Kim Jong Un Pet Shop Visit Photo Video: क्षेपणास्त्र चाचण्या, लष्करी सराव किंवा पाहणी याचसाठी कायम चर्चेत असणाऱ्या उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांचा मृदू स्वभाव पहिल्यांदाच समोर आला आहे. किम जोंग उन यांनी नव्याने सुरु झालेल्या प्योंगयांगमधील एका पाळीव प्राण्यांच्या दुकानाला भेट दिली. समोर आलेल्या फोटोंमध्ये किम चक्क कुत्र्यांच्या पिल्लांसोबत आणि मांजरींसोबत खेळताना दिसत आहेत. या भेटीदरम्यान किम जोंग उन अत्यंत आनंदी मूडमध्ये दिसून आले.

‘सेंट्रल पेट शॉप’ला भेट

आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, किम जोंग उन यांनी प्योंगयांगमधील एका ‘सेंट्रल पेट शॉप’ला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी देखील उपस्थित होती. शहरातील सुविधांची पाहणी करणे आणि देशातील जनतेच्या राहणीमानात होत असलेल्या बदल जाणून घेणे, हा या भेटीचा मुख्य उद्देश होता, असे समोर आलेल्या वृत्तांमध्ये म्हटले आहे. यावेळी किम यांनी पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवला. तसेच, दुकानाच्या रचनेचे आणि तिथे उपलब्ध असलेल्या सुविधांचे कौतुक केले. या दुकानात प्राणी विक्रीसाठी उपलब्ध आहेतच, शिवाय तिथे प्राण्यांसाठी रुग्णालय, ग्रूमिंग सेंटर आणि खाद्याची व्यवस्था देखील आहे.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अत्यंत शिस्तप्रिय आणि कठोर म्हणून ओखळले जाणारे या प्राण्यांच्या सहवासात अत्यंत आनंदी मूडमध्ये दिसले. त्यांनी तिथल्या लहान कुत्र्यांच्या पिल्लांना कडेवर घेतले, त्यांना कुरवाळले. पाळीव प्राण्यांशी खेळताचे त्यांचे फोटो समोर आले आहेत. तसेच त्यांनी तिथल्या मांजरींच्या पिल्लांचीही पाहणी केली.

किम यांची भेट चर्चेचा विषय

जगाला कायम लष्करी वेशात दिसणारे किम एका सामान्य माणसाप्रमाणे प्राण्यांसोबत वेळ घालवताना दिसले. सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, चर्चेचा विषय ठरले आहेत.

‘प्रोपोगंडा’ असल्याचा आरोप

उत्तर कोरियामध्ये पाळीव प्राणी पाळणे हे मध्यमवर्गीयांचे आणि मॉडर्न जीवनशैलीचे लक्षण मानले जाते. दरम्यान, राजकीय तज्ज्ञांच्या मते, किम जोंग उन यांची ही ‘सॉफ्ट इमेज’ मुद्दाम तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. किम फक्त हुकूमशहा नसून जनतेच्या आनंदाची काळजी घेणारा नेता आहे हे दाखविण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप केला जात आहे. दरम्यान, सध्यातरी नेहमी गंभीर राहणारे किम पेट शॉपमध्ये प्राण्यांसोबत वेळ घालवताना दिसल्यामुळे ही बातमी जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे.