अचिंत्यला माझी खास मैत्रीण मानत आलोय मी. आपल्या समाजात पती-पत्नीमधलं नातं मी बघतो तेव्हा सतत असं जाणवत राहतं की, हृदयाच्या अति जवळच्या या नात्यात अनेक कंगोरे आहेत. या नात्याचा एक पदर समाजाकडे आहे, तर दुसरा चार भिंतींच्या आड- अदृश्य. माझं पहिलं लग्न अयशस्वी ठरलं म्हणून घाबरून मी अचिंत्यशी लग्न केलं नाही असं काही नाही. लग्नाचा घाट घालण्यात आम्हाला कधी स्वारस्य वाटलं नाही. मी अनेक विवाहित जोडपी पाहत आलोय. ते एकमेकांना गृहीत धरतात. लग्नाची सिल्व्हर, गोल्ड ज्युबिली होते तरी पत्नीच्या हृदयाचा थांग पतीला लागत नाही आणि पतीला पूर्ण जाणून घेण्यात त्याची अर्धागिनी कमी पडते. लग्न करूनदेखील नातं जर समृद्ध होत नसेल तर होमहवन, बाजे-गाजे, लग्नाचा थाटमाट याला काय अर्थ उरतो? माझ्या आणि अचिंत्यच्या लग्नाविना नात्यात आम्ही दोघांनीही एकमेकांना गृहीत धरलेलं नाही. लग्नाविना एकत्र राहण्याबद्दल अचिंत्यला तिच्या कुटुंबाने वेळोवेळी फटकारलं, पण ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. आम्ही दोघांनी जाणीवपूर्वक, समंजसपणे घेतलेला हा निर्णय होता.. आणि आहे.
माझ्या मते, माझी व अचिंत्यची लिव्ह-इन् रिलेशनशिप ही कमिटमेन्टच आहे. लग्नाविनाही आमचं आयुष्य सुरळीत, सुखकर गेलं. वी बोथ हॅव ग्रोन. विवाहित नात्यामध्ये एक तर पतीचा विकास होतो किंवा पत्नीचा. दोघांची सारखी उन्नती अभावानेच आढळते.
समाज ‘सलाम नमस्ते’सारखा ‘लिव्ह-इन्’ विषयावरचा चित्रपट चवीने पाहतो. त्याला तो पटतोही. पण मग तो वस्तुस्थिती का नाकारतो? या नात्याला समाजमान्यता का मिळत नाही, असा प्रश्न मला नेहमी पडतो. म्हणजे समाजातच स्प्लीट पर्सनॅलिटी आहे. आपण त्यात का जा? आपल्याला जे योग्य  वाटतं, आवडतं, ते करावं. बस्स.