मोदी सरकारने देशभरात सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा अनेक ‘स्मार्ट सिटीज्’ उभारण्याची घोषणा केली आहे. तथापि ही संकल्पना प्राचीन काळापासून आपल्याकडे अस्तित्वात आहेच. अगदी हडप्पा-मोहेंजोदडोतच नव्हे, तर थेट रामायणकाळापासून याचे असंख्य दाखले सापडतात..

सध्या ‘स्मार्ट सिटी’ या संकल्पनेची जोरदार चर्चा सुरू आहे. स्मार्ट सिटी म्हणजे सुंदर, स्वच्छ, आधुनिक शहरे. विविध सोयीसुविधांनी युक्त. पण आपले पूर्वज एवढे स्मार्ट होते, की प्राचीन काळी आपल्याकडे अगदी अशीच शहरे होती, असे कोणी सांगितले तर..?

Buldhana, Police Seize 4 Pistols, Live Cartridges, Buldhana Madhya Pradesh Border, Buldhana Madhya Pradesh Border Operation, police operation, pistols seize in buldhana, buldhana crime news, crime news, buldhana news, lok sabha 2024,
बुलढाणा : चार पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त, मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात कारवाई
NIA team attacked in Bengal
पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात ट्विस्ट; अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
Sudhir Singh murder case
सुधीर सिंग हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला अटक, उत्तर प्रदेशच्या जंगलात पेल्हार पोलिसांचा थरारक पाठलाग
Loksatta anvyarth A terrorist attack on Pakistan naval air base in Balochistan province
अन्वयार्थ: अनागोंदीचा आणखी एक पाकिस्तानी पैलू

हे वाचल्यानंतर काहींची छाती त्या पूर्वजांच्या अभिमानाने भरून येईल. आपण विश्वगुरू असल्याच्या विश्वासाने त्यांचे मस्तक उंच होईल. तर काहींना हसू फुटेल. प्राचीनकाळी आपल्याकडे सर्व काही होते.. विमाने होती, क्षेपणास्त्रे होती, एड्ससारख्या आजारांवरची औषधे होती, यज्ञाने पाऊस पडत असे.. एवढेच नव्हे तर भोपाळसारख्या वायुदुर्घटनेतूनही माणसे वाचू शकतील अशी पर्यावरण शुद्धीकरणाची शक्ती त्या यज्ञांच्या धुरात आणि राखेत होती.. वगैरे वगैरे ‘मनोहर’ कहाण्या आपल्याकडे सांगितल्या जातात. त्यासाठी हटकून ‘नासा’सारख्या संस्थेची वा पाश्चात्त्य विद्यापीठांची साक्ष काढली जाते. त्यातलीच ही एक ‘प्राचीन स्मार्ट शहरांची कथा’ म्हणून बरेचजण त्याकडे दुर्लक्ष करतील. पण ही नक्कीच भाकडकथा नाही.

आता आपल्याकडे प्राचीनकाळी अगदी अशीच ‘स्मार्ट’ शहरे होती, म्हणजे त्या शहरांत वायफाय होते किंवा उड्डाणपूल होते असे कोणीही म्हणणार नाही. ‘अशीच’ म्हणजे जी सुंदर होती, स्वच्छ होती, जेथे नागरिकांच्या आरोग्याची, सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली जाई. त्यांना दैनंदिन जीवनात वाहतूक कोंडी, अस्वच्छता यांसारख्या अडचणी येऊ  नयेत अशी व्यवस्था असे. अशी त्या काळाच्या तुलनेत ‘आधुनिक’ म्हणता येतील अशी शहरे! असे एक शहर आपल्याकडे अनेकांना ऐकून माहीत असते.

‘शहर नव्हे, महानगरच होते ते. विस्तार सुमारे ६६ मैलांचा. शहरात अत्यंत सुंदर असे लांब-रुंद रस्ते. रस्त्यांना मोठमोठी प्रवेशद्वारे, कमानी. रोज त्या रस्त्यांवर पाण्याचा शिडकावा. शहरात उंच उंच इमारती. ठिकठिकाणी बगीचे, उद्याने. मनोरंजनासाठी नाटय़गृहे. सजलेले बाजार. वाहनांची वर्दळ. नागरिकांची, देशोदेशीचे पर्यटक, व्यापारी, उद्योजक यांची गर्दी.. असे ते महानगर.’

विसाव्या शतकाच्या प्रारंभकाळातील महानगरी मुंबईचेच हे वर्णन! खरे तर त्या काळातली कोणत्याही आधुनिक शहरात कमी-जास्त प्रमाणात असेच चित्र असेल. परंतु उपरोक्त वर्णन आहे- अयोध्येचे. वाल्मीकी रामायणातले. (बालकांड, सर्ग ५, श्लोक- १० ते १७) अर्थ स्पष्ट आहे. आता राजा दशरथाची अयोध्या प्रत्यक्षात अशी होती की नव्हती, हा गौण भाग आहे. येथे आपल्यासमोर आहे ती वाल्मीकींना त्या प्राचीन काळात दिसलेली नगरी. अर्थात् हे कवीचे पाहणे झाले. त्यात कल्पनेच्या भराऱ्या, अतिशयोक्ती हे गृहीत धरायचे असते. वाल्मीकींना लंकानगरी सोन्याची दिसली होती. त्यातला रावणाचा प्रासाद हजार सुवर्णखांबांवर उभा होता. असा अतिशयोक्तीचा भाग वगळला तरी त्यातून वास्तवाचे काही तुकडे हाती येतातच. वाल्मीकींनी वर्णिलेली अयोध्या खरेच कशी होती, हे थोडा वेळ बाजूला ठेवले, तरी त्यातून एक बाब समोर येते. ती म्हणजे त्या काळात अशा सुरचित नगरांची कल्पना करता येण्याजोगी परिस्थिती नक्कीच होती.

शालेय पाठय़पुस्तकांतून आपणही अशी सुरचित नगरे पाहिलेली आहेत. हडप्पा आणि मोहेंजोदारो. आजपासून सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीची ती संस्कृती. हिंदुस्थानात सप्तसिंधुच्या मोठय़ा भूभागात- आजच्या पाकिस्तानपासून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरातपर्यंत पसरलेली ही संस्कृती. आखीवरेखीव नगररचना, विटांचे भक्कम बांधकाम, सार्वजनिक स्वच्छतेवर देण्यात आलेला भर ही या शहरांची वैशिष्टय़े. ती उभारणारे लोक कोण होते, ते कोठून आले होते, की मूळचे इथलेच होते, त्यांची भाषा, लिपी कोणती होती, असे अनेक प्रश्न आहेत. त्यांची अंतिम उत्तरे अजूनही गवसलेली नाहीत. मात्र, पुरातत्त्वशास्त्रे आणि अन्य पुराव्यांवरून असे म्हणता येते की, ते इथलेच आर्य होते. हडप्पा येथे कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या उत्खननात काही मानवी सांगाडे सापडले होते. अमेरिकी मानववंशशास्त्रज्ञ प्रा. केनेथ केनेडी यांनी त्यांचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढले. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘गेल्या पाच हजार वर्षांत भारतीय लोकांमध्ये कोणतेही नवे लोक आले नाहीत. सिंधुसंस्कृतीतले लोक हल्लीच्या पंजाब्यांसारखेच होते. त्यांच्यात आणि इराण, अफगाणिस्तानपासून एजियन समुद्रापर्यंत (म्हणजे ग्रीसपर्यंत!) राहणाऱ्या लोकांत अनेक समान गुणधर्म होते.’ याचा अर्थ सरळ आहे. येथे पिढय़ान् पिढय़ा राहणाऱ्या आर्य लोकांनीच या शहरांची उभारणी केली. मात्र, हे वैदिक आर्य नव्हेत. ऋग्वेदाची रचना होते ती उत्तर-सिंधुसंस्कृतीत. ती वैदिक आर्याची संस्कृती होती.

हडप्पा, मोहेंजोदारो ही नागरी सिंधुसंस्कृतीला ललामभूत असलेली शहरे. हडप्पा आजच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतात रावी नदीच्या किनारी आहे. आधी ते एक साधे खेडे होते. मातीच्या झोपडय़ांत राहणाऱ्या शेतकऱ्यांचे. हळूहळू त्याचे शहरात रूपांतर झाले. आपल्याकडील अनेक शहरे अशीच आकाराला आली आहेत.. विस्तारत आहेत. पण ती सूज आल्यासारखी. अस्ताव्यस्त. आणि आजही नगररचना नावाचे शास्त्र अस्तित्वात असताना तशीच बेशिस्त प्रक्रिया सुरू आहे. हडप्पा वेगळे ठरते ते येथे. सुमारे एक चौरस मैलाचा त्याचा विस्तार. पण त्याची रचनाशिस्त आजही आदर्शवत वाटावी अशी. उत्खननातून समोर आलेले हे शहर नेमके होते तरी कसे?

नवी मुंबईसारखे शहर वसवताना जसे सेक्टर आखण्यात आले तसेच ब्लॉक- प्रभाग हडप्पामध्येही दिसतात. त्यात मधोमध वाहणारे सरळसोट रस्ते. तेही चांगलेच प्रशस्त. ३० फूट रुंदीचे. हे झाले मुख्य रस्त्यांचे. आत त्यांना जोडणाऱ्या  छोटय़ा रस्त्यांचे जाळे. त्यांच्या बाजूला इमारती. भाजलेल्या विटा आणि लाकूड यांचा वापर करून बांधलेल्या. त्याही दुमजली, तिमजली अशा. खालचा मजला सरासरी ३० x ३० फुटांचा. त्याहूनही मोठी घरे असत ती श्रीमंतांची. त्यांत बाजूला नोकरचाकरांसाठी खोल्याही असत. पण घरांची रचना मात्र सर्वसाधारण सारखीच असे. म्हणजे मधे चौकोनी मोकळी जागा आणि त्याभोवती खोल्या. काहीशी जुन्या काळातल्या वाडय़ांसारखी. या इमारतींमध्ये प्रवेश करायचा तर बाजूच्या छोटय़ा रस्त्याने वा गल्लीतून यावे लागे. इमारतींची प्रवेशद्वारे कुठेही मोठय़ा रस्त्याच्या बाजूने नसत. फार काय, मोठय़ा रस्त्याच्या बाजूने इमारतींना खिडक्याही नसत. म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असत त्या इमारतींच्या सरळसोट भिंती. त्या तशा रस्त्यांवरून जाणे तसे कंटाळवाणेच असणार. रस्त्याच्या बाजूला खिडक्या नसण्यामागे नेमके कारण काय असावे हे समजलेले नाही. मात्र, त्याचा अंदाज श्री. ज. जोशी यांच्या ‘पुणेरी’ या लेखसंग्रहातील एका किश्श्यावरून चांगलाच लावता येतो. जोशी यांनी भालाकार भोपटकरांना ‘पुण्यातील शेवटचा विक्षिप्त’ म्हटलेले आहे. त्यांचा हा किस्सा.. बाहेर पौर्णिमेचे टिपूर चांदणे पडले असताना भालाकार हातात छत्री घेऊन बाहेर पडले. ती उघडली. जोशी तेथेच होते. त्यांनी काही विचारायच्या आतच ते म्हणाले, ‘या आपल्या सदाशिव पेठेतल्या ब्राह्मण बायका अगदी अजागळ असतात. रात्री जेवणं झाली म्हणजे खरकटं पाणी खिडकीतून सरळ रस्त्यावर फेकतात. ते आमच्यासारख्यांच्या अंगावर पडतं. मला एकदा प्रसाद मिळाला. तेव्हापासून ठरवलं, की दिवस असो, रात्र असो- अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो, डोक्यावर छत्री ही पाहिजेच!’ हडप्पातील गृहिणी असे काही करत होत्या की नाही, माहीत नाही. परंतु तेथे मुख्य रस्त्यांच्या बाजूने खिडक्या मात्र नव्हत्या.

या घरांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तेथील न्हाणीघर. प्रत्येक घराचा तो आवश्यक भाग होता. त्याची रचना पाहता लक्षात येते की, तेव्हाही भारतीय लोकांना उभ्यानेच अंघोळ करण्याची सवय होती. या स्नानगृहांतील पाणी वाहून नेण्यासाठी गटारे काढलेली असत. ती बाहेरच्या रस्त्यांखालून जाणाऱ्या गटारांना जोडलेली असत. ही गटारे मोठय़ा विटांच्या तुकडय़ांनी बंदिस्त केलेली असत. इतिहासकार उपेंद्रसिंह यांच्या मते, तर हडप्पा संस्कृतीतील धोलाविरा (गुजरात) या नगरात गटारांतील सांडपाणी शोषखड्डय़ांत सोडले जाई. एवढेच नव्हे, तर तेथील घरांमध्ये शौचकूपही असत. त्यासाठी जमिनीत मोठे भांडे गाडलेले असे आणि तेथे पाण्यासाठी लोटाही असे.

आज एवढय़ा वर्षांनंतरही तो लोटा टिकला; पण हडप्पाकालीन हिंदुस्थानातले ते ज्ञान कुठे हरवले कोण जाणे! आजही भारतातील बहुसंख्य गावांत एकतर गटारेच नाहीत. सांडपाणी सरळ घराबाहेर सोडून दिलेले असते. वर्षांनुवर्षे, पिढय़ानुपिढय़ा हे चाललेले आहे. सातवाहनांच्या काळात लिहिल्या गेलेल्या ‘गाहाकोसा’त सांडपाण्याचे ‘पऱ्हीवे’ (घरातील सांडपाण्याचे ओहळ) रस्त्यावरूनच वाहत जात असल्याचे उल्लेख आहेत. हे तेराव्या शतकातले सांडपाणी एकविसाव्या शतकातही वाहते आहे! त्या काळात पायखाने असत. पण यादवकालातील घरांमध्ये बंदिस्त स्नानगृह असल्याचे मात्र उल्लेख नाहीत. सार्वजनिक स्वच्छतेवर असलेला हडप्पा संस्कृतीचा कटाक्ष आपण किती लवकर झटकून लावला, याचे हे एक साधे उदाहरण. शहराची स्वच्छता आणि अर्थातच नागरिकांचे आरोग्य यावर त्या संस्कृतीचा असलेला भर मोहेंजोदारोतील महास्नानगृहातूनही दिसतो. हे सार्वजनिक स्नानगृह तेव्हाच्या एखाद्या धार्मिक कृत्याकरिता वापरले जात असावे असा कयास आहे. मोहेंजोदारो (मूळ सिंधी- ‘मुअने-जो-दारो’- म्हणजे मृतांची टेकडी!) आणि हडप्पा यांच्या रचनेत खूपच साम्य आहे. प्रमाणबद्ध विटा, आखीवरेखीव रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, पेयजलाचे व्यवस्थापन.. सगळे सारखे.

वर उल्लेखिलेले धोलाविरा हे शहर कच्छच्या रणात होते. हडप्पामध्ये पश्चिम दिशेला एक बालेकिल्ल्यासारखा भाग दिसतो. ३० ते ५० फूट उंचावर साधारणत: अंडगोलाकृती आकाराचा तो भाग आहे. त्याच्याभोवती तटबंदी असे आणि त्यावर इमारतीही. १२० एकर क्षेत्रावर पसरलेल्या धोलाविरामध्येही असाच बालेकिल्ला आहे. पण तो शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. त्याला जाड तटबंदी आहे. त्यात बहुधा नगरश्रेष्ठी राहत असावेत. या बालेकिल्ल्याच्या समोर मोकळे मैदान होते. त्याच्याभोवती आजच्या स्टेडियमसारखी बैठकव्यवस्था आढळून आली आहे. याचा अर्थ त्या मैदानात सैन्याच्या कवायती, खेळ, उत्सव असे कार्यक्रम साजरे होत असावेत. या मैदानानंतर नागरिकांची वस्ती आहे. हडप्पा, मोहेंजोदारोतील इमारती विटांच्या असत. येथे त्या दगडांनी बांधलेल्या होत्या. हे संपूर्ण शहर आधी आखलेल्या योजनेनुसार बांधण्यात आले असावे असे पुरातत्त्वशास्त्रज्ञांचे मत आहे.

कोणत्याही नगरनियोजनात जलव्यवस्थापन ही एक सर्वात महत्त्वाची बाब. धोलाविरा हे तर पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या भागात येते. त्यामुळेही असावे, परंतु तेथील जलनियोजन हे आजच्या अनेक शहरांना लाजवील असे आहे. इसवी सनापूर्वी तीन हजार या काळाबद्दल आपण येथे बोलतो आहोत हे लक्षात घेतले तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांचे जलव्यवस्थापन हा चमत्कारच म्हणावा लागेल या दर्जाचे आहे. धोलाविरामध्ये तीन मोठे तलाव होते. तेथून दगडी कालव्यांनी शहरात पाणी खेळविले जात असे. नंतरच्या काळात तेथे अनेक लहान लहान तलावही बांधण्यात आले. त्यातील काही खडक कोरून बनविलेले होते. याशिवाय शहरात काही विहिरीही होत्या. सुमारे ४० हजार लोकसंख्या असलेल्या मोहेंजोदारोमध्येही किमान ६०० विहिरी होत्या.

हे हडप्पाकालीन शहर आजच्या आपल्या बहुतेक महानगरांशी एका बाबतीत जवळचे नाते सांगते. ते म्हणजे झोपडपट्टी. शहर जसजसे वाढू लागले तसतसे त्याच्याकडे स्थलांतरितांचा ओघ सुरू झाला. शहराच्या नियोजनात त्यांना जागाच नव्हती. त्यांनी शहराच्या पूर्वेकडील अंगाने वस्त्या उभारण्यास सुरुवात केली. पण हडप्पा संस्कृतीतील लोकांचे हे वैशिष्टय़, की त्यांनी तेथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना आखली. ख्यातनाम पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. आर. एस. बिश्त यांच्या अभ्यासानुसार, धोलाविरा प्रशासनाने ती वस्ती सुधारली. त्यांना शहराचे कायदे-नियम लागू केले. धोलाविराच्या उत्खननात सापडलेला ‘न्यू लोअर टाऊन’ हा भाग या नव्याने सामील झालेल्या वस्तीचा होता. धोलाविराचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तेथे सापडलेल्या नावांच्या पाटय़ा. अशा ९.८ फूट उंचीच्या पाटय़ा तेथे सापडल्या असून, त्यावर काही अक्षरे वा आकृत्या दिसून आल्या आहेत.

हडप्पा संस्कृतीतील ही शहरे व्यापारी शहरे होती. त्यांचा बाहेरील प्रदेशांशी संपर्क असे. दळणवळण जलमार्गाने चाले, तसेच रस्त्याने- बैलगाडय़ांच्या माध्यमातूनही. हडप्पा संस्कृतीतील लोथल हे बंदराचे शहर होते. या सर्वाचे व्यवस्थापन अर्थातच आपोआप होत नसणार. तेथे पालिकेसारखी काही व्यवस्था असणारच. ती नक्की कशी होती, हे अद्याप नीटसे उलगडलेले नाही. पण अगदी बांधकामासाठीच्या विटांचे आकारही सारखेच होते म्हटल्यावर हे पालिका प्रशासन चांगलेच कार्यक्षम होते असे म्हणावे लागेल.

हळूहळू ही संस्कृती उताराला लागली. माणसे पांगली आणि शहरे ओस पडू लागली. हे कशामुळे झाले, याबद्दल अनेक सिद्धान्त प्रचलित आहेत. त्यातील सर्वमान्य म्हणजे- पर्यावरणीय बदल! हे संस्कृतीचे लयास जाणे एका दिवसात झालेले नाही. त्यात बराच मोठा काळ गेलेला आहे. हडप्पा संस्कृतीचा प्रभाव मात्र त्यापुढील काळातच नव्हे, तर अगदी आजच्या काळापर्यंतही काही अंशी दिसून येतो. हडप्पामध्ये काही मातीच्या मूर्ती सापडल्या आहेत. दोन्ही तळहात जोडलेल्या अवस्थेतल्या. नमस्ते करणाऱ्या. काही मातीच्या बाहुल्यांवर लाल शेंदराचा टिळा आढळला. कपाळावरच्या सिंदूरशी त्याचे नाते नसेल असे कसे म्हणता येईल? मायकल डॅनिनो हे भारतीय लेखक. मूळचे ते फ्रान्सचे. त्यांच्या ‘दी लॉस्ट रिव्हर : ऑन द ट्रेल ऑफ द सरस्वती’ या पुस्तकात त्यांनी दाखवून दिले आहे, की धोलाविराच्या नियोजनकारांनी लांबीचे १.९ मीटर हे मानक वापरले आहे. त्यानंतर काही हजार वर्षांनी, इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात लिहिल्या गेलेल्या अर्थशास्त्रात धनुष हे लांबीचे मानक येते आणि ते सारखेच आहे. अशा अनेक गोष्टी नंतरच्या संस्कृतींनी आत्मसात केल्या. याचे पुरावे नंतरच्या शहररचनेतही दिसून येतात. उदाहरणार्थ.. पाटलीपुत्र!

चंद्रगुप्त मौर्य (इसवी सन पूर्व ३२२ ते २९८) यांच्या दरबारातील मॅकेडोनियाचा (ग्रीस) राजदूत मेगॅस्थेनिस याने पाटलीपुत्र नगरीचे जे वर्णन केले आहे ते पाहण्यासारखे आहे. तो म्हणतो- ‘मी जगातली अनेक शहरे पाहिली आहेत. सुसा पाहिले, एकबातना पाहिले. पण पाटलीपुत्र हे जगातील सर्वात मोठे शहर आहे.’ हे शहर समांतर चतुर्भुज आकाराचे होते. लांबीला साडेचौदा आणि रुंदीला अडीच किलोमीटर. हे आकडे अतिशयोक्त म्हटले तरी त्यावरून हे शहर म्हणजे महानगर होते एवढे लक्षात यावे. शहराभोवती लाकडी तटबंदी होती. त्याला ६४ प्रवेशद्वारे आणि ५७० निरीक्षण मनोरे होते. पाचव्या शतकात भारतात आलेला चिनी प्रवासी फा हियान पाटलीपुत्रात आला तेव्हा तेथे जुन्या वैभवाचे अवशेष तेवढे उरले होते. पण तेथील त्या दगडी भिंती, उंच मनोरे, प्रवेशद्वारे पाहून तो एवढा भारावला, की त्या भरात तो लिहून गेला- ‘हे शहर मानवी हातांना उभारता येणे शक्य नाही. ते कोणा अतिमानवी शक्तीचे काम असावे!’ एवढय़ा मोठय़ा शहराचे व्यवस्थापन कसे चालत असेल? हडप्पा संस्कृतीतील शहराच्या व्यवस्थापनाबद्दल आपणास माहिती नाही. पाटलीपुत्रबद्दल मात्र मॅगेस्थेनिसने त्याच्या ‘इंडिका’ या ग्रंथात केलेली वर्णने तसेच चाणक्याचे ‘अर्थशास्त्र’ यांतून बरीच माहिती मिळते.

मौर्यकाळातील या शहरात ३० सदस्यांची समिती असे. त्यांच्या मिळून सहा उपसमित्या असत. या समित्या शहराचे व्यवस्थापन पाहत, असे मॅगेस्थेनिस सांगतो. मात्र, त्याचे पुरावे अन्यत्र मिळालेले नाहीत. एक मात्र खरे, की त्या काळातील काही शहरांची स्वतंत्र नाणी सापडली असल्याने त्यांचे बऱ्यापैकी स्वातंत्र्य असलेले प्रशासन असे, असे म्हणण्यास वाव आहे. या प्रशासनात उच्चाधिकारी असे तो नागरक किंवा पूरपाल. याचे स्थान पौरजनांत सर्वात उच्च. म्हणजे महापौरच तो! शहरातील महसूल वसुली, कायदा-सुव्यवस्था, स्वच्छता ही याची मुख्य जबाबदारी. रस्त्यांची स्वच्छता, पूर, दुष्काळ, आग, आजाराच्या साथी यांची जबाबदारीही त्याच्यावरच असे. त्याच्या हाताखाली पोलीस प्रमुख असे. तो दण्डनायक. शिवाय गुप्तचर असत ते वेगळेच. त्यांच्याकडून, तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून शहरातील सर्व घटना-घडामोडींची खबर ठेवली जात असे. अशाच एका महापौराने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाची दुरुस्ती करून घेतल्याचाही उल्लेख आढळतो. ही घटना स्कंदगुप्ताच्या काळातील- इसवी सनाच्या पाचव्या शतकातील. पर्णदत्त नावाच्या एका प्रांतपालाचा मुलगा चक्रपालीत हा नगरपाल होता. त्याने इ. स. ४५५ मध्ये गिरनार धरणाची दुरुस्ती केली होती. यावरून तत्कालीन पालिका प्रशासनाच्या कार्याची थोडीशी कल्पना यावी.

हडप्पा संस्कृतीतील नगररचनेचे लिखित शास्त्र नाही. तसे शास्त्र पाहायला मिळते ते कौटिल्याच्या अर्थशास्त्रात. कौटिल्याच्या सूचनांनुसार, शहर चौकोनी आकारात वसवावे. त्याचे सहा मोठय़ा रस्त्यांनी सहा प्रभाग पाडावेत. यातील तीन रस्ते पूर्व-पश्चिम आणि तीन दक्षिणोत्तर असावेत. शहराच्या मधोमध मुख्य मंदिर असावे. वेगवेगळ्या प्रभागांत वेगवेगळ्या वर्गाची वा जातींची व्यवस्था करावी. भुवनेश्वरजवळील शिशुपालगढ हे शहर अशा प्रकारे चौकोनी आकारात उभारलेले दिसते. अर्थात हे शहर मौर्यकाळाच्याही आधीचे असल्याने ते ‘अर्थशास्त्रा’नुसार उभारण्यात आले आहे असे म्हणता येणार नाही. ‘अर्थशास्त्र’ आणि वात्सायनाचे ‘कामशास्त्र’ हे दोन ग्रंथ आणि अन्य काही साहित्यिक, कलात्मक पुरावे यांवरून तेव्हाची नगररचना आणि नागरिकांचे जीवन यांवर चांगलाच प्रकाश पडतो. हडप्पाप्रमाणेच या नगरांतील निवासस्थानेही बहुमजली असत. त्यात एव्हाना एक फरक पडला होता. तो म्हणजे आता या इमारतींची प्रवेशद्वारे, गवाक्षे रस्त्याच्या दिशेने उघडत असत. ही घरेही पूर्वीसारखीच असत. मधे मोकळी जागा, त्याभोवती ओसरी आणि मागे खोल्या- अशी. वात्सायनाने गृहस्थाच्या निवासस्थानास दोन खोल्या असाव्यात असे म्हटले आहे. द्विवास-गृहं कारयेत्- एक बाहेरची खोली आणि दुसरी आतली. काही साहित्यरचनांत स्नानगृहांचाही उल्लेख आढळतो. कालिदासाने वारियांत्राचा उल्लेख केलेला आहे. हे जलयंत्र. उन्हाळ्याच्या काहिलीत पाणी फवारून घरातील वातावरण शीतल करण्यासाठी ते वापरले जाई. शहरात तरणतलाव असत. बागा असत. श्रीमंतांची खासगी उद्याने तर असतच; पण सार्वजनिक बागाही असत. त्यांत झोपाळे असत. चंद्रगुप्त मौर्याच्या राजवाडय़ाबाहेर सुंदर बगीचा होता असे वर्णन आहे. या शहरांत गरीब नव्हते का?.. होते. ‘अर्थशास्त्रा’त दर दहा गरीब कुटुंबांसाठी एक सार्वजनिक विहीर असावी, असे म्हटले आहे.

अर्थशास्त्रातील नगर प्रशासनाचे नियम आजही लक्षात घ्यावेत असे आहेत. उदाहरणार्थ- आग लागून शहराचे नुकसान होण्याची शक्यता अधिक. कारण घरे जवळ जवळ असतात. त्यामुळे प्रत्येक घरात अग्मिशमनाची प्राथमिक साधने असावीत असे कौटिल्याने बजावले आहे. त्याने वाहतुकीचे नियमही घालून दिले आहेत. तेव्हाच्या रस्त्यांवरील वाहतूक ही प्रामुख्याने बैलगाडय़ांची. गाडीवानाशिवाय बैलगाडी चालली तर तो तेथे गुन्हा होता. लहान मुलांसोबत कोणी मोठा गाडीवान असल्याशिवाय बैलगाडी चालविण्यास त्यांना मनाई होती. रस्त्यांतून गाडय़ा उडवणेही निषिद्ध होते. जर बैलाची वेसण वा कासरा तुटला, जू झुगारून बैल पळाला तर मात्र गोष्ट वेगळी. एरवी वेगाने गाडी पळवणे हा दंडनीय अपराध होता. यातील एक नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानुसार शहरात नगर प्रशासनाने गटारींची व्यवस्था करायची आहे. पण कचरा टाकून त्या गटारी कोणी तुंबवल्या, रस्त्यात केरकचरा टाकून कोणी घाण केली तर त्याला मोठा दंड करावा असे सांगितले आहे. आणि हा रस्ता जर राजमार्ग असेल तर त्यासाठी दुप्पट दंड आकारावा असा नियम सांगितला आहे. (पांसुन्यासे स्थायामष्टभागो दण्ड:। पंकोदक संनिरोधे पाद:। राजमार्गे द्विगुण:। – ‘अर्थशास्त्र’, अ. ३५, श्लोक ३०, ३१, ३२) हीच गोष्ट मलमूत्रविसर्जनाची. कौटिल्याने म्हटले आहे-

पुण्यस्थानोदकस्थानदेवगृहराजपरिग्रहेषु पणोत्तरा विष्ठादण्डा:। मूत्रेष्वर्धदण्डा:। (अ. ३५, श्लोक ३३, ३४)

राजमार्ग, पवित्र तीर्थस्थान, मंदिर, विहीर, तलाव, खजिना, गोदाम या ठिकाणी कोणी मल वा मूत्रविसर्जन करील त्याला कशा प्रकारे आर्थिक दंड करावा, हे कौटिल्याने यात सांगितले आहे. त्यातही राजमार्गावर मलत्याग करणारास एक पण (त्यावेळचे चलन) दंड आहे आणि विहीर वा तलावाच्या ठिकाणी तसे करणारास तीन पण दंड सांगितला आहे. येथे राजमार्गाहून जलस्थानाचे महत्त्व मोठे आहे हे लक्षात यावे. हडप्पा संस्कृतीत स्वच्छतेवर अतिशय भर होता हे आपण पाहिले आहे. त्यानंतर अनेक वर्षांनी कौटिल्यही तेच सांगत आहे, हे शोचनीयच म्हणावे लागेल.

कौटिल्याच्या नियमांची सरसकट अंमलबजावणी होत होती की नाही, हे सांगणे अवघड आहे. पण या नियमांतून, त्याकाळच्या नगररचनेतून आपणासमोर उभी राहतात ती तेव्हाची स्मार्ट शहरेच! हडप्पा, मोहेंजोदारो, धोलाविरा, कालिबंगन, लोथल या सिंधु-संस्कृतीतील शहरांपासून पाटलीपुत्र, राजगढ, विजयनगर, कनौज अशी शहरांची ही यादी वाढवता येईल. कालौघात त्यातील काही शहरे ओस पडली. गाडली गेली. काही बकाल झाली. आक्रमणांनी, नैसर्गिक आपदांनी त्यांतील अनेकांची रया गेली. ऋग्वेदनिर्मितीचा काळ हा सिंधसंस्कृतीच्या उताराचा काळ होता. ऋग्वेदात नगरांचा उल्लेख आढळत नाही, हे विशेष. ‘पूर’ हा शब्द ऋग्वेदात येतो, परंतु त्याचा अर्थ ‘नगरे’ असा होतो का, याबद्दल मतभेद आहेत. ऋग्वेदात पुरे फोडून इंद्राने दासांनी अडवलेले आर्याचे पाणी मोकळे केले असा उल्लेख येतो. (वृत्रखादो वलंरूज: पुरांदर्मो अपामज: । स्थाता रथस्य हर्योरभिस्वर इन्द्रो दृळ्हा चिदारूज: ।। ऋग्वेद, ३.४५.२) दासांची ही पुरे डोंगराळ प्रदेशात होती. एकूणच या काळात नागरी संस्कृती ग्रामीण झाली होती. ऋग्वेदातील एकंदरीत पुराव्यावरून आर्याची आर्थिक स्थिती हलाखीची होती असे दिसते. उत्तर-सिंधुकाळातील हे आर्य झोपडय़ांत राहात. अशा झोपडय़ांच्या खेडय़ांत सांडपाण्याची व्यवस्था असणे अवघडच. पण म्हणून प्राचीन नागरी संस्कृतीच्या स्मृती लोपल्या नव्हत्या. त्या पुढे परिस्थिती सुधारल्यानंतर उभ्या राहिलेल्या नगरांच्या रचनेतून दृगोचर झाल्या. आज पुन्हा त्या स्मृती उजळण्याची आवश्यकता आहे. प्राचीनाचा गौरव करण्याचा, त्यातील उत्तम ते घ्यावे, हाच एकमेव चांगला मार्ग असतो.
रवि आमले