फुटपाथवरून…

दगडूला तोच कुत्रा पुन्हा चावला. तिसऱ्यांदा. शेंडीला आवडणारा असा कुठला सुवास आपल्या शरीराला आहे ते दगडूला कळेना. शेंडी हे कुत्र्याचं नाव. बेहराम म्हणाला, ‘‘सुवास नाही रे, त्याला घाण वास येतो तुझा. त्याला तो सहन होत नाही.’’

दगडूला तोच कुत्रा पुन्हा चावला. तिसऱ्यांदा. शेंडीला आवडणारा असा कुठला सुवास आपल्या शरीराला आहे ते दगडूला कळेना. शेंडी हे कुत्र्याचं नाव.
बेहराम म्हणाला, ‘‘सुवास नाही रे, त्याला घाण वास येतो तुझा. त्याला तो सहन होत नाही.’’
‘‘पण झोपतो तर तो माझ्याचकडे. लाख वेळा पळवून लावलं. रात्रीचा कधी माझ्याजवळ येऊन झोपतो, समजत नाही.’’
‘‘का कळेना पण?,’’ हिरा मोठय़ानं हसली. म्हणाली, ‘‘तीनदा म्हंजे खूप झालं! आता तू चाव त्याला.’’
वान्द्रय़ाच्या त्या फुटपाथवर हीरा ही एकदम वेगळीच गोष्ट होती. ती खूप काही करून-करवून घ्यायची. सूर्योदयापूर्वी उठायची आणि दोन तासांत खार- वान्द्रय़ातल्या अध्र्याहून अधिक कचरापेटय़ा धुंडाळून यायची. डबा, ढाकण- जे मिळेल ते आपल्या बोरीत टाकायची. एक-दोन बियरच्या बाटल्या मिळाल्या तर पैसे चांगले मिळायचे. नाही तरी आजकाल झालंय काय की, रद्दीतले पेपर विकायला मालक मंडळी स्वत: जातात. हॉस्पिटलातनं कचरा म्हणून फेकून दिलेली इंजेक्शनं विकून पैसे मिळतात, हा शोध हिरानं लावला. खूप हिमतीची होती हिरा. सुपाएवढं काळीज. आख्खा दिवस काय न् काय सुरू असायचं तिचं. रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाला तर बेवडय़ाच्या खरुजाळलेल्या पोराला उचलून गाडय़ांच्या रांगांतून भीकसुद्धा मागायची हिरा. पोराचं भाडं बेवडा घ्यायचा. चोख.
बालू होता तेव्हाची गोष्ट. दोन विटांचे तुकडे लावून हिरा भीक म्हणून मिळालेलं अन्न गरम करायची. बेकरीवाल्याकडून पावसुद्धा आणायची. पिंपासारखं एक मोठं पातेलं होतं हिराकडे, आणि काही अ‍ॅल्युमिनियमची भांडी. जेवण झालं की मागच्या खाडीतल्या पाण्यानं भांडी धुवायची अन् झाडावर टांगायची, की झालं! हिराला सोडून बालू ‘दुसरी’शी नांदायला गेला. तेव्हापास्नं हिरानं जेवण रांधायचं सोडलं. कुणासाठी करायचं सगळं? त्याच काळात भिकूला वास लागला अन् तो हिराच्या मागे लागला. भिकूची ‘स्वत:ची’ तर हिंडू-फिरूही शकत नव्हती. दिवस-रात्र झोपडीत पडून असायची.
भिकू मनानं वाईट नव्हता. पण शेंडीच्या शेपटीप्रमाणे वाकडा तो वाकडाच राहिला. अन् शेंडीप्रमाणेच खाजवत खाजवत दर दोन-तीन दिवसांनी दत्त म्हणून हजर व्हायचा. तो माहीमच्या फुटपाथवरचा. एकदा मुंबईत मुसळधार पाऊस पडला. सगळी फुटपाथं वाहून गेली. सगळ्यांना आसरा शोधावा लागला. भिकूनं सगळ्यांना खूप मदत केली. टिळक पुलाच्या खाली एक जागा केली. माहीमच्या झोपडीपास्नं ही नवी जागा फार दूर नव्हती. त्या पावसाच्या दिवसांत शेंडी भिकूला दोनदा चावला. दोन महिने झाले होते हिराला. अन् आपोआपच पोट पडलं तिचं. ते बरंच झालं. ती पुन्हा तिच्या वान्द्रय़ाच्या फुटपाथला आली. दगडू, शेंडी बेवडय़ाकडे. हे पुरुष सगळे सारखेच असतात. भिकू सांगायचा- ‘‘मला वारस हवा.’’ एक झोपडं आणि कपडे टांगण्याची एक दोरी घेऊन तो फिरायचा. आणि म्हणे वारस हवा!!
बेहरामच्या सवयी फुटपाथवाल्यांसारख्या नव्हत्या. कमी बोलायचा. आत मात्र पुष्कळ पेच होते. कारवाल्यांशी तो खूप भांडणं करायचा. वळणावर एखादी गाडी असली की बेहराम गाडीला अशी टक्कर द्यायचा अन् खाली पडायचा. हा मेला, असं वाटायचं. लोक जमा व्हायचे. गोंधळ व्हायचा. कारचा मालक हात जोडून पैसे द्यायचा. रात्री उशिरा हॉटेलातनं दारू पिऊन बाहेर पडणारे किंवा बरोबर बाई आहे अशा कारवाल्यांशी बेहराम पंगा घ्यायचा. म्हणायचा- ‘‘असे लोक फार लवकर खिशातनं आपलं पैशाचं पाकीट काढतात. असामी छोटी आहे की मोठी, ते पाकिटावरनं समजतं.’’
कुठं मोठा डल्ला मारला की मग बेहराम दिवसच्या दिवस आपल्या फुटपाथवरून गायब व्हायचा. सरळ सायनच्या तसल्या खास वस्तीत जाऊन राहायचा. दिवस तिथं, अन् रात्रीसुद्धा तिथंच. दिलदार मनाचा होता. सायनला त्याची मनपसंत होती कुणीतरी. नाव सांगितलं नाही तिचं कधी. एकदा इतकंच म्हणाला : ‘‘चांदीचे आकडे बनवून दिले. आई शप्पथ, काय दिसत होती!’’
‘‘लग्न का नाही करत?’’ हिरा म्हणाली.
बेहराम थोडासा हसला. म्हणाला : ‘‘कमावणार कोण?’’
बालू ‘दुसरी’च्या मुलीला घेऊन पळून गेला हे हिराला कळलं. कुठं गेला, ठाऊक नाही. ‘दुसरी’ कोयता घेऊन हिरावर चढून बसली.
‘‘कुठाय तुझा नवरा? साला कुत्रा! जातपात तर सोडली, धर्म-लाजही सोडली. आई, मुलगी- दोघांच्या बरोबर..’’ आणखी काही काही बडबडत होती ती. ‘दुसरी’ बोलू लागली की तिचे लांबच लांब दात बाहेर येत आणि तोंडाचा जबडा आख्खा उघडायचा. शेंडीप्रमाणे!
खरं तर हिरा मनातल्या मनात खूश होती. पण बोलली नाही. एका फटक्यात ‘दुसरी’चे केस धरून हिरानं तिला खाली पाडलं. तिचाच कोयता तिच्याच मानेवर.
‘‘तुझ्या भैनीची.. तुला भाजून शेंडीसमोर टाकीन पुन्हा कधी या फुटपाथवर आलीस तर!..’’
ते दिवस अन् हे दिवस. पुन्हा कधी फिरकली नाही बालूची ती.. काय नाव तिचं.. ‘दुसरी’!
भिकू आला होता. हिरानं त्याला भाकरतुकडा दिला नाही. मनात दु:ख तर होतंच. बालू परत नाही आला. आता तर दोन बाया दूर झाला तो. भिकूनं हिराच्या दु:खात तेल ओतलं.
‘‘मला तर ठाऊक होतंच- तो हरामखोर तसाच आहे. केरळची एक मुलगी आली होती फुटपाथवर.. आठवतंय? बालमजूर वर्गातच हा तिच्याकडे झोपायचा.’’
हिरा काहीही न बोलता ऐकत होती. अन् भिकू बोलत होता- ‘‘हाडं-मांस जिथं दिसलं, की हा लागला शेपूट हलवायला. तुला काय वाटतं? बालू त्या ‘दुसरी’च्या मुलीबरोबर राहील देवळात?’’
‘‘कोणत्या देवळात?’’
‘‘कल्याणला. साईचं देऊळ आहे ना तिथं?’’
काय झालं हिराला, अन् काय आलं तिच्या डोचक्यात, ठाऊक नाही. एके दिवशी गेली तिथं आणि भिकूलासुद्धा बरोबर घेऊन गेली. अडीचशे पायऱ्या चढून वर गेली. तरीही बालू भेटला नाही. सगळं देऊळ धुंडाळलं. चहूकडे शोधाशोध केली. नऊ दिवस हिरा राहिली तिथं भिकूबरोबर. ना साई भेटला, ना बालू. तिथं भिकू हिराला चावला. ही तिसरी खेप. सगळं मांसच ओरबाडलं भिकूनं. आग्रीपाडय़ातल्या सुईणीनं हिराचं पोट साफ केलं. दीड महिना ना तिनं भीक मागितली, ना कसला धंदा केला!
ती भिकूवर रुसली. कंटाळली ती त्याला. आला की ती त्याला पळवून लावायची. लाथच मारायची तेवढी बाकी राहिली. तरीही दर दुसऱ्या- चौथ्या दिवशी भिकू रात्रीच्या काळोखात हिराकडे यायचा. तिला खेटून पडलेला असायचा. तिला त्याची दरुगधी येऊ लागली. दगडूला शेंडीची यायची, तश्शी.
अचानक भिकूची ‘स्वत:ची’ मेली. मेली तर नाव ‘सीता’ दाखवलं. कशीही असो, भिकूनं तिची पुष्कळ सेवा केली. तिला खूप इज्जत दिली. सगळे पैसे चुकते केले आणि स्मशानात घेऊन गेला आणि जाळलं. हिराचं मन द्रवलं. ती काही दिवसांकरिता माहीमच्या झोपडीत जाऊन राहिली. भिकूबरोबरच राहावं कायमचं, असं एकदा तिच्या मनात आलं. शेवट तर चांगला होईल! परंतु सीताचं मरण झालं आणि भिकू सैरभैर झाला. नेहमी रात्री तिच्या शेजारी येऊन भिकू झोपत असे. आता रात्री गायब व्हायचा अन् बऱ्याच दिवसांनंतर परत यायचा. जादूटोणावाल्यांच्या पाठी पाठी फिरत असायचा. तांत्रिक साधूंच्या टोळीत असायचा. काय शोधत होता भिकू, काय हवं होतं त्याला, ठाऊक नाही. सीताची आठवण काढायचा. पुष्कळ..
बारा महिन्यांनंतरची गोष्ट. काय झालं ठाऊक नाही, पण हिरा आपल्या वान्द्रय़ाच्या फुटपाथवर परत आली. दगडूच्या पायाची जखम सतत भळभळ वाहत असायची. कधीही भरून न येणारी जखम. नासूर.
‘‘अरे, म्युनिसिपालिटीत जा, इंजेक्शन घे. नाही तर एके दिवशी भुंकत भुंकत झोपेतनं उठशील,’’ बेहरामनं कित्येकदा सांगितलं.
पण दगडू गेला नाही!
हिरासुद्धा म्हणाली, ‘‘जा ना. नाही तर कधीतरी पाय कापावा लागेल!’’
अन् तसंच झालं..!
दगडूचा पाय कापला तेव्हा हिरा होती बरोबर त्याच्या. आधी दगडूला बेशुद्ध करण्यात आलं. शुद्धीवर येता येता आख्खा दिवस गेला. शुद्धीवर आला तर दगडू खूप रडला. हॉस्पिटलवाल्यांनी पंचवीस दिवस ठेवून घेतलं. हिरा सांगायची, ‘‘विश्वास ठेवा, नाही तर नका ठेवू- पूर्ण पंचवीस दिवस शेंडी हॉस्पिटलच्या बाहेर बसून होता.’’
हॉस्पिटलमधून परत आल्यावर हिरा दगडू आणि शेंडीबरोबर राहू लागली. अ‍ॅल्युमिनियमची थोडीबहुत भांडी हिरानं जमा केली. एका कोपऱ्यात चार विटा रचून चूल तयार केली. दगडूसाठी ती जेवण करू लागली. सूर्य वर येण्याअगोदर उठण्याचा तिचा क्रम पुन्हा सुरू झाला आणि खार-वान्द्रय़ाचे फेरे सुरू झाले. तिथल्या कचरापेटय़ा उचकण्याचं हिराचं काम सुरू झालं.
कसं झालं, ते ठाऊक नाही. एका गाडीनं शेंडीला उडवलं. खूप त्रास झाला दोघांना. हिरासुद्धा खूप रडली. त्या दिवशी ती म्हणाली : ‘‘गाडीचा धक्का लागून भिकू मेला तेव्हा असंच झालं होतं.’’
‘‘काय झालंतं तेव्हा?’’ दगडूनं विचारलं.
‘‘रात्री लघवी करायला भिकू उठला होता. रस्ता ओलांडून जात होता. रेल्वे लाइनकडे. तिथनं एक कार आली. खूप वेगात.. आणि उडवलं. भिकू पडला तर कार त्याच्यावरून गेली. थांबलासुद्धा नाही तो साला. सकाळी म्युनिसिपालिटीची गाडी आली. इकडं-तिकडं विचारलं. मी काही बोलले नाही.
काय केलं असतं मी? पोलिसांत कोण गेलं असतं? आणि प्रेत ताब्यात घेऊन जाळायचं कोणी? म्युनिसिपालिटीची गाडी प्रेत घेऊन गेली. शेंडीला कसं फरफटत घेऊन गेले ते, तसं! फुटपाथचं आयुष्य साला असंच आहे!’’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व दिवाळी अंक २०१२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gulzar book dyodhi from the footpath