scorecardresearch

औदुंबराच्या सावलीत

‘ग्रेस’ नावाचं गारूड रसिकांवर अक्षय आहेच; पण हेच ग्रेस आपल्या निकटतम सुहृदांना कसे दिसले, कुठल्या रूपात आढळले, हे जाणून घेणंही निश्चितच औत्सुक्याचं ठरावं.

‘ग्रेस’ नावाचं गारूड रसिकांवर अक्षय आहेच; पण हेच ग्रेस आपल्या निकटतम सुहृदांना कसे दिसले, कुठल्या रूपात आढळले,  हे जाणून घेणंही निश्चितच औत्सुक्याचं ठरावं.

औदुंबर..

मागे वळून पाहिलं तर अंगणात औदुंबर दिसतो.
तू जरी दूरच्या अंगणात
असतो जवळ माझ्या हृदयात…
कवी ग्रेसच्या कुटुंबात औदुंबरही आहे. ती सावली वारंवार मला त्या अंगणात ओढून नेते.
औदुंबर म्हणजे आमची मायेची सावली.
औदुंबरानं आमच्या सगळ्यांच्याच हृदयात जागा केली असली तरी मी याला कवी ग्रेसचा औदुंबर असं म्हणते.
कवीचं जीवन औदुंबराशी जुळलं आहे आणि म्हणूनच त्यांच्या लेखनात या झाडाचा उल्लेख जागोजागी आढळतो.
काही नाती रक्ताची नसतात, माणसाशी नसतात; पण तीच आपल्यात घर करून बसतात आणि आपल्या सोबत सरणापर्यंत असतात.
औदुंबर कवीच्या नागपूरच्या नॉर्मल स्कूल क्वार्टर्सच्या अंगणात अगदी दारातच होता. घर कौलाचं आणि पुढेमागे अंगण.
झाड जरी दारात असलं तरी त्याची सावली संपूर्ण अंगणभर होती. आमचं घरच त्या झाडाच्या सावलीत होतं.
अंगणातले झाड
हिरवेकंच विशाल
घरटी त्यात अनेक
उंबर हिरवे लाल
अंगणात कवीने वेगवेगळ्या वेली, फुलझाडे लावली होती. तुळस, गुलाब, शेवंती, मोगरा, जाई…अनेक. त्याला खतपाणी तेच देत असत.
समोरच्या अंगणात औदुंबर, मागच्या आवारात िलबू आणि पेरूचं झाड आधीपासूनच होतं.
औदुंबराच्या सावलीतून उन्हाचे थेंब मोगऱ्यावर पडले की ते फुलतच राहायचं. पहाटे मोगऱ्याचा सुगंध अंगणात आणि पडवीत असायचा.
पेरले बीज तू अंगणात  
त्या वेली आज झुलतात  ..
औदुंबराची दणकट मुळं खूप खोलवर आणि दूर पसरली होती. अंगणात आजूबाजूच्या
िभतींत भेगा दिसायला लागल्या, तेव्हा वाटायचं
एक दिवस घर उकरून जाणार, परंतु कवीला
असं कधीच वाटलं नाही. त्यांच्यासाठी
औदुंबर म्हणजे देवाचे रूप, खरोखरच
या झाडाने घराला इजादेखील होऊ दिली
नाही.
फांद्या भरून पाने  
चढती कौलावर
मुळे पसरली िभतीत
जपून कौलाचे घर
औदुंबराचे झाड दाट होते. त्यात उंबराचे झुंबर आणि झाडाची काळजी घेणारे आणि प्रेम ओतणारे कवी होते, त्यामुळे इथे नांदायला भरपूर निळे, सावळे, काळे पक्षी यायचे. इथे कवीचे कावळे होते आणि चिमण्याही होत्या. चिमण्यांची शाळाच होती. उंबराच्या अवती भवती पक्ष्यांची झुंड असायची आणि लाल गोड उंबरांत त्यांच्या चोची.
वाऱ्याने टप टप उंबर कौलावर आणि अंगणात पडायचे. पाखरे निजल्यावरच झाड शांत
व्हायचं.
कवी म्हणतो.
तृण कोटरात चिमण्यांची शाळा
घेउनी निजला औदुंबर …
पहाटेपासून पक्ष्यांचे सूर आणि चिवचिवाट कानावर पडायचे. कवीला चिमण्यावर कधी क्रोध यायचा तर कधी प्रेम. चिमण्या दिवसभर इकडून तिकडे करायच्या, कधी त्या कवीच्या मागे तर कधी कवी त्यांच्या मागे. चिमण्या घरात असल्या की त्यांच्या काडय़ा, कापूस, गवत सगळीकडे पडायचे, ते आवरायला कवीला त्रास होत असे, परंतु चिमण्या नसल्या तर कवीला जास्तच त्रास व्हायचा. ते त्यांच्या शोधात अंगणातच मुक्काम करायचे.
झाडावर येणाऱ्या-जाणाऱ्या पक्ष्यांची माहिती कवीला होती. कुठल्या घरटय़ाचे बांधकाम सुरू आहे हे ठाऊक असे. झाडातल्या प्रत्येक जीव-जंतूची त्यांना काळजी. अंगणातले मुंग्यांचे वारुळ त्यांनी कधीच हलवलं नाही.
झाडात सतत चळवळ असायची पानांची, पक्ष्यांची, पाऊसपानांची आणि वाऱ्याची! सगळ्यांचं एकमेकांशी नातं होतं. कवी येता जाता झाडाला हात लावत असत.
अंगणात येरझार करायचे. औदुंबराच्या सावलीत बसायचे. उन्हाळ्यात दाराबाहेर उन्हाची झळ असायची आणि दाराआड वृक्षाची गार सावली. कवीचं दार सताड उघडंच असायचं. माणसाला आत जायला परवानगी लागत असे; परंतु त्यांच्या चिमण्या, वारा, सूर्य हे अगदी बेधडकपणे आत शिरायचे.
जिथे कवी बसायचे तिथून त्यांना त्यांची पडवी, अंगण, औदुंबर आणि त्यांचा निसर्ग दिसायचा.
अंगणात येई कावळा
पडवीत बसे मना
झाडात असे किलबिल
घरात चिवचिव चिमण्या ..

पाचोळा
पाचोळा म्हणजे झाडाचे गळून पडलेलं पान.
शिशिर आला की संपूर्ण अंगणभर पानगळ. तो बेधुंद पाचोळा कवी गोळा करून अंगणात एका कडेला लावायचे. हा उद्योग दिवसभर सुरू राहायचा. थकायचे पण थांबायचे नाहीत. ते झाडापेक्षा जास्त पाचोळ्याला जपत असत. कवीला गळलेले पान अशक्त पान वाटत असावे. मेलेले नाही म्हणूनच त्याची एवढी काळजी. ही पाने कुणाच्या पायाखाली येऊ नयेत म्हणून त्यांची धडपड.
तुडवू नका पायाखाली
हे थकलेले पान ..

पाऊसपाने
पाऊस आला की हे झाड अजूनच हिरवंगार व्हायचं. झाडांच्या दाट पानांतून पाऊस पाझरून अंगणात आणि पडवीत यायचा. पावसाचा
आवाज कौलावर वेगळा, पानात वेगळा आणि पडवीत वेगळा.. कधी पाऊस हळूच स्पर्श
करून निघून जायचा तर कधी ते थेंब
पानांवर थांबायचे. कधी वारा पानात अ
डकायचा तर कधी ती शीळ पानातून बाहेर पडायची.
जेव्हा पाऊस कौलावर आदळायचा तेव्हा कवीला झाडातल्या घरटय़ांची आणि चिमुकल्या पाखरांची काळजी वाटायची. त्यांना रानातल्या गुरांची आणि गावाचीदेखील काळजी
वाटायची. ते पाऊस थांबल्यावर झाडाखाली उभे राहून, झाडाचे निरीक्षण करायचे. त्यांची पाखरे सुखरूप आहेत, ही खात्री पटल्यावरच ते घरात यायचे.
कवी म्हणतो..
पाऊस आला पाऊस आला
गारांचा वर्षांव
गुरे अडकली रानामध्ये
दयाघना तू धाव ..
कवीला पावसाचं अतिशय आकर्षण होतं. त्यांच्या लेखनात पाऊस सगळीकडेच दिसतो.. टेकडीवर, रानात, रस्त्यात, गल्लीत, देवळाजवळ, देवळापलीकडे,
पाराजवळ, पारापलीकडे.. सर्वत्र.
तुटून पडणाऱ्या बेभान पावसाचं कवीला भय वाटायचं कारण तो पाऊस त्यांना त्यांच्या आईची आठवण करून देत असे.

पारावर
औदुंबराच्या सावलीत पारावर बसून कवीनं बरीच र्वष काढली. तिथे बरंच काही घडलं आणि जुळलं. संध्याकाळी त्यांची पणती पारावर असायची, कधी ती फडफडायची तर
कधी ती शांत असायची. झाड नेहमीच त्यांच्या हृदयात राहिलं. घर सोडताना त्यांना
खूप त्रास झाला. तिथून निघताना ते आपला
बगीचा घेऊन गेले परंतु औदुंबर राहून गेला.
नवीन घरातून अनेकदा कवीचे पाय त्या अंगणात जायचे. औदुंबरानं त्यांना सोडलं नाही
आणि त्यांनी औदुंबराला.
कवीच्या ओळी ..
इथे कुणीतरी रचले होते
झिमझिम पाऊस गाणे
जाता येता टाकीत होता
तो चिमण्यांना दाणे ..
आज सगळंच दूर आहे ते गाव, ते घर आणि ते अंगण …
तुझ्या सावलीत नाही लागले ऊन
तुझी सावली माझ्यापासून दूर ….    

गळलं हिरवं पान

पाय कधीचे उभे
    वाट वेडय़ा मुलीला
     भिंती धुळीत मागे
    चाहुल आडोश्याला
    
खिडकीत बेधुंद वारा
    कसं आवरू स्वत:ला
    ज्योत समईवर विझली
    अंधार घरात दाटला
    
डोळ्यात नाही नीज
    भय जागं उरात
    गाते तुझीच गाणी
    बसून मी पडवीत
    
बाहुलीचे निळे डोळे
    खुंटीवर मिटले
    चंद्रमाधवीच्या प्रदेशात
    घरटं एक तुटलं
    
वस्तू रुसून कोपऱ्यात
    माझ्याशी नाही बोलत
    नाही राहिलं घर
    एकटीच उंबरठय़ावर
    
गेला पक्ष्यांचा कल्लोळ
    ते पक्षी तुझ्या शोधात
    जाईची वेल वाकली
    मोगऱ्यात नाही फूल
    
उघडं औदुंबर
    शोकात पृथ्वीवर
    हिरवं पान हरवलं
    गळलं पाठोपाठ

डॉ. माधवी ग्रेस

मराठीतील सर्व दिवाळी अंक २०१२ ( Ls-2012-diwali ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Friends talking about marathi poet grace

ताज्या बातम्या