scorecardresearch

आय. टी. युगाची गोष्ट…

चेक-इन करून नेमलेल्या गेटवर जाऊन बसलो. रात्रीचा १ वाजला होता. ४.३० ची ब्राझिलची फ्लाइट होती. आजकाल तर अर्धी बॅग कायम भरून तयार असते. पण रात्रीचं जेवण होईपर्यंत उरलेल्या बॅगेला काही हात लागत नव्हता. दुपारी आधी ऑनलाइन चेक-इन करून घेतलं, तेव्हाच मी जात असलेल्या शहराचं हवामानही पाहून घेतलं होतं.

चेक-इन करून नेमलेल्या गेटवर जाऊन बसलो. रात्रीचा १ वाजला होता. ४.३० ची ब्राझिलची फ्लाइट होती. आजकाल तर अर्धी बॅग कायम भरून तयार असते. पण रात्रीचं जेवण होईपर्यंत उरलेल्या बॅगेला काही हात लागत नव्हता. दुपारी आधी ऑनलाइन चेक-इन करून घेतलं, तेव्हाच मी जात असलेल्या शहराचं हवामानही पाहून घेतलं होतं. त्यानुसार लाइट विंटर जॅकेट नेऊन पुरणार होतं. बाकी नेहमीसारखं सवयीनं सगळं पटापट भरून घर सोडलं होतं. चेक-इन करून इंटरनॅशनल एअरपोर्टवर बसलं की पुढचं सगळं दिसायला लागतं.. जागरणं, नॉनस्टॉप प्रवास किंवा ब्रेक जर्नीमधले ओळखीचे एअरपोर्ट्स, अनेक एअरलाइन्सचे पाठ झालेले मेन्यू, जेट लॅग! कल्पनेनेच थकायला होतं. पुढचा सगळा वेळ हमखास एक भकास रितेपणा यायला लागतो. आणि तेव्हा मग हटकून पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची आठवण होते.
साल १९८८. आय. टी. नोकरीतली माझी पहिली परदेशवारी. सहा महिने हॉलंडला जायचं होतं. पहिल्यांदा मॅनेजरनी बोलावून आमच्यापैकी काहीजणांना हे सांगितलं तेव्हा आनंदाचे नुसते उमाळे आले होते. हॉलंड एम्बसी कुठं आहे, इथपासून तयारीला सुरुवात होती. व्हिसासाठी कसं अप्लाय करायचं, बरोबर सामान काय न्यायचं, ही तर फारच दूरची गोष्ट. कुणाच्यातरी डोक्यात आलं- हॉलंडला जातोच आहोत, तर युरोपही पाहता येईल. मग जर्मनी आणि फ्रान्सचेही व्हिसा घेतले. त्याकाळी बेनेलक्स व्हिसा मिळायचा, बेल्जियम- नेदरलॅन्ड्स- लक्झेम्बर्ग अशा तीन देशांचा. तोपर्यंत लक्झेम्बर्ग नावाचा देश असतो, हेदेखील माहीत नव्हतं!

जाण्याची तयारी मोठी बॅग घेण्यापासून होती. बरं, तिकडच्या हवामानाला लागतील असे कपडे कोणते आणि ते कुठे मिळतील, इथपासून आमची सगळ्यांचीच सुरुवात होती. थर्मल्स म्हणजे काय हे आधी नीटसं कळलं नाही. थर्मल्स हा प्रकार पहिल्यांदा पाहणं आणि तो घालणं, हे दोन्ही विलक्षण अनुभव आहेत. आज आय.टी.तल्या माझ्यासारख्या अनेकांच्या मुंबई-पुण्यातल्या घरात हेवी स्नो जॅकेट्सपासून ट्रेंचकोटपर्यंत बरेच प्रकार पाहायला मिळतात. तेव्हा परदेशी जायचं ठरलं की गाडी शिकून लायसन्स घेणं, असा प्रकार होता. आणि एकदा लायसन्स मिळालं, की मग एका दिवसात आय.डी.पी.! त्याच्या बळावर परदेशात गाडी चालवायची. म्हणूनच त्याकाळी परदेशात एखादा ट्रॅफिक रूल मोडणारा कुणी सापडला, तर तो नवशिका भारतीयच असेल, हे पोलिसांना खूप अंगवळणी पडले होते.
सहा महिने हॉलंडच्या एका छोटय़ा गावात आम्ही आठजण एकत्र राहिलो. एका घरात! सहा मुलं आणि दोन मुली! त्यातली एक नवविवाहित. आमच्यातली एक मुलगी आणि मुलगा ख्रिश्चन आणि एकजण मुसलमान. घरात एक बाथरूम, एक संडास. जवळजवळ सगळ्यांची बाहेर राहण्याची ही पहिलीच खेप. आठातल्या चार- जणांना स्वयंपाक येत होता. आणि दोघांना ड्रायव्हिंग.
इथे अनेक स्तरांवर अ‍ॅडजस्टमेंट्स कराव्या लागल्या, सर्वानाच. खाण्याच्या आवडी-निवडीपासून ते गाडी कोण चालवणार, टीव्ही प्रोग्रॅम्स कुठले पाहायचे, वीकएण्डला कुठं जायचं इथपर्यंत. सगळीकडे घर्षण, ठिणग्या आणि कधी कधी भडकाही. गावातली दुकानं सहा वाजताच बंद व्हायची. सामानसुमानाची सगळी खरेदी त्यामुळे संध्याकाळी लगेच आटपावी लागायची. भाज्या मिळायच्या त्याही मोजक्या चार-पाचच. कोबी, फ्लॉवर, फरसबी आणि ढोबळी मिरची अशा. एकंदर हे आठजणांचं सहजीवन म्हणजे आनंदच होता.
त्याकाळी लॅपटॉप आणि इंटरनेट नव्हतं. त्यामुळे संध्याकाळी रोज भरपूर एकत्रचा वेळ. ही गोष्ट चांगलीही आणि वाईटही. तुम्ही अमेरिकेतल्या न्यूयॉर्क-शिकागोसारख्या एखाद्या मुख्य शहरात असाल तर करण्यासारख्या खूप गोष्टी असतात आणि त्या स्वतंत्रपणे करताही येतात. पण हॉलंडसारख्या देशाच्या एखाद्या छोटय़ा गावात दिवस सहा वाजताच संपतो. त्यात गावात इंग्लिश जाणणारे लोक दुर्मीळच, आणि लवकरच सगळी सामसूम होते. मग उरलेला दिवस खायला उठतो. विशेषत: तुमचं वय २६-२७ असेल आणि तुम्ही संसारी झाला नसाल तर!
एकत्र राहण्याचे आणि अ‍ॅडजस्टमेन्टचे मात्र खूप धडे मला इथे मिळाले. ‘सर्वधर्मसमभाव’च नाही तर ‘सर्वकाही समभाव’ या तत्त्वावर जगायला शिकलो. घरात आई-वडिलांबरोबर राहताना आपण किती गोष्टी गृहीत धरतो, ते कळलं. साधं रोज पानात येणारं जेवण कसं बनतं, त्यामागे काय काय असतं, याचा कधी विचारच केलेला नसतो. हॉलंडहून परतल्यावर मात्र पहिली गोष्ट काय केली असेल, ती म्हणजे रीतसर स्वयंपाक शिकून घेणं. त्यानंतरच्या कुठल्याही दीर्घ परदेश वास्तव्यात माझे खाण्याजेवणाचे हाल कधी झाले नाहीत, आणि संध्याकाळीही कधी अंगावर आल्या नाहीत.
त्याकाळी काय कामासाठी परदेशी जायचंय, हा प्रश्नच मनात नाही यायचा. बस्स, परदेशी जायचंय! परदेशी म्हणजे कुठं जायचंय, हाही प्रश्न मनात नाही यायचा. बस्स परदेश! आम्ही काम करीत असलेली संगणक भाषा आणि पॅकेज फारच वेगळं होतं. पण त्याला डिमांड किती आहे, त्याचा माझ्या करिअरला पुढे काही फायदा होईल का, त्याच्यामुळे पुन्हा परदेशवारी घडेल का, असले कसलेच प्रश्न तेव्हा मनात नाही आले. माझ्याही आणि माझ्याबरोबरच्यांच्याही.
आम्ही सुरुवात केली ती भल्यामोठय़ा मेनफ्रेम कम्प्युटर्सवर. ते सगळं प्रकरण खर्चिक आणि वेळखाऊ होतं. त्यामुळे कागदावर आधी सगळा प्रोग्रॅम चोख लिहून न्यायचा, मग आपली संगणक वापरायची टर्न आली की तो इनपुट करायचा. बारीकशी चूक झाली की कम्प्युटर तुमचा प्रोग्रॅम बाहेर ओकणार, मग शिव्या पडणार, असा एकंदर खाक्या होता. वर आपली पुढची टर्न येईपर्यंत थांबणं आलंच. एकंदरच त्या काळात ‘कम्प्युटर टाइम’चं कडक ‘रेशनिंग’ होतं. ज्याचा प्रोग्रॅम फर्स्ट शॉट ‘ओके’ होईल तो जिनिअस मानला जायचा. अशांकडे बाकीचे खूप आदराने बघायचे. पुढे प्रचंड स्पीडचे कॉम्पॅक्ट कम्प्युटर्स आल्यावर कम्प्युटर टाइम ही संकल्पनाच कालबाह्य़ झाली. टाईपरायटर्स कालबाह्य़ झाले तसे.
आय.टी.तली पहिली नोकरी कशी मिळाली? १९८०-८५ च्या काळात मोजक्या कंपन्या होत्या. त्यांचे कॅम्पस इंटरव्ह्य़ूज किंवा मग त्यांच्या नोकरीच्या जाहिराती. मग एखाद्या कॉलेजात लेखी प्रवेश परीक्षा. शेकडय़ांनी उमेदवार. सगळी इंजिनीअर मंडळी. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्रॉडक्शन इंजिनीअरिंग केलेले. त्यातील मग १००-१५० मुलं निवडून त्यांची मुलाखत. त्यातून मग २०-२५ जणांची बॅच निवडत. तेव्हा फक्त सिव्हिल इंजिनीअर मंडळी आपल्या विद्याशाखेशी संबंधित सिव्हिलच्या नोकऱ्या घ्यायची.
आयटीची डिमांड वाढत गेली आणि शेकडय़ांनी लोक घेण्याची वेळ आली आणि मग एक एक उमेदवारामागे इतका वेळ आणि सोपस्कार करत बसायला वेळ पुरेनासा झाला. तेव्हा मग ‘वॉक-इन  इंटरव्ह्य़ूज’ आले. वॉक-इन्च्या दिवशी मग एखादा बाजार लागतो तसा माहोल असायचा. एखाद्या शनिवार किंवा रविवारसाठी जाहिरात दिली जायची, कंपनीतल्या सगळ्या वरिष्ठांना वेठीस धरलं जायचं. हजारो मुलं त्या दिवशी यायची. त्यांचे रेझ्युमे पटापट निवडून फटाफट दोन इंटरव्ह्य़ूज आणि मग निर्णय. जास्तीत जास्त जण कमीत कमी वेळात मिळवणं, हा यामागचा हेतू. विशेषत: प्रॉजेक्ट्स मिळालेले आहेत, पण हाताशी माणसं नाहीएत, अशा स्थितीत वॉक-इन्ला पर्याय नसायचा. झपाटय़ाने वाढत गेलेल्या या इंडस्ट्रीत मग लोकांचा करिअरचा आलेखही झपाटय़ाने वर चढू लागला. दोन वर्षांत टीम लीड, चार वर्षांत प्रॉजेक्ट लीड, सहा-आठ वर्षांत प्रॉजेक्ट मॅनेजर.. सगळ्याचीच तेजी होती. बदलते तंत्रज्ञान आणि वाढती मागणी यामुळे संधीसाधूपणा आणि हव्यासाची खूप बीजं या उद्योगक्षेत्रानं आपल्याकडं रोवली. लक्षावधी डॉलरचे प्रॉजेक्ट्स जेव्हा आ वासून थांबलेले असतात, तेव्हा मग त्या तंत्रज्ञानाची माणसं तात्काळ हवी असतात, आणि त्यांना मूँहमांगी किंमत दिली जाते. संधीसाधूपणा आणि हव्यासाबरोबर सतत एका नोकरीतून दुसरीत उडय़ा मारणं आलं. त्यात कहर म्हणजे एखाद्यानं चार-पाच र्वष एकाच ठिकाणी नोकरी केली असेल तर त्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, असं समजलं जाऊ लागलं. मॅनेजर म्हणून असे डिलिव्हरी प्रॉजेक्ट्स मॅनेज करणं, हे प्रचंड दिव्य! आज टीममध्ये पन्नास माणसं आहेत, तर उद्या तीसच असतील. कुणीतरी दुसऱ्या कंपनीने एका फटक्यात वीसजण उचललेले असायचे. आमच्यातल्या बऱ्याच जणांचे तिशीत केस पांढरे झाले आणि बी.पी. वाढलं ते याच्याचमुळे. खरं तर आमच्या पिढीतल्या अनेकांनी डिलिव्हरी प्रॉजेक्ट्सना ऐन उमेदीत रामराम ठोकला, तो याच प्रकारामुळे. कायम माणसं मिळवण्याचं टेन्शन. बऱ्याच कंपन्यांनी नंतर नंतर आपली काही सीनिअर आणि तशी उताराला लागलेली माणसं मग केवळ या कामाला लावली- माणसं मिळवा!
अलीकडं ब्राझिलला गेलो ते एका प्रख्यात भारतीय संगणक कंपनीच्या तिथल्या शाखेत. काळ किती बदलला होता! तिथे पाहतो तर सगळी सूत्रं भारतातून हलत होती. तिथली माणसं फक्त वरकड सांगकाम्याची कामं करीत होती आणि सगळे व्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकारी भारतातले! ही खरोखरच थक्क करणारी गोष्ट होती. आय.टी. जगतात केवढा प्रवास झालाय भारताचा. आपण आता कामं घेऊन इतर देशांना आऊटसोर्स करतोय किंवा ते आपलं ऑफशोअर झालंय.
१९८० च्या सुमारास बॉडीशॉपिंग करत आपली सुरुवात झाली. कुठल्याही छोटय़ा-मोठय़ा कामासाठी माणसं पाठवायची. अमेरिकेत कम्प्युटर्समधल्या मंडळींची गरज वाढायला लागली तसं बॉडीशॉपर्सचं पीक आलं. माणसांची दलाली. नुसते रेझ्युमे आणि प्राथमिक चाचणी करायची आणि मोठय़ा कंपन्यांना माणसं पुरवायची. काही कंपन्यांनी अमेरिकेतच ऑफिस उघडलं आणि भारतातले हे दलाल डायरेक्ट या अमेरिकन कंपन्यांना माणसं पुरवू लागली. अनेक जणांनी हा दलालीचा धंदा घरबसल्या फोनवर केला. आधी लोक बिझनेस व्हिसावर परदेशी जाऊन कामं करायचे, जे खरं तर कायद्याविरुद्घ होतं. खरं काम करायचं तर वर्क परमिटवर जायला पाहिजे. सुरुवातीला जाणाऱ्या लोकांना याची काहीच कल्पना नव्हती. नंतर मग लोक शहाणे झाल्यावर कंपन्यांनीही हा प्रकार बंद केला. मग छ1 व्हिसा आले. त्यावर तीन वर्षांसाठी तुम्ही उजळ माथ्यानं काम करू शकता. त्यानंतर मग रीतसर ऌ1 व्हिसा आला. हे खरं वर्क परमिट. याचा मग भारतासाठी कोटा आला.
आपली माणसंही परदेशी जायला उत्सुक. त्यामुळे अनेक भारतीय आय.टी. कंपन्यांनी दरडोई कमिशन मिळवत आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली होती. पण शेवटी भारतीय माणूस हुशार. अशी माणसं पाठवत वरकड कामं करत राहण्यात काही राम नाही, हे लगेचच जाणलं. राजीव गांधी आणि सॅम पित्रोडांमुळे आय.टी. आणि कम्युनिकेशनची दारं उघडी झाली आणि आपले लोक भारतात बसून अमेरिकन आणि इतर पाश्चात्त्य देशांच्या संगणकांवर काम करू लागले. आपलं इंग्लिश भाषाप्रेम असं फळाला आलं.
त्यामुळे आयटीमधली नोकरी म्हणजे परदेशवारीची खात्री-असा एक काळ आला. ती परदेशवारी म्हणजे अमेरिकाच असं सुटसुटीत समीकरणही काही काळ झालं. याबाबत खूप वेगवेगळे अनुभव मला आले. मी एका यूकेमधल्या प्रॉजेक्टसाठी इंटरव्ह्य़ूज् घेत होतो, तेव्हा अगदी दोन-तीन वर्षे अनुभव असणाऱ्यानेही, ‘मला यूकेला जायला लागेल का?’ असं नाराजीने विचारलं होतं, तेव्हा मीच उडालो होतो. नंतर अमेरिकेतल्या, तुलनेने लहान शहरातल्या प्रॉजेक्टसाठी इंटरव्ह्य़ू घेताना एकाने ‘लंडन, दुबई चालेल, पण अमेरिकेतलं लहान शहर नको, तिथे ऑफिस अवर्सनंतर काहीच लाइफ नसतं’, असं स्वच्छ सांगितलं होतं. एकंदर मित्रमंडळी, बाकीचे कलीग्ज, इंटरव्ह्य़ू घेताना कुठे पोस्टिंग होणार यामुळे अन्य देश, तिथलं राहणीमान यांच्याबद्दलचं अवेअरनेस खूप आला आणि अगदी फ्रेशर्सही चूझी झाले. त्यामुळे पाच-दहा र्वष अनुभवी मंडळी इंटरव्ह्य़ूज् घेऊन आली की ‘काय ही आताची मुलं, काय क्लॅरिटी असते यांना!’ असा सूर त्यांच्यात लागे. थोडक्यात, आयटीमधली जरा सीनियर मंडळी ‘आमच्या वेळी आणि आता’ ही भाषा फार लवकर बोलायला लागली. एकंदर आयटीत तुम्ही फार पटकन म्हातारे होता असं नेहमी म्हटलं जातं, ते काही उगाच नाही.
सुरुवातीला सगळी मेंटेनन्सची कामं यायची- विमा, बँकिंग अशा बलाढय़ क्षेत्रांतल्या प्रचंड सिस्टीम्स मेनफ्रेम संगणकांवर चालत्या ठेवणं, आणि त्यात छोटेमोठे बदल करत राहणं अशा प्रकारची. ऑनसाइट-ऑफशोअर मॉडेलचा जन्म इथूनच झाला. आपल्यातल्या काही जणांनी अन्य देशांत जाऊन काम करायचं (ऑनसाइट) आणि भारतातल्या टीमबरोबर (ऑफशोअर) को-ऑर्डिनेशन करायचं, त्यांना कामं पाठवायची, त्यांच्याकडून कामं करून घ्यायची, असं ते मॉडेल. आपली भारतीय मंडळी भारतात बसून अमेरिकेसारख्या देशाच्या संगणकांवर कामं करताहेत, हे दृश्य दिसू लागलं.
या ऑनसाइट ऑफशोअर प्रकाराला अनेक छटा होत्या. सुरुवातीच्या काळात ऑनसाइटचा दरारा असायचा. ऑनसाइटहून फोन, ऑनसाइटशी कॉन्फरन्स कॉल, ऑनसाइटला स्टेटस रिपोर्ट देणं म्हटलं की त्या दिवशी वातावरण तंग असायचं. मग हे ऑनसाइट म्हणजे पलीकडं प्रत्यक्ष एखादा गोरा कस्टमर असायचा. किंवा मग त्याच्या वतीनं कामाची प्रगती विचारणारा आपलाच कुणी हिरा असायचा. ऑनसाइटला जाऊन बसलेली भारतीय मुलं ही कालांतराने क्लायंटचंच प्रतिनिधित्व करू लागली. तो त्यांचा अस्तित्वाचा भाग झाला. मी ऑनसाइट आणि ऑफशोअर अशा दोन्ही भूमिका केल्या. त्यामुळे ‘आपण’ आणि ‘ते’च्या बदलत्या सीमारेषांचा खेळ जवळून पाहता आला.
यात आणखीन एक वेगळीच गोष्ट पुढे आली. एकंदरच सगळ्यांचे डोळे परदेशाकडे लागलेले असतात. कसं जायला मिळेल, कधी जायला मिळेल? नव्या प्रोजेक्टवर सगळ्यांचाच डोळा असायचा. कारण बऱ्याचदा सुरुवात काहीजणांची ऑनसाइट (परदेशी) जाऊन काम समजून घेण्यानं व्हायची. सुरुवातीच्या काळात ऑनसाइटसाठी निवड व्हायचे निकषही गमतीदार होते. स्पष्टपणे संगतवार विचार मांडणाऱ्यांना, चटपटीत बोलणाऱ्यांना, वेगळ्या संस्कृतीतल्या लोकांबरोबर वावरू शकणाऱ्यांना, कुठेही जमवून घेणाऱ्यांना प्राधान्य मिळायचं. परदेशी माणसांबरोबर रोजचा व्यवहार करायचा, तिथली संस्कृती, कामं समजून घ्यायची आणि तिच्यात अ‍ॅडजस्ट व्हायचं, राहायचं आणि मग आपल्या भारतीय बांधवांना कामं पाठवून त्यांच्याकडून ती शिताफीने करून घ्यायची, ही तारेवरची कसरत असायची. आणि ती अर्थातच सगळ्यांना नव्हती जमत. बरीचशी टेक्निकली दादा असणारी, पण आपल्याच जगात रमणारी मुलं भारतातूनच काम करायची. मात्र, परदेशी क्लायंट मंडळींना भारतीयांच्या अफाट टेक्निकल ज्ञानाचा आदर वाटण्यात याच लोकांचा हात मोठा असायचा.
हे चित्र नंतर बदलत गेलं. जसजशी आपली कामात प्रगती होत गेली, प्रोजेक्टची संख्या आणि त्यांचा आवाका वाढत गेला, आणि प्रोजेक्टवर काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढत गेली, तसं मग टेक्निकल, हुशार, पण फारसं बोलता न येणाऱ्या मंडळींचीही परदेशी जाण्यात वर्णी लागू लागली.
तशी एक-दोन मुलं मग मोठय़ा ग्रुपमध्ये खपून जात. परदेशीयांचाही भारत देश आणि भारतीय लोकांवरचा, त्यांच्या कुवतीवरचा विश्वास दृढावला आणि संवादाची नवी दारं उघडली. संबंधांना पार्टनरशिपचं स्वरूप येऊ लागलं. आपसी सामंजस्य खूपच वाढलं. आमचे अनेक अमेरिकन सहकारी आठ-दहा मोडकीतोडकी हिंदी वाक्यं बोलायला लागले. पालक पनीर आणि छोलेच्या रेसिपीज् विचारायला लागले. खासकरून व्हेजिटेरियन पंथ स्वीकारणारे. या मंडळींना भारतीय  स्वयंपाकातला शाकाहाराचा खजिना अचंबित कारायचा. काही सहकारी दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला लागले. आता तर व्हाइट हाऊस ऑफिशिअली दिवाळी साजरं करतं.
बॉडी शॉपिंग कमी होऊन जसजशी अधिक कामं भारतात येऊ लागली, तसं अमेरिकेतल्या अनेक कंपन्यांना भारतात कामं पाठवून कॉस्ट कटिंगचे वेध लागले. पण हे सगळं नवं असल्याने प्रचंड भीती असायची. भारताबद्दल फार माहितीही नसायची. अगदी १९९५ सालीही हीच स्थिती होती. अनेकांना भारत देश म्हणजे फक्त हत्ती आणि गारुडय़ांचा देश वाटायचा. अशामुळे ही मंडळी भारत देश आणि इथली परिस्थिती प्रत्यक्ष बघायला यायची. आपण काम पाठविणार तो देश आणि ती कंपनी आहे तरी कशी? कस्टमर व्हिजिट हा मग एक स्वतंत्र चॅप्टर असे.
हे म्हणजे कुणी पाहुणे घरी येणार असतील तर आपण कसं त्यांना सगळं चकाचक दिसावं याचा आटोकाट प्रयत्न करतो, तसं. त्या दिवशी मग जणू सोहळाच असायचा. याची तयारी दोन-तीप आठवडय़ाआधीपासून सुरू व्हायची. सुरुवातीलच्या दिवसात तर खुद्द एम. डी. किंवा सी.ई.ओ. सगळी सूत्रं हाती घ्यायचे. क्लायंटचा अख्ख्या दिवसाचा कार्यक्रम आखला जायचा. आदल्या दिवशी विमानतळावर आगमन, हॉटेलचा प्रवास, दुसऱ्या दिवशी त्यांना रिसीव्ह करायला कोण जाणार, त्यांना कुठल्या गाडीतून आणायचं, त्यांना कुठल्या रस्त्यानं आणायचं (शक्यतो बरे रस्ते असावेत, खड्डे आणि बाहेरील दृश्य या दृष्टीने), ऑफिसात त्यांना नेमकं कुठे बसवायचं, कुठं कुठं न्यायचं- सगळ्याची पूर्वतयारी. गाडी ऑफिसला पोचण्यापूर्वी तेथील आसपासच्या भटक्या कुत्र्यांना हाकलून देण्याचाही समारंभ असायचा. गेटवर सिक्युरिटीला आधीच सूचना दिलेल्या असायच्या, कडक तपासणी करायची, कस्टमर इम्प्रेस झाला पाहिजे.
खरी पंचाईत ऑफिसमध्ये असायची.  संगणकांवर काम करण्यात हुशार असणारी अनेक मंडळी इथे फार कामाची नसत. इथे ‘मॅनेजिंग द क्लायंट’ हे स्किल आवश्यक असायचं. गप्पा, विनोद, ऊठबस करता येणं, संवाद चालू ठेवणं, तो कुठे चालला आहे, यावर नियंत्रण ठेवणं, अवघड प्रश्नांना शिताफीनं बगल देणं किंवा छान अर्धसत्य सांगणं- अशा कौशल्यांची येथे गरज असायची. त्यामुळे मग टेक्निकल, पण त्यातल्या त्यात बरी बोलू शकणारी पोरं निवडायची. त्यांची प्रेझेन्टेशन्स पाहायची, त्यांची तयारी करून घ्यायची. आणि ही  मुलं प्रेझेन्ट करत असताना मग या इतर सगळ्या गोष्टी सराईत मंडळींनी सांभाळून घ्यायच्या.
दिवस संपला की संध्याकाळी कस्टमरला बाहेर जेवायला घेऊन जाण्याचा समारंभ असायचा. यासाठी चढाओढ कशाची लागावी? या समारंभाला बगल देण्याची! सीनिअर मॅनेजमेंटपैकी कुणालाही या गोष्टी करायच्या नसत. परदेशी लोकांबरोबर एक संध्याकाळ. त्यात मग सगळं आलं. दिवसभराच्या अनुभवाबद्दल डायरेक्टली न बोलता त्यांना नेमका अनुभव कसा वाटला, हे जाणून घ्यायचं, त्यांच्याशी अखंड वेळ गप्पा मारायच्या, त्यासाठी योग्य विषय सुचणं, त्यांच्या देशाची थोडीबहुत माहिती असणं, आपल्या देशाची, संस्कृतीची बऱ्यापैकी माहिती असणं, काय खावं, खाऊ नये,ची माहिती त्यांना पुरवणं- अशी अनेक कौशल्यं आली. यामुळे एखाद्दोन जण आले असले आणि आमचे सात-आठ जण त्यांच्यासोबत असले, की त्यांच्या शेजारची खुर्ची टाळण्यासाठी चुरस असायची. कारण त्यांच्या शेजारी बसलं की ही सगळी जबाबदारी आली की तुमच्यावर! कस्टमरच्या शेजारचे त्यांना एंगेज करताहेत आणि आसपासचे इतर लोक आपापसातच गप्पा मारताहेत असं चित्र अनेकदा दिसायचं. आपल्या कंपन्या मोठय़ा झाल्या, अधिक काम घेऊ लागल्या आणि आपल्या कामाच्या पद्धती सुधारल्या, तसं हे चित्र नंतर झपाटय़ानं बदलत गेलं. १९९० च्या सुमारास काही कंपन्या खूपच मोठय़ा झाल्या, नावारूपाला आल्या. त्यांना टीयर-१ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तिथं कस्टमर व्हिजिट हे लवकरच रूटीन प्रकरण झालं.
मला आठवतं, एका सीनिअर कस्टमर बाईंबरोबर ब्रेकफास्ट मीटिंग ठरवली होती. पवई लेकसमोरचं हॉटेल. मीटिंग सुरू असतानाच बाई अचानक उठल्या आणि खिडकीपाशी गेल्या. आम्ही अचंबित! काय झालं, दोन मिनिटं काही कळलंच नाही. बाईंना लेकमध्ये चार- सहा म्हशी निवांत डुंबताना दिसल्या होत्या. त्यांना ते प्रकरण फारच इंटरेस्टिंग वाटलं होतं. त्यामुळे त्या चक्क मीटिंग सोडून ते पाहत राहिल्या होत्या. आम्ही  मनातल्या मनात कपाळाला हात लावला!
एकंदर भारतात कुठेही दिसणाऱ्या गायी-म्हशी-कुत्र्यांमुळे आपण आणि प्राणिजगत फार आपसी सामंजस्याने राहतो, असं अनेकांना वाटायचं. कस्टमरची पहिली भारत ट्रिप असेल (आणि त्यात केरळला जायला वेळ नसेल) तर त्यांना ‘खराखुरा’ हत्ती पाहायचा असायचा. आमचे मार्केटिंगवाले मग मुंबईतल्या आमच्या ऑफिससमोर हत्तीही उभा करायचे. पुढचा अर्धा तास हत्तीचं कौतुक. धारावीची ट्रिप करणं हाही त्यातलाच प्रकार. धारावी आणि तिथले लेदर गुड्स पाहून मंडळी तर फुल्ल वेडी व्हायची. आपल्या काही मानसिकता मात्र परदेशीयांना अजूनही कळणं कठीण असेल. मला आठवतं, मी अशाच एका ऑनसाइट कॉलवर होतो, यूके मंडळींबरोबर. आमचं त्या दिवशीचं काम होणार नव्हतं. कारण बंगलोरमध्ये रस्त्यावर नासधूस आणि दंगली चालू होत्या. पलीकडून विचारणा झाली, ‘काय झालं’ म्हणून. म्हटलं, ‘एक सिनेनट वारलाय.’ ‘त्याची हत्या वगैरे झाली का?’ म्हटलं, ‘नाही.’‘ मग अकाली वगैरे वारला का तो?’ म्हटलं, ‘नाही, चांगला वयस्कर होता. वृद्धत्वानं गेला.’ ‘ मग दंगल कसली?’ माझ्याकडं उत्तर नव्हतं. काय सांगणार मी? की आम्ही भावनिक आहोत म्हणून आम्ही आमचं प्रेम आणि आदर असा व्यक्त करतो? दंगली करून!
एकंदरच ज्या देशासाठी काम करायचं, तिथली संस्कृती, लोकांची मानसिकता समजून घेणं फार महत्त्वाचं झालं. त्यातून अनेक गमतीजमती कळल्या. अमेरिकन मानसिकता एका प्रकारची तर ‘गल्फ कण्ट्रीज’ हे वेगळंच प्रकरण! माझं पहिलं गल्फ एक्स्पोजर- मस्कत. नुकताच न्यूयॉर्कमध्ये दीर्घकाळ राहून परतलो होतो, १९९२ च्या सुमारास. अशा पाश्र्वभूमीवर मस्कतच्या कंपनीतल्या भारतीय मॅनेजरनी मला एक कानमंत्र दिला- तो अभूतपूर्वच होता- ते म्हणाले, ‘इकडे कसं असतं पाहा, गावात तू एखादी बैलगाडी पकडलीस स्टॅण्डवर जायला आणि गाडीवाल्याला विचारलंस, किती लांब आहे, तर तो सांगतो- हे काय इथंच, आलं बघा. पाच-दहा मिनिटांनी तुम्ही परत विचारता- आणखी किती लांब आहे, तर उत्तर तेच मिळतं- हे काय इथंच, आलं बघा. थोडक्यात, इथं प्रायॉरिटी आणि अर्जन्सी असं काहीच नाही. आता तो चहावाला पाहा. त्याला तू सांग- गव्हर्नर सुट्टीवर गेला आहे, जरा त्याच्या खुर्चीत जाऊन बैस, तर तो आनंदानं बसेल. आणि त्याहून मजेशीर गोष्ट म्हणजे कुणाला याचा पत्ताही लागणार नाही!’ आता मात्र गल्फमधलं चित्रही बदलताना दिसत आहे. गोष्टी जरा गतिमान होताना दिसताहेत.
यूकेमध्ये पब कल्चर कॉमन. तिथं कुठल्याही सेलिब्रेशनची पहिली आयडिया म्हणजे पबमध्ये थडकणं. दहा वर्षांपूर्वी यूकेमधल्या आमच्या एका प्रोजेक्ट मीटिंगमध्ये ऑनसाइट काम करणाऱ्या दोघा भारतीय मुलींनी अगदी खालच्या आवाजात मीटिंगच्या शेवटी सुचवलं होतं, ‘वी डोण्ट एन्जॉय गोइंग टू द पब! आपल्याला सलिब्रेशन म्हणून दुसरं काही करता येईल का?’ ब्रिटिश प्रोजेक्ट मॅनेजर त्यावर क्लीन  बोल्ड झाला होता! ‘डोण्ट एन्जॉय इन पब’ म्हणजे काय, तेच त्याला कळेना! आता अर्थात भारतातही काही स्तरांमध्ये परिस्थिती बदलते आहे. पब कल्चर अगदीच नवखं राहिलेलं नाही. मला मात्र या सगळ्यामुळे आपल्याला जगाच्या पाठीवरच्या किती बऱ्या-वाईट गोष्टींचं एक्स्पोजर किती कमी काळात मिळालं, असं वाटत राहतं. द. आफ्रिकेत प्रत्येक घराला इलेक्ट्रिक शॉक लागणाऱ्या तारांचं कुंपण आणि अनेकांकडे स्वत:ची गन पाहायला मिळाली. आणि जॉर्डनमध्ये एअरपोर्टपासून ते ट्रेनिंग रूमपर्यंत- सगळीकडे अनेकांना स्मोकिंग करताना पाहिलं. प्रत्येकासमोर पाण्याचा ग्लास असावा तसा अ‍ॅश ट्रे ठेवलेला असायचा. आयटी नोकरीने पैसा दिला, तसंच हे सगळं दिलं, असंही वाटत राहतं. आणि एअरपोर्टवर चेक इन केल्यावर चाळिशीतच प्रचंड नॉस्टॅल्जिक होणंही दिलं.
मला आठवतं, १९९६ साली एका नव्या कंपनीत लागलो आणि लगेचच एक नवा प्रोजेक्ट मिळाला. या प्रोजेक्टचं वैशिष्टय़ असं होतं की, हा आमच्या कंपनीतला पहिला नॉन-मेनफ्रेम प्रोजेक्ट होता. प्रथमच विन्डोज, ग्राफिक्स आणि लेझर प्रिंटर या प्रोजेक्टच्या रूपाने कंपनीत आले. तोवर कंपनीतले सगळे मेनफ्रेमवर कामं करायचे. तिथं अक्षरं आणि आकडे याव्यतिरिक्त काही दिसायचं नाही. ती अक्षरं, आकडेही हिरवे. आमचे नवे संगणक, त्यावरचं विंडोज् रंगीत ग्राफिक्स आणि लेझर प्रिंटरनं सगळ्यांचाच जळफळाट झाला. तोपर्यंत एखादा रेझ्युमे बनवायचा आणि तो प्रिंट करायची सुविधा फक्त एच. आर. आणि एम. डी.च्या सेक्रेटरीकडे होती. आमच्या प्रोजेक्टच्या आसपास मग अनेक मुलं घुटमळायची, ग्राफिक्स पाहायला. आणि जमलं तर रेझ्युमे बनवून तो प्रिंट करायला. मला आठवतं, आमच्या डी. जी. एम.नं आमच्या प्रोजेक्टच्या आवारात एक नोटीसच लावली होती की, कुणीही कामाशिवाय इकडे उगाच घुटमळू नये. आता हे सगळं आठवलं की, हसू येतं. आजकाल दुसरी-तिसरीतली मुलंही शाळेच्या प्रोजेक्टसाठी कलर प्रिंटआऊट्स घेताना दिसतात.
१९९८-९९ हा वायटूके (८2‘) चा काळ. सगळ्या जगाच्या सिस्टीम्समध्ये तारखेतील वर्ष दोन अंकी स्वरूपात स्टोअर केलेलं होतं. त्यामुळे २००० साली ते ०० होऊन तारखेवर अवलंबून सगळी गणितं चुकली असती. यासाठी जे बदल करायचे होते, त्याचं अमेरिकेतलं प्रचंड काम आपल्याकडं आलं आणि आपण अक्षरश: वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. केवळ कागदावरचा रेझ्युमे आणि एक टेलिफोनिक इंटरव्ह्य़ू, एवढय़ावर अमेरिकन व्हिसा पदरात पडायला लागला. त्या काळात देशाची आणि आय. टी. करिअर म्हणून अनेकांची भरभराट झाली. मागणी वाढू लागली, पगार वाढले. आय.टी. आणि इतर करिअरमधील वेतनांमध्ये खूपच तफावत पडत गेली. स्वाभाविकच अनेकांना आयटी करिअर करायचे वेध लागले. येनकेनप्रकारेण आयटीमध्ये शिक्षण ऑफर करणाऱ्या कॉलेजांचंही पीक आलं. कोणीही उठावं आणि आयटी इंजिनीअिरग कॉलेज काढावं, असं महाराष्ट्रातही झालं. (तोपर्यंत आंध्र आणि कर्नाटक यात आघाडीवर होतं.) पण त्यामुळे खासगी महाविद्यालये बोकाळली. एकंदर शिक्षणाचा दर्जा घसरू लागला.
या काळात भारतातल्या काही विशिष्ट प्रांतातली लोकं अमेरिकेत येण्यासाठी काहीही करतात, असं दिसायला लागलं. कुत्र्याच्या छत्रीसारखे त्या भागात बॉडी शॉपर्स उगवले होते. तिथे एक भन्नाट व्यवस्था उदयाला आली- टेलिफोनिक इंटरव्ह्य़ू दुसराच कुणी द्यायचा आणि प्रत्यक्षात वेगळाच माणूस अमेरिकेत उगवायचा. अशा टेलिफोनिक इंटरव्ह्य़ूज् देऊ शकणाऱ्या तज्ज्ञ मंडळींचं मार्केटही तेव्हा तेजीत होतं. मी त्या काळात अमेरिकेत फोनच्या दुसऱ्या बाजूला होतो. अशा वेळी समोरचा खरा आहे की खोटा, ओळखायला आम्ही इंटरव्ह्य़ू घेणारेही नवनवीन प्रश्न बनवायला लागलो. ‘पहिलीच्या क्लास टीचर कोण होत्या?’, ‘आईचं लग्नाआधीचं पूर्ण नाव काय?’ अशा दुसऱ्या माणसाला पटकन् सांगता येणार नाही, अशी माहिती.
अमेरिकेतल्या प्रदीर्घ वास्तव्यानंतर २००० च्या अखेरीस आम्ही भारतात कायमसाठी परत आलो. इकडे आय.टी.मुळे आलेली सुबत्ता सर्वत्र दिसू लागली होती. गाडय़ा आणि एसींची संख्या वाढली होती, लॅपटॉप्स दिसू लागले होते, फोन लाइन्समध्ये खूपच सुधार होताना मोबाइल्सचीही सुरुवात झाली होती. इंटरनेटचा वापर वाढला होता. नेट कॅफेज् आले होते. ई-मेलचा वापर वाढत होता. अनेक ठिकाणी मॅकडोनल्ड्स आणि पिझ्झा हट्स दिसू लागली होती. एकंदरच ग्लोबलायझेशनची चिन्हं सर्वत्र खऱ्या अर्थी दिसू लागली होती. भारतात परतताना तेव्हा अमेरिकेत अनेकजणांनी ‘का जाता आहात?’ विचारलं होतं. आम्हाला वेडय़ात काढणारेही काहीजण होते. निघताना, ‘बरंय, लवकरच पुन्हा इथेच भेटूया’, असंही काहीजणं मजेने म्हणाले. भारतातही अनेकांनी ‘परत का आलात?’ असं विचारलं. वर्षांच्या आत २००१ च्या सप्टेंबरमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला आणि गोष्टी झपाटय़ाने बदलल्या. दरम्यान ‘डॉट कॉम’ कंपन्यांचा फुगा अवास्तव वाढणं आणि तो फुटणं, दोन्ही होऊन गेलं. अमेरिकन रिसेशनचा एक मोठा पॅच आला. पुढच्या काही वर्षांत मग अनेकांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. वर्षभरातच भारतात परत का आलात, हा प्रश्न आम्हाला विचारणं जवळजवळ थांबलंच. २००८ सालचं सबप्राइम हाऊसिंग रिसेशन आणि पाठोपाठच्या लेहमन ब्रदर्सची बँक्रप्टसीचा सगळ्या जगावर परिणाम झाला. या सगळ्यात ग्लोबलायझेशन काय थराला झालंय याची जगाला प्रचीती आली. भारतीय इकॉनॉमी तुलनेने किती स्थिर आहे याचीही अनेकांना प्रचीती आली. शिवाय भारतात अनेक सुखसुविधा मिळू लागल्याकारणाने परत येणाऱ्यांची संख्या आणखी वाढीस लागली. आता ‘आधी शिकागोत आणि आता ठाण्यात’ किंवा ‘आधी बे एरियात, आता कोथरूडमध्ये’ असे राहणारे मित्रांचे ग्रुप तयार झालेले दिसतात तेव्हा मजा वाटते.
गेल्या सात-आठ वर्षांत आयटीचं वलय जरा फिकं झालं. त्यामुळे अर्थातच परदेशी जाऊन आलं म्हणजे जग जिंकून आलं, हा प्रकारही कमी झाला. आई-बाबांच्या पिढीला अमेरिकेला जाऊन आल्यावर मुलांच्या मोठय़ा गाडय़ा, प्रचंड घरं आणि अवाढव्य मॉल्सचं वाटणारं अप्रूपही ओसरलं. आई-बाबांच्या पिढीचं मुलांच्या प्रत्येक लहान-मोठय़ा अडचणीला, प्रत्येक बाळंतपणाला अमेरिकावारी करणारी आई-बाबांची पिढीही थकली. प्रत्येक ट्रिपमागे जेटलॅग, भलेमोठे प्रवास, पाच-सहा महिन्यांसाठी इथली घराची आवराआवर, तिथे दिवसभर घरात बांधलं राहणं नकोसं होतं, हे ती मंडळीही बोलून दाखवायला लागली. मागच्या वीसेक वर्षांत भारतीयांची एक भलीमोठी नवी पिढीच अमेरिकेसारख्या देशात तयार झाली होती. त्यांच्या मुलांची पुढची पिढी निर्माण होत होती. सुरुवातीच्या दिवसांमध्ये भारतीय, जे आपापले कंपू करून राहायचे आणि अगदी ऑफिसमध्येही एकमेकांशी भारतीय भाषेत बोलायचे, ते तिथल्या समाजाचा भाग होऊ लागले. राजकारणामध्ये शिरले, यशस्वी होऊ लागले. एकंदरच या दोन देशांमधील अनेक भिंती ढासळल्या आणि माणसं अधिक एकत्र आली. त्यातून मग भारत देश आणि भारतीय माणूस अमेरिकन माणसाला माहीत झाला. नाहीतर सामान्य अमेरिकन माणसाला दुसरा देश सोडा, स्वत:च्या राज्याच्या बाहेरचं काही धड माहीत नसतं.
अनेक अमेरिकेतल्या भारतीयांनी अमेरिकन कंपन्या काढल्या. याउलट, काही भारतीय कंपन्या भारतात मोठय़ा झाल्या आणि त्यांनी अमेरिकेत ऑफिसं काढली. या कंपन्या तिथल्या स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होऊ लागल्या. आणि केवळ लिस्ट झाल्या असं नाही, तर त्यांच्या मालकांना नॅसदॅक (स्टॉक एक्सचेंज) उघडण्याचा किंवा बंद होण्याचा टोला देण्याचा सन्मान  मिळाला. भारतीय म्हणून या सगळ्याने कुठेतरी खूप बरं वाटलं.
इंग्रजीत ‘मूव्हिंग अप द व्हॅल्यू चेन’ अशी एक टर्म आहे. आयटीची सुरुवात आपण ज्याला ‘लो एन्ड जॉब्स’ म्हणतात अशाने केली, माणसं पुरवणं, त्यानंतर प्रत्यक्ष काम येथे आणून ते आपल्या जबाबदारीनं पार पाडणं, असं करीत आज आपण ‘टर्नकी प्रॉडक्ट्स’ करतो, म्हणजे अथपासून इतिपर्यंत. वीसएक वर्षांत एकीकडं ही प्रगती झाली आणि दुसरीकडं मागच्या दशकात एका नव्या लो एंड जॉबनी आपण परत सुरुवात केली- बी. पी. ओ. अनेक रटाळ कामं जी स्वतंत्रपणं होऊ शकतात आणि ज्यासाठी फार स्किल लागत नाही, अशी कामं आपल्याकडं येऊ लागली. केवळ परदेशातील संगणकावर काम करण्याचं, आणि माहिती आणणं आणि पाठवण्याचं नवं नवं तंत्रज्ञान येत गेलंए ज्यामुळं हे वाढीस लागलं. तुलनेनं कमी शिक्षण असलेल्या तरुण मंडळींनाही चांगल्या उत्पन्नाची संधी मिळाली. त्यातून अर्थातच अनेक बऱ्यावाईट गोष्टीही उदयाला आल्या. आता एकंदरच टेक्नॉलॉजी आणि जगण्याचाच वेग इतका वाढला आहे, की यावरच्या पहिल्या चर्चा विरेपर्यंत नवीन काहीतरी वेगळंच समोर येतं आहे. ‘यापुढे काय?’ असं मनात येईपर्यंत काहीतरी नवीन येऊन दाराशी उभं आहेच. पंचवीस वर्षांपूर्वी इंजिनिअरिंग कॉलेजामधून बाहेर पडल्यावर मला कम्प्युटर्समध्ये जॉब करायचा आहे, अशी धून डोक्यावर सवार होती. तेव्हा यातलं काहीही डोळ्यासमोर नव्हतं. तशी कुवत नव्हती, समजही नव्हती. र्अध जग आणि एक अख्खं युग पाहायला मिळेल, याची सुतरामही कल्पना नव्हती.

मराठीतील सर्व दिवाळी अंक २०१२ ( Ls-2012-diwali ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Era of information technology

ताज्या बातम्या