नवनाथ गोरे

दिस उगवायला अजून बराच उशीर हुता. पहिल्या कोंबडय़ानं आपलं तोंड उघडलं. झाडावरची पाखरं जागी झाली. मधीच एखादी वाऱ्याची झुळूक अंगाला झोंबून जायाची. बाबू हाथरूणात उठून बसला. अंगाला आळोखपिळोखं दिली. डोळ्याचं चिपडं बोटानं काढलं. तोपतूर दावणीतली म्हसरू हंबरत उठलं. अजून काळुखचं हुतं. तसाच हाथरूणातनं उठला. डेऱ्यातलं तांब्याभर पाणी घेटलं. उभ्यानंच तोंडावर मारलं. तसं खुराडय़ातल्या कोंबडय़ा जास्तच वरडाय लागल्या. अंधार निवळत चाल्ला. शेजारपाजारची माणसं एक-एक उठून कुणी रानाकडं, कुणी मेंढराच्या वाडय़ाकडं जात हुती. काय बायामाणसं हातात हांडं-कळशा घिवून पाण्यासाठी वाटंला लागल्या. जरा जाणती पोरं िशबूड गाळत आयच्या माघं पळत हुती. न्हाणगी घरात रडत असलेली.

दिसाचा लाल गोळा थोडासा आईच्या पोटातनं वर आला. सगळीकडं उजीडचं पडल्यागत स्वत:च्या पोटासाठी धडपडणारी माणसं. बाबू भिश्यानं आपल्या बायकुला हाक मारली,

‘‘अगं ये जने, उठ. दिस उगून कासराभर वर चढलाय, अगं उठ.’’

तस जनीनं डोळ्यावरची च्यादर बाजूला ढकलली नं स्वत:शी बोलली,

‘‘अगं आई गं दोडाचं! किती उशीर झाला म्हणायचा? मगाशीच उठवायचं नाय व्हय? माझ्या यिडीच्या डोळ्यात माती पडली. मला कैदाशिनीला लयच डोळा लागला.’’ चिंतेच्या स्वरात जनी बोल्ली.

‘‘असुदी. आता आवर पटाकशिना. म्या जरा आण्णा पाटलाच्या वाडय़ावर जाऊन येतू. मेंढराशिनाला चारायला कायच नाय. आप्पा खराताचं रान बी दुसऱ्याला ईकलया. काय करायचं? बगुया, पाटील काय रान चारायला दितूयाका?’’

असं बोलतच बाबूनं धोतराच्या एका पदरानं तोंडावरनं हात फिरूला अन् निघून गेला. जनी जागची उठली. वाडय़ातल्या मेंढराच्या लेंडय़ा खराटय़ानं लुटून काढल्या. निहुण उकिरंडय़ात टाकल्या आणिख वाडय़ात आली. तवा मेंढरं कावरीबावरी हुन जनीकडं बघत हुती. काय मेंढरं नाकानं लाळ गाळत हुती. पोटं पाटीला चिकटलेली. त्यात एक गुणी लाव्हार हुतं. ती जनीजवळ गेलं. तोंड वर करून शिकरल्यागत कराय लागलं. तसं जनीनं डाव्या हातानं माघं सारलं अन् म्हणाली,

‘‘अरं ये बाबा, तुझ्या पोटाला कायबी नाय रं माझ्या लेकरा. म्या तरी काय करू? आठ दिस झालं. आम्हीबी असंच कॉर कुटका खावून कंबर आवळून झोपतूया. तुला म्या काय घालू हॉ.. सांग?’’ तसं ती लाव्हार माघ सरलं. तिझं बोलनं त्येला समजलं असावं. गप्पच मान हलवत ते मेंढराच्या खांडव्यात शिरलं. तसं जनीच्या डोळ्यात पाणी आलं. मुक्का जीव काय वैरण काडी मागंल व्हय? नुसतं डोळ्यानं खुणवत हुतं. लगीच जनीनं मातऱ्यातलं मूठभर दाणं पिसवीतनं झाडून काढलं. ती पितळीत घालून लाव्हराच्या म्होरं ठिवलं. लाव्हरानं हिकडं तकडं बघटलं. नुसता नाकानं वास घेटला अन् गप्प उभा राहिलं. जनू कळता माणूस उभा राहावं तसा. जनी म्हणाली,

‘‘अरं ये बाबा, खा गासभर. कामून हिकडं तकडं बगतूयास? खा वायसं.’’

तरीबी दाण्याला तोंड लावीना. जनीनं ताट तथंच ठिवलं अन् वाडय़ाच्या बाहिर आली. त्या लाव्हराला कळलं असावं- माझी आयबी उपाशी हाय असं.

बाबू आण्णा पाटलाच्या वाडय़ावर पोचला हुता. पाटील नुकताच उठून बाजंवर बसलेला. पाटलाची करडी नजर बाबूवर पडली. तसा पाटील मिशावर हात फिरवत बोलला, ‘‘का रं बाब्या, आज वाडय़ावर येणं केलंस?’

‘‘व्हय मालक, तसं अडचणीचं काम हुतं.’

‘‘अडचण! कसली? अन् तुला?’’

‘‘व्हय मालक.’’

‘‘कशाची अडचण रं बाब्या?’’

‘‘अजूक दोन यॉक महिनं तर उन्हाळा हाया. म्होरंबी पावस हुईल असं काय दिसत नाय. मालक, जितराबाशिनाला वैरण नव्हती वो. रानं सगळी वसाड पडल्याती. पाण्याचं बी लय हाल चाललंया. आठ दिस झालं बगा, मेंढराशिनालाबी खायाला काय नाय. रानातली कुठली तर एखादी हराळीची वाळ्ळी काडी तोंडात धरून दिसभर वर माना करून जितराब हुभारत्याती.’’

सगळं गाराणं बाबूनं आण्णा पाटलाम्होरं मांडलं. पाटलानं सगळं आयकून घेटलं. अन् म्हणाला,

‘‘बरं, मग म्या काय करावं म्हणतूयाच?’’

‘‘मालक, तुमचं वडय़ापसलं रान मोकळंच हाय. तेवढं मेंढराशिनाला देचालं म्हणूशाना आलूया. बांधा-बांधावरनं जरा हिरवं हाय. तेवढंच च्यार दिस तर जगत्याली. बाकी काय नाय बगा. दिसकाळ लय बेकार आलं वो.’’ लगीच पाटलानं बाबूचा शब्द आडवून धरलानं म्हणाला,

‘‘अरं, तू म्हणतूयाच तिबी खरंच हाया. पर वडय़ापसला बांध तुला चारायला दिवून आमची जितराबं काय वारीला पाठवू का रं?’’

‘‘तसं म्हणू नकाशी मालक. तुमच्या पाया पडतू. माझी जितराबं जगत नायती. राव, तुमी कायबी काम सांगा, म्या करिन, पर नाय म्हणू नगा.’’

बाबूनं आण्णा पाटलाचं पाय धरलं. ईनवणी करू लागला. तरीबी पाटलाला दया आली नाय. शेवटी बाबूचा नाइलाज झाला. पाटील म्हणजी वाडीवरलं कडू कारलं. कुणालाबी कसली मदत करायचा नाय. रोजगारानं रानात कामाला माणसं लावायचा. दिसभर राबवून घ्यायचा. पर येळंला रोजगार कुणाला द्यायचा नाय. मागायला गेलेल्या माणसाशिनाला म्हणायचा,

‘‘अरं, तुमच्या मी बायली वसावा, सुकाळ्ळीच्यानू.. लय काम करून दमलाय की रं. किती काम केलं रं तुम्ही? तीन तासबी काम नीट करत नाय अन् आलाय तोंड घेऊन पगार मागायला. जावू द्या येवढा आठूडा. बगु, दिवूया.’’

गेलेल्या माणसाला तोंडावर मारल्यावानी हुयाचं. खाली मान घालून ती माघारी फिरायची. पाटील वाडीवरचा म्हसोबा झाला हुता. गुंड माणूस. कुणी काय बोल्लं तर राच्चं तेझी मेंढरं पळव, कोंबडय़ा घेऊन जा.. असलं काम करण्यात पटायत हुता. कुणीच काय म्हणत नव्हतं. नुसता मुक्याचा मार सहन करत माणसं जगत होती.

उन्हाचा चपाटा वाढला हुता. बाबू घराकडं निघाला. वाटंवरची माती पायानं उडत हुती. पाय आगीत घाटल्यासारखा वाटत हुता. पायात तर चप्पल नव्हती. पायाचं कातडं गाडीच्या चाकाच्या टायरच्या कातडय़ावानी. सगळं पाय भरून कुरपचं. डोसक्यावरचा घाम गळून छाटी भिजलेली. वाढल्याली दाढी खांजळत हुता. छाटी उचलून गळ्यापशी तोंडानं फुकायचा अन् ऊसकारा सोडायचा. झाडावरचं किड्डं दिवसा किर्र किर्र करून वरडत हुतं. माणकू मिसाळाचं रान वलाडलं तसं बाबूला लयच भवळकी आल्यागत वाटाय लागलं. म्होरल्या बांधावरचं चिंचंचं झाड आता भुतागत दिसाय लागलं. तेझ्या खाली बोचा टेकावा म्हणून बाबूचं पाय चिंचंच्या झाडाकडं वळलं. चिंचंच्या बुडापाशी आला. एकदम खाली बसला. तसं भुईवरच्या मातीनं चटका दिला. त्याचा जीव एकदम कळवळला.

‘‘अरं देवा, काय भोग म्हणावा जल्माचा! कसा येवढा दुष्काळ वाढवून ठिवलाचरं देवा. डोळं उघड रे बाबा, डोळं उघड.’’

अन् बाबूचं डोळं आपुआपचं झापलं. झाडाच्या फांद्या वाळून जनावराच्या हाडाच्या सापळ्यागत वरनं पडलेली सावली. झाडाला एकबी पान राहिलं नव्हतं. गुराच्या अंगावरचं कातडं सोलावं तसं झाडाची सालं निघाल्याली. आतनं झाड वाळवीनं पोखरल्यालं. वाळक्या ठाप्याची फांदी हाताच्या बोटासारखी दिसत हुती. लांबवरनं ऊनाच्या झळा आपलं काम करण्यात गुतलेल्या. वाटंवरचं गारगुटीची दगडं एकमेकावर जाळ झाल्यावाणी चमकायची. जणू एका तपाचा भोग भोगल्यागत. तेवढय़ात माणकू मिसाळच्या भावानं- सदानं हाक मारली, ‘‘अरं ये बाबू..’’ तसं बाबूनं डोळं उघडलं अन् डोळ्यात इस्त्याचं कोळगं पडल्यागत झालं. उटूचनी. याच झाडाची सोबत करून रहावं. नाय. आपुन जितीजाणती माणसं. जनी वाट बघत अशीन. दिस डोक्यावर आलाय. गेलं पाहिजी. मेंढरं वाडय़ात वरडत असत्याली. म्हणून हात टिकून उठला. तसा हाताला ईच्याची नांगी डसावी तसा चटका बसला. ‘बाईली वसावा.. याच मातीत राबलो. या मातीनं संबाळलं अन् हीच माती आमच्या जिवाची माती कराय उठल्या का? माणूस जल्माला यिवून चुकला का? अगं, माझी आय, त्वाचं मातीचा गोळा तयार केलाच, येवढं मोठं केलयाचं, अन् आता तुला आम्ही जड झालोय व्हय? अशी वाईट हु नकूच गं आय..’ म्हणतच भुईवरनं उटायची धडपड  केली अन् पुन्हा स्वत:शी पुटपुटला, ‘आय नं बाबा हुती तवा येवढं कवा वायट वाटलं नाय. ती असती तर किती बरं झालं असतं.’ त्यो सारखा मनातल्या मनात विचार घोळत हुता. तोपतूर सदा झाडापशी आला.

‘‘ये लगा बाबू, कवाच्यान् म्या हाका मारतूया. वु नाय का चू नाय. कसल्या इच्यारात हायचं, हा?’’

‘‘आपल्या कर्माचा इच्यार करतूया गडय़ा.’’

‘‘अरं, कसल्या कर्माचा इच्यार करतूयाच येडय़ा. उठ लगा, ऊन लय तापाय लागलंया. चल घराकडं.’’

दोघबी झाडापासनं हाल्ली. ऊनानं चांगलीच लाही करून सोडलं हुतं. चालतच बाबू बोलला,

‘‘अरं सदा, जितराबाला घालायला कायच नाय, म्हणूनशिना पाटलाकडं गेलो हुतू. तेनं तर हात वर केलं. अरं, आम्ही किती राबलू त्या पाटलाच्यात- सांग? माणसं वळख राखत नायती गडय़ा. हादा आला म्हणजी माणसं माघं लागत्याती. आता ह्य़ो प्रसंग आम्हावर आलाय, पर कुणीबी इच्यारत नाय. अरं, जितराबासाठी गाव सोडायला लागतंया गडय़ा. काय हुईल ती हुदी, पर जातू.’’

‘‘अरं, जातू म्हणतूयाचं पर नुसती मेंढरं घिवून जातूयाचं काय येडय़ा. माघं येक म्हसरू हाय नव्हं?’’

‘‘अरं, म्हसरूबी संगच घिवून जातू. बारकं एक पोरगं हाय. ती तेंच्या मामाकडं सोडतू. त्यो पाव्हणा येतूया आज सांच्याला. तेंच्या हिकडं येवढा उन्हाळा नाय गडय़ा. पोरग्याला संबाळलं तर फुरं. आम्ही कसंबी जगु. वाडीवरची दोन-तीन खांड येत्यातिका बगतू. त्यो सुर्याबा मला काल बोललाय.’’ बाबू व्याकूळ हुन बोलत हुता. त्याला ह्य़ो दिवस भकास वाटत हुता. पाय उचलायला हातापायात जीव गेल्यावानी झालं.

जनीनं घरात अजून चूल पेटवली नव्हती. सारखं मेंढराकडं येकदान् नवऱ्याच्या वाटंकडं येकदा बगायची. डोक्यावरचा घाम तोंडावरनं वरघळत हुता अन् डोळ्यातनं आल्यालं पाणी घामाच्या पाण्याबर मिसळत हुतं. लुगडय़ाच्या पदरानं वारं घ्यायची. वाडय़ातली मेंढरं वरडत हुती. तशी पोरगं सारखं ‘भाकर भाकर’ म्हणून रडत हुती. जनीनं मापठभर जुंधळ्याचं दाणं तेवढं सुपात घेटलं अन् जात्यापशी बसली. जातं साळुत्यानं झाडून काढलं. एका लाकडाच्या फळीनं खुठा मारून बसूला. जात्यात जुंधळ्याचं दाण्याचा पहिलाचं घास टाकला. डोळ्याच्या पाण्याबर जनीच्या तोंडातनं आपुआपच शब्द बाहिर पडलं..

‘जिवात जीव नाय

माझ्या वनवासाची खाय

एका मुलूखात सुकूळ

बारा मुलूखात दुकूळ

राब राब राबूनं गं माय

माझ्या पोटाला पडला पीळ बाय

इनंती माझी देवराया

साकडं घालती रं मेघराया

साकडं घालती रं मेघराया’

जनीनं गाणं म्हणतच दळान उरकलं. पाटीत पिट भरलं. साळूत्यानं जात्याच्याकडंचं पीठ झाडून तिबी कुडताभर शेणावारावरचं पीठ काढलं. चूल पेटवलीनं भाकर करायला बसली. चुलीतल्या धगधगत्या जाळाकडं बगत काटवटीतला हात काटवटीत अन् आपल्याच इच्यारात बुडाली.

असाच दोन-तीन र्वष दुष्काळ पडला. सगळ्या हिरी-बारवा आटल्या. रोजगार बंद झालं अन् जनावरांचं हाल हुया लागलं. म्हणूशाना सावकाराकडनं कर्ज काढलं. तेझ्यावरबी पावसानं दगा दिला अन् कर्जाचा आकडा वाढला. ओग्याप्पा पाटलानं दोन येकर रान लिहून घेटलं. व्याज वाढत गेलं, पर पाऊसकाळ काय हुईना. सासू-सासऱ्यानं गाव सोडलं. काय तर करून सावकाराचं कर्ज भागवायचं, ह्य़ा इच्यारानं रातनं ध्या राबत हुती. वरीस- दोन र्वष राबून थोडकं पसं गोळा केलं अन् गावाला आली. तर रानात औवतं लावला हुता. सासू-सासऱ्यानं सावकाराच्या हातापाया पडली, पर तेला हेंची दया आली नाय. ‘तुमच्या रानाची मुदत संपल्या. तुमची वस्ती सुदिक हिथनं हालवा..’ असा सावकार बोल्ला. सासू-सासऱ्यांनी गबाळ उचललं. अन् म्हणाला, ‘‘हेझ्याम्होर या रानात पावलं टाकायचा नाय..’’ असा तावाण सावकार बोल्ला. तवा तेनी गावाच्या कडंला च्यार लाकडं टाकून पालं टाकलं. तथंच तीन दगडांची चूल मांडली अन् राबून खायाला सुरवात झाली. पर आतनं गुशीन पोखरून काढावं तसं रानाची धास्तीचं..

या देण्याच्या धास्तीनं सासनं सासरा खंगत गेली. त्यातच ती देवाघराला निघून गेली. सगळ्या घरादारावर आबाळ कोसळल्यागत झालं. जी मरून स्वर्गी गेली ती किती सुखात आसत्याली. आम्हीच गेलो आसतो तर केवढं बरं झालं आसतं. हे दिवस तर बगायला आलं नसतं. आता ऱ्हायला होती घरापुरती जागा. त्येच्याम्होरं मेंढराचा वाडा. बाजूला जनावरांची दावण.

तेवढय़ात पोरगं बाहेरनं वरडत आलं. तशी जनीची तंद्री उडाली. डोळ्याचं पाणी पदरानं पुसलं. पोराला ताटात भाकर कालवून दिली. तोपतोर बाबू घरात आला. तशी व्याकूळ नजरेनं नवऱ्याकडं बगतच बोलली, ‘‘आवं, लय ऊन पडलंया. आंगातली छाटी घामानं पाक भिजलीया. काढा अगुदर.’’ तसं बाबूनं मिनमिनत्या डोळ्यानं जनीकडं बघटलं. थोडा येळ कोणीच काय बोललं नाय. मग जनी म्हणाली,

‘‘अवं, पाटील काय म्हणला?’’

‘‘त्यो काय म्हणतूया, तेला काय सुख-दु:ख हाय व्हय?’’

‘‘दितू म्हणलाय नव्हं रानं चारायला?’’

‘‘नाय?’’

‘‘का?’’

‘‘इच्यार तूच जावून आता.’’

‘‘अवं, तसं नव्हं.’’

‘‘मग कसं म्हणत्याचं. या ऊन्हाळ्यानं जीव नुसता नकुसा करून सोडलाय. जीव जायाचा वकुत आलाय. त्यो म्हणतूया- तुम्हाला रान दिवून आमची जितराबं काय वारीला पाठवावं का तुमानी दिवून.’’

जनीला तोंडात मारल्यागत झालं. कासुटा सोडता सोडता म्हणाली, ‘‘अवं, काय तरी हुईलंच नव्हं. कायबी चिंता करू नगा. घ्या तोंड धुवून. गासभर खावा.’’

बाबू जाग्यातनं उठला. डेऱ्यापशी गेला. डेऱ्यावरचं झाकाण काढलं. तांब्या आत घाटला. तसं तांब्या डेऱ्याच्या बुडाला टेकला. पाणी तळाला गेल्यालं. तसाच तांब्या वाकडा करून आर्धा भरला. तोंडावर पाणी मारलं. धोतराच्या सोग्यानं तोंड पुसलं. जनीनं ताट वाडून म्होरं ढकललं अन् काटवट धुली. निम्मी-आर्धी काकणं पीठ शिरून वाळून पांढरंशिपट दिसत हुती. जनीनं बी एक भाकर हातावर घेतली अन् तेझ्यावर हिरव्या मिरचीची चटणी थोडकी घेऊन तोंडात पहिलाच गास घाटला तर नरडं कडू ईक झाल्यालं. नरडय़ातनं गास खाली उतरंना. तशीच दुरडीत भाकर ठिवली. बाबूनंबी हात धुतला. धोतराच्या सोग्यानं तोंड पुसत म्हणाला,

‘‘जनीय.. आजच आपुन निघायला पायजी. आजूक च्यार दिस राहिलू तर ही जनावरं टिकायचा व्हाऱ्या काय दिसत नाय.’’

‘‘अवं पर, म्हस कशी चालील? आणिख कुणाची खांड हायती आपल्याबर?’’

‘‘अगं हायती, त्या वरच्या निगडीचा खंडू तात्या, निकमाचा म्हादा, अर्जुन आण्णा बी हाय.’’ बाबूनं सगळ्यांची नावं एका दमात सांगटली.

अख्खी रात सगळ्या माणसांनी गबाळ बांधलं. पहिली चान्नी उगवायला हालणार हुती. जनीनं मािळगरायाचा भंडारा येका पिसवीत घाटला. देव्हाऱ्यावरचा फोटो काढून घेटलं. द्यावं सगळं येका फडक्यात बांधलं. देवाच्या म्होरं ठिवलेली लोकर लुगडय़ाच्या फाटक्या पदरात बांधून घेटली. लोकर पदरात बांधून घेटली म्हणजी कुठलीच बाधा व्हत नाय अशी एक भोळी समज हुती. चिमणीचा मंद उजीडात आज देव्हारा बोडका दिसत हुता. सासू-सासऱ्याचा फोटो तेवढा गाडग्यात घाटला. आणिख बाहिर काढला. पदरानं पुसला. उरासंगट धरला. जनीचं डोळं भरलं. पहिली चान्नीनं त्वाँडं बाहिर काढलं. सगळ्यांची मेंढरं वागरतनं बाहिर निघाली. पर काय जणानी घोडय़ावर गबाळ घाटलं. बाबूनं सगळ्या घरातनं नदर टाकली. माघल्या दिवळीत मेंढराला आणल्यालं आवशीद दिसलं. बाबूला राग आला. हेझ्या आयला, या आवशीदाच्या. या आवशीदानं तर माझा संसार वाटंला लागला. ‘नगु ही घरात असली पिढा..’ म्हणतच दिवळीपशी गेला अन् हातात घेऊन लांब भिरकाटून टाकला. देव्हाऱ्यापशी गेला. जेजुरीच्या खंडोबाचा फोटो हुता. गुडगं टेकून देव्हाऱ्यावर डोसकं ठिवलं.

‘‘अरं खंडेराया, जगलू वाचलू तर म्होरल्या साली तुझ्या पायरीला यिन यॉस दि. काळ्या रानाला पोचूपतूर माझ्या जितराबावर तुझं ध्यान असूदी बाबा. ताकद दी.’’

भोळं मन देवाला ईनवत हुतं. काळ्या रानाची वाट देवाला सांगत हुतं. काळं रान ही विजापूरपासून शंभर-एक मल लांब असं बारा काळ बारा महिनं हिरवंगार, भरपूर पाणी, चाऱ्याला काय कमी नाय. या दुष्काळी भागातनं जाणारी धनगर माणसं या रानाकडं जायाची. काळ रानं म्हणजी चांगलं पिकणारं, बारा काळ काळंझ्यार पिकानं बसल्यालं. या रानाकडं बाबू अन् तेझी भावभावकी चाल्ली हुती.’’

बाबूनं घराचा दरवाजा लावला. काय बाया माणसं आपल्या पोरीशिनाला समजावत हुत्या, ‘‘बाय चिंगा, बाय अस रडूनी गं. माझी बाय शानी नय. माझ्या बायला मी पुढल्या येळंला येताना खायाला घिवून यिती हा.’’ तरीबी पोरी रडायच्या.

तोपतूर दुसरी समजावायची, ‘‘अरं बाबा संभा, म्हातारीला संभाळ. उंडग्यागत िहडू नगुचं बाबा. आम्ही हुतू तवा बरं हुतं. त्या खाल्याच्या वडय़ाकडचं हिरीकडं जावू नगु. तथ भूत हायती बरं का. आत्या, तूम्ही ध्यान ठिवा. लय आवच्यारी हाय कारटं.’’

त्यातनंच एखादी बोलायची, ‘‘अगं, राहुदी, लयच पुळका आलाय लेकरािशचा. लागल्या गुलुगुलु करायला. हिथं जाग्याला असताना कवा म्हातारा-म्हातारीला कपभर च्या दिला नाय अन् आता जाताना येवढा पुळका आलाय.’’

‘‘अगा काका, पावसकाळ चांगला झाला म्हणजी आम्ही माघारी यितूगा.’’

काय बाया समजावत, ‘‘पोरीय, म्हातारीला संबाळ. अंधाराचं तिला काय दिसत नाय. म्हाय पुनवीला मी नायतर तुझा बा यिल, सगळीकडं ध्यान ठिव.’’

जनी आपल्या भावाला म्हणाली, ‘‘अरं बाबशा, माझ्या पोराला संभाळ बाबा. म्या नायतर हेझा बा यिल. म्हाय पुणवीपतूर टिक्की मेंढीचं कोकरू ईकून हेला नवीन कापड आणती.’’

दोघातिघांची खांड हल्ली हुती. बाबूनं दार म्होरं केलं. कडी घाटली. बाहिरनं फाटकं पोतं दाराच्या फटीत खवलं अन् उगवत्या चान्नीला हात जोडून डोसक्यावर गबाळ घेटलं. खंडीभर मेंढरं दुसऱ्या खांडात मिसळून चालत हुती. जनीनं म्हशीला साखळी लावली. म्हस धडपडत उठली आणिख खाली बसली. जनीनं आणिख उठूलं. अंगात जीव नसल्यागत म्हस भेळकांडत जाग्यातनं हल्ली.

आंधाऱ्या राती सगळ्यानी गाव सोडलं. गावातली मरगळल्याली कुत्री जीव गेल्यागत भुकत हुती. काही कुत्री लांबवरनं रडत हुती. या रडण्याच्या आवाजानं रात आणिख भेसूर वाटत हुती. निगडी गावातनं सगळी बाहिर पडली. मुख्य हद्दीवर गेली. सुऱ्याबानं सगळ्याला थांबूलं अन् घोंगडय़ाचं खॉळ खांद्यावरणं काढलं. खाली भुईवर हाथरलं. पाच दगडं वळीनं पुजली. वाळक्या िलबूच्या दोन फाकी केल्या. दोनी दिशानं दोन टाकल्या. चौवकडनं पाण्याचा शितूडा टाकला. डोळं झाकून गावाकडं येक नदर टाकली. डोळं झाकून हात जोडला. खांद्यावर घोंगडं टाकलं अन् गावाची हद्द वलांडली. रात म्होरं सरकत हुती. मेंढरं मेंढक्याच्या माघं मरगळल्यागत पाय वढत, काळ्या रानाच्या वढीनं हिरव्या चाऱ्याच्या दिशेनं, उद्या जगण्याची धडपड या काळंराच्ची उगवत्या दिसाकडं चाल्ली हुती.