लोकसत्ता दिवाळी अंक २०१७

‘एनिग्मा’ या शीर्षकाचं हे माझं चित्र. त्यात एक माणूस एक वस्तू हाताळताना विचारात गढलेला दिसतो. या चित्रातल्या माणसाच्या हातात जो त्रिकोण दिसतो आहे, त्याचा आकार जरा कोडय़ात टाकणारा आहे. अशक्य आकाराचा हा त्रिकोण अनेकांनी आधीही पाहिलेला असेल.

या चित्रासंदर्भात चित्रकार म्हणून मला पडलेलं कोडं आणखी निराळं आहे. दृश्यातून काय दाखवलं जातं आणि काय पाहिलं जातं याबद्दल- म्हणजे ‘रिप्रेझेंटेशन’बद्दल मी अधिक विचार करतो आहे.

लायनेल आणि गणितज्ञ रॉजर पेनरोज या पिता-पुत्रांनी ‘ट्रायबार’ची रचना केली. दृष्टिभ्रम वाटणारी आणि गणितातल्या भूमितीच्या प्रश्नांचा वेध घेणारी अनेक चित्रं करणारा मॉरित्स इचर हा या पेनरोज पिता-पुत्रांचा समकालीन; आणि एका शोधनिबंधाच्या लेखनात त्यांचा सहकारीदेखील. त्यांनी विकसित केलेला हा ‘इम्पॉसिबल ट्रँगल’चा आकार आहे.

तो इथं टेबलावर आहे. ‘स्टिल लाइफ’मध्ये एखादी वस्तू असते, तसा. पण हे स्टिल लाइफ नाही. इथं एक माणूस त्या त्रिकोणाला हाताळतो आहे. चित्रात मानवाकृती आल्यामुळे चित्रातली गुंतागुंत वाढतेय इथे. जणू बारकाईनं निरीक्षण करून झाल्यावरही ही त्रिकोणी वस्तू त्याच्या हातातच आहे. चित्रातला तो माणूस हातातल्या या आकाराबद्दल काही सखोल विचारांमध्ये गढून गेला आहे.. त्याला कोणते प्रश्न पडले असावेत?

एखादी गोष्ट अगदी पटण्यासारखीच (कन्व्हिन्सिंगली) समोर येते. ती गोष्ट प्रत्यक्षात शक्य नाही, अस्तित्वात असूच शकत नाही, हे माहिती असतं, तरी ती खरी किंवा सहजशक्य असल्याप्रमाणेच भासते. हे कसं काय होतं? यामागच्या प्रक्रियेचा शोध ‘भाषे’मध्ये (‘दृश्यभाषेत’ या अर्थानं) घ्यायचा की त्याच्या उत्तरांसाठी जगाकडे पाहायचं, हा प्रश्न मला मांडायचा आहे. तो माझ्याहीपुढला प्रश्न आहे. तोच साधारणपणानं या चित्रामागचा हेतू म्हणता येईल.

दृश्याचं सादरीकरण कसं करायचं, हा एक चित्रकार म्हणून माझ्यापुढला प्रश्न असतो. खरं तर दृश्यभाषा ही दृश्याच्या सादरीकरणाचं माध्यम. पण दृश्यभाषेत- किंवा कोणत्याही भाषेत- अर्थाबद्दलचे प्रश्न असतातच.

‘लँग्वेज ऑफ रिप्रेझेंटेशन’बद्दलचे म्हणजेच दृश्य-प्रत्ययाच्या किंवा ‘चित्राच्या अर्थापर्यंत पोहोचवणाऱ्या’ भाषेबद्दलचे प्रश्न हे माझ्या अनेक चित्रांना घडवणारे ठरले आहेत.

‘स्टिल लाइफ’ या चित्रप्रकाराच्या परंपरेत समोरच्या वस्तू जशा आहेत तशाच दाखवण्यासाठी त्या वस्तूंचा आकार, रंग, पोत हे यथार्थपणे रंगवलं जात होतं. त्या वस्तू आहेत आणि त्या अशा आहेत, हे रंगवण्याची ती परंपरा होती. सेझाँसारख्या चित्रकारांनी त्यात बदल केले, पस्र्पेक्टिव्ह बदलून त्याच वस्तू पाहण्याची सुरुवात झाली. पुढे चित्रकलेतही दोन विचारप्रवाह दिसू लागले. हे असेच विचारप्रवाह, कोणत्याही भाषेचा अर्थाशी असलेला संबंध काय, याविषयी असू शकतात. एक: दृश्यातून रूढ अर्थाचं प्रतिनिधित्व करायचं असं मानणारा आणि तसंच करणारा प्रवाह. आणि दुसरा: चित्राच्या रचनेतून अर्थप्रत्यय घडत असतो आणि तसाच तो पुढे घडवायचा आहे, असं मानणारा प्रवाह. इंग्रजीत पहिल्या प्रवाहाला  ‘कन्व्हेन्शनल ’ किंवा ‘बेस्ड ऑन कन्व्हेन्शन्स ऑफ मीनिंग’, तर दुसऱ्याला ‘स्ट्रक्चरल’ किंवा ‘बेस्ड ऑफ स्ट्रक्चरल इक्विव्हॅलन्स’ प्रवाह असं म्हणता येईल. उदाहरणार्थ, फोटोग्राफीमध्ये ‘स्ट्रक्चरल इक्विव्हॅलन्स’ आहे. कारण वस्तूवर जसा प्रकाश पडला, तोच प्रकाश फोटोग्राफीत प्रतिबिंबित होतो.

यापलीकडेही ‘सब्जेक्टिव्ह’ आणि ‘ऑब्जेक्टिव्ह’ असे मतप्रवाह आहेतच. या अशा सगळ्या विभागण्यांना खरंच काही अर्थ आहे का?

अलीकडेच ‘टीआयएफआर’ या संस्थेतल्या एका भौतिकशास्त्रज्ञाचं व्याख्यान होतं, तिथं गेलो होतो. खगोलभौतिकी विषयावरल्या या व्याख्यानात कृष्णविवर कसं असतं, याच्या प्रतिमा दाखवून कृष्णविवरांबद्दलच्या नव्या संशोधनाची माहिती दिली गेली. नंतरच्या प्रश्नोत्तरांत साहजिकच प्रश्न आला: ‘‘तुम्ही आत्ता या स्लाइड दाखवल्यात, ते ‘खरे फोटो’ होते का? कृष्णविवरांची छायचित्रं होती का ही?’’ नाही. ती नव्हती. ‘‘कृष्णविवरांबद्दल आपली समज वाढायला मदत व्हावी यासाठी संगणकावर या प्रतिमा घडवण्यात आल्या होत्या,’’ असं वक्त्यानं सांगितल्यावर श्रोत्यांमध्ये काहीशी चुळबुळ दिसली. तेवढय़ात वक्ता म्हणाला, ‘‘पण त्या प्रतिमा म्हणजे फोटोच आहेत की संगणकीय चित्रं, यामुळे काही फरक पडत नाही. उपलब्ध ज्ञानाचं प्रतिबिंब या प्रतिमांमध्ये आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि असाही विचार करा की, आत्ता मी तुमच्यासमोर आहे-  पण मी तुम्हाला पाहू शकतो आहे, तेव्हा मला काय दिसतं आहे? माझ्या मेंदूतल्या ज्ञानग्राहक यंत्रणांनी मला दाखवलेली तुमची प्रतिमाच तर मला दिसतेय!’’ हे एक उदाहरण प्रतिमांबद्दल विभागण्यांच्या पलीकडला विचार करण्यासाठी उपयोगी पडू शकेल असं मला वाटतं.

माझ्या मते, आपण दोन्ही प्रकारांनी पाहत असतो. कन्व्हेन्शनल आणि स्ट्रक्चरल, सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह या प्रत्यक्षात विभागण्या राहत नाहीत. या विभागण्यांमधलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न मी माझ्या नव्या चित्रमालिकेतून करतो आहे.
सुधीर पटवर्धन