पार्टीवाला म्हणाला, ‘‘नऊ र्वष भांडून-झगडून आम्ही तुमच्या लोकांसाठी ही कॉलनी बनविली. तुम्हा लोकांना झोपडपट्टीतनं काढलं, सिमेंटची पक्की घरं करून दिली. आणि तुम्ही म्हणताय- डब्यात बंद केलं म्हणून.’’
माझा घरवाला सदोदित पार्टीवाल्याशी हुज्जत घालायचा.. ‘‘तू याला वस्ती म्हणतोस. माणसांचं गोदाम वाटतं. सगळ्यांना पार्सलमध्ये पॅक करून ठेवलंय.’’
तोंडात दुपट्टा दाबून मी सगळं ऐकत असते. माझं काय देणं-घेणं यांच्या पॉलिटिक्सशी? त्याचं सुरू असतं- माझ्या नवऱ्याचं..
‘‘अरे साला, दोन बिल्डिंगांच्या मध्ये गाडीसाठी दोन हात जागा तर असली पाहिजे ना! इकडून जाणाऱ्या माणसाची तिकडून येणाऱ्या माणसाशी टक्कर होते अन् काय!’’
‘‘काय म्हणतोयस मॅथ्यू? पोलिसांच्या दोन जिपा जाऊ शकतात. तू स्वत: मापून बघ.’’
‘‘अरे सोड.. दोन खाटा टाकून पत्ते खेळू शकतोस काय?’’
‘‘त्यासाठी नाहीयेत आता मुंबईच्या गल्ल्या, मित्रा!’’
मीही विचार करते- जमिनीचं रंगरूप अगदी पालटलंय. अगोदरच्या काळात सहा महिने चिखल असायचा. थोडं खाडीचं पाणी यायचं. उरलेले सहा महिने सुकलेल्या चिखलाची काळी माती उडत असायची सगळीकडे. नागडीउघडी पोरं, कुत्री, जानीच्या कोंबडय़ा अन् कोंबडे- सगळ्यांचं छान चालायचं. पिलांना दोरी बांधून मुलं खेचत न्यायची. मोठं होता होता सगळ्या कुत्र्यांच्या माना लांबोडय़ा लांब व्हायच्या.
या अध्र्या जमिनीच्या तुकडय़ावर सरकारनं सिमेंटची तीन माळ्यांची बिल्डिंग बनवलीये. आणि एका-एका माळ्यावर २४-२४ फ्लॅट्स आहेत. प्रत्येक फ्लॅटमध्ये एक खोली, एक स्वैंपाकघर- जिथं धूर लोकरीच्या गुंडाळ्याप्रमाणे लपेटून टाकतो सगळं. एक मोरी. आणि प्रत्येक मजल्यावर दोन संडास. टमरेल घेऊन फार लांब जावं लागू नये म्हणून. लाइन तर लागतेच. पूर्वी या रांगा उघडय़ावर लागायच्या. आता लाइन भिंतीलगतच्या शिडय़ा चढून जाते.
बिल्डिंगचं काम सुरू झालं तेव्हा सगळ्या झोपडय़ा मैदानाच्या एका बाजूला सरकवण्यात आल्या. मोठय़ा बाजारात रिकाम्या टोपल्यांचा ढीग लागतो, तसं. त्या टोपल्यांत नासलेल्या भाज्या; तर इथल्या ढिगाऱ्यांत कुजकी-नासकी मुलं अन् त्यांचे आई-बाप कण्हत राहायचे. किडय़ा-मुंग्यांसारखं जगणं. उन्हसुद्धा, पाऊससुद्धा आणि उरलंसुरलंही. आकाशसुद्धा आपलं उरलंसुरलं खाली टाकत असायचा. या बिल्डिंगच्या भिंतींना शेवाळही लागत नाही. त्या जुन्या झोपडय़ा खूप हिरव्यागार असायच्या.
आमच्या झोपडीच्या समोर थोडी मोकळी जागा होती. संतोषनं तिथं कारल्याची वेल लावली होती. कपचे-कपचे बांधून तिथं एक भिंत उभी केली त्यानं. त्यामुळे आमच्या आणि शेजारच्या झोपडीत अंतर पडलं. परंतु वेल ती वेल. व्हायचं काय, की दोन कारली नजरेस पडली की शेजारचे कपडे धुण्याच्या बहाण्यानं पाण्यानं भरलेली बालदी घेऊन यायचे आणि संधी मिळताच हात लांब करून कारली चोरायचे. पाण्याच्या बालदीत  कपडय़ांच्या खाली कारली ठेवायची आणि घरी जायचं- असा मामला. चार बटाटे आणि खूपशा लाल मिरच्या टाकून खरपूस भाजल७ की झालं. कारल्यांचा खमंग वाससुद्धा बाहेर जात नसे. कसं कळणार संतोषला? पण तिला संशय आला. म्हणून म्युन्सिपाल्टीनं रज्जब अलीचं गॅरेज पाडलं तेव्हा संतोषच्या नवऱ्यानं पातळ पत्रा आणून बांबूच्या कपच्यांच्या मागच्या बाजूला असा लावला, की कारल्याची वेल दिसेना. त्यामुळे संतोषच्या घरी कारली शिजत असताना खमंग वास यायचा. ढीगभर लाल मिरच्या टाकून भाजीचा सुवास  लपविण्याची भानगड नाही. हां- कधी मागितलं तर द्यायची केव्हा केव्हा. तीसुद्धा माझ्या कुंडीतले कच्चे टोमॅटो मागायची ना! सगळ्यांनी घराच्या बाहेर काही ना काही लावलेलं.
तुळस तर होतीच. रोज संध्याकाळी तिथं दिवे लावले जायचे. तुळस का लावतात? कुणाला धड ठाऊक नाही. दिवा का लावायचा? नाही ठाऊक. अमिनाकडे, करिमांकडे, शांती आणि पूरोंकडेसुद्धा. सगळ्या म्हणायच्या- ‘‘म्हाताऱ्याला खोकला झाला की तुळशीचा काढा पाजते त्याला.’’ काहींच्या वेली तर झोपडीच्या छपरावर पसरलेल्या असत.
परंतु आंटी तर आंटी ना! तिच्याकडे एक भट्टी होती. लहानशी. मैदानातल्या कोपऱ्यात तिची जागा. पंधरा-वीस दिवसांत एकदाच भट्टी लावायची. दारूची पिंपं भरून झोपडीत सुरक्षित ठेवायची. भट्टी लागायची त्या दिवशी पोलीस तिच्या घराभोवती फिरताना दिसायचे. तिच्या आणखी दोन झोपडय़ा होत्या. प्रतिष्ठित लोक आत बसून प्यायचे. मामुली इज्जतवाले- जी ना धड उतरायची, ना चढायची- ते बाहेर बसून ठर्रा प्यायचे आणि समोर बशीत ठेवलेलं मीठ अधनंमधनं चाटायचे.
परंतु आंटी तर आंटी होती. ती खूप उत्तम दारू बनवायची. कुजकी फळं दारूत टाकायची आणि नवसागर तर फारच कमी. तिच्या दारूत रंगसुद्धा असायचा. कुणी खाली बाटली घेऊन आला, तर आंटी त्याला एक रुपयाची सूट द्यायची. तिची ठरलेली गिऱ्हाईकं होती. तीच माणसं यायची. आणि रात्री दहानंतर कुणी नाही. दहानंतर आंटी स्वत: पिऊन टाइट व्हायची आणि ‘बडे का गोश्त’ खाऊन झोपून जायची. कुणी जागं करायला गेलं तर अशा शेलक्या शिव्या पडायच्या त्याला, की वस्ती दणाणून जायची.
आता या नव्या, सिमेंटच्या बिल्डिंगमध्ये आंटी चार भिंतींमध्ये बंदिवान झाल्येय. घुसमटलीये ती. पूर्वी ती इतकी एकटी वाटत नसे.
‘‘हॉटेलची नोकरी आता परवडत नाही,’’ असं जॉनीसुद्धा म्हणतो. त्याच्या काही कोंबडय़ा विकल्या गेल्या, काही खाल्ल्या गेल्या, काही मेल्या. नव्या इमारतीत दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्यावर कोंबडय़ा कशा पाळायच्या?
गफ्फारनंसुद्धा यंदाच्या वर्षी बकरा आणला नाही. कुर्बानी म्हणून आपल्याकडची बकरी कापली. अगोदर कसं होतं, की बकरीला सोडून दिली की ती कचरापट्टीत छान चरत असायची. आता घरातले कपडे खाते. एका महिन्यात दोन लुंग्यांचा खर्च वाढला. नवं बिल्डिंग नव्हतं, सिमेंटचं घर नव्हतं तेव्हा किती बरं होतं!
माझा घरवाला पूर्वी मित्रांना घेऊन यायचा. झोपडीच्या बाहेर खाट टाकून सगळे पीत बसायचे. दंगा करायचे. जो खाली सांडायचा, तो रात्रभर तिथंच पडलेला असायचा. सकाळी डय़ुटीची वेळ होण्याअगोदर उठून जायचा. आता माझ्या घरवाल्यानंसुद्धा मित्रांना आणायचं सोडून दिलंय. एकाच खोलीत सगळे पुरुष आणि बायाबापडय़ा. काय करायचं? जुन्या काळी मुलं जमिनीवर झोपून जात. बाप्ये बाहेर झोपत. रात्री पाणी भरून स्त्रिया आपापल्या किरकिरणाऱ्या पोरांना छातीशी धरून झोपायच्या. आता या नव्या बिल्डिंगमध्ये काय करणार? मोठी मुलं डोळे विस्फारून सगळं पाहत असतात.
माझ्या नवऱ्याला कैकदा सांगितलं : हे सालं कसलं जगणं? बंद करून टाकलंय सरकारनं. माहीत आहे का? गरिबीचा वास बाहेर जाऊ नये म्हणून! मी अनेकदा म्हणते माझ्या घरवाल्याला- घर विकून जाऊ कुठंतरी दुसरीकडे. दुसऱ्या कुठच्या तरी झोपडपट्टीत जागा मिळेल.