विवेक शानभाग, अनुवाद- अपर्णा नायगावकर

मरीकंबा देवस्थानाकडे जाणाऱ्या छोटय़ाशा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना एकमेकांना खेटून अनेक घरं होती. एखाद्या आळीत अनेक घरांची रांगच रांग असावी तशी. एकाच िभतीच्या दोन्ही बाजूंना वेगवेगळी बिऱ्हाडं होती. या टोकापासून त्या टोकापर्यंत जणू एकमेकांत गुंफलेली अशी ती घरं. एखाद्या पुष्पवाटिकेत सुंदर तरुणी फेऱ्या मारत असावी अशा प्रकारे त्या घरांच्या मधून एक छोटासा रस्ता विहरत जात होता. त्या घरांच्या गर्दीत मधेच एक मोकळी जागा होती व त्या जागेजवळच त्या घरांची रांग तुटत होती. या मोकळ्या जागेच्या अगदी समोर, रस्त्याच्या अलीकडच्या बाजूलाच माझ्या आजोबांचं घर होतं.

दरवर्षी शाळेला सुट्टी पडली की आम्ही सगळे आजोबांकडे जायचो. पण गेल्या गेल्या माहेरवाशिणींना मिळणारी वागणूक, मानापमान यावरून आईचं भांडण सुरू व्हायचं. तिच्या चार धाकटय़ा बहिणींपैकी एक-दोघी तरी त्यावेळी माहेरी आलेल्या असायच्या. सगळ्या मिळून आजी-आजोबांना अपराधी वाटेल असं बोलून, कधीकाळी घडलेले- न घडलेले प्रसंग अगदी निवडून, उकरून काढून त्यावरून भांडत बसायच्या. कुठलीही गोष्ट शेवटी भांडणाशी आणून जोडायची- या कलेत सगळ्याच बहिणी तरबेज होत्या. या वादावादीत मधे मधे मुलींचे हक्क, इस्टेटीतला वाटा, हुंडा वगरे विषय हमखास असायचे. कधी कधी आईच्या बोलण्यातही कायदा, दावा वगरे शब्द यायचे. आईच्या अशा बोलण्यामुळेच भांडणं होत असावीत असा मला संशय होता. माहेरपणाला बोलावण्यातला कमी-अधिकपणा, विस्मरणात गेलेल्या भेटवस्तू, बोललेले लागट शब्द, न केलेलं कौतुक असं कशा ना कशावरून तरी कोणाचा तरी पापड मोडायचा व भांडणाला निमित्त मिळायचं. भांडण किती जोरदार आहे यावरून आमचा जायचा दिवस किती दूर आहे याचा अंदाज आम्ही बांधायचो.

आजोबांच्या घरासमोरची मोकळी जागा चार घरं बांधून होतील इतकी विस्तृत होती. या जागेच्या उजवीकडे पंडितांचं घर होतं. आजोबांच्या घराच्या ओसरीवरून पाहिलं असता मोकळ्या जागेला चिकटून असलेल्या त्या घराची उंच िभत दृष्टीस पडायची. या िभतीला असलेल्या मोठमोठय़ा खिडक्यांना चार-चार दारं होती. खालची दोन्ही दारं कायम बंदच असायची. वरची दोन मात्र विमनस्क मन:स्थितीत वाकल्यासारखी अर्धवट उघडी असायची. खिडक्यांचे जाड गज- त्यावरील रंग उडून, गंजून गेलेले होते. िभतीच्या वरच्या भागात ‘दम्यावरती गुणकारी- डॉ. पंडितांचे औषध परिणामकारी’ असं पुरुषभर उंचीच्या गोल गोल अक्षरांत लिहिलेलं होतं. ती जाहिरात लिहिल्यानंतर डॉ. पंडित जास्त दिवस जगले नाहीत, असं एकदा आजी म्हणाली होती. तेव्हापासून ती जाहिरात, ती िभत, ते घर याविषयी बोलताना नीट सांगता येणार नाही असं काहीतरी गूढ मनात असायचं. डॉ. पंडितांना जाऊन कितीतरी वर्षे झाली तरी ती जाहिरात मात्र अजून तशीच होती. ती मोकळी जागा असो वा ते समोरचं घर असो- यांची आठवण येते तेव्हा ती जाहिरात आधी डोळ्यांसमोर येते. आम्ही आजोबांकडे आलो की ओसरीवर चढून ती अक्षरं मोठमोठय़ाने वाचायचो. घरातल्या नातवंडांपकी एखाद् दुसरं तर नव्याने अक्षरं शिकत असायचं. त्याला ‘चल, आपण वाचू या’ असं म्हटलं की ते पोरगं थांबत थांबत ‘द-म्या-व-र-च’ असं वाचू लागायचं. तेव्हा त्याच्यापेक्षा थोडंच मोठं असलेल्या आपल्याला किती छान वाचता येतं याचा अहंकार वाटायचा. पण नागेशमामा तेथे असेल तर ‘सुपरिंटेंडंट, स्वातंत्र्याकांक्षी’ असे शब्द आम्हाला लिहायला सांगायचा, तेव्हा आमची सगळी हुशारी थंड पडायची.

समोरचं घर इतकं मोठं होतं, की एकेकाळी तो राजवाडा असला पाहिजे असंच लहानपणी  वाटायचं. घराच्या एका भागात दुकान होतं. समोरून पाहिलं तर डावीकडचा दुकानाचा व उजवीकडचा घराचा असे दोन्ही दरवाजे दिसत असत. संपूर्ण इमारतीचा पाया सुमारे दीड पुरुष उंचीचा होता. ओसरीवर चढून जायचं असेल तर दहा पायऱ्या चढाव्या लागत. घराच्या दर्शनी भागातले मजबूत खांब, मोठमोठय़ा तुळया, मुख्य दरवाजावर रेखाटलेली चित्रं या सगळ्या गोष्टी तेथील एकेकाळच्या वैभवाची झलक दाखवण्याचा प्रयत्न करत असत.

अशुभाची सावली असल्यासारख्या या इमारतीवर एखादा अदृश्य हात उदासीनतेचा पातळ पडदा पसरून टाकत आहे असं दृश्य घराचा विटलेला, उडालेला रंग पाहून डोळ्यासमोर येत असे. मंगलोरी कौलं असलेल्या या घराच्या माडीच्या पडक्या भागात गवत भरून ठेवलेलं असे व उन्हामुळे सुकलेल्या शेवाळाने घराची कौलं काळपट दिसत असत. रुंद अशा दहा पायऱ्या चढल्यावर मोठी ओसरी होती. दुकानात येणाऱ्यांनी घराच्या बाजूला येऊ नये या उद्देशाने मधेच एक अडसर घातलेला होता. दुकानाचा दरवाजा सळ्यांचा होता. दुकान बंद करताना दरवाजाच्या सळ्यांवर एकेकाळी पांढऱ्या अक्षराने लिहिलेले, पण आता मळकट रंगात असलेले एक ते अठ्ठावीस आकडे दिसत असत. एकदा मी लवकर उठलो असता मधुकरने एक-एक सळी नीट बाजूला ठेवून दुकान उघडलेलं मी पाहिलं होतं. सगळ्या सळ्या नीट क्रमाने काढून ठेवाव्या लागत, अशीच त्यांची रचना होती.

दुकानाच्या आत रांगेने काळ्या रंगाची लाकडी कपाटं होती. मात्र, ती संपूर्ण रिकामीच होती. आतला काळोख व मागच्या िभतींचा उडालेला रंग यामुळे रस्त्यावरून दुकानाकडे पाहिलं असता ते अंत नसलेल्या गुहेसारखं अथवा भुयारासारखं वाटत असे. दुकानाच्या पुढच्या भागात नारळांच्या तोंड उघडून ठेवलेल्या गोणी, कुंकवाचे ढीग असलेली पितळेची परात, एका बाजूला उदबत्त्या, दुसऱ्या एका टोपलीत फुलांचे छोटे छोटे हार.. हे सोडून आणखी तिथे होत्या त्या सात-आठ पेपरिमट ठेवलेल्या बरण्या. रस्त्यावरून दिसतील अशा प्रकारे दोन छोटय़ा बांबूच्या परडय़ा ओसरीच्या कडेवर ठेवलेल्या असत. त्यात नारळ, उदबत्ती, कुंकवाची पुडी, छोटा हार व हिरवा खण ठेवलेला असे. बाजूलाच ‘येथे ओटीचे सामान मिळेल’ असा पांढऱ्या खडूने वाकडय़ातिकडय़ा अक्षरात लिहिलेला पत्र्याचा बोर्ड ठेवलेला असे.

या दुकानात गावातलं कोणीच येत नसे. कारण रोजच्या व्यवहारात नेहमी लागणाऱ्या वस्तू तेथे मिळत नसत. देवीच्या दर्शनासाठी परगावातून येणारे लोक या रस्त्याकडून आले तर देवाला वाहण्यासाठी ठेवलेल्या या तयार परडय़ा पाहून एखादी विकत घेत. कधी कधी त्यांच्याबरोबर असलेली मुलं पेपरिमटसाठी हट्ट करत. ‘परत येताना रिकामी परडी ठेवून जा,’ असं बजावूनही काही लोक परडी परत करायला विसरत. त्यामुळे परडी घेऊन गेलेल्या माणसाला परत यायला उशीर झाला तर मधुकर अस्वस्थ होत असे. मग तो पुन्हा पुन्हा ओसरीच्या कडेवर येऊन देवस्थानच्या बाजूला नजर टाकून पुन्हा गल्ल्यावर येऊन बसे. तेवढय़ात आजोबांच्या घरातलं कोणी दिसलं तर ‘त्याच्याकडची परडी काही परत येत नाही असं दिसतंय. ढुंगण भाजलेल्या बोक्यासारखे पळून जातात..’ असं म्हणत तो चिडचिड करू लागे. एका बांबूच्या परडीसाठी त्याचा चाललेला हा आकांत पाहून त्याच्या परिस्थितीबद्दल दया यायची, तसंच त्याची असहायताही दिसून यायची. यायला उशीर झालेल्या लोकांनी ‘घ्या राव, तुमची परडी!’ असं म्हणून परडी परत दिली की त्यांच्या वागण्याने लज्जित झालेला मधुकर मग त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष करण्याचं नाटक करून ‘इथे ठेवून जा..’ असं म्हणायचा. तेव्हा सगळ्यांना तो चेष्टेचा विषय व्हायचा. नागेशमामा तेथे असेल तेव्हा ‘तो पाहा- त्या बाजूला जाऊन परडी कशी फिरवत फिरवत तुझी परीक्षा पाहतोय..’ असं म्हणत त्याला भडकवायचा. असलं थिल्लर बोलणं कानावर पडलं की आजोबा गंभीर व्हायचे व म्हणायचे, ‘‘असलेली श्रीमंती जाते ना, त्याचं दुख तुम्हाला नाही कळणार.’’

दुकानाच्या आत उजवीकडे मोठी गल्लापेटी होती. त्याच्या मागे असलेली लाकडी खुर्ची ही मधुकरची बसायची जागा. मळकट पांढरा पायजमा व सदरा घालून, समोर टक्कल पडलेल्या डोक्यावरून सारखा डावा हात फिरवत आपल्या निस्तेज डोळ्यांनी शांतपणे रस्त्याकडे पाहत बसलेला मधुकर नेहमीच मोठ्ठा व्यवहार करत असल्यासारखा दिवसभर गल्ल्याच्या मागे बसलेला असायचा. तो स्वत:हून कोणाजवळ बोलायला जायचा नाही. आजोबा मात्र रोज सकाळी त्याच्या दुकानावर जाऊन त्याच्याशी बोलून यायचे. आजोबा घरातून बाहेर पडले की मधुकर बसल्या जागेवरून हलून गल्ल्यावरून उठायच्या तयारीत राहायचा. त्यांनी दुकानासमोर जाऊन ‘मधुकरा..’ अशी हाक मारली की तो पायऱ्या उतरून खाली यायचा व नम्रपणे उभा राहायचा. एका मिनिटात ही रोजची ख्यालीखुशाली विचारून झाली की आजोबा त्यांच्या दुकानाकडे निघून जायचे.

आजोबांच्या घरासमोरच्या त्या मोकळ्या जागेवर खेळायला जायला मुलांना बंदी होती. पंडितांच्या घरातले लोकही त्या जागेचा उपयोग करताना दिसत नसत.

एके दिवशी दुपारचं जेवण झाल्यावर आजोबांच्या ओसरीवर पान लावत बसलेला धाकटय़ा मावशीचा नवरा समोरच्या जागेकडे पाहत नागेशमामाला म्हणाला, ‘‘या अशा रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या जागेला सोन्याचा भाव येईल.’’

विडय़ाचं पान हातात धरून चांगल्या सुपारीसाठी चंचीत हात घालत नागेशमामा म्हणाला, ‘‘ही बाई जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत त्या जागेच्या चौकशीलाही कोणी येणार नाही.’’

‘‘अहो महाराज, या काळातही या सगळ्यावर विश्वास ठेवणारे लोक असल्यावर जागा विकायला अडचणी येणारच.’’ मावशीचा नवरा म्हणाला. होन्नावरमध्ये त्याचे नाना प्रकारचे उद्योग होते. तो हात लावील त्याचं सोनं करतो, शुक्र त्याच्या भाग्यस्थानी आहे, जे हातात घेईल ते यशस्वीपणे तडीस नेतो, अशी त्याची ख्याती होती. मचव्यापासून ते आइस फॅक्टरीपर्यंत अनेक व्यवसायांचा अनुभव त्याच्याकडे होता. आता या समोरच्या मोकळ्या जागेतून कसा फायदा उठवता येईल याचाच विचार करत त्याच्या गप्पा चालल्या होत्या. त्या जागेचं रहस्य उलगडून सांगताना नागेशमामाने अनेक गोष्टी त्याच्या कानावर घातल्या.

‘‘अगदी परवा परवा हम्मन्नाचा मुलगा किमानीहून बलगाडी घेऊन आला होता. तसा तो पहिल्यांदाच इकडे आला होता. दुपारची वेळ होती. आम्ही सगळे घरातच होतो. त्याने बल व गाडी तिथे मोकळ्या जागेत लावली, बलांपुढे गवत टाकलं व आमच्या घराच्या मागे येऊन गप्पा मारू लागला. त्याने बलांना पुढच्या जागेत बांधलं आहे हे आम्हाला माहीत होतं. पण तिला हे कळल्यावर ‘‘अय्यो, नको.. नको, बल तिकडे कशाला? इकडे मागे आणून बांध..’’ असं म्हणून त्याला पाणी प्यायलाही वेळ न देता आईने त्याला बलांना मागे आणून बांधायला लावलं. धष्टपुष्ट, हत्तीच्या पिल्लासारखे होते ते बल. किमानीला परत जाताना मंडल घाटात मोटारीची धडक बसली आणि एका बलाचा पाय मोडला. आता याला काय म्हणायचं बोला!’’

‘‘मी काही तिला पाहिलेली नाही. खिडकीजवळ बसून असते म्हणतात ते खरं का?’’

‘‘या बाजूने दिसत नाही. ती िभत आहे ना, तिच्या टोकाला असलेल्या खिडकीतून कधी कधी दिसते असं म्हणतात. मला तर एक अंधार सोडून तेथे काहीच दिसत नाही.’’

‘‘तुमचे अप्पा हे असलं काही मानत नाहीत हे खरं आहे का?’’

‘‘त्यांची मतं बदलणं देवालाही शक्य नाही. डोळ्यांसमोर असतानाही बघायला तयार नाहीत अशांना काय सांगणार? एवढंच कशाला, गेल्या वर्षी त्या बारक्याची मुलगी शकू गोव्याहून आली होती. बरोबर तिचा सोळा वर्षांचा मुलगाही होता. कोणाच्याही डोळ्यात भरेल असा निरोगी, दणकट मुलगा. यांच्या नात्यातलाच ना तो! ते सगळेच इकडे आले होते. आल्यावर दुसऱ्या दिवसापासून ताप येऊन मुलाने अंथरूण धरलं. ताप टॉयफॉइडचा निघाला. त्यातून त्याला बरं करता करता नाकीनऊ आले. ‘पुन्हा तिच्या नजरेला पडू देणार नाही व या घरात पुन्हा पाऊलही टाकणार नाही,’ अशी प्रतिज्ञा करूनच परत गेली शकू. आता याला दुसरं काय म्हणणार सांगा?

‘‘आत्ता ही जागा स्वस्तात मिळू शकेल. ही आताच खरेदी करून ठेवली तर पुढे त्याचं काही करता येईल.’’

‘‘मधुकरला ती जागा विकायचीच नाहीये. खरं तर दिवसाला दहा रुपयाचाही धंदा होत नाही त्याचा. काय हवा खाऊन जगतात की काय कोण जाणे! लग्न-मुंजींना जात नाही. चल म्हटलं तरी दुकान सोडून कसं काय येणार, असं म्हणतो. गल्ल्यावर कोण बसणार, म्हणतो. मागे एकदा त्याच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी ‘ही जागा विकून टाक’ असं म्हणालो तर म्हणाला, की ही जागा विकली तर गिऱ्हाईकांना गाडय़ा बांधायला कुठली जागा मग? त्याच्या वडिलांच्या भरभराटीच्या काळात तेथे गिऱ्हाईकांच्या गाडय़ा बांधण्यासाठी पक्कं छप्पर बांधलेलं होतं असं म्हणतात. सोड, माणसाच्या मूर्खपणालाही काही मर्यादा हव्यात की नाही?’’

‘‘तुझ्या आप्पांनी सांगितलं तर तो ऐकेल?’’

‘‘मुळात या गोष्टीला आप्पांची संमती मिळवणंच कठीण आहे. आणि दुसऱ्या कोणामार्फत मधुकरकडे गेलं तरी आप्पांना विचारल्याशिवाय तो एक पाऊलही पुढे टाकणार नाही.’’ तोंडातल्या पानाच्या तोबऱ्यामुळे शब्द अस्पष्ट येऊ लागल्याने नागेशमामा िपक टाकण्याकरिता ओसरीच्या टोकाकडे गेला.

त्या घरातील बाईबद्दल लोक काहीबाही बोलत. पण नीटपणे कोणी काही सांगत नसे. परिणामी कानावर पडलेल्या गोष्टी, चोरून ऐकलेलं बोलणं, पोरवयातल्या कुतूहलामुळे चालणारी हेरगिरी या सगळ्या गोष्टींमुळे काही दिवसांनी माझ्या मनासमोर तिचं एक चित्र तयार झालं होतं.

माझी आई व आजोबा यांच्या मनात तिच्याबद्दल काही प्रमाणात सहानुभूती असावी असं त्यांच्या बोलण्यावरून दिसून येई. बाकी कोणीही तिच्याबद्दल चांगलं, माणुसकीला धरून बोललेलं मला तरी आठवत नाही.

समोरचं ते मोठं घर घनश्याम पंडितांचं होतं. ती पंडितांची एकुलती एक धाकटी बहीण. मुक्ता तिचं नाव. घनश्याम पंडित गावातले मोठे व्यापारी होते. एकेकाळी त्यांचं मोठं किराणा मालाचं दुकान होतं. आजूबाजूच्या गावांतले लोक लग्नकार्याचं सामान घ्यायला त्या दुकानात येत असत. त्यांच्या घरातल्या दमणीत बसून एका लग्नाला गेल्याचं आई सांगत असे. दमणीमध्ये अंथरलेल्या मऊसूत गालिच्याचं आईने केलेलं वर्णन मला स्पष्टपणे आठवतंय. रूप, पसा सगळं असूनही योग्य वेळी मुक्ताचं लग्न झालं नाही. पत्रिकेतील दोष किंवा अन्य काही कारणांनी बरेच दिवस न जमलेलं तिचं लग्न शेवटी तर्नमकीच्या एका घराण्यात सगळ्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलं. घनश्याम पंडितांनी सढळ हातांनी वरदक्षिणा दिली. परंतु काही दिवसांतच तिच्या नवऱ्याचं आकस्मिक निधन झालं. तोपर्यंत सगळं काही ठीक होतं. नंतर मात्र तिला सासरचा त्रास सुरू झाला. तिची नजर पडल्यावर गोष्टी बिघडून जातात, वाईट घडतं, असं बोललं जाऊ लागलं.

तिची नजर पडल्यावर चांगला धरणारा माड सुकून गेला. छोटय़ा बाळाचं दुपटं पाहून ‘तुझी बायको चांगली हौशी दिसते आहे,’ असं हिने म्हणताच दुसऱ्याच दिवशी तिला साप चावला. ‘आमच्या घरच्या विहिरीतलं पाणी कधी आटत नाही,’ असं हिने म्हटल्यावर पुढच्या उन्हाळ्यातच विहिरीचा तळ दिसू लागला. ‘महन्मयी देवीचा रथ पाहायला दोन डोळे पुरत नाहीत,’ असं हिने म्हणताच रथाचं चाक मोडून पडलं. आता हिच्या नजरेमुळे देवीचा रथ मोडावा इतकी वाईट, उग्र शक्ती तिच्या नजरेत असेल का? तिच्या बाबतीत तिला दोष  लावणारे असे प्रसंग एकामागोमाग एक घडत होते. गणेश चतुर्थीचा चंद्र बघितल्यामुळे असं होतंय की काय असा विचार करून तिने गणेशाचं व्रत केलं. पूजासुद्धा केली. त्यासाठी कलश ठेवला असता तिच्या नणंदेचा मुलगा खेळता खेळता सुपारीच्या झाडावर चढायला गेला व पाय घसरून पडून तो गेला. असं झाल्यावर ही घटना घडण्यापूर्वी मुक्ता काय काय बोलली होती याची चौकशी करून काही निष्कर्ष काढण्यापूर्वीच तिची नणंद जळतं लाकूड घेऊन तिला मारायला धावली होती आणि कोणाच्या तरी घराचा आसरा घेऊन लपतछपत तिने रात्र काढली होती.

दुसऱ्या दिवशी तिच्या मोठय़ा दीराने तिला माहेरी आणून सोडलं. पंडितांच्या मानाचा, मोठेपणाचा विचार न करता तो तोंडाला येईल ते बोलला. तेवढय़ात गावातले चार लोक तेथे जमा झाले. त्यांच्यासमोर अपमानित झाल्याचं दुख एका बाजूला, तर दुसरीकडे धाकटय़ा बहिणीवर लावण्यात आलेला कलंक- यामुळे पंडितांचा संताप उफाळून आला व त्यांनी व्याह्य़ांच्या मोठय़ा मुलाच्या कानाखाली एक सणसणीत ठेवून दिली. ‘लग्न करून दिलं तेव्हा ‘हे माहेरचं घर व घरातले आता तुझे कोणी नाहीत,’ असं तिला म्हणाला होतात ना? माझी अर्धी इस्टेट आता तिच्या नावावर करतो. तुमच्या घरातल्या अन्नाच्या एका दाण्याचीही तिला आवश्यकता नाही,’ असं शेजाऱ्यांसमोर ओरडून सांगितलं त्यांनी.

तिथेच सगळं संपलं. त्यानंतर मुक्ता कधीच सासरी गेली नाही.

ही बातमी गावात पसरायला क्षणाचाही वेळ लागला नाही. इतके दिवस चांगली असलेली तिची नजर अचानक वाईट कशी झाली, हा प्रश्न कोणाच्याही मनात आला नाही. या गावात जे जे अनुचित, वाईट घडेल त्याला या ना त्या प्रकारे तीच कारणीभूत ठरत गेली. भागवतांच्या घरात गवताच्या गंजीला लागलेली आग, वाडीबुगरीच्या मुलीने केलेली आत्महत्या, विठ्ठल रावांच्या मुलीला झालेला मानसिक आजार, जन्मत:च गेलेली लक्कप्पाची नात- कोणतीही घटना असो, सगळ्याला कारण तीच! ती घरी परत आल्यापासून सगळ्या समस्यांचं कारण गावाला मिळू लागलं. तिचं बोलणं, तिची नजर, तिचं हसणं, तिने स्पर्श केलेल्या वस्तू.. सगळं काही घडलेल्या घटनांच्या मागचं कारण ठरत होतं. गोष्टी घडण्यामागे एक वेगळी अदृश्य अशी शक्ती असते, हे विसरून समोर दिसणाऱ्या मुक्ताला सगळे दोष देऊ लागले. एखादी अटळ अशी दुर्घटना किंवा अकारण घडलेल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टींसाठी इतकं सहज कारण मिळत असताना ते सोडायला कुणीच तयार नव्हतं.

आईचा सर्वात लहान भाऊ सुधीर. सुधीरमामाच्या लग्नाकरिता आम्ही आजोबांकडे गेलो होतो. कार्य आटोपून बेळगावहून दुसऱ्या दिवशी परत आल्यावर दुपारी आई मला जबरदस्तीने झोपवायचा प्रयत्न करत होती. काळोखच काळोख असलेल्या त्या खोलीत खाटेवर मी व आई झोपलो होतो. समोरच खाली चटईवर पडलेल्या आजीचं बोलणं समोरच्या घरातील मुक्ता या विषयापर्यंत जाऊन पोचलं. घरातली नवी सून सुरेखामामीही तेथेच होती. आजी तपशिलात जाऊन काही सांगू लागली तेव्हा तिचं बोलणं सहन न होऊन आई अस्वस्थ झाली होती, तळमळत होती.. हे तिच्या जवळ झोपलेल्या मला जाणवत होतं.

‘‘त्यांच्या घरातल्यांना असं कधी जाणवलं होतं का?’’ भीतीच्याही पलीकडे जाऊन सुरेखामामीने विचारलं.

‘‘जाणवलं काय आणि न जाणवलं काय, घनश्याम पंडितांचं दुकान कसं होतं व त्याचं काय झालं? मी खोटं सांगणार नाही. कोणालाही विचारून पाहा. दुकानाचा कारभार केवढा मोठा होता. शेजारीच घर असून जेवायला जायलाही त्याला फुरसत मिळत नसे. मंगळवार तर बाजाराचा दिवस. त्या दिवशी दुकानासमोर रांगा लागायच्या. ओसरीवर या टोकापासून त्या टोकापर्यंत पिशव्या भरून ठेवलेल्या असायच्या. त्याच दुकानाची आताची अवस्था पाहा. भुताटकी झाल्यासारखं सगळं दिसेनासं झालं. संपूर्ण दुकान रिकामं झालं. हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडलेलं आहे. बघता बघता अख्खं कुटुंब भिकारी झालं.’’

माझ्या बाजूला पडल्या पडल्याच आई म्हणाली, ‘‘पुरे आई, आता बस कर. तिने काय केलं आहे ग? या सगळ्याला घनश्यामचा मुलगा कारण आहे असं कुणीच का म्हणत नाही?’’

‘‘त्याला अशी बुद्धी व्हायला काहीतरी कारण असेलच ना? नाही तर चांगला मुलगा कोणा बाबाजीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून घरातलं सगळं सोनं बांधून त्याला देऊन टाकतो यावर विश्वास कसा ठेवायचा? विनाशकाले विपरीत बुद्धी देतो हा देव.’’

‘‘असं बोल. त्या खुळचट मधुकरला पशांची हाव सुटली. त्या बाबाजीनं सोनं दुप्पट करून देतो असं सांगितलं आणि म्हणून याने देऊन टाकलं. कोणाला एका शब्दानेही विचारलं नाही. सगळं घडून गेल्यावर रडून काय फायदा?’’

‘‘त्याला अशी बुद्धी व्हायचं कारण..’’

‘‘कारण मी सांगते.’’ आजीचं बोलणं अध्र्यावर तोडत आई म्हणाली, ‘‘पंडिताने अर्धी इस्टेट बहिणीच्या नावावर केली म्हणून याच्या पोटात आग पेटायला सुरुवात झाली. लग्न झालेल्या मुलीच्या नावावर अर्धी इस्टेट करतो म्हणजे काय? पण वडिलांच्या समोर बोलायचं धर्य नव्हतं. रागापोटी असेल, वाईट इच्छेने असेल, तिच्या सासरच्यांना दाखवण्याकरता असेल किवा अपमानित झाल्यासारखं वाटूनही असेल; पण अखेर एक दिवस सगळी तिजोरी रिकामी झाली.’’

‘‘त्यासाठी आधी काय झालं होतं ऐक. एके दिवशी भावाला बोलवायला ती दुकानात गेली होती. पंडित गल्ल्यावर बसून पसे मोजत होता. नोटांची बंडलं बांधून ठेवत होता. त्यावेळी ही डोळे विस्फारून पाहत होती. झालं! सगळं धुतल्यासारखं स्वछ होऊन गेलं. याला काय म्हणशील?’’ – इति आजी.

‘‘हरिदासाची कथा मूळ पदावर..’’ असं म्हणून आणखी काही न बोलता आई तेथून उठून गेली. नवीन सुनेबरोबर आजीच्या गप्पा चालूच होत्या.

‘‘सोनंनाणं गेल्यावर पंडितांची परिस्थिती अगदी बदलून गेली. बघता बघता दुकानाला उतरती कळा लागली. त्याचवेळी पेठेत शंकर नायकाने नवीन दुकान चालू केले. पुढे सहा महिन्याच्या आत पंडित मरण पावला. मरताना बहिणीला काय सांगून गेला काय माहीत? की त्याच्या अधोगतीला तीच करणीभूत आहे, हे लोकांचं म्हणणं तिच्यापर्यंत पोचलं होतं, तेही माहीत नाही. पण तिने त्यावेळी प्रतिज्ञा केली, की ‘यानंतर या घराच्या बाहेर पडेन ती मेल्यावरच.’ इतकी वर्षे झाली, त्यानंतर ती एकदाही घराबाहेर पडली नाही.’’

‘‘पण आधी ती सगळीकडे वावरायची का?’’ घाबरलेल्या मामीने विचारले.

‘‘हो तर. सगळीकडे जायची. तिच्यावर लावले गेलेले सगळे दोष खोटे आहेत असंच तिला वाटत होतं. ते दाखवण्यासाठीच मग ती इकडे तिकडे फिरायची. पण एकदा डोक्यात संशयाचं भूत शिरलं की त्याला हुसकावून लावणं देवालाही शक्य होत नाही. तसंच लोकांचं झालं होतं. ती दिसली की केवढी घबराट उडायची. ती काहीतरी बोलेल की काय? तिची नजर पडणार नाही ना? असं मनात यायचं. काही चांगलं घडलेलं तिच्या कानावर पडेल की काय, या भीतीने या भागातील लोकांनी तिच्याजवळ बोलणंच सोडून दिलं. एक जोडपं चांगलं सुखात नांदत होतं. तिची नजर पडल्यावर चार दिवसांत तो दुसऱ्या बाईकडे गेला. याला काय म्हणायचं? दुसरा कोणी नाही- रंगाप्पाचा मुलगा मोहन. नव्या नवरीला घेऊन देवाला जाऊन आला. येताना ‘मुक्ताताई..’ असं म्हणून तिच्याजवळ बोलायला गेला. मान वर करून कोणाकडे पाहणारही नाही असा मुलगा; पण चार दिवसही संसार केला नाही. वरच्या आळीतल्या एका मुलीच्या मागे लागून मुंबईला पळून गेला. असं घडल्यावर काही जणांनी सरळच तिला सांगून टाकलं, की यानंतर इथे पाऊल टाकायचं नाही. सुरवातीला ती कोणाचंही ऐकत नसे. घनश्याम पंडित गेल्यावर मात्र ती बदलली. त्यामुळेच सगळ्यांना आपल्याला सगळं माहीत आहे असं वाटत असलं तरी खरं काय ते बाहेर कोणालाच माहीत नाही.’’

‘‘त्यानंतर ती एकदाही बाहेर पडली नाही?’’

‘‘नाही. मधुकरच्या लग्नालाही आली नाही. त्याच्यासाठी मुलगी शोधताना किती त्रास पडला होता माहीत आहे? नंतर हळदीपूरची, वय उलटून गेलेली गरीबाघरची मुलगी केलीन् त्याने. त्याच्यापेक्षा किती लहान. पण म्हणतात ना ‘सटवाईला नाही नवरा आणि म्हसोबाला नाही बायको-’ तशातला प्रकार. काय पण जोडी.. परमात्म्याने जणू स्वतच्या हाताने घडवलेली.’’

‘‘आपल्या घरच्या ओसरीवरून तिला पाहता येईल का?’’

‘‘असं घाबरून जायचं कारण नाही. असं भलतंसलतं काही होणार नाही. कडेला असलेल्या त्या शेवटच्या खिडकीतून ती बाहेर पाहत असते असं सगळे म्हणतात. मी काही पाहिलेली नाही. त्या खिडकीत अंधाराशिवाय दुसरं काही दिसत नाही. तिच्यामुळेच तर समोरची ती मोकळी जागा अजूनही तशीच पडून आहे.’’

तेवढय़ात माझी आई तेथे आल्यामुळे त्यांच्या गप्पा तेथेच थांबल्या. आजी म्हणत होती त्या खिडकीकडे मी हळूच पाहून घेतले. खिडकीची दारं थोडीशी किलकिली होती. किती प्रयत्न केला तरी आत फक्त अंधारच दिसत होता.

त्या दिवशी दुपारी बायका झोपल्या नाहीत. त्यांच्या काही न् काही गप्पा चालू होत्या. थोडय़ा वेळाने आजी म्हणाली, ‘‘लाडूच्या पुडय़ा वाटण्याचं काम आज संपवायला हवं.’’ लग्नासारख्या शुभकार्यानंतर आळीतल्या सगळ्यांकडे व लग्नाला आले नसतील त्यांच्याकडेही लाडू वाटायची आमच्याकडे पद्धत होती. तिच्या बोलण्याला होकार देत एकेक जण उठला. चहा-पाण्याचं आवरल्यानंतर बायकांनी ५-६, ५-६ लाडूंच्या पुडय़ा तयार केल्या. त्या घराघरात जाऊन पोचवण्याची जबाबदारी मुलांवर आल्यावर त्यांच्यात एकदम उत्साह आला व आरडाओरडा सुरू झाला. एकेक पुडी हातात घेऊन आजी ती कोणाकडे द्यायची ते सांगत होती. कोणाकडे जायचे ते एकदा कळल्यावर मुलांना थांबायला वेळ नव्हता. लांबलांबची घरं मोठय़ा मुलांसाठी राखून ठेवली होती.

अशा प्रकारे कामाची वाटणी होऊन माझ्या हातात आलेली लाडूची पुडी समोरच्या घरी द्यायची आहे हे कळल्यावर मी एकदम निराश झालो. इतक्या जवळच्या घरी जाण्यात कसली मजा? मी आजीच्या पुढे उभा राहून तोंड वेंगाडायला सुरुवात केली.

‘‘आधी समोर जाऊन ही पुडी देऊन ये. मध्येच गडबड केलीस तर पुडय़ांचं माझं गणित चुकेल. समोरच मधुकर असेल बघ. त्याच्याजवळ दे व परत ये. मग बारक्याच्या घरी तुलाच पाठवीन..’’ असं म्हणून आजीने मला बाहेर हाकललं.

मी गेलो तेव्हा मधुकर दुकानात नव्हता. दोन मिनिटं थांबलो, पण तो यायचं काही चिन्ह दिसेना. बारकूच्या घरी पुडी द्यायची जास्त उत्सुकता होती. म्हणून दुकानात कोणी नाही तर घरी देऊन येऊ असा विचार करून मधला अडसर ओलांडून त्या घराच्या दारासमोर जाऊन उभा राहिलो. पण घरात कोणी आहे असं वाटत नव्हतं. कडी वाजवली, पण काहीच उत्तर नाही. शेवटी आत पाऊल टाकलं. मोठा सोपा होता. तेथे थोडाफार अंधारच होता. एका बाजूला माडीवर जाण्यासाठी असलेला लाकडी जिना होता. जिना चढताना आधारासाठी टांगलेला एक दोर वरून खालपर्यंत लोंबत होता. कोणाच्याही जाण्यायेण्यात नसलेलं हे घर. पण तो दोर तेथील कोणाचं तरी त्या घरातील अस्तित्व जाणवून देत होता. गेल्या गेल्या डोळ्यात भरला तो घराचा भकासपणा. िभती सोडल्यास दुसरी एकही वस्तू तेथे नसल्याने घर रिकामं रिकामं वाटत होतं. आत जाण्यासाठी असलेला तेथील लोखंडी दरवाजा वैऱ्यासारखा दिसत होता. तो बंद असून त्याला कुलूप लावलेलं होतं. या खोलीतून जरा पुढे गेल्यावर टोकाला एक दरवाजा व त्यापलीकडे थोडासा उजेड असलेली जागा नजरेस पडली. चुली दिसल्यावर ते स्वयंपाकघर होतं हे लक्षात आलं.

इतक्यात डाव्या बाजूच्या खोलीतून- ‘‘कोण आहे? ये, इकडे ये..’’ असा आवाज आल्यावर मी थोडा दचकलो.

‘‘कोण आहे? काय हवंय? ’’ पुन्हा आवाज आला.

डोळे फाडून पाहिलं तरी आतल्या काळोखात काही दिसत नव्हतं. त्यात मी बाहेरून उजेडातून आलेलो होतो. थोडंसं दबकतच यायचं कारण सांगितलं.

‘‘हो का? मग चोरी करायला आल्यासारखा घाबरतोस कशाला? तू अंतण्णांचा नातू नं?’’

‘‘होय.’’

‘‘कोणाचा मुलगा?’’

मी आईचं नाव सांगितलं.

‘‘असा घाबरतोस का? ये, आत ये.’’ या बोलण्यानं मला थोडा धीर आला. तरीही मी उभा होतो तेथूनच काळोखातच हातातली पुडी पुढे केली.

‘‘ए घाबरट, ये इकडे.’’ या आवाजात आजीसारखी जरब वाटली. काय होतंय ते कळायच्या आत आतल्या काळोखातून एक हात पुढे आला व माझा हात पकडून मला आत खेचून घेऊन गेला.

‘‘मला उजेड चालत नाही. डोळ्यांना त्रास होतो. म्हणून तुला आत ये म्हटलं. घाबरू नको. दोन प्रहरी खिडकी थोडीशी उघडते, पण अख्खा दिवस या खोलीतच असते रे, म्हणून..’’ असं म्हणून माझा हात न सोडता ती मला आत घेऊन गेली. अशी चार पावलं चालल्यानंतर माझ्या ढोपराला कसला तरी मऊ मऊ स्पर्श झाला. तो पलंगावर अंथरलेल्या अंथरुणाचा शेव होता. दिसत नव्हती तरी ती पलंगावर बसली आहे हे मला कळलं.

‘‘इथे बस.’’

‘‘नको, मी जातो.’’

‘‘बस. हुशार मुलगा आहेस. बस. तुझ्या आईला मी खेळवलेलं आहे. तिचं ढुंगणसुद्धा धुतलेलं आहे मी. आता तुला बस म्हणून आग्रह करायला हवा का रे? लाडू कोणी पाठवले?’’

‘‘आजीने.’’

‘‘तू लग्नाला गेला होतास का?’’

‘‘हो, गेलो होतो.’’

‘‘लग्न मुलीच्या घरीच झालं की देवस्थानात?’’

‘‘घरीच. त्यांचं मोठं घर आहे. मांडव घातला होता.’

‘‘तुझी नवीन मामी चांगली आहे का? नाव काय ठेवलंय?’’

‘‘हो, छान आहे. सुरेखामामी.’’

‘‘सुधीर-सुरेखा. सु-सु छान जोडी. बरं, मुलगी उंच आहे का? सोनं किती घातलंय अंगावर?’’

‘‘सुधीरमामापेक्षा ठेंगणी आहे. बांगडय़ा घातल्या आहेत.’’

‘‘त्याच्यापेक्षा उंच कशी आणतील? वेडा मुलगा. आणि बांगडय़ा तर घालणारच. आणखी काय घातलं सांग. दंडात काय आहे?’’

आता तिच्या प्रश्नांची उत्तरं देण्याकरिता नवऱ्या मुलीने काय काय दागिने घातले होते ते आठवू लागलो. दंडात काही नव्हतं वाटतं. मग तिच्या कमरेला काय होतं बरं? बहुतेक ते मोठय़ा मामीचं होतं. मला नीटसं काही माहीत नसताना काही पाहिलेलं व काही कल्पनेतलं यातून जमेल तशी तिला उत्तरं देत गेलो.

‘‘तिच्या कमरेला होतं.’’

‘‘होय का? मग गळयात किती सर होते?’’

‘‘एक.’’

‘‘तुम्ही मुलगे नं काहीही बघत नाही. मी तुझ्याएवढी होते ना तेव्हा लग्नाला जाऊन आल्यावर घरी आईला सगळं तपशीलवार सांगत असे. जराही न चुकता.’’

‘‘मी आता जातो.’’

‘‘थांब, मी खिडकी उघडते. बाहेर घोडे बांधून येतात त्यांच्याप्रमाणे घाई करू नको.’’

तिने उठून खिडकीची दारं किंचित उघडली तेव्हा फटीतून थोडा थोडा प्रकाश आत येऊ लागला.

‘‘मुलाच्या बरोबर वरपूजेला कोण बसलं होतं?’’

‘‘सिमंतीनी मावशीचा मुलगा चंद्रू बसला होता.’’

‘‘तू का नाही बसलास? मोठा झालास म्हणून का? जेवायला काय काय केलं होतं?’’

‘‘वरण-भात.’’

‘‘पक्वान्नं काय काय होती ते विचारलं हो.’’

‘‘जिलेबी, खीर, लाडू आणि पापडावर मामा-मामीचं नाव लिहिलं होतं.’’

तळलेल्या पापडावर लिहिलेली नावं पाहून आम्हाला खूप कौतुक वाटलं होतं. ती अक्षरं पिवळ्या रंगाने लिहिलेली असल्यामुळे पापडाच्या आतूनच उमटली आहेत असं वाटत  होतं. हे सांगताना मला नवीनच उत्साह आला होता. तिनेही असं आधी कधी ऐकलेलं नव्हतं. त्यामुळे मीच तिला हे पहिल्यांदा सांगत आहे असं वाटून माझ्या बोलण्यातला आत्मविश्वास वाढला व बोलण्यात नकळत मोकळेपणा आला होता.

‘‘कार्य मोठं दणक्यात केलेलं दिसतंय. किती लोक आले होते लग्नाला?’’

‘‘कित्तीतरी लोकं होती. तीन वाजेपर्यंत जेवणं चालली होती.’’

‘‘वऱ्हाड कुठे उतरलं होतं? बेळगावात आता थंडी असेल ना रे?’’

लग्नाच्या आदल्या रात्री एका मोठय़ा घरात वऱ्हाडाला जागा दिली होती. त्या रात्रीचं गरमागरम जेवण आजही आठवतं. तपशिलात जाऊन सांगितलेलं तिला आवडतं हे माझ्या लक्षात आलं.

‘‘अरे वा, पुढे सांग..’’ असे प्रोत्साहनपर उद्गार कानावर पडल्यावर सगळं बारकाव्यांसह सांगताना माझ्या डोळ्यासमोर ती रात्र तरळू लागली. वऱ्हाड उतरलेल्या त्या घरात माडीवर ओळीने सतरंज्या घातलेल्या होत्या. देवस्थानाच्या प्रांगणासारखा तो मोठा हॉल होता. त्याला बरेच दरवाजे होते. प्रवासामुळे शिणलेल्या बायकांची थोडी चिडचिड झाली होती. त्यामुळे एक-दोन मुलांनी छोटय़ाशा चुकीसाठी मारही खाल्ला होता. आम्हाला पोचायला थोडा उशीर झाल्याने वरपूजेच्या वेळी थोडा गोंधळ झाला. त्यामुळे काही बायका नाखूश होत्या. अखेरीस सगळं पार पडून त्या हॉलमध्ये एका बाजूला बायका-मुलं व एका बाजूला पुरुष माणसं अशी व्यवस्था होऊन झोपायला बराच उशीर झाला. ‘दिवे घालवतो, घालवतो’ असं दहा वेळा म्हणून शेवटी नागेशमामाने दिवे घालवून टाकले. आता झोप लागणार इतक्यात ‘नारायणा.. रमारमणा.. मनमोहना.. मधुसूदना’ हे मराठी नाटय़गीत पियानोच्या सुरावटीसह कानावर येऊ लागलं. आता झोपमोड होऊन पोरं अंथरुणावर उठून बसली. त्यांच्या आया शू- शू करून त्यांना दटावू लागल्या. एका पोराने उठून खिडकीतून खाली डोकावून पाहिल्यावर बाकीचेही त्याच्यामागोमाग धावत जाऊन डोकावून खाली पाहू लागले. खाली घराच्या मागील बाजूला दुसऱ्या दिवशीच्या लग्नाच्या स्वयंपाकासाठी भाजी चिरण्याचं काम चालू होतं. सात-आठ लोक विळीवर बसून खसाखसा भाजी चिरत बसले होते. दोघेजण नारळाच्या वाटय़ा गरागरा फिरवत नारळ खोवत होते. मध्यरात्री काम करणारांच्या मनोरंजनासाठी नवऱ्या मुलीचे वडील पियानो वाजवत होते व मोठय़ा आवाजात मफल सुरू झाली होती. पहिलं गाणं संपल्यावर क्षणभराच्या शांततेनंतर ‘घेई छंद मकरंद प्रिय हा मििलद’ हे दुसरं नाटय़गीत सुरू झालं. सगळी पोरं खिडकीतून खाली पाहत उभी होती. भांडखोर म्हणून प्रसिद्ध असलेला माझ्या आजोबांचा धाकटा भाऊ- म्हणजे माझे धाकटे आजोबा बोलू लागले , ‘‘थुत तिच्या! हे असं रात्रभर चालणार असं दिसतंय. अजूनपर्यंत नाटकवाल्यांची मुलगी घरात आणलेली नव्हती.’’

आता हे बोलणं आणखी किती वाढत जाणार, कोणकोणते वाक्बाण मारले जाणार, याची सगळे वाट पाहत असतानाच ते एकदम उठले व खिडकीतून खाली पाहून आपल्या दणदणीत आवाजात म्हणाले, ‘’कोण रे तो िशचा गातोय?’’ गाणं एकदम थांबलं. नंतरच्या क्षणभराच्या शांततेनंतर ते पुन्हा बोलायला लागले. ‘‘काळ-वेळ न बघता रात्री ओरडत बसलाय? आम्ही झोपायचं नाहीच का? डोकी फिरली आहेत की काय?’’

पियानो थांबवून त्यांनी मान वर करून पाहिलं. दिवे घालवलेले असल्याने त्यांना आतलं काही दिसत नव्हतं. या आकाशवाणीची आज्ञा पाळून त्यांनी पियानो पेटीत ठेवला व ते आत निघून गेले. खाली गाणं ऐकत थांबलेल्या व त्या गर्जनेला घाबरून वर खिडकीकडे पाहणाऱ्या श्रोत्यांमध्ये दुसऱ्या दिवशी सुधीरमामाशी जिचं लग्न होणार होतं ती सुरेखामामीसुद्धा होती. ती ज्या प्रकारे डोळे वटारून काळोख्या माडीच्या खिडकीकडे पाहत होती त्याचं वर्णन मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही करू शकलो नाही. दरम्यान, खिडकीच्या गजात डोकं घालून खाली पाहणाऱ्या मुलांना त्यांच्या आयांनी दरादरा ओढत अंथरुणावर खेचलं.

‘‘कसं थांबवलं की नाही गाणं!’’ ही फुशारकी त्या रात्रीच नाही, तर दुसऱ्या दिवशीसुद्धा धाकटे आजोबा सांगत सुटले होते. आमच्याबरोबर माडीवर झोपलेल्या त्यांना विरोध करण्यासाठी माझे आजोबा किंवा सुधीरमामा एक शब्दही बोलले नव्हते.

‘‘मुलीकडची बाजू अशीच असते. सगळं काही गिळून गप्प बसायचं.’’ ती असं म्हणाल्यावर मला आश्चर्यच वाटलं. मी ‘मी जातो’ची रेकॉर्ड परत सुरू केली. इतका वेळ तेथे असूनही या काळोखात ती माझ्या डोळ्यात पाहत आहे असं काही मला वाटलं नाही. जिचा चेहराही नीट दिसत नव्हता अशा समोरच्या अस्पष्ट अशा आकृतीजवळ इतका वेळ माझ्या गप्पा चालल्या होत्या. माझी गडबड वाढत चालल्यावर ती उठली व आंब्याचं एक साट माझ्या हातात देऊन म्हणाली, ‘‘घे.’’

मी ते अख्खंच्या अख्खं तोंडात कोंबलं तेव्हा ती म्हणाली, ‘‘सावकाश. घाई करू नकोस.’’

लग्नाविषयी खरं तर तिला अजून खूप चौकशा करायच्या होत्या. पण मी जायची घाई करू लागल्यामुळे तिचा नाइलाज झाला व तिने एकदाचं मला सोडलं.

पुन्हा त्या अंधाऱ्या रिकाम्या खोल्या पार करून मी दरवाजात आलो.

‘‘इतका वेळ कुठे होतास रे?’’ मधुकर गल्ल्यावरूनच ओरडला- ‘‘तुला घरातले सगळे शोधताहेत. तू कुठे गेला होतास?’’ मी काही न बोलता सोपा उतरून घराकडे पळालो.

मी समोरच्या घरी लाडू द्यायला गेल्यानंतर बारक्याकडे द्यायची पुडी तयार झाली तेव्हा आजीला माझी आठवण झाली. मला जाऊन बराच वेळ झाला तरी मी परत आलो नाही तेव्हा तिने मधुकरला हाक मारून, तो अजून आला नाही, असं सांगितलं. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. घरामागची विहीर, शेणखळी सगळीकडे पाहून झालं. एकाला आजोबांच्या दुकानातही पाठवलं. इतक्यात मी परतलो. आल्यानंतर आता इतका वेळ मी कुठे होतो ते सगळ्यांना ऐकायचं होतं.

‘‘समोरच्या घरी गेलो होतो. तिथल्या आजीबरोबर गप्पा मारत बसलो होतो.’’

‘‘कुठली आजी?’’

‘‘ती बाई.’’

‘‘ओ हो, ती होय? ती आता आजीसारखी दिसायला लागली का?’’ सगळे बोलू लागले. माझ्या आईला तर इतका आनंद झाला, की ती खालीच बसली. नीट पाहिलं असता तिच्या चेहऱ्यावर हजार प्रश्न दिसत होते, जे माझ्याभोवती फिरत होते.

‘‘कशाबद्दल काय काय बोललात?’’ भीती व कुतूहलमिश्रित आवाजात सगळ्यांनी विचारायला सुरुवात केली.

मी नाहीसा झाल्याची बातमी कळून नागेशमामा धावतच दुकानातून घरी आला. सगळी हकीकत ऐकल्यावर- ‘‘काही होत नाही. सोड. या बारकुंडय़ावर तिची नजर पडली तर याला काही होण्याऐवजी तिचेच डोळे फुटतील. उलट, झाल्या प्रकाराने याच्याच ढुंगणावर थोडं मांस दिसू लागेल..’’ असं मामा म्हणाला. हे ऐकून आईला भयंकर संताप आला. ती चिडून मामाला काहीतरी बोलली. त्यावर मामा तिला बोलू लागला.

त्यांच्या भांडणाचा आवाज टिपेला पोचला. आमचा आजोबांकडचा मुक्काम आता इतक्यात हलत नाही, हे नक्की झालं.