‘ही धरती हे अम्बर तुझे गुण गाती;

हे तारे हे वारे तुझे नाव घेति;

विश्वाचा पालक तू नायक गणांचा;

गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता..’

‘‘यातलं ‘मयतू’ थोडं सुरात गेलंय आणि आपण ‘चापाल’पासून परत घेऊ यात. श्वास पुरत नाहीये..’’

हास्यास्पद वाटले तरीही हे कुठलेही गाणे रेकॉर्ड होतानाचे आजच्या काळातले सर्वसाधारणपणे नेहमीचेच संवाद आहेत. प्रगत तंत्रज्ञानामुळे आज तुकडय़ा-तुकडय़ांमध्ये, वेळ घेऊन, पाहिजे त्या चुका सुधारत रेकॉर्डिग करणे शक्य झाले आहे.

अर्थातच जुन्या काळात असे होत नसे. सैगलसाहेबांच्या काळात तर प्रत्यक्ष शूटिंगच्या वेळीच गाणेसुद्धा रेकॉर्ड होत असे. गायक नटाला ऐकू येईल, पण फ्रेममध्ये दिसणार नाही अशा पद्धतीने वादक साथीदार लपून बसायचे. यात एखाद्याची छोटीशी जरी चूक झाली तरी पूर्ण सीन पुन्हा शूट आणि रेकॉर्ड करावा लागत असे. मग डबिंगचे तंत्र आले. गाणी स्वतंत्रपणे स्टुडिओमध्ये रेकॉर्ड व्हायला लागली. त्यामुळे गायकासाठी ते सोयीचे झाले. नटाला गाता यायलाच पाहिजे, ही अट त्यामुळे नाहीशी झाली. संगीत संयोजनातही खूप शक्यता वाढल्या. आधी जिथे साथीला फक्त एखादे व्हायोलिन, हार्मोनियम, तालवाद्य आणि तबला एवढेच असायचे, तिथे २५-२५ व्हायोलिन्सचा ताफा (स्ट्रिंग्स्) वेगवेगळी तालवाद्य्ो वापरून सिनेगीते बनवण्यात यायला लागली. संगीत आणखीन समृद्ध, विविधतेने नटलेले असे होत गेले. तरी या प्रकारातसुद्धा चुकांना वाव नव्हताच. सगळे वादक आणि गायक एकाच वेळी वाजवत व गात असत. त्यामुळे एखादा चुकला की अख्खे गाणे ‘रिटेक’ करायचा शाप होताच. म्हणजे विचार करा.. ‘तूने अभी देखा नहीं, देखा है तो जाना नहीं, जाना है तो माना नहीं, मुझे पहचान नहीं, दुनिया दीवानी मेरी, मेरे पीछे पीछे भागे, किस में है दम यहाँ, ठहरे जो मेरे आगे, मेरे आगे आना नहीं, देखो टकराना नहीं, किसीसे भी हारे नहीं हम..’ हे एकतर एका श्वासात म्हणायचं आणि शेवटच्या कडव्यात काही कोणाची चूक झाली, तर परत पहिल्यापासून सुरुवात! किंवा लतादीदींचे ‘सावरे सावरे.. काहे मोसे करे जोराजोरी..’

कालांतराने तंत्रज्ञानात अधिकाधिक प्रगती होत गेली. वादक वेगळ्या वेळी आणि गायक वेगळ्या वेळी ध्वनिमुद्रित होऊ लागले. सिंथेसाइजर हे एक वाद्य- ज्यात वेगवेगळे आवाज तयार करता येतात (असे आवाज- जे अन्य वाद्यांमधून काढता येत नाहीत!)- अस्तित्वात आले. पंचमदांनी या वाद्याचा खूप उत्तम वापर केला. बहुधा पंचमदांनीच पहिल्यांदा ओव्हरलॅपचा प्रयोग केला. (उदाहरणार्थ- ‘कतरा कतरा..’ ‘ज्वेल थीफ’मधले ‘बैठे है क्या इसके पास..’ ज्वेल थीफ’चे संगीत संयोजन बव्हंशी पंचमदांनी केले होते.) आशाच्या आवाजावर आशाचाच आवाज आणि तोही ‘कतरा कतरा’सारख्या गीतावर- लाजवाबच होता. थोडक्यात काय, तर तंत्रज्ञानामुळे काम फक्त सोपे नाही झाले, तर ते अधिकाधिक श्रीमंत, व्यामिश्र होत गेले.

पुढे मग ‘कॉम्प्युटर’ नावाचा क्रांतिकारक कलाकार अस्तित्वात आला. अशी वेळ येऊन ठेपली, की कोणाकडूनही काहीही वाजवून न घेता अख्खे गाणे तयार होऊ शकते. बहुधा विजू शहाने या क्रांतीमध्ये मोठा वाटा उचलला. ‘गुप्त’ या चित्रपटाच्या संगीतात त्याने पूर्णत: प्रोग्रॅम्ड् आवाज वापरले. एकही ‘लाइव्ह’ वाद्य वापरले नाही. अर्थात् गायक-गायिकेला मात्र अजूनही पर्याय नाही सापडलेला! परंतु ज्याचा गायनाशी काही संबंध नाही अशा व्यक्तीला गायक बनवणे आता शक्य झाले आहे. तुम्हाला काय वाटते? सलमान हा काय सुराबिरात गाऊ शकतो की काय? ‘ऑटो टय़ूनर’ नावाच्या तंत्रज्ञानाने कोणालाही सुरात आणता येते. आजचा रेडा ‘वेद’ केवळ म्हणणारच नाही, तर उत्तम सुरात वगैरेही गाईल! पण सलमानने गाणे हा एक अपवाद आहे, साइड बिझनेस आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. आजचे गायकसुद्धा तेवढीच मेहनत घेतात- जेवढी आधीचे घ्यायचे. म्हणजे ‘पान में पुदीना देखा, नाग का नगीना देखा, चिकनी चमेली देखा..’ म्हणताना बैनी दयालला मधे मधे थांबायची मुभा असते, पण याचा वापर तो गाताना आवाजातले चढउतार, ५्रु१ं३, े४ि’ं३्रल्ल वगैरे अलंकार आणखीन चांगल्या पद्धतीने दाखवण्यासाठी करतो. या आधुनिक तंत्रामुळे गाण्यात जे दाखवायचे आहे ते अधिक प्रभावीपणे दाखवता येते. याच तंत्रज्ञानामुळे ‘ब्रेथलेस’सारखे एक अफलातून गाणे बनते. ‘साथिया’मध्ये एकावर एक गाणारे असे चार-पाच सोनू निगम आपल्याला एकाच वेळी ऐकू येतात. नव्या तंत्रज्ञानामुळे सादर होण्याच्या, व्यक्त होण्याच्या प्रतिभेला वाट मोकळी करून देण्याच्या शक्यता अनेक पटीने वाढल्या आहेत. आणि ज्या संस्कृतीत व्यक्त होण्यासाठी जास्तीत जास्त विकल्प उपलब्ध असतात ती संस्कृती जास्त श्रीमंत असते.

..तर मग चुकतंय काय? काही चुकतंय की नाही? नक्की काय चुकतंय? हेच, की या शक्यतांचा वापर आज जरा चुकीचा होतोय. आज ‘बिझनेस’ हा संगीताच्या वरचढ झाला आहे. १९९० च्या दशकात होते तसे ‘इंडिपेंडेंट म्युझिक’ आज राहिलेले नाही. कारण आज कॅसेट्स, सीडीज् विकत घेण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे. आपले गाणे पोहोचवण्याचे चित्रपट संगीत हेच एक प्रबळ माध्यम उरले आहे. त्यामुळे चित्रपटात पैसे टाकणाऱ्याचे संगीत क्षेत्रातल्यांना ऐकावे लागते. नृत्य-गीतांचा भडिमार होतो आहे. संगीत ‘हिट् असेल तरच चांगले’ हे समीकरण घट्ट होत आहे. परिणामी हिट् गाण्यांचा एक साचा बनवून त्याच साच्यातली गाणी पुन: पुन्हा काढली जात आहेत. त्यातून संगीतनिर्मितीची फॅक्टरी सुरू झाली आहे. पटापट बनणारी ‘चायना माल’ गाणी बाजारात येत आहेत; ज्यांचे आयुष्य केवळ एखाद् दोन वर्षांचेच असते. ‘मागणी तसा पुरवठा’ करण्यासाठी चोऱ्यामाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अर्थात या चोऱ्यामाऱ्या अगदी ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ चित्रपटांच्या जमान्यापासून चालू आहेत. पण आज त्या जास्त प्रमाणात आणि तंत्रज्ञानामुळे अगदी कॉपी- पेस्टच्या सुलभतेने घडतात. पण याच तंत्रज्ञानाच्या जोरावर आज त्या पकडल्याही तितक्याच लवकर जातात. पण तरीही ती गाणी हिट् होतात. या सगळ्या गदारोळात मग मनापासून केलेली, वेगळा प्रयोग आणि नावीन्य असलेली काही गाणी दुर्लक्षिली जातात. पण म्हणून अशी गाणी आज बनतच नाहीत असे म्हणणे चुकीचे आहे. अजरामर कलाकृती आजही बनतात; पण ‘कारखानी गाण्यां’च्या तुलनेने अशा गाण्यांचे प्रमाण कमी आहे, इतकेच. ही ‘कारखानी गाणी’ आजच्या काळाचे प्रतिनिधित्व करताहेत खरी, पण ही क्षणभंगुर आहेत, हे या गाण्यांच्या निर्मात्यांनासुद्धा माहीत आहे. आजचा काळ या गाण्यांमुळे ओळखला जात असला तरी २०५० मध्ये आपण आजच्या काळाकडे वळून पाहिले तर आपल्याला ‘चार बोतल वोडका’, ‘लुंगी डान्स’, ‘आशिक बनाया’, ‘चलाओ ना नैनो से बाण’ ही गाणी आठवणारसुद्धा नाहीत. पण ‘तू बिन बताये’, ‘फिर ले आया दिल’, ‘अभी मुझ में कहीं’, ‘साथिया’, ‘तनहाई’, ‘दिलसे रे’ ही आणि अशी गाणीच सर्वात आधी आठवणार आहेत. मग आम्हीही तेव्हा म्हणू की, ‘काय काळ होता तो जुना! जुनं ते सोनं!’

यातून मला हे सांगायचंय की, प्रत्येकालाच ‘जुनं ते सोनं’ असं वाटत असतं. कारण त्याला जुन्या काळातली हाइलाइट्स.. क्षणचित्रेच दिसत असतात. जुन्या काळातल्या हजारो गाण्यांपैकी शेकडो चांगली गाणीच आठवत असतात. आणि हे प्रत्येक काळात होत राहणार आहे. प्रत्येक काळात काही चांगले, काही वाईट असतेच. जसे ‘त्या’ काळात मुख्य गायक आणि संगीतकार बोटांवर मोजता येतील एवढेच होते. पण आजच्या काळात संधीची दारे सर्वासाठी खुली आहेत. दरवर्षी आपल्याला एखादा नवीन आवाज ऐकायला मिळतो. नवीन प्रकारचे संगीत ऐकायला मिळते. आज संगीतात जेवढी विविधता आहे तेवढी तेव्हा नव्हती, हे मान्य करावेच लागेल. आजच्या काळातसुद्धा त्रुटी आहेतच. पण त्याही जातील हळूहळू. इंटरनेटमुळे आपले संगीत लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या नवनवीन शक्यता निर्माण होऊ पाहताहेत. चित्रपटांची मक्तेदारी लवकरच संपेल. संगीत अधिकाधिक विविधतेने नटलेले, थेट हृदयातून निघालेले असे होत जाईल आणि संगीताचा सुवर्णकाळ पुन्हा येईल. त्याला यावंच लागेल.
जसराज जोशी