scorecardresearch

वेगळ्या वाटेचे वाटसरू

आयटी क्षेत्रातील बहुतांशी मंडळी ‘मी- माझं ऑफिस- माझं घर’ असं एकेरी आयुष्य जगत असतात. आय. टी.मधील स्वत:ची नोकरी सोडल्यास याच्या पलीकडे काही जग आहे, याची बहुतेकजणांना पुसटशी कल्पनादेखील नसते, हे मी स्वानुभवानं सांगतो. त्यामुळे ज्यांचे विविधांगी व्यक्तिमत्त्व नसते, अशा लोकांची मंदीच्या काळात खरी कसोटी असते.

आयटी क्षेत्रातील बहुतांशी मंडळी  ‘मी- माझं ऑफिस- माझं घर’ असं एकेरी आयुष्य जगत असतात. आय. टी.मधील स्वत:ची नोकरी सोडल्यास याच्या पलीकडे काही जग आहे, याची बहुतेकजणांना पुसटशी कल्पनादेखील नसते, हे मी स्वानुभवानं सांगतो. त्यामुळे ज्यांचे विविधांगी व्यक्तिमत्त्व नसते, अशा लोकांची मंदीच्या काळात खरी कसोटी असते. २००८ साली जी जागतिक मंदी आली त्यामुळे अनेक सॉफ्टवेअर इंजिनीअर्सना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. तोपर्यंत ‘कधीकाळी आय. टी.मधली माझी नोकरी गेली तर मी काय करू शकतो. किंवा शकते’, याचा यातल्या अनेकांनी कधी विचारच केला नव्हता. अशांना त्या वेळी प्रचंड नैराश्य आले होते. याउलट, ज्या लोकांना स्वत:चे असे छंद होते किंवा नोकरीव्यतिरिक्त वेगळ्या क्षेत्रात ज्यांचा संचार होता, अशा लोकांना नोकरी गेल्याचा धक्का पचवणे तुलनेने सोपे गेले.
आज विचाराल तर आय. टी. क्षेत्राच्या मानसिकतेत हळूहळू बदल घडतोय. सभोवताली घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक बदलांकडे जे जाणीवपूर्वक लक्ष देत आहेत त्यांचा येणाऱ्या काळात टिकाव लागणार आहे, हे उघड आहे. परंतु या बदलांबद्दल पूर्ण अनभिज्ञ असणारे लोकही बरेच आहेत. महिन्याच्या शेवटी पगार मिळतोय तोवर देशात कुठलीही समस्या येवो किंवा न येवो, त्यांना त्याचं सोयरसुतक नाही. उलट, मिळणारा पगार खर्चायचा कसा, हे योजण्यात ते दंग असतात. मात्र, अशा सपाट आणि गुळगुळीत आयुष्य जगणाऱ्या लोकांची ‘गोष्ट’ होत नाही. गोष्ट अशा लोकांची होते- जे समूहात राहून समूहापेक्षा वेगळा विचार करतात. आय. टी. क्षेत्रातील अशाच काही शिलेदारांच्या या गोष्टी! काहींनी आपल्यासमोर उभ्या राहिलेल्या परिस्थितीचे रूपांतर संधीत केले. काहींनी राजमार्गापासून दूर जात स्वत:ची पायवाट निर्माण करण्यात धन्यता मानली. काहींनी आय. टी. क्षेत्रात राहून स्वत:ची आवड जोपासली. काहींनी स्वत:च्या आवडीसाठी आय. टी. क्षेत्र सोडले; परंतु त्यात निभाव लागणार नाही, हे स्वीकारून ते पुन्हा आय. टी. क्षेत्रात आले. ही सर्व उदाहरणे प्रातिनिधिक आहेत. ही उदाहरणे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की, आय. टी.च्या चाकोरीबद्ध आयुष्याच्या पलीकडे जे एक मोठ्ठे जग आहे, त्या जगाचा त्यांनी शोध घेतला. या व्यक्तींमध्ये तुम्हांला स्वत:ला शोधता येईल. वेळ काढून स्वत:ची आवड जोपासता येईल.

संजय फुले
आपली गाडी सिग्नलशी थांबते. इतक्यात आपल्यासमोर एक मळकट कपडय़ातला आणि त्याहून मळकट चेहऱ्याचा एक पाच-सहा वर्षांचा मुलगा येतो. त्याचा चेहरा कोरा असतो. कुणीतरी शिकवल्यागत आपला एक हात पुढे पसरवून तो भीक मागत राहतो. आपण पाहिलं- न पाहिल्यासारखं करतो. तरी तो पोरगा भिकेसाठी हात हलवतच राहतो. सुट्टीचा बट्टय़ाबोळ व्हायला नको म्हणून आपल्याला ती ‘ब्याद’ नको असते. खिशातलं एक नाणं आपण त्या चिमुकल्या हातांवर टेकवतो. पोरगा निघून जातो, पण डोक्यात प्रश्नांचा भुंगा सोडून जातो.. आपल्या आजूबाजूला अशी शेकडो मुले आहेत.. कुणी गाडी पुसतोय, कुणी पेपर टाकतोय, कुणी फुलं विकतोय, कुणी बूट-पॉलिश करतोय.. काय भविष्य आहे या मुलांचं, हा विचार आपल्या डोक्यात येतो खरा; पण त्यापलीकडे आपल्या हातून काही होत नाही.
संजय फुले यांनी मात्र यापुढे जाऊन स्वत:ला प्रश्न विचारला- या मुलांची परिस्थिती बदलण्यासाठी ‘मी’ काही करू शकतो का? या प्रश्नाचा शोध घेणं चालू होतं. एखादी गोष्ट तडीस न्यायची तळमळ आपल्या ठायी असेल तर ती गोष्ट घडून येण्यासाठी सर्व सृष्टी ‘कारस्थान’ करते, असं ‘अलकेमिस्ट’ पुस्तकात एक सुंदर वाक्य आहे. त्याचाच प्रत्यय संजय फुले यांनादेखील आला.
पुण्याच्या ज्या नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत संजय काम करत होते (आणि आजही करत आहेत), त्या कंपनीत श्रीयुत उमामहेश्वर नावाचे एक जनरल मॅनेजर होते. त्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांचा ‘इन्स्पायिरग माइंड्स’ नावाचा एक ग्रुप त्यांनी स्थापन केला होता. ही मंडळी अशा उपेक्षित मुलांना आधार देण्यासाठी धडपडत होती. या कार्यात संजय फुले यांना भेडसावणाऱ्या प्रश्नाचे उत्तर होते. उरफ च्या नावाखाली अनेक संस्थांना केवळ देणग्या देऊन कंपन्या आपले उपक्रम राबवतात; तसा प्रकार इथे नव्हता. सर्व मंडळी नोकरी सांभाळून हे काम करत होती. त्यांचा उद्देश साधा आणि सरळ होता- ‘आपण एकत्र आलो तर बरंच काही करू शकतो! गेंडय़ाची कातडी न पांघरता समाजाकडे पाहायचं आणि कुंभार मातीला आकार देतो तशी ही मुलं घडवायची!’ साहजिकच संजय या मंडळींकडे आणि त्यांच्या कार्याकडे आकर्षति झाले. बघता बघता त्यांच्यातलेच एक होऊन गेले.
आपल्या अनुभवाबद्दल संजय सांगतात, ‘मुलांमध्ये काम करता करता एक गोष्ट ध्यानात येऊ लागली. त्यांच्या या परिस्थितीला एकच गोष्ट कारणीभूत आहे- निरक्षरता. त्यामुळे या मुलांची आत्ताची स्थिती सुधारायची असेल तर त्यांची निरक्षरता दूर केली पाहिजे. यासाठी आम्ही त्या मुलांना संगणक प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. ही मुलं होती इंडिया स्पॉन्सरशिप कमिटीची. वीटभट्टीवर काम करणारी. सकाळी ती महानगरपालिकेच्या शाळेत जायची आणि दुपारी काम करायची. आम्ही या मुलांना संगणक आणि इंग्रजी शिकवत होतोच, पण त्याच्या जोडीला वाहतुकीचे नियम व सुरक्षा यांसारखे विषय किंवा शुभेच्छापत्र बनवणे वगरे विषयांतून एका नव्या जगाची ओळखही करून देत होतो. आम्ही त्यांचे एक छोटे नाटक बसवले. त्या मुलांनी दोन हजार लोकांसमोर ते नाटक सादर केले. एक वर्षांपूर्वी ज्यांना भेटलो होतो ती हीच मुले होती का, असा प्रश्न पडावा इतका आमूलाग्र बदल या मुलांमध्ये झाला होता. आता आमचाही आत्मविश्वास दुणावला होता. आम्ही आणखी काही मुलांना शिकवलं आणि स्वत:मध्ये बदल घडवून आणण्यास त्यांना मदत केली. संजय फुले यांचं काम केवळ इथेच थांबलं नाही. ‘स्वाधार’ या संस्थेच्या कार्यात ते सामील झाले. ही संस्था गरजू मुली, वेश्यावस्तीतील महिला आणि पीडित महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करते. संजय आणि वासंती दर शनिवारी आठवीच्या मुलींना शिकवण्यासाठी जाऊ लागले. पुण्याच्या विद्यावíधनी शाळेत हे वर्ग भरत. आठवी ते दहावी अशी तीन वष्रे हे वर्ग भरत होते. या सर्व मुलींनी ७० ते ८० मार्क्‍स टक्के मिळवून त्यांच्या कष्टांचं सोनं केलं. याचबरोबरीने संजय व  त्यांची पत्नी वासंती यांनी ‘स्वरूपवíधनी’ या संस्थेच्या कार्यात स्वत:ला सामील करून घेतले आहे. ही संस्था मुलामुलींच्या सर्वागीण विकासाकडे लक्ष पुरवते; त्यांचे ध्येय गाठण्यास मदत करते. संजय व वासंती या संस्थेच्या वडारवाडीतील शाखेत जात व तेथील गरीब मुलांना शिकवत. ती मुलं हुशार होती. अभ्यास करताना काही अडलं तर ते समजावून सांगण्यासाठी त्या मुलांना संजयसारख्या मंडळींची मदत व्हायची.
संजय फुले पुण्यातल्या एका प्रथितयश आय. टी. कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअरची नोकरी करतात. शनिवार-रविवार जोडून मिळालेल्या सुट्टीचा ‘वीक-एंड’ संजय आणि वासंती फुले त्यांचे शनिवार-रविवार समाजासाठी देत आहेत. ते दोघे उपेक्षित मुलांमुलींना भेटतात, त्यांचं जगणं समजून घेतात. आपलं ज्ञान त्या मुलांमध्ये वाटतात. हे करून मिळणारं समाधान त्यांच्यासाठी शब्दांच्या पलीकडचं आहे. ‘ऑफिसमधील कामाच्या ताणामुळे समाजासाठी वेळ नाही,’ असं म्हणणाऱ्या अनेकांसाठी संजय फुले हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरेल.

राहुल भिवरे
गणित-भूमितीसारख्या ‘डेंजर’ विषयांनी आपलं कोवळं बालजीवन किती खडतर केलं होतं, हे प्रत्येकाने आठवून पाहावं! राहुल भिवरे या सॉफ्टवेअर इंजिनीअरने मात्र गणित-भूमिती या विषयांना सामोरं जाऊन भिडायचं ठरवलं. त्या विषयांशी गट्टी जमवली. त्यातल्या खाचाखोचांचा अभ्यास केला. विशेषत: भूमितीमधील रेषा, त्यांचे आकार, त्यांचे एकमेकांशी झालेले कोन यांत सौंदर्यस्थळे शोधली. राहुलच्या लक्षात आलं की, वाटतो तितका हा विषय कठीण नाही. उलट, तो जर मनोरंजक पद्धतीने शिकवला तर मुलांना या विषयाची गोडी लागेल. रोजच्या जगण्यातली, आजूबाजूला असलेल्या वस्तूंमध्ये लपलेली भूमिती मुलांपर्यंत पोहोचली तर गणित-भूमितीबद्दलचा आकस नष्ट होऊन मुलं भूमितीत अधिक रस घेतील. आपले मित्र प्रसन्ना मराठे, मनोज जानवेकर आणि प्रमोद खाडिलकर यांच्यासह दीर्घ काळ चर्चा करून त्यांनी एका उपक्रमाची स्थापना केली. त्याचं नाव ‘जॉयमेट्री’ ग्रुप ! Geometry (भूमिती) शिकण्यात मजा आहे, म्हणून Joymetry!  २००८ मध्ये उरळीकांचनमधील िशदेवाडी या गावी विद्यार्थ्यांसोबत काम करताना राहुलला ही संकल्पना सुचली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या या- संदर्भात त्यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या. या माध्यमातून तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांतून ही संकल्पना पूर्ण विकसित झाली. ‘जॉयमेट्री’ या संकल्पनेविषयी प्रत्यक्ष राहुलकडूनच जाणून घेतले.
राहुल म्हणतो, ‘आम्ही ‘जॉय’मेट्रीच्या माध्यमातून तीन पातळ्यांवर काम करतोय. एक म्हणजे मुलांना रस वाटेल आणि शिक्षकांना शिकवायला मजा येईल अशी आम्ही भूमितीची रेडीमेड किट्स तयार केली आहेत. मुलांची किट्स वेगळी आणि शिक्षकांची किट्स वेगळी. दुसरं म्हणजे शाळांमध्ये माफक किमतीत भूमितीच्या प्रयोगशाळा तयार करून देणे आणि तिसरं म्हणजे मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी ‘जॉय’मेट्री तंत्रानुसार भूमितीच्या कार्यशाळा आयोजित करणे. ‘जॉय’मेट्री तंत्राचा प्रसार जास्तीत जास्त मुलांपर्यंत आणि शाळांपर्यंत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. काही शाळांनी याचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे.’ राहुलच्या ‘जॉय’मेट्री तंत्राचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्याची माफक किंमत. अवघ्या अडीचशे रुपयांत मुलांना भूमितीची आवड निर्माण होऊ शकते. यात मुलांना सहज हाताळता येतील अशा उपकरणांद्वारे भूमिती सिद्धांतांचे प्रयोग करता येतात. मुलांना वर्गात शिकवलेल्या ज्ञानाचा उपयोग करता येईल (Application of knowledge) अशी यात प्रयोगरचना आहे. प्रयोग करण्याची व निरीक्षणे मांडण्याची ही शास्त्रोक्त पद्धत त्याच्या माफक किमतीमुळे आणि सुगमतेमुळे अगदी दुर्गम खेडय़ातही वापरता येऊ शकेल. याशिवाय आधुनिक शिक्षणातील सीबीएससी, आयसीएसई या अभ्यासक्रमात देखील ‘जॉय’मेट्री तंत्राचा उपयोग होऊ शकतो. एम.ई. झालेला राहुल पुण्याच्या एका आय.टी. कंपनीत नोकरी करतो. नोकरी ही त्याची उपजीविका असली तरी मुलांना शिकवणं हे त्याचं पॅशन आहे. नोकरीत आठवडाभर काम करून आलेला शिणवटा मुलांना शिकवता शिकवता कुठच्या कुठे गायब होतो, असं तो सांगतो. अगदी तळागाळातल्या मुलांना भूमितीची गोडी लागावी यासाठी राहुल आपली आय.टी. क्षेत्रातील नोकरी सांभाळून झटत आहे. राहुल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या आगळ्यावेगळ्या भूमिती प्रयोगशाळेच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. राहुलला त्याच्या कार्यात यश मिळावे यासाठी  शुभेच्छा देऊया!

जयश्री जोगळेकर
बडोद्यातून बी.ई. आणि अमेरिकेतून एम.एस. एफ-१६, एफ-१८ यांसारख्या फायटर जेट्सची ‘डिझायनर इंजिनीअर’ म्हणून जयश्री जोगळेकर यांच्या करिअरची सुरुवात झाली.
अमेरिकेतील एटी अ‍ॅण्ड टी बेल लॅबज्, तसेच वेरिटास सॉफ्टवेअर (आताची सिमेंटेक), विप्रोसारख्या नामवंत कंपनीतला २८ वर्षांचा तगडा अनुभव. विप्रोच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये फायनान्शियल सिक्युरिटीज शाखेची चीफ ऑपरेशन्स ऑफिसर अर्थात सीओओ. ‘आयटी वुमन ऑफ दि इअर’ हा ‘कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया’कडून मिळालेला मानाचा किताब! आय.टी. क्षेत्रातील कुठल्याही होतकरू युवतीस हेवा वाटावा असा जयश्री जोगळेकरांच्या करिअरचा हा आलेख!  मात्र ‘समाजातील उणिवा भरून काढण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे,’ ही जाणीव जयश्रीताईंना स्वस्थ बसू देत नाही. ‘डोअरस्टेप स्कूल’ या आगळ्यावेगळ्या शैक्षणिक उपक्रमासाठी आपलं ज्ञान आणि अनुभव खर्ची घालायचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी कॉर्पोरेट विश्वात एक एक पायरी चढत गेलेल्या त्या उंच शिडीवरून स्वत:हून खाली उतरायचा निर्णय घेतला. आणि तरीही या खूप उंच ठरल्या. ‘गलेलठ्ठ पगाराची आय.टी.मधील नोकरी’ ते ‘केवळ समाधान देणारं डोअरस्टेप स्कूल’ हा त्यांचा प्रवास दाद देण्याजोगा आहे.  
त्या म्हणतात, ‘नोकरीच्या निमित्ताने मी अमेरिकेत अनेक वष्रे होते. मात्र भारतात परतायचे हे मनाशी पक्के होते. अखेर १९९५ साली मी भारतात परतले. त्यानंतर २००८ पर्यंत म्हणजे सुमारे १३ वष्रे मी इथे आय.टी. क्षेत्रात कार्यरत होते. या काळात मी अनेक उच्च पदे भूषविली; तरीही मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी या समाजासाठी काहीतरी करावे असे वाटत होते. मात्र, नेमकं काय करायचं, हे चित्र अस्पष्ट होतं.’
ज्या विप्रो कंपनीतून जयश्रीताईंनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती, त्याच कंपनीने त्यांना एक अनोखी संधी देऊ केली. ‘विप्रो केअर्स’ या विप्रोच्या सीएसआर शाखेने संपूर्ण महाराष्ट्र विभागाची जबाबदारी जयश्रीताईंवर सोपवली. याअंतर्गत जयश्रीताईंच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात शिक्षण-आरोग्य-आहार या क्षेत्रात उल्लेखनीय असे पाच प्रकल्प सुरू झाले. त्याचवेळी ‘डोअरस्टेप स्कूल’ या संस्थेच्या पुणे शाखेस एका सशक्त नेतृत्वाची गरज होती. जयश्रीताईंसमोर ही संधी चालून आली. आज ‘डोअरस्टेप स्कूल’च्या पुणे विभागाच्या संचालिका म्हणून जयश्रीताई कार्यरत आहेत. पुण्यातील सर्व प्रकल्पांच्या त्या प्रमुख असून निधी उभारणी, जनसंपर्क अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत.   
‘डोअरस्टेप स्कूल’ ही १९८८ साली मुंबईत स्थापन झालेली संस्था. झोपडपट्टीतील तसेच बांधकाम मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी ही संस्था कार्यरत आहे. दरवर्षी ५० हजारांहून जास्त मुलांना या संस्थेच्या उपक्रमांचा लाभ होतो. दरवर्षी सुमारे हजार मुलांना महानगरपालिकेच्या शाळेत भरती करायचे कामही ही संस्था करत असते.
आपल्या आय.टी. क्षेत्रातील नोकरीचा स्वयंसेवी संस्थेत काम करताना खूप उपयोग होतो, हे जयश्रीताई आवर्जून सांगतात. आय.टी. क्षेत्रात काम करताना पार पाडलेले अनेक प्रोजेक्ट्स, मनुष्यबळ आणि साधनांचे केलेले व्यवस्थापन, कॉर्पोरेट जगात इतकी वष्रे काम केल्यामुळे कामात येणारी शिस्त या साऱ्या गोष्टी स्वयंसेवी संस्थेचे काम करताना उपयोगी पडतात असे त्यांना वाटते.
त्या सांगतात, ‘अनेकांना काम करायची इच्छा असते, पण त्यासाठी वेळ कसा काढायचा, ते कळत नसतं. मी म्हणेन, आधी सुरुवात करा! आठवडय़ातून अगदी दोन तास इतरांसाठी द्या. हळूहळू यातूनच काहीतरी घडेल.’

रामाशीष जोशी
रामाशीष जोशींना तुम्ही भेटाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, हा माणूस इतरांपेक्षा वेगळा आहे. बारीक शरीरयष्टी, वयाहून लवकर पिकलेले केस, उन्हात काम करून रापलेला, पण प्रसन्न चेहरा, शांत देहबोली, संयत आवाज, ठरावीक वेळात कुठला मुक्काम गाठायचाय अशी कुठली घाई नसलेला असा हा माणूस!
२० वर्षांहून अधिक काळ आय. टी. क्षेत्रात काम करून या क्षेत्रातील भरपूर पगार, परदेश दौरे रामाशीष यांना फार काळ जखडून ठेवू शकले नाहीत. आपल्या आय. टी.च्या करिअरवर पाणी सोडून पाण्याबाहेर वाढणाऱ्या कासवांचं संवर्धन करण्यासाठी रामाशीष कोकणात जाऊन राहत आहेत. भाऊ काटदरे यांच्या चिपळूण येथील ‘सह्य़ाद्री निसर्गमित्र’ या संस्थेसह दीड वर्षांचा अनुभव घेऊन २०१२ साली पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून रामाशीष काम करीत आहेत.
आयटी ते कासव संवर्धन या टप्प्याबद्दल सांगताना ते म्हणतात, ‘आय. टी.चा कंटाळा कधीच नव्हता. धाडसी निर्णय घेणे, शून्यापासून सुरुवात करणे ही आय. टी.चीच देणगी आहे. आई-बाबांनी दिलेले वैचारिक स्वातंत्र्य, मित्रांची साथ, पुस्तकातून आणि प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तींकडून मिळालेली स्फूर्ती आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझी जोडीदार नेहल आणि माझ्या मुली यांचा माझ्यावरील विश्वास यामुळेच मी हा निर्णय घेऊ शकलो. आय. टी.मधील करिअर ते कासव संवर्धन या प्रवासातील विचारप्रक्रियेला त्यांनी नाव दिलंय- ISOD म्हणजेच In search of a dream!
रामाशीष नक्की काय काम करतात, ते त्यांच्याकडूनच जाणून घेतलं. ते म्हणाले, ‘कोकणच्या किनारपट्टीवर भरतीच्या वेळी पुढील सुक्या बाजूस कासविणी अंडी घालतात. अगदी खड्डा उकरून वगैरे. नंतर हे खड्डे वाळूने पूर्ण बुजवून आपल्या वजनाचा भार टाकून त्या कासविणी तिथली जागा सपाट करतात. तिथे खड्डा खणला गेलाय हे कुणाला कळू नये म्हणून. आपली अंडी सुरक्षित राहतील, या विश्वासाने कासवीण पुन्हा पाण्यात जाते. दुर्दैवाने माणूस नावाच्या धूर्त प्राण्याला याची कल्पना असते. कासवांच्या पिल्लांना भरपूर मागणी असते. त्या लालसेपोटी माणूस ती अंडी बाजारात विकतो. हे असंच चालू राहिलं तर कासवांचा विनाश व्हायला वेळ लागणार नाही, हे ‘सह्य़ाद्री निसर्गमित्र’ संस्थेच्या लक्षात आलं. त्यांनी गावा-गावात जागरूकता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कोकणातल्या वेळाससारख्या किनाऱ्यांवर ‘कासव महोत्सव’ सुरू केले. गावातल्या लोकांचे ‘कासव मित्र मंडळ’ सुरू केले. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून हे काम अनेक गावांमध्ये मोठय़ा नेटाने सुरू आहे. आनंदाची गोष्ट अशी की, आमच्या संस्थेच्या कामामुळे आतापर्यंत ३२ हजारांहून अधिक पिल्ले पाण्यात सोडून देण्यात आम्हाला यश आलंय.
रामाशीष आपल्या कामात समाधानी दिसतात. एकेकाळी आय. टी. क्षेत्रात सशाच्या वेगाने काम करणारे रामाशीष मनुष्याच्या लोभापासून वाचलेल्या कासवांचे आशीर्वाद घेत काम करीत आहेत. ससा आणि कासवाच्या शर्यतीत शेवटी कोण जिंकतं, हे इसापने खूप आधीच लिहून ठेवलंय.

सुनील चांदुरकर
रंगभूमीवरील ५४ हून अधिक कार्यक्रमांची निर्मिती केलेले सुनील चांदुरकर यांनी आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनीत डायरेक्टर ऑफ इंलिनीअरिंगपर्यंत पदे भूषवली. नागपूर विद्यापीठातून कॉम्प्युटर टेक्नोलॉजी या विषयात बी.ई. शिक्षण पूर्ण केलेल्या सुनीलचं पहिलं प्रेम नाटक होतं. आयटी क्षेत्रात अगदी ट्रेनी ते डायरेक्टर या प्रवासात सुनील यांना त्यांच्यातील कलाकार स्वस्थ बसू देत नव्हता. सुनील यांची हैदराबाद येथे कामानिमित्त बदली झाली तेव्हा तिथल्या वास्तव्यात ते हैदराबाद येथील नाटय़चळवळीकडे आकर्षित झाले. नोकरी सांभाळून सुनील तिथल्या नाटकांमध्ये काम करू लागले. इतकंच नाही तर नाटकांची निर्मितीही करू लागले. त्यांच्या मानेवर चढलेले भूत खाली उतरणे जणू अशक्य बनले.
एका पारडय़ात आयटी क्षेत्रातील उच्च पदाची नोकरी आणि दुसऱ्या पारडय़ात नाटकाविषयी वाटणारं प्रेम- असं असताना २०१० च्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी आपल्या संचालकपदाचा राजीनामा दिला आणि स्वत:ची ‘माय थिएटर कॅफे’ ही नाटय़संस्था सुरू केली. हैदराबाद येथून पुण्याला स्थलांतरित होत त्यांनी स्वत:चं ऑफिस थाटलं. मराठी नाटकांसोबत हिंदी, इंग्रजी आणि बंगाली नाटकांची निर्मिती केली. अगदी रॉक बँडपासून गझलच्या कार्यक्रमांचीही निर्मिती केली. सुमारे वर्षभर सुनील यांनी आपली आवड जोपासण्याची धुंदी अनुभवली. मात्र वर्षभरानंतर आíथक गणितं चुकतायत, हे लक्षात येताच पुन्हा एकदा ते आयटी क्षेत्रात परतले. मनोरंजन आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणाऱ्या ‘धिंगाणा’ नावाच्या कंपनीत ते सध्या नोकरी करत आहेत. रंगभूमीवरील नवोदित कलाकारांना संधी मिळावी, यासाठी आपल्या वेतनातील काही रक्कम ते खर्च करतात. त्याच्या जोडीला नाटकांची निर्मिती करण्यास ते उत्सुक आहेत. कटू अनुभवानंतरही सुनील यांनी आयटीत राहून रंगभूमीशी नाळ कायम राखली आहे. नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या सुनील चांदुरकर यांचं आयुष्य आनंदाने ‘हाऊसफुल्ल’आहे!

मराठीतील सर्व दिवाळी अंक २०१२ ( Ls-2012-diwali ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Information technology professionals who have chosen different career path

ताज्या बातम्या