लोकसत्ता दिवाळी अंक २०१७

‘The Wizard of Oz’ हा चित्रपट १९३९ साली अमेरिकेत पहिल्यांदा प्रदर्शित झाला त्यावेळी त्याचे थंडे स्वागत झाले. मेट्रो गोल्डविन मेयरने तो निर्माण करण्यासाठी पैसे खर्च करताना कसलीच कसर ठेवली नव्हती. त्यावर आलेली परीक्षणेही उत्साहवर्धक होती. तरीही हा चित्रपट फारसा चालला नाही. मध्यंतरी दहा वर्षांचा काळ गेला. हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करावा असे निर्मात्यांच्या मनात आले. १९४९ मध्ये त्यांनी तो दुसऱ्यांदा प्रदर्शित केला आणि या सिनेमाचे भाग्यच पालटले. त्याने लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडले. बालचित्रपट म्हणून बनवल्या गेलेल्या या सदाबहार चित्रपटाच्या निर्मितीची आगळीवेगळी गोष्ट..

एखादी कलाकृती लोकप्रिय का होते याची कारणे निश्चितपणे कधीच सांगता येत नाहीत. ती लोकप्रिय झाली (किंवा झाली नाही) की तिचे विश्लेषण करून काही निष्कर्ष काढले जातात.. काहीएक कारणमीमांसा केली जाते. परंतु हे निष्कर्ष सार्वकालीन नसतात. ते नंतरच्या दुसऱ्या कलाकृतीसाठी उपयोगी पडत नाहीत. अनेकदा कलाकृतीच्या श्रेष्ठत्वाबद्दलही नेमके असेच होते. हे जसे साहित्यकृतीच्या संदर्भात लागू होते तसेच चित्रपटाच्या संदर्भातही अनुभवण्यास मिळते.

‘The Wizard of Oz’ हा चित्रपट २५- ८- १९३९ रोजी अमेरिकेत जेव्हा प्रदर्शित झाला त्यावेळी त्याचे बरेचसे थंड स्वागत झाले. मेट्रो गोल्डविन मेयरने तो निर्माण करण्यासाठी पैसे खर्च करताना कसलीही कसर ठेवली नव्हती. त्याच्यावर आलेली परीक्षणेही उत्साहवर्धक होती. मात्र, काय झाले कुणास ठाऊक, हा चित्रपट फारसा चालला नाही. सुमारे २८ लक्ष डॉलर खर्च करून काढलेल्या या चित्रपटाने जेमतेम निर्मितीखर्च भरून निघण्याएवढा- म्हणजे ३० लक्ष डॉलरचा व्यवसाय केला. (अर्थात ‘मुलांसाठीचा चित्रपट’ अशी जाहिरात केलेली असल्यामुळे अनेक ठिकाणी तो सवलतीच्या दरात दाखवला गेला, हेही उत्पन्न कमी होण्याचे एक कारण होते.) या वेळेपर्यंत एम. जी. एम.ने काढलेल्या चित्रपटांत हा सर्वाधिक खर्चीक चित्रपट होता. निर्मितीनंतर चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी होणारा खर्च ध्यानात घेतला तर हा चित्रपट तसा संस्थेला तोटय़ातच गेला.

..दहा वर्षे गेली. हा चित्रपट आपण पुन्हा एकदा प्रदर्शित करावा असे निर्मात्यांच्या मनात आले. १९४९ मध्ये त्यांनी तो अमेरिकेत दुसऱ्यांदा प्रदर्शित केला, आणि या सिनेमाचे भाग्य पालटले. पाहता पाहता तो अत्यंत लोकप्रिय चित्रपट बनला. १९५६ मध्ये तो टेलिव्हिजनवर दाखविण्यात आला आणि त्याने लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडले. तेव्हापासून दरवर्षी एकदा तरी तो टेलिव्हिजनवर दाखवला जातोच. या प्रक्षेपणाचा एक फायदा असाही झाला, की पूर्वी ज्या प्रौढांनी हा सिनेमा ‘मुलांसाठी’ आहे असे मानून पाहिला नव्हता, त्यांना हा पाहावयास मिळाला व तो मुलांना आवर्जून दाखवावा अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. लायब्ररी ऑफ काँग्रेसने टेलिव्हिजनवर सर्वाधिक पाहण्यात आलेला चित्रपट म्हणून त्याची नोंद केली. इतकेच नव्हे, तर ‘culturally, historically and aesthetically significant’ चित्रपट म्हणून जतन केल्या गेलेल्या मोजक्या चित्रपटात त्याला सामील केले.

अर्थात या चित्रपटाला एवढे यश मिळेल हे निर्मात्यांना अपेक्षितच होते; म्हणून तर त्यांनी हा प्रकल्प हाती घेतला व त्याच्या निर्मितीसाठी भरपूर पैसा खर्च केला होता. कारण मुळात या चित्रपटाची कथा ही अमेरिकन साहित्यविश्वातील अत्यंत लोकप्रिय बनलेल्या ‘The Wonderful Wizard of Oz’ या एल. फ्रँक. बाउम लिखित कुमार-कादंबरीवर आधारित होती.

एल.  फ्रँक. बाउमचा जन्म १५ मे १८५६ रोजी झाला. लहानपणापासून त्याचे हृदय थोडे कमजोर होते व म्हणून तो शाळेत फारसा गेलाच नाही. प्रकृतीच्या तक्रारीमुळे त्याला मित्रांत खेळणे अवघड वाटे. त्यामुळे वाचन आणि लेखन हाच त्याचा विरंगुळा बनला. अर्थात त्याला नऊ  भाऊ -बहिणी असल्यामुळे त्याला एकटे कधीच वाटले नाही. तो आणि त्याचा भाऊ  हॅरी घरीच एक मासिक लिहीत आणि ते छापून प्रकाशितही करीत. त्याचे वडील श्रीमंत होते आणि त्यांनी आपल्या मुलाच्या या छंदासाठी त्याला एक लहानसे प्रिंटिंग मशीन घेऊन दिले होते. या मासिकात फ्रँक आपल्या कविता, एकांकिका वगैरे लिहीत असे, छापत असे व त्याच्या प्रती नातेवाईक, मित्र यांच्यात मोफत वाटल्या जात. तरुणपणी त्याने नाटककार बनण्याचे ठरविले. त्याने लिहिलेले पहिलेच नाटक खूप लोकप्रिय झाले. या नाटकाची निर्मितीही त्यानेच केली होती. शिवाय त्यात त्याने प्रमुख भूमिकाही केली. मात्र, अपघाताने लागलेल्या एका आगीत या नाटकाचा सगळा सेट, कपडे वगैरे जळून गेले व त्याने नाटकाला रामराम ठोकला. ‘The Wonderful Wizard of Oz’ या पुस्तकातील बुजगावणे एके ठिकाणी म्हणते, ‘‘मला सर्वाधिक भीती कशाची वाटत असेल तर ती जळत्या काडीची.’’ या वाक्याचे उगमस्थान वरील प्रसंग असू शकेल.

या सुमारासच मॉड गेज नावाच्या मुलीच्या प्रेमात बाउम पडला आणि त्याने १८८२ मध्ये तिच्याशी लग्न केले. उदरनिर्वाहासाठी त्याने अनेक व्यवसाय करून पाहिले, पण कशातच त्याला यश आले नाही. नवीन प्रकल्प सुरू करावा आणि त्यात अपयश यावे, हे जणू ठरूनच गेल्यासारखे झाले होते. बालपणापासून त्याला अद्भुत कथांचे फार आकर्षण होते आणि अनेक कल्पनारम्य गोष्टी रचून तो आपल्या भावा-बहिणींना सांगायचा. आता त्या गोष्टी तो आपल्या चार मुलांना सांगू लागला. त्याच्या मुलाने म्हटले आहे, ‘‘अत्यंत अविश्वसनीय गोष्टी विश्वसनीय बनवून सांगण्यात माझ्या वडिलांचा हात कुणी धरू शकत नाही.’’ या गोष्टी आपण प्रकाशित कराव्यात अशी कल्पना त्याच्या मनात आली आणि त्याने त्यांच्यासाठी प्रकाशक शोधण्यास सुरुवात केली. मात्र, इतक्या प्रकाशकांनी त्याच्या गोष्टी प्रकाशित करण्यास नकार दिला, की त्याने एक डायरी घेऊन त्यात आपल्या ‘अपयशाची कहाणी’ तपशीलवार नोंदविली. (या डायरीला त्याने ‘Record of Failure’ असे नाव दिले.) पण या अपयशामुळे खचून न जाता तो लिहीतच राहिला. शेवटी वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी त्याचे मुलांसाठीचे पहिले पुस्तक ‘Mother Goose’ आणि पुढील वर्षी दुसरे पुस्तक ‘Father Goose’ प्रकाशित झाले व ही दोन्ही पुस्तके बऱ्यापैकी लोकप्रिय झाली.

मात्र, फ्रँकला खरी लोकप्रियता मिळाली ती १९०० साली प्रकाशित झालेल्या त्याच्या ‘The Wonderful Wizard of Oz’ या पुस्तकामुळे. या पुस्तकामुळे एल. फ्रँक. बाउम हे नाव घराघरात पोहोचले. (त्याचे नाव ‘लिमन फ्रँक बाउम’ असले तरी ते त्याला मुळीच आवडत नव्हते. त्यामुळे त्याने एल. फ्रँक. बाउम या नावानेच सारे लिखाण केले आहे.) या पुस्तकातील नायिका डोरोथी, तिचा टोटो नावाचा कुत्रा, बुजगावणे, पत्र्याचा माणूस आणि घाबरट सिंह हे तिचे मित्र, जादूगार ओझ ही सारी मंडळी बालगोपाळांत अत्यंत प्रिय झाली.

अमेरिकेच्या कॅन्सास भागात डोरोथी ही मुलगी तिच्या काका-काकूसह राहत असते. एकदा  घरात ती आणि तिचे आवडते कुत्र्याचे पिल्लू टोटो हे दोघेच असताना गावात मोठे चक्रीवादळ येते आणि ते वादळ तिचे घर उचलून दूरदेशी ‘ओझ’ नावाच्या देशात घेऊन जाते. आता परत आपल्या घरी कसे जावे असा प्रश्न डोरोथीला पडतो. एक भली चेटकीण तिला सांगते की, ओझ प्रदेशाचा राजा ओझ नावाचा एक महाजादूगार आहे, तो तिला घरी जाण्यास नक्कीच मदत करेल. वादळाने उडत आलेले डोरोथीचे घर एका दुष्ट चेटकिणीच्या अंगावर पडून ती मेलेली असते. तिच्या पायातील चांदीचे बूट डोरोथीला फार आवडतात. ते पायात घालून डोरोथी ओझला भेटण्यास निघते.

नंतरची कहाणी ही या नमुनेदार प्रदेशातून डोरोथीने केलेल्या चित्तथरारक प्रवासाची मनोरंजक कथा आहे. भल्या चेटकिणीने सांगितलेले असते की, ‘पिवळ्या विटांचा रस्ता’ ओझच्या गावी घेऊन जाईल. या रस्त्यावरून डोरोथी चालू लागते. या प्रवासात तिला एक बुजगावणे भेटते. त्याला वाटत असते की आपल्याला मेंदू नाही. जादूगार आपल्याला मेंदू देईल या आशेने ते डोरोथीबरोबर निघते. पुढे त्यांना एक पत्र्याचे शरीर असलेला माणूस भेटतो. आपल्याजवळ हृदय नाही अशी खंत त्याला असते व त्याला हृदय हवे असते. त्यानंतर एक घाबरट सिंह भेटतो व त्याला धीटपणा हवा असतो. आपल्याला जे हवे ते मिळू शकेल अशी आशा प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेली असते. प्रवासात अनेक संकटे येतात. ही मंडळी त्यांना धैर्याने तोंड देतात. पण ते ज्यावेळी महाजादूगाराला भेटतात त्यावेळी तो अट घालतो की, त्यांनी प्रथम राज्यातील आणखी एका दुष्ट चेटकिणीला ठार केले पाहिजे, तरच तो त्यांना मदत करेल.

डोरोथी आणि तिचे मित्र ही कामगिरीही यशस्वीपणे पार पाडतात. पण नंतर त्यांना कळते की, हा स्वत:ला महाजादूगार म्हणविणारा माणूस खोटारडा आहे. त्याला जादू वगैरे काही येत नाही. ते हिरमुसले होतात. पण ओझ हा खोटा जादूगार असला तरी तो भला माणूस असतो. तो या मित्रांना समजावून सांगतो, पटवून देतो, की ते ज्या गोष्टींच्या शोधात आहेत, त्या गोष्टी आधीच त्यांच्याजवळ आहेत.

डोरोथीने जे बूट पायात घातलेले असतात ते जादूचे असतात. तिच्या मनात येईल तिकडे ते तिला नेऊ  शकतात. पण ही गोष्ट तिला ठाऊक नसते. ही जादू जेव्हा तिला समजते तेव्हा ती या बुटांच्या साहाय्याने सुखरूप आपल्या घरी पोहोचते.

हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर ते अतिशय लोकप्रिय तर झालेच, पण ‘अमेरिकेला आपली बालकादंबरी मिळाली आहे’ असे म्हणून समीक्षकांनी त्याला गौरविले. काहींनी त्याचे वर्णन ‘First American Fairy Tale’ असेही केले. या पुस्तकाचे परीक्षण चक्क ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये छापून आले. मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकाचा हा फार मोठा बहुमान होता. ‘मुलांच्या मनात गोष्टींबद्दल जन्मजात प्रेम असते. ‘मला आणखी एक गोष्ट सांग,’ ही मुलांची विनंती आपल्या सर्वाच्या ओळखीची आहे. हे पुस्तक मुलांना आणि त्यांना गोष्टी सांगणाऱ्यांना निश्चितच आवडेल..’ असे परीक्षणात लिहिले होते.

हे पुस्तक काळाच्या कसोटीवरदेखील खरे उतरले आहे. आजही ते आवडीने वाचले जाते. २००२ साली निघालेल्या एका आवृत्तीचे परीक्षण करताना बिल डेलानी याने लिहिले- ‘रोजच्या सर्वसाधारण गोष्टींतही जादू सापडण्याची संधी असते हे लेखकाने मुलांना दाखवून दिले आहे. लाखो मुलांच्या मनात वाचनाविषयी प्रेम निर्माण करण्याचे कार्य बाउमने केले आहे.’ लायब्ररी ऑफ काँग्रेस’ने ‘Americals greatest and best loved homegrown fairy tale…’ असा या पुस्तकाचा गौरव केलेला आहे.

मुलांसाठी एक नवी आणि मनोरंजक कथा घेऊन आलेले हे पुस्तक इतके लोकप्रिय झाले, की एका महिन्यात त्याच्या दहा हजार प्रतींची विक्री झाली. या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीसाठी फ्रँकचा मित्र डेन्सलो याने अतिशय आकर्षक चित्रे काढली होती. डेन्सलो याने काढलेली चित्रेही एवढी लोकप्रिय झाली, की त्यांच्यावरून रबराची, धातूची खेळणी बनविली गेली. पुस्तकाची अंतिम प्रत तयार करीत असताना बाउम आणि डेन्सलो एकत्र बसून चर्चा करीत. कथानकातील अनेक प्रसंग रंगविण्यात बाउमला आपल्या या मित्राचे फार साहाय्य झाले असे म्हटले जाते.

यानंतर या पुस्तकाच्या आवृत्त्यावर आवृत्त्या निघतच गेल्या. (या पुस्तकाचा स्वामित्व हक्कजेव्हा संपला त्या वेळेपर्यंत त्याच्या तीस लाखापेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या होत्या.) या पुस्तकाच्या लोकप्रियतेमुळे बाउमच्या मनातील नाटकाची ओढ पुन्हा उफाळून आली. त्याने या कथानकावर आधारित एक संगीतिका लिहिली. तिचे प्रयोग ब्रॉडवेवर सलग एक वर्ष होत होते. या काळात वाचकांच्या, विशेषत: मुलांच्या पत्रांचा प्रचंड ओघ बाउमकडे सुरू झाला. बहुतेक पत्रांत डोरोथीचे, तिच्या मित्रांचे पुढे काय झाले याची विचारणा केलेली असे आणि त्याने या मित्रांना घेऊन नवे पुस्तक लिहावे अशी मागणीही असे. फ्रँकच्या मनात तर असंख्य कथानके तयार होती. १९०४ साली त्याने या पात्रांचे पुढील जीवन आणि कामगिऱ्या चित्रित करणारी ‘The Marvelous Land of Oz’ ही कादंबरी लिहिली व तिच्यावर नाटकही रचले. या पुस्तकालाही अमाप लोकप्रियता मिळाली. आणि यानंतर बाउमच्या लेखणीतून पुस्तकांचा ओघच सुरू झाला. पुढील पंधरा वर्षांत त्याने जवळजवळ दरवर्षी एक असे ‘ओझ’-पुस्तक लिहिले. याशिवाय आणखी वेगवेगळ्या कहाण्यांवर टोपणनावाने त्याने सुमारे चाळीस पुस्तके लिहिली.

या पुस्तकांचे मानधन इतके मिळत होते की बाउमने काहीच न करता त्याच्या कित्येक पिढय़ांना सुखाने बसून खाता आले असते. परंतु त्याच्या मनात नेहमीच काहीतरी वेगळ्या, म्हणूनच आकर्षक वाटणाऱ्या कल्पना येत. १९०८ साली त्याच्या मनात ‘ओझ’ पुस्तकावर आधारित स्लाइड शो करण्याची कल्पना आली. या शोला फोटोग्राफी, संगीत आणि नटांच्या भूमिकेची जोड देऊन त्याने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प तयार केला. मात्र, त्याचा हा प्रयत्न सपशेल फसला. या उपक्रमात त्याला इतका आर्थिक तोटा झाला की त्याला आपल्या नऊ  पुस्तकांचे हक्क विकून टाकावे लागले आणि शेवटी १९११ साली ‘दिवाळे’ जाहीर करावे लागले. १९१४ साली त्याच्या मनात आपल्या पुस्तकांवर मूकपट तयार करावेत अशी कल्पना आली व ती प्रत्यक्षात आणण्यासाठी तो हॉलीवूडला जाऊन राहिला. त्याने ‘Oz Film Manufacturing Company’ची स्थापना करून तीन लघुचित्रपट तयारही केले. पण त्यांनी फारसा व्यवसाय न केल्यामुळे ही कंपनी बंद करावी लागली. मात्र, यानंतर १९१९ पर्यंत- म्हणजे आपल्या मृत्यूपर्यंत बाउमने त्याच्या पुस्तकांतून होणाऱ्या मिळकतीवर शांतपणे आयुष्य घालवले. या पुस्तकांची लोकप्रियता एवढी होती, की फ्रँकच्या मृत्यूनंतरही त्याच्या पत्नीने ‘ओझ आणि इतर व्यक्तिरेखा’ यांच्यावर अनेक लेखकांकडून पुस्तके लिहून घेतली व प्रकाशित केली. १९२५ मध्ये ‘ओझ’च्या कथानकावर आधारित एक मूकपट तयार करण्यात आला. प्रसिद्ध हास्य-अभिनेता ऑलिव्हर हार्डी (लॉरेल-हार्डी जोडीतील) याने त्यात पत्र्याच्या माणसाची भूमिका केली होती.

बाउमच्या पुस्तकाच्या अमाप लोकप्रियतेवर विश्वास ठेवूनच एम. जी. एम.ने १९३८ साली ‘The Wizard of Oz’ या भव्य, रंगीत, संगीतप्रधान चित्रपटाची निर्मिती सुरू केली. मात्र, काही जाणकारांचे म्हणणे पडले की, १९३९ चा प्रेक्षक एक पूर्ण कल्पनारम्य कथा (Fantasy) स्वीकारणार नाही, म्हणून ही कथा हे नायिका डोरोथीला पडलेले स्वप्न आहे अशा पद्धतीने चित्रपटाच्या पटकथेची रचना करण्यात आली होती. डोरोथीच्या प्रमुख भूमिकेसाठी प्रथम शार्ले टेम्पलचे नाव चर्चेत होते. पण निर्माता लेरॉय याला या भूमिकेसाठी ज्युडी गारलंडच हवी होती.

१९२२ साली जन्म झालेली ज्युडी अमेरिकन नाटय़क्षेत्रातील एक उत्तम बालकलाकार म्हणून प्रसिद्ध होती. तिचा आवाजही सुरेख होता आणि तिने नृत्याचे शिक्षणही घेतलेले होते. १९३५ मध्ये एम. जी. एम.ने तिच्या आवाजाची टेस्ट घेतली आणि तिला गायिका म्हणून करारबद्ध केले. मात्र, तिला कोणती भूमिका द्यावी याबद्दल निर्णय होत नव्हता. कारण तेरा वर्षांची असल्यामुळे ती बालकलाकार म्हणून शोभत नव्हती आणि तरुणी म्हणूनही! काही लहानसहान भूमिका तिला दिल्यानंतर शेवटी ‘The Wizard of Oz’मधील डोरोथीची भूमिका तिला दिली गेली आणि तिचे भाग्य पालटले. या भूमिकेत ती अतिशय शोभून तर दिसलीच, पण तिने गायिलेले ‘Over the Rainbow’ हे गाणे इतके लोकप्रिय झाले, की ते तिची ओळखच बनून गेले.

या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी एम. जी. एम.ने प्रथम रिचर्ड थोर्पे याच्यावर आणि तो काम सोडून निघून गेल्यावर जॉर्ज ककर याच्यावर टाकली. पण तोही मधूनच निघून गेला. शेवटी हे काम व्हिक्टर फ्लेमिंग याच्याकडे सोपविण्यात आले. त्याने बहुतांश चित्रपट पूर्ण केला, पण नंतर निर्मात्याने त्याला ‘Gone With the Wind’वर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. उरलेला चित्रपट किंग व्हिडोर याने पूर्ण केला असे म्हणतात. पण श्रेयनामावलीत दिग्दर्शक म्हणून फक्त फ्लेमिंगचेच नाव आहे.

फ्लेमिंगबद्दल एका समीक्षकाने लिहिले आहे, ‘He was a poet and one of the great unsung men of film business. Someday someone is going to bring up what Fleming meant to movies.’ इंग्रजी चित्रपटांची थोडीफार ओळख असलेल्या रसिकाला ‘Gone With the Wind’ हे नाव माहीत असते, पण त्याचा दिग्दर्शक फ्लेमिंग आहे हे ठाऊक नसते. ‘अविस्मरणीय चित्रपटांचा विस्मरणात गेलेला दिग्दर्शक’ अशी त्याची ओळख आता उरली आहे. पण १९३९ साली या माणसाने इतिहास घडवला होता. त्या वर्षी त्याने दिग्दर्शित केलेले ‘Gone With the Wind’ आणि ‘Wizard of Oz’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले व त्यांना एकंदर १९ ऑस्कर नामांकने मिळाली. त्यापैकी दहा पुरस्कार त्यांनी पटकावले. जगातील सर्वोत्तम चित्रपटांच्या याद्या दरवर्षी प्रसिद्ध होतात. त्यांत हे दोन्ही चित्रपट असतातच. पण समीक्षकांनी या चित्रपटांचे बरेचसे श्रेय निर्मात्याला दिले. शिवाय ‘Gone With the Wind’साठी सहा, तर ‘Wizard of Oz’साठी चार दिग्दर्शकांचा हातभार लागला, असे सांगत अभ्यासकांनी फ्लेमिंगला याचे पूर्ण श्रेय दिले नाही.

१९३८-३९ चा कालखंड हा युरोप-अमेरिकेच्या इतिहासातील एक अत्यंत अस्वस्थ, अस्थिर कालखंड होता. या काळात कुटुंबव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास डळमळीत होऊ  लागला होता. निर्मात्यांनी ठरवले की, चाळीस वर्षांपूर्वीचे हे पुस्तक आज चित्रपटासाठी घेताना त्यातील कौटुंबिक मूल्यांवर भर देऊन त्यांना उजाळा देण्याचा प्रयत्न करायला हवा. मूळ कथेत डोरोथी आणि तिच्या घराच्या संदर्भात एकही प्रसंग नाही. चित्रपटात सुरुवातीला डोरोथी, तिचे काका-काकू, तिचे शेजारी यांच्यातील काही प्रसंग निर्माण करून तिच्या घराचे मोहक चित्र उभे करण्यात आले. (त्यामुळे दूर गेल्यानंतर घराकडे परतण्याची डोरोथीची ओढ अधिक तीव्रतेने प्रकट झाली.)

या घराला हंक, झेके आणि हिकोरी हे चांगले मित्र शेजारी म्हणून लाभले आहेत, तसेच एक खाष्ट शेजारीणदेखील आहे. एके दिवशी डोरोथीचे कुत्र्याचे पिल्लू त्या शेजारणीला चावते. ती मेयरकडे तक्रार करून त्या कुत्र्याचा ताबा मिळवते. डोरोथीला खूप वाईट वाटते. पण मेयरचा आदेश असल्यामुळे तिच्या काका-काकूंनादेखील काहीच करता येत नाही. ती शेजारीण पिल्लाला घेऊन जात असताना ते निसटून परत घरी येते. शेजारीण पुन्हा त्याला नेईल या भीतीने डोरोथी त्याला घेऊन घर सोडून निघते. मात्र, गावाच्या सीमेवर राहणारा, भविष्य सांगणारा प्रो. मॉर्गन नावाचा एक माणूस तिला समजावून घरी परत पाठवतो. ती घरापाशी येथे तेव्हा जोराचे चक्रीवादळ सुरू झालेले असते. ती लगबगीने घरात शिरते, तोच हे वादळ तिचे घर उचलून उंच आकाशात घेऊन जाते. वादळात घर गरगरा फिरत असल्यामुळे डोरोथीला चक्कर आल्यासारखी होते. ती डोळे उघडते तेव्हा तिला जाणवते की घर फिरणे आता थांबले आहे. ती उठून घराचे दार उघडते.

.. आणि समोर एक विलक्षण मोहक असे रंगीबेरंगी जग तिचे स्वागत करताना तिला दिसते!

आतापर्यंतचा चित्रपट करडय़ा ‘सेपिया’ रंगात चित्रित केलेला होता. बाउमच्या पुस्तकात डोरोथी ज्या प्रदेशात राहते त्याचे वर्णन ‘करडय़ा रंगाच्या कुरणांचा प्रदेश’ असे केले आहे. ‘नजर पोहोचेल तिथपर्यंत सपाट कुरण. एक झाडही नाही. हिरव्या रंगाचा मागमूस नाही.’ चित्रपटात तो तसाच दाखविण्यासाठी हा भाग सेपिया रंगात चित्रित केला गेला. डोरोथी जेव्हा घराचे दार उघडते तेव्हा समोर दिसणारा देखावा इतका सुंदर होता की प्रेक्षकांच्या तोंडून ‘वा!’ असा उद्गार निघायचा. इथून पुढला चित्रपट ईस्टमन कलरमध्ये ‘रंगवला’ होता. पुस्तक वाचताना दृश्यात झालेला बदल वाचकाला मनाने ‘पाहावा’ लागतो. विशेषत: मुलांजवळ तेवढी कल्पनाशक्ती नसते.

इथे प्रत्यक्षात ते जादूचे मोहक दृश्य समोर दिसत होते. ‘सर्वत्र हिरवेगार गवत पसरलेले होते. झाडांना भरपूर रसाळ फळे लगडली होती. असंख्य झुडुपांवर सुंदर सुंदर फुले उमललेली होती. कितीतरी मनमोहक पक्षी झाडाझुडुपांवर बसून गोड आवाजात गाणी गात होते. पलीकडे काही अंतरावर एक ओढा झुळझुळ वाहत होता..’ या शब्दांतून लेखकाने वर्णन केलेले जग चित्रपटात त्याहून अधिक झगमगत्या रूपात दृश्यातून जिवंत केले गेले होते. या पाश्र्वभूमीवर असंख्य छोटी छोटी माणसे समोर येतात आणि डोरोथीभोवती फेर धरून नाचू लागतात. रंगांच्या किमयेत सुरांची किमया मिसळून जग अधिकच अद्भुत बनून जाते.

बाउमच्या पुस्तकात नसलेली आणखी एक क्लृप्ती दिग्दर्शकाने चित्रपटात वापरली होती. डोरोथीच्या घराजवळ असणारे तीन शेजारीच आता आपल्यासमोर बुजगावणे, पत्र्याचा माणूस आणि घाबरट सिंह बनून येतात. राय बोग्लर, जॅक हेली आणि बर्ट लहर यांनी या भूमिका धमाल रंगविल्या होत्या. फ्रँक मोर्गन याने प्रो. मार्वल आणि ओझ यांच्या भूमिका केल्या. खाष्ट शेजारणीची भूमिका करणारी मार्गारेट हॅमिल्टन हीच पुढे दुष्ट चेटकिणीच्या रूपात समोर येते. या पात्रयोजनेमुळे सत्य आणि कल्पित यांची फार मजेदार सरमिसळ चित्रपटात तयार झाली. मुलांना तर ते आवडलेच, पण मोठय़ांनाही कथेचा आतला पदर समजण्यास त्याची मदत झाली.

‘The Wizard of Oz’ हा चित्रपट एवढा लोकप्रिय झाला की त्याने वाचकांवर असलेला पुस्तकाचा प्रभाव खूप कमी केला. मूळ पुस्तकात डेन्सलोने काढलेली अप्रतिम चित्रे होती. नंतरच्या काही आवृत्त्यांत त्यांचीच नक्कल केलेली आढळते. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यावर डोरोथी, बुजगावणे, पत्र्याचा माणूस आणि सिंह यांना ‘चेहरे’ मिळाले आणि अमेरिकेतील सारी मुले (व त्यांचे पालकही) त्या पात्रांना त्याच चेहऱ्याने ओळखू लागले. एक मजेशीर उदाहरण म्हणजे आज सिनेमातील ‘There is no place like home’ हे वाक्य ही सिनेमाची एक खास ओळख बनले आहे. AFI च्या ‘Best 100 Quotes’च्या यादीत त्याचा अंतर्भाव केलेला आहे. पण हे वाक्य मूळ पुस्तकात नाही. पुस्तकातील वाक्य आहे- ‘It is good to be home again.’

चित्रपट तयार करताना मूळ पुस्तकातील कथानकात आणखी एक बदल केलेला दिसतो. ओझ हा नकली जादूगार आहे हे समजल्यावर डोरोथी राज्यातील भल्या चेटकिणीचा शोध घेत पुढे प्रवास चालू ठेवते असे बाउमने दाखविले होते. या प्रवासात तिच्यावर आणखी संकटे येतात. शेवटी भली चेटकीण भेटल्यावर डोरोथीला घरी परत जाता येते. ही लांबण अनावश्यक होती व तिच्यात पुनरुक्ती झालेली आहे, हे ध्यानात घेऊन सिनेमात हा भाग गाळला गेला. भली चेटकीण स्वत: प्रकट होऊन डोरोथीला परतीचा उपाय सुचविते असे दाखविले गेले.

डोरोथी घरी परतलेली दाखवून पुस्तक संपते. चित्रपटात शेवटच्या दृश्यात ती पलंगावर झोपलेली दिसते. आतापर्यंत पडद्यावर असणारा रंगांचा उत्सव संपलेला असतो. पुन्हा चित्रपट सेपिया रंगात अवतरतो. डोरोथीच्या पलंगाभोवती काका-काकू, शेजारी जमलेले असतात. जागी झाल्यावर ती आपल्या प्रवासाबद्दल सांगू पाहते, पण सारे तिची थट्टा करतात. फक्त काका तिला म्हणतात, ‘‘माझा तुझ्यावर विश्वास आहे.’’ आणि टोटोला जवळ घेऊन डोरोथी म्हणते, ‘There is no place like home.’

चित्रीकरण, संगीत, छायाचित्रण, अभिनय यांनी तयार झालेली एक उत्तम कविता आपण अनुभवत आहोत असे सिनेमा पाहताना जाणवत राहते. या चित्रपटाला ‘ईस्टमन कलर’ बनविण्यासाठी निर्मात्यांनी अपार कष्ट घेतले. मात्र या कष्टांतून साक्षात एक जादूचे जग प्रेक्षकांसमोर उभे राहिले. पुस्तकात डोरोथीचे बूट हे चांदीचे आहेत असा उल्लेख आहे. चित्रपटात त्यांना उठाव येण्यासाठी ते लाल माणिकाच्या (रूबी) रंगाचे दाखविले गेले. ज्यूडी गारलंड  ही डोरोथीच्या भूमिकेसाठी थोडी मोठी वाटते, असा काही समीक्षकांनी आक्षेप घेतला. पण तिचा निव्र्याज चेहरा, स्वप्न पाहण्याची वृत्ती व निर्धार स्पष्ट करणारा तिचा प्रसन्न वावर, तिच्या डोळ्यांतील घराची ओढ हे सारेच फार लोभस होते. सारा चित्रपट तिने आपल्या खांद्यावर पेलला होता. तिला सहकारी नटांनीही फार सुरेख साथ दिली होती.

सुमधुर संगीत हा या चित्रपटाच्या सौंदर्यात (आणि लोकप्रियतेत) भर घालणारा महत्त्वाचा घटक होता. सुरुवातीच्या ‘over the Rainbow’ या गाण्याशिवाय सिनेमात आणखी असंख्य गाणी होती. एखादी संगीतिका असावी तशीच या चित्रपटाची रचना केली गेली होती. चित्रपटासाठी संगीत हरोल्ड आर्लेनने तयार केले होते आणि गाणी यिप हरबर्ग याने लिहिली होती. या दोघांनाही ‘over the Rainbow’ या गाण्यासाठी ऑस्कर मिळाले. या गाण्याला अभूतपूर्व अशी लोकप्रियता मिळाली. AFI च्या ‘100 Years…100 Songs’ या यादीत हे गाणे पहिल्या क्रमांकावर आहे. गमतीची गोष्ट म्हणजे सिनेमा तयार झाल्यावर या गाण्यामुळे सुरुवातीचा प्रसंग खूप लांबतो, असे कारण देऊन निर्मात्यांनी ते गाळण्याचे ठरवले होते. लेरॉय आणि फ्लेमिंग यांनी ते चित्रपटात असावे असा हट्ट धरला म्हणून ते राहिले. चित्रपटाच्या संदर्भात हे गाणे अतिशय अर्थपूर्ण असे आहे..

Somewhere, over the rainbow,

way up high

There’s a land that I heard of,

once in a lullaby

Somewhere, over the rainbow,

skies are blue

And the dreams that you dare to dream really do come true

Someday I’ll wish upon a star and

Wake up where the clouds are

far behind me

Where troubles melt like

lemon drops, away

above the chimney tops, that’s where you’ll find me

Somewhere, over the rainbow,

bluebirds fly

birds fly over the rainbow

why then oh why cant I?

If happy little bluebirds fly

beyond the rainbow

Why, why can’t I?

प्रत्येक मुलाला आपले घर तर प्रिय असतेच, पण त्याच्याबाहेरचे क्षितिजाजवळचे एक इंद्रधनुष्यदेखील त्याला खुणावत असते. अंगाईगीतातून ऐकलेल्या त्या जगाची स्वप्ने त्याला पडत असतात. पक्षी त्याच्या पलीकडे उडत जाताना त्याने पाहिलेले असते आणि म्हणून तिकडे जाण्याची त्याची इच्छा अधिकच तीव्र होते. पण जेव्हा खरेच त्याची पावले घरापासून दूर जातात तेव्हा त्याचा जीव घाबराघुबरा होतो. त्याला परतावेसे वाटते. वरकरणी वाटणारा हा विरोधाभास हे जीवनाचेच एक अत्यावश्यक रूप असते. आणि म्हणूनच हा चित्रपट जसा डोरोथीच्या प्रवासाची कहाणी आहे, तशीच तो प्रत्येक मुलाच्याही प्रवासाची कहाणी बनून गेला आहे. एकाच वेळी अत्यंत व्यक्तिगत, तरीही विश्वात्मक अशा कलाकृती फार थोडय़ा असतात. ‘The Wizard of Oz’ ही अशी कलाकृती आहे. म्हणून तिच्या प्रदर्शनाला आज ऐंशी वर्षे होत आली तरी तिचे गारूड कायम आहे.

हा चित्रपट टेलिव्हिजनवर दरवर्षी दाखविण्यात येत असल्याचा एक फायदा असा झाला, की अमेरिकेतील तीन ते शंभर (आणि अधिकही) वर्षांच्या प्रत्येक व्यक्तीने तो पाहिलेला आहे. त्यामुळेच त्याला ‘सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट’ अशी उपाधी मिळाली आहे. २०१४ साली त्याच्या प्रथम प्रदर्शनाला ७५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने एम. जी. एम.ने तो Imax 3D या भव्य रूपात प्रदर्शित केला. त्याला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला. ‘पंच्याहत्तर वर्षे झाली तरी अजून हा सिनेमा शिळा झालेला नाही,’ अशी प्रतिक्रिया यानिमित्ताने या चित्रपटावर लिहिणाऱ्या बहुतेक साऱ्या नव्या पिढीच्या समीक्षकांनी व्यक्त केली.

१९३९ सालच्या ऑस्कर सोहोळ्यात ‘The Wizard of Oz’ या चित्रपटाला ‘सर्वश्रेष्ठ चित्रपट’ या पारितोषिकासाठी नामांकन होते. पण त्या वर्षी तो मान फ्लेमिंगच्याच ‘Gone With the Wind’ला मिळाला. ‘The Wizard of Oz’ची अनेक समीक्षकांनी खूप स्तुती केली. श्रेष्ठ समीक्षक रॉजर इबर्ट याने लिहिले, ‘या चित्रपटात पृष्ठभूमीवर संगीत, हास्य, उत्कंठा आणि स्पेशल इफेक्टस् यांची रेलचेल असली तरी साठ वर्षांनंतर अजूनही तो पाहावासा वाटतो, कारण लहान मुलांच्या मनातील असुरक्षितता, भय काढून टाकून त्यांना आश्वत करण्याचे कार्य तो करतो. या चित्रपटाने माझ्या मनात एक खास जागा व्यापलेली आहे. अनेक चित्रपट खोटे किंवा कृत्रिम वाटतात. मला तो नेहमीच खरा वाटत राहिला आहे.’

बाउमची कादंबरी लोकप्रिय तर होतीच, पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तिची लोकप्रियता अधिकच वाढली. सिनेमात पाहिलेले जग पुस्तकाच्या रूपाने आपल्याजवळ असावे असे मुलांना वाटू लागले. मोठय़ा प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडला. पण त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी त्यातून वेगवेगळे अर्थ शोधण्याचाही प्रयत्न केला. खरे तर बाउमने जेव्हा हे पुस्तक लिहिले तेव्हा त्याचे उद्दिष्ट अगदी साधे-सरळ होते. ‘Written solely to please todayls children.’ आणि असे करताना ‘the wonderment and joy are retained and heartaches and nightmares are left out.’ आपल्या बहिणीला मुलांसाठी लिहिलेले एक पुस्तक भेट देताना बाउमने लिहिले होते, ‘‘To please a child is a sweet and lovely thing that warms one’s heart and brings its own reward.’’ बऱ्याचदा असे घडते की, कलावंत एक ठरवतो आणि त्याच्या हातून दुसरेच काहीतरी निर्माण होते. केवळ मुलांसाठी तयार केलेली ही गोष्ट सर्वाचीच बनून गेली.

ही कहाणी जशी मुलांसाठी आहे, तशीच ती बालपण न विसरलेल्या प्रौढांसाठीदेखील आहे. वरवर दिसणाऱ्या या कल्पनारम्य कहाणीला एक तत्त्वचिंतनात्मक पदर आहे. डोरोथीचे घर तिच्यापासून दुरावले आहे आणि ती आपल्या घराचा शोध घेते आहे. डोरोथी या नावाचा एक अर्थ ‘Gift of God’ असाही होतो. तिच्या या प्रवासात तिला जे मित्र भेटतात, ते वेगवेगळ्या मानवी प्रवृत्तींचे प्रतीक आहेत. प्रत्येक जण कशाच्या तरी शोधात आहे. पत्र्याच्या माणसाला ‘हृदय’ पाहिजे आहे, बुजगावण्याला ‘मेंदू’, तर सिंहाला ‘धीटपणा’! पण जर बारकाईने पाहिले तर हे गुण त्यांच्यात आहेतच हे ध्यानात येते. अनेक प्रसंगी बुजगावणे अगदी नेमका विचार करते (मग त्याला मेंदू नाही असे कसे म्हणता येईल?); पत्र्याचा माणूस इतरांच्या दु:खामुळे व्यथित होतो, त्यांना साहाय्य करू पाहतो (मग त्याला हृदय नाही असे कसे म्हणायचे?); तर सिंह अनेक संकटांतून मित्रांची मुक्तता करतो, (मग त्याच्याजवळ धीटपणा नाही, असे कसे?) या साऱ्या गोष्टी त्यांच्याजवळ आहेतच. फक्त त्या आपल्याजवळ आहेत, ही जाणीव त्यांना नाही. माणसांचेही असेच असते. आपल्याजवळ काय आहे, हे फार थोडय़ांना माहीत असते. मग ‘तुझे आहे तुजपाशी’ हे त्यांना कुणीतरी सांगावे लागते. हे सांगणारा कुणी गुरू माणसाला भेटावा लागतो. जसा या मित्रांना ओझ भेटतो, किंवा भली चेटकीण. डोरोथीचेही असेच आहे. तिच्या पायात जे बूट आहेत त्यांच्यात एवढी शक्ती आहे की ते तिला आपल्या घरी परत नेऊ  शकतात. पण तिलाच ते माहीत नाही. भली चेटकीण तिला ते सांगते आणि पुढला प्रवास सोपा होऊन जातो.

घरापासून दूर जावे लागणे, घराकडे परतण्याची पाहिलेली स्वप्ने, त्यासाठी केलेला दूरदेशीचा प्रवास आणि परत घरी येणे- हा मूलबंध प्राचीन काळापासून अनेक कहाण्यांत आढळून येतो. अनेक आधुनिक साहित्यकृतींतूनही तो वर्णन केलेला आढळतो. ‘जीवनाच्या प्रवासात परतून घराकडे कुणीही येऊ शकत नाही’ (Nobody can go home again) ही अभिजात साहित्यातील एक महत्त्वाची थीम आहे. आपल्या घरात राहण्याचा आपला कालखंड संपला आहे, हे एका निकालक्षणी माणसाच्या ध्यानात येते. त्याला बाहेर पडावे लागते. मनात असो वा नसो. कारण जे सामोरे येणार असते त्यावर त्याचा ताबा नसतो. पावले आपल्याला दूर घेऊन जातात. पण परत फिरण्याची, पुन्हा एकदा ‘त्या’ घरी जाण्याची आस मनात सतत जागी असते. मात्र जसजसे दिवस जातात तसतसे आपल्याला जाणवते, की परतीची वाट धूसर बनत बनत कायमची बंद होऊन गेली आहे. कारण काळानुसार आपण ‘मोठे’ बनलेलो असतो. थोडक्यात म्हणजे- बदललेलो असतो. घर सोडतानाचे आपण आणि आताचे आपण यांत फार मोठा बदल झालेला असतो. आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे- घर तरी कोठे पूर्वीसारखे राहिलेले असते! त्याच्यावर काळाने आपल्या पाऊलखुणा उमटविलेल्या असतातच. कॉनराड रिक्टर या श्रेष्ठ अमेरिकन कादंबरीकाराने याला छेद देणारे एक नवे आशयसूत्र मांडले.. ‘घरापासून कुणीही दूर जाऊ  शकत नाही.’ कितीही दूर गेले तरी घर तुमच्यासोबत असतेच. पण त्याने जे लिहिले ते त्याच्या मनातल्या घराबद्दल होते. प्रत्यक्षातील घर हे नेहमी अप्राप्यच असते. घरापासून दूर जावे लागणे आणि पुन्हा परत येणे, याच आशयसूत्राभोवती दोन प्रख्यात बालसाहित्यिकांनी- लुईस करोल हा इंग्लिश आणि एल. फ्रँक. बाउम हा अमेरिकन- आपल्या कलाकृतींची रचना केलेली आहे. जादूची शक्ती मिळाली की आपण केव्हाही घराकडे परतू शकतो, हे ते सूत्र.

या सूत्राभोवती करोलने ‘Alice in wonderland’, तर बाउमने  ‘The Wonderful wizard of Oz’ या कुमार-कादंबऱ्या लिहिल्या. मात्र बाउमने या सूत्राचा विस्तार करताना ‘ही जादूची शक्ती आपल्याजवळ असतेच, फक्त कुणीतरी ती जाणीव आपल्याला करून देणे आवश्यक असते,’ असे प्रतिपादन केले.

हा चित्रपट तसा मी फार उशिरा पाहिला. वयाची साठी जवळ येत असताना, ‘लोकसत्ता’त जागतिक सिनेमावर मी एक सदर लिहीत होतो त्यावेळी, अचानक मला हा चित्रपट प्रथम पाहावयास मिळाला होता आणि मी हरखून गेलो होतो. आज हा लेख लिहिण्याच्या निमित्ताने मी तो पुन्हा पाहिला तेव्हा माझ्यासोबत माझी दहा वर्षांची नात होती. सिनेमा पाहताना ती अतिशय गुंग होऊन गेली होती. हे मला सिनेमा संपल्यावरच ध्यानात आले, कारण मीही तेवढाच गुंग झालो होतो. माझे बालपण या सिनेमाने मनात पुन्हा जिवंत केले होते. पुन्हा एकदा त्या कोवळ्या वयातल्या सुखवेदना मी अनुभवल्या. माझा प्रवास मला आठवला. त्या प्रवासात शिकलेले धडे आठवले. काही काळ सोबत वाटचाल केलेले मित्र आठवले. आज खोटे वाटणारे, पण त्याकाळी खरे भासलेले जादूगारही आठवले. दूर गेलेले घरही आठवले.

‘परतून कुणीही घराकडे जाऊ  शकत नाही’ हे सत्य जरी असले तरी बाउमने ते नाकारले आहे. कारण सत्य नाकारण्याचा अधिकार ललित लेखकाजवळ असतो. सत्याची रूपे सतत बदलत असतात आणि अंतिम सत्य असे काहीच नसते. डोरोथी परतून घराकडे जाऊ  शकली याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तिची निरागसता अजून टिकून आहे. वय वाढते तसे आपण अनेक गोष्टी शिकत जातो आणि त्या बदल्यात आपल्याला आपली निरागसता द्यावी लागते. म्हणूनच आपली घराकडे जाणारी वाट बंद होते.

कथेचे तात्पर्य हेच असेल काय? असेल अथवा नसेलही. अमेरिकन विचारवंत थोरोचे एक वाक्य मला नेहमी आठवते.. ‘सर्वच कहाण्यांना त्यांचे तात्पर्य असते. पण निरागस माणसे फक्त गोष्ट ऐकून आनंदतात.’

गोष्ट ऐकायची/ पाहायची की तात्पर्य काढायचे, हे मात्र ज्याचे त्याने ठरवायचे असते.
विजय पाडळकर