यंदाच्या दिवाळीला मंदावल्या अर्थदीपाची काजळी आहे. बँका संकटात आहेत. भांडवली बाजार वर जायला तयार नाही.  खनिज तेलाचे दर खाली यायला तयार नाहीत. ब्रेग्झिटचं काय होणार, ही चिंता आहे. अमेरिकेतल्या भारतीयांसमोर नवनवी आव्हानं तयार होतायत आणि पश्चिम आशियातली वाळूही तापू लागलीय. हे कमी म्हणून की काय, वर करपून टाकणारी दुष्काळाची काळजी!

अशात आनंद आहे तो दिवाळीचाच.

कितीही वास्तव बोचरं असलं तरी माणसं उदासीनतेतनं बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात. एखादं गाणं, संध्याकाळचं झळंबलेलं आकाश, देहपेशींत चैतन्य भरणारी पहाटेची झुळुक असा बहुरूपी निसर्ग आहे म्हणून या उदासीनतेवर उतारा आहे. या अशा उताऱ्यांसाठीच सणांचा जन्म झाला असेल का?

असेलही कदाचित.

पण आताचं सणांचं स्वरूप आनंदापेक्षा निश्चितच काळजी वाढवणारं आहे. सणांची आताशा भीती वाटू लागलीये. आपापल्या धर्मपताका फडकवत हिंडणारे बेभान जथ्थे, विचारप्रक्रिया गोठवणारे आवाज आणि सहभागींच्या चेहऱ्यावर एक विखारी आनंद हमखास आढळतो आताशा सणांमध्ये. पूर्वी जगण्यातला साधेपणा सणांच्या स्निग्धतेतनं पाझरायचा. आता रोजच्या जगण्यातला उन्माद सणांच्या उपद्रवातनं आपल्याला विदग्ध करतोय.

पण तरीही सण साजरे व्हायला हवेत. निदान शहाण्यांनी तरी त्यातली सात्त्विकता जपायला हवी. सणांचा आनंद हा दुसऱ्यांच्या छाताडावर नाचत का साजरा करायचा, हा प्रश्न पडायला हवा आपल्याला. सतत वीरश्रीची पाशवी भाषा का? कोणाला तरी पराभूत करणं यातच विजयाचा आनंद कशासाठी?

स्वत:वरही विजय मिळवायला हवा असं वाटायला हवं. दुसरों की जय से पहले खुद को जय करे.. ही अशी भावना यायला हवी आपल्या मनात. आपण माणूस आहोत, हेच मिरवण्यासाठी पुरेसं असताना पुन्हा एकदा त्यात ‘गर्व से कहो..’ अशी आरोळी ठोकावंसं वाटणं हे खचितच मोठेपणाचं लक्षण नाही; तर ते आपल्यातल्या गंडाचं निदर्शक आहे.

प्रकाश हवाच. पण तो समोरच्याचे डोळे दिपवणारा नको. तो आपलं आणि त्याचंही जगणं उजळून टाकणारा हवा. ‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ, उतरली तारकादळे जणू नगरात..’ ही अवस्था निश्चितच उल्हसित करणारी. पण अशा वेळीही ‘..परि स्मरते आणिक करते व्याकूल केव्हा, त्या माजघरातील मंद दिव्याची वात!’ ही भावना आपलं भान जागेवर ठेवणारी.

अशी माजघरातील मंद दिव्याची वात प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करो.. या शुभेच्छांसह!

आपला