलं आडबाजूला गेली आहेत. बायपास रोडवरून न थांबता जाणाऱ्या चारचाकी वाहनांची गर्दी वाढली आहे. शीतपेये, मोबाइल फोन, टीव्ही, केबल, कॉम्प्युटर सर्वत्र दिसताहेत. मोठय़ा शहरांत शॉिपग मॉल्स आहेत. विविध पदार्थाची रेलचेल आहे. दूरदूरच्या भागांत होणाऱ्या लक्झुरिअस अपार्टमेंटस्च्या जाहिरातींनी वर्तमानपत्रांची पानेच्या पाने भरून जात आहेत.
हे लेखक-कवी ज्या पिढीतले आहेत त्या पिढीतले अनेक लोक माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापनविद्या, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्र, दूरचित्रवाणी, जाहिरात क्षेत्र, कृषिविज्ञान, औषधविज्ञान, बँकिंग, प्रशासकीय सेवा, कॉर्पोरेटस्, मल्टिनॅशनल्स इत्यादी क्षेत्रांत काम करीत आहेत. त्यातले काही लेखन करीत असतील. याच पिढीत इतर अनेक व्यवसाय करणारे लोक आहेत. शिक्षक, प्राध्यापक, वकील, वेगवेगळे व्यवसाय वा उद्योग करणारे लोक. याच पिढीतले काही शिक्षित लोक शेती, भाज्यांचे मळे, फळबागा यात काम करणारे आहेत. याशिवाय असंख्य छोटय़ा-मोठय़ा नोकऱ्या करणारे लोकही. खूप लोकांची ही पिढी आहे. त्यात मोठय़ा संख्येने कामधंदा नसलेले तरुण आहेत. त्यांना सामावून घेणारे राजकीय पक्ष आहेत. गावोगाव अवाढव्य फ्लेक्स लागलेले दिसत आहेत. कुणा त्या गावातल्या राजकीय हितेच्छूचा फोटो, त्याच्या डोक्यावर त्याच्या पक्षातल्या नेत्यांचे फोटो, कुणा बंटीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मित्रमंडळ, कुणा आप्पा, अण्णा, दादा यांची कुठल्यातरी पदावर निवड झाल्याचे अभिनंदन.
आजचे हे तरुण महानगरांत, लहान-मोठय़ा शहरांत, खेडय़ापाडय़ांत राहत आहेत. त्यांच्यातही लेखन करणारे काही असतीलच. लेखन करणारे थोडे आणि लेखन न करणारे अनेक असे हे लोक आपापल्या कार्यक्षेत्रात, उद्योगात, व्यवसायात कार्यरत असतील. त्यांच्याहीभोवती आपला समाज आहे, त्या समाजातले प्रश्न आहेत, समस्या आहेत, सहज प्रतिक्रिया व्हाव्यात अशी कारणे आहेत. ते वेगवेगळ्या समाजगटातले, आíथक गटातले असतील. त्यांच्यातले जे लेखक नाहीत ते आपल्या कार्यक्षेत्राबाहेर काय करत असतील? ते शिक्षित, उच्चशिक्षित, बुद्धिमान, संवेदनशील, समाजविषयक आस्था असलेले असेच असतील. ते कसे व्यक्त होत असतील? मुळात ते व्यक्त होतात का? यंग अर्बन प्रोफेशनल्स समाजातल्या एखाद्या ज्वलंत प्रश्नाविषयी (उदाहरणार्थ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या) काय विचार व्यक्त करत असतील? तीन-चार छोटय़ा खेडय़ांच्या आसपास भव्य शैक्षणिक संकुल असते. तिथे काम करणाऱ्या बुद्धिजीवींना काय वाटत असेल? लिहिणारे लोक सोडल्यास उरलेले जे हजारो लोक आहेत, ते कोणती पुस्तके वाचत असतील? मुळात काही वाचन करत असतील का? मला प्रश्न पडला आहे तो हा, की यांना काही प्रश्न पडत असतील का?
अशा स्थितीत लेखक-कवी काय करताहेत ते पाहिले पाहिजे. भोवतीच्या कोलाहलात त्यांचा आवाज दबून गेला का? की स्वत:शीच हळुवार, क्वचित इतरांशी मोठय़ाने ते बोलत राहिले? येथे सोयीसाठी गेल्या दहा-पंधरा वर्षांतल्या कवितेत आमच्या तरुण कवींनी काय व्यक्त केले आहे, तेवढेच पाहू. १९८० च्या दशकात शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची चळवळ सुरू झाली होती. या चळवळीशी काही कवी, लेखक जोडले गेले होते. त्यांचे ग्रामीण अथवा नजीकच्या निमशहरी, शहरी भागांत वास्तव्य होते. शेतकऱ्यांची दु:स्थिती त्यांना दिसत होती. त्याचबरोबर समाजाची व शासनाची त्यांच्याबाबतीतली उदासीनतेची भूमिकाही ते पाहत होते. ग्रामीण जीवनातून कृषिजीवनमूल्यांची चाललेली घसरण ते अनुभवत होते. झपाटय़ाने होत चाललेल्या शहरीकरणाचे ते साक्षी होते. १९९० मध्ये आíथक उदारीकरणाचे धोरण मान्य केल्यानंतर जीवनशैलीत होत गेलेला बदल त्यांच्या समोरच होता. वर्षभर राबराब राबावे आणि पीक बाजारात न्यावे, तर भाव पडलेले. उत्पादनखर्चही निघत नाही, त्यामुळे कर्जफेड करू शकत नाही. काल कोणीतरी भाव चढवतो, आज कोणीतरी उतरवतो असा लहरी हैदर कारभार सुरू असतो. सुगीभरल्या शेतात आला कटोरा हातात (इंद्रजित भालेराव) अशी शेतकऱ्याची विपरीत दशा होते. गाव बदलत चालले आहे. माणसे दुभंगलेली आहेत. आतडय़ांचा ओलावा राहिलेला नाही. गावाची वाताहत होते आहे. कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. मातीत जन्मून मातीत नांदणाऱ्यांच्या देहावर मातीचेच फोड उठतात (प्रकाश होळकर) अशी स्थिती आहे. बल मोट ओढतो तसे आयुष्य शेतकऱ्यांनी ओढावे (श्रीकांत देशमुख) याखेरीज दुसरा उपाय राहिलेला नाही. रानटी हत्तींनी उच्छाद मांडावा तसा राजकीय-आíथक सत्तांनी उच्छाद मांडलेला आहे, आणि त्यात माणसे पायदळी तुडवली जात आहेत (अजय कांडर), गाव बदलले आहे. किती बदलले आहे? गावापासून शहरापर्यंत डांबरी रस्ते झाले, पूल बांधले. गावाकडून शहरात काहीच गेले नाही, शहरच गावात घुसले (शंकरराव दिघे). गावाला राजकारणाची नशा चढलेली आहे. आता गाव अनेक झेंडे, राजकीय पक्ष, गटागटात विभागलेला, माणूस माणुसकीसह स्वत:पासून तुटलेला (एकनाथ पाटील) अशी अवस्था आहे. शहरी लोक, कॉर्पोरेटस्, मल्टिनॅशनल कंपन्या खेडय़ातली शेते विकत घेत आहेत. त्यांच्या लेखी ती नुस्ती लँड आहे. वावर म्हणजे नुस्ती जमीन, नुस्ती लँड नाही हो सरकार (केशव खटींग). त्या जमिनीत शेतकऱ्यांच्या कित्येक पिढय़ांचा इतिहास, भूगोल, शास्त्रे, पुराणे असतात. पण लँड घेणाऱ्यांना त्याच्याशी कर्तव्य नसते. आज लिहिल्या जाणाऱ्या या कवितांमधून ग्रामीण परिसराचे, कृषिजीवनाचे जे चित्र उभे राहते ते अस्वस्थ करणारे आहे. आज शेतकऱ्यांच्या आयुष्यावर विषारी सावली पसरली आहे, असे कवी सांगतो (अविनाश साळापुरीकर).
या पिढीतल्या कवींना आजचे अत्याधुनिक जगणे कसे दिसते? या जगण्याशी आणि जगाशी आपला काही संबंध राहिलेला आहे का? की आपण कमालीचे दूरस्थ, तटस्थ झालो आहोत? विमाने टीव्हीत उडाली/ माझ्यात नाहीत/ टॉवर्स टीव्हीत कोसळले/ माझ्यात नाहीत/ माणसे टीव्हीत मेली/ माझ्यात नाहीत (श्रीधर तिळवे). टेक्नॉलॉजिकल क्रांतीने माणसांना अलिप्त, कोरडे करून टाकलेले आहे. कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे वागणे, मोठमोठय़ा शब्दांची पोपटपंची करणे, काहीही करणे शक्य नसले तरी ‘हे करू, ते करू’ म्हणणे- एवढेच खरे तर शक्य आहे. चल, उज्ज्वल परंपरा पुष्ट करू! रांगा लावून मतदान करू, राजकीय हक्क बजावू, जागरूक नागरिक बनू, वाहतुकीचे नियम पाळू, कंडोम वापरून जनसंख्या रोखू, सत्याग्रह करू.. यांव करू, त्यांव करू (प्रवीण दशरथ बांदेकर). महानगरातल्या कवींना शॉिपग मॉलचे भयावह जग दिसत असते. वस्तूंनी वेढलेल्या या जगात आपणही विकायला ठेवलेल्या वस्तूसारखे आहोत असे वाटायला लागते. बाजारपेठेच्या समाज-अर्थव्यवस्थेत व्यक्तीही वस्तुरूप बनतात, हे नवे वास्तव कवी अनुभवत असतात (हेमंत दिवटे). या पिढीतल्या कवींना नव्या ग्लोबलाइज्ड जगाचे एखाद्या दु:स्वप्नासारखे रूप दिसते असते. राजकीय, आíथक, औद्योगिक, वित्तीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक सत्ता वेगवेगळी रूपे घेऊन येत असते याचे भान आजच्या कवीला आहे. ही सत्ता गाजवणारा पुरुष कोणत्या रूपात कधी येईल, हे सांगता येत नाही. वर्तमानाच्या रंगमंचावर आलेला हा सत्तापुरुष वराह अवताराचा क्लोन आहे की परशुरामाचा क्लोन आहे, याविषयी कवीच्या मनात संभ्रम आहे. मात्र, लोक अशा सत्तापुरुषाची वाट पाहत असतात, तो आला की पृथ्वीवर आनंदाचे, समृद्धीचे, सुखाचे राज्य निर्माण होईल असे त्यांना वाटत असते (मंगेश नारायणराव काळे). तो खरे तर त्यांचा भ्रमच असतो. त्याच्याविषयीच्या प्रसारमाध्यमांनी उत्पन्न केलेल्या प्रतिमांना तो भुलतो. तो आपल्याला वाचवणारा, आपला त्राता आहे असेच त्यांना वाटत असते. लोक असे आपल्या ताब्यात आल्यानंतर तो आपल्या लीलांचा आविष्कार करू लागतो. आजच्या कवीला धर्मविद्वेष आणि त्यामुळे होणारी सामान्यांची वाताहत याची कल्पना आहे. दोन वेळच्या दाल-चावलची सोय लावताना चालवलेली तंगडतोड, एकवेळची शांत झोप मिळवण्यासाठी चालवलेला आकांत (वर्जेश सोलंकी).. असे दैनंदिन आयुष्य चाललेले असताना कोणीतरी दोन भिन्नधर्मी मित्रांच्या वेगळेपणाची पत्रके फिरवत असतो, हे कवीला ठाऊक आहे. नव्या पिढीतल्या कवीला अद्यापही पाण्याविषयी प्रश्न पडतात. तो विचारतो : पाणी स्पृश्य असतं की अस्पृश्य? पाणी अगोदर जन्माला आलं की ब्रह्म? पाणी ब्राह्मण असतं की क्षत्रिय की वैश्य, पाणी शूद्र अस्तं की अतिशूद्र? शेवटी कवी विचारतो, पाणी निव्वळ पाणीच असू शकत नाही का? या वर्तमानात? (दिनकर मनवर). वर्तमानातल्या या कवींना राजकारण कुठपर्यंत पोचलेले आहे याचीही विदारक जाणीव आहे. कवी एक उदाहरण सांगतो : स्वयंघोषित झोटिंगशाहीच्या या कृपाळू दरबारात, हात उंचावून दाद मागणारा एक बावळट इसम, बायका-मुलांसह गायब झाला काल रात्री अचानक (वीरधवल परब). आजच्या या आíथक-राजकीय अवस्थेत दाद मागणाऱ्यांची स्थिती काय होत असते, हे क्रूर सत्य कवीने सांगितले आहे. वर्तमान वास्तवाचे अनेक पलू कवींनी व्यक्त केले आहेत. या समाजव्यवस्थेत स्त्रीचे स्थान काय आहे, याचे नवे भान कवयित्रींना आलेले आहे. एका कवयित्रीने म्हटलेले आहे : बाप्ये शोधतात रोज नवा व्हायरस, बायांच्या फाइल्समध्ये सोडण्यासाठी, बायांना आता करावी लागेल, त्यांच्या जगण्याची चौकट, व्हायरस-फ्री आणि जमलंच तर बदलूनही टाकावी लागेल, हार्डडिस्क, बाप्यांनी तयार केलेली.. त्यांच्यासाठी (नीरजा). आपल्या असण्याच्या, आपली ओळख करून घेण्याच्या शोधयात्रेत स्त्रिया सामील झालेल्या आहेत, हे दुसऱ्या एका कवयित्रीने (प्रज्ञा दया पवार) सांगितले आहे. पुरुषकेंद्री पितृसत्ताक समाजव्यवस्थेत पुरुषाचे मालकात आणि स्त्रीचे गुलामात रूपांतर झालेले असते. ‘बाई ओलांडते बाईपणाच्या मर्यादा, बाई नाकारते आपण गुलाम असल्याचं’ असे विधान विविध कवितांमधून कविता महाजन यांनी केलेले आहे.
ऐंशी-नव्वदची दशके हा जागतिक अर्थव्यवस्थेतला एक महत्त्वाचा टप्पा होता. त्याचे परिणाम पुढल्या दोन दशकांवर झाले. महानगरांपासून ग्रामीण परिसरापर्यंत सर्वत्रच निर्णायक बदल होत गेले. कवींची पिढी या प्रक्रियेतून जात होती. कवींच्या भोवती जे राजकीय- सामाजिक- आíथक- धार्मिक पर्यावरण असते, त्याचे प्रभाव त्यांच्या अभिव्यक्तीवर होत असतात. हे कवी या वर्तमानाची स्थिती केवळ सांगत नाहीत, तर प्रश्न उपस्थित करतात. वर्तमान समाजव्यवस्थेचे रूप कवींना कसे दिसते, हे समजण्यासाठी एक कविता संपूर्ण उद्धृत करतो :
कमल महाआरती कर
रझिया महानमाज पढ
गौतम पाटलाच्या घरी जा
गाईला गवत घाल
डेव्हिड कबूतरं उडव
करीम मंदिर बघून ठेव
छगन मशीद बघून ठेव
एकमेकांचे धर्म बघा, जाती बघा
एकमेकांचा द्वेष करा
दगडं डोक्यात घाला
दगड आणा दगड घाला (अरुण काळे)
कवीने काय करायचे असते? मला वाटते, की या कवितांमधून भोवतीच्या कृत्रिम कोलाहलाला चिरून टाकणारा धारदार स्वर आहे. भोवतीच्या कानठळ्या बसवणाऱ्या शांततेत मराठी कवी बोलत आहेत. तो विवेकाचा स्वर आहे. तो क्षीण आहे, मंद आहे, अस्फुट आहे असे आपल्याला वाटते. कारण भोवतीच्या कोलाहलाने आपल्या कानात दडे बसलेले आहेत. कवीने काय काम करायचे असते? आपल्या भोवतीच्या जगण्यासंबंधीच्या आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करायच्या असतात. त्याचे लिहिणे हेच त्याचे बोलणे असते. सर्वत्र हरवत चाललेला विवेकाचा स्वर त्याच्या शब्दांतून ऐकू आला पाहिजे.