scorecardresearch

प्रवास न करता केलेला प्रवास!

जागतिकीकरण आणि डिजिटल संस्कृतीने जगभरातील खाद्यसंस्कृतीत आमूलाग्र बदल झाले आहेत.. होत आहेत.

खाद्यसंस्कृती ही परंपरेतून झिरपत येत असली तरी आता या गृहितकात मोठंच स्थित्यंतर येऊ घातले आहे.
सचिन कुंडलकर

जागतिकीकरण आणि डिजिटल संस्कृतीने जगभरातील खाद्यसंस्कृतीत आमूलाग्र बदल झाले आहेत.. होत आहेत. खाद्यसंस्कृती ही परंपरेतून झिरपत येत असली तरी आता या गृहितकात मोठंच स्थित्यंतर येऊ घातले आहे. देशोदेशीच्या खाद्यसंस्कृतींशी जानपहेचान असणाऱ्या आणि त्यांच्याशी सहज दोस्ती करणाऱ्या व्यक्तीची यासंबंधातली वैशिष्टय़पूर्ण निरीक्षणं..

आजच्या काळात तरुण माणसांनी स्थलांतर करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. हे स्थलांतर नुसतं छोटय़ा गावांतून महानगरांमध्ये होत नसून, ते अनेक पातळ्यांवर होत आहे. यात प्रत्यक्ष स्थलांतराच्या अनुभवाइतकाच हातातल्या मोबाइल फोनवरती इंटरनेटमुळे मिळालेली माहितीची ताकद तुमचे सांस्कृतिक स्थलांतर करते त्याचा वाटाही फार मोठा आहे.

टीव्ही बघणारी पिढी ही आता आपल्या आई-वडिलांची आहे. आपली पिढी ही पूर्णपणे टॅब आणि मोबाइलच्या आधारे माहिती आणि करमणूक दोन्ही गोष्टी साध्य करते आहे. या सगळ्या बदलांच्या पाश्र्वभूमीवर जेवण किंवा खाद्यसंस्कृतीत झालेला सगळ्यात मोठा बदल मला जाणवतो तो म्हणजे स्वयंपाकघरांचा धाक आज कमी झालेला आहे. मुलं आणि मुली दोघांच्यावर स्वयंपाकाचा जो ताण पूर्वी होता तो आता कमी झाला आहे.

एखादा मुलगा किंवा मुलगी जर स्वतंत्रपणे नव्या शहरात आपलं घर वसवणार असेल तर स्विगीसारख्या अ‍ॅपचा त्यांना सुरुवातीला खूप आधार वाटतो. स्वयंपाकघराचा आपल्या कुटुंबपद्धतीत जो एक धाक होता, आग्रह होता, तो आता कमी झाला आहे. याचं कारण म्हणजे आज प्रत्येक माणसाला आपल्या बजेटनुसार आणि आवडीनुसार घरगुती डबे, टिफिन सव्‍‌र्हिसेस, डाएट फूड सव्‍‌र्हिसेस किंवा रेस्टॉरंटच्या स्विगीसारख्या सुविधा सहज मिळू लागल्या आहेत. त्याने आपण सक्षम झालो आहोत असं मला वाटतं. आपल्या आधीची पिढी ही स्वयंपाकाचा नाही, तर स्वयंपाकघराचा बाऊ करत होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्वयंपाक तेव्हाच करावा- जेव्हा तो करायचा आपल्याला मूड येतो आणि त्यात आनंद वाटतो. एखाद्यावर स्वयंपाक करण्याचं बंधन घातलं तर त्याच्याइतकं वाईट काहीच नाही. यातून अनेक मुलामुलींची आता सुटका झाली आहे, हे माझ्या मते डिजिटल काळातील सक्षमतेचं पहिलं पाऊल आहे. नव्याने आलेल्या डिजिटल क्रांतीमुळे आपण प्रवास न करता प्रवास करू लागलो आहोत. म्हणजे मी आसामला गेलो नाही तरी इन्स्टाग्रामवरच्या व्हिडीओज्मुळे मला जर आवड असेल तर सगळ्या आसामी पदार्थाच्या रेसिपीज् मला माहिती होतात. इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर सोप्या सोप्या रेसिपीज्चे छोटे छोटे व्हिडीओ असतात. अनेक हँडल्स आणि वेबसाइट्स अशा आहेत, ज्यावर पदार्थाचे वर्णन आणि प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी करून दाखवलेली असते. त्यामुळे पदार्थ बनवण्याची मनातली भीती पळून जाते. अनेकजण या व्हिडीओज्मुळे हल्ली स्वयंपाकाकडे आकर्षति झाले आहेत. बाहेरचं न खाता ते स्वत: पदार्थ बनवून बघतात. आजच्या काळातला हा बदल जास्त सकारात्मक आहे.

आपल्या देशांतर्गत आढळणाऱ्या विविध खाद्यसंस्कृतींची ओळख आपल्याला या माध्यमातून व्हायला लागली आहे.. ज्याला मी ‘प्रवास न करता केलेला प्रवास’ असे म्हणतो. परप्रांताविषयी आपल्याला कुतूहल वाटलं तर आपण पहिलं काय स्वीकारतो? आपण त्यांची वेशभूषा नाही, तर त्यांचे खाद्यपदार्थ स्वीकारतो. आपण आपल्या मित्रांबरोबर बाहेरगावी फिरायला गेलो तर ‘इथलं काहीतरी खाऊन बघूयात,’ असं सहजपणे म्हणतो. त्यांच्यासारखा वेश करायला वेळ लागतो. त्यांची भाषा शिकणं हे तर त्याहून अवघड काम. पण खाद्यसंस्कृती ही माणसांना जोडणारा एक सोपा दुवा आहे. आणि डिजिटल काळात नानाविध खाद्यपदार्थ, त्यासाठी लागणारे घटक मिळण्यातली सहजता वाढली आहे. आपण इंटरनेटवरून काहीही मागवू शकतो. आपल्याला थाई जेवण बनवायचं असेल तर त्यासाठी ‘काफिर लाईम’ नावाचा पदार्थ लागतो. आपल्याकडे कढीपत्ता असतो तसा त्यांच्याकडे हा काफिर लाईम असतो. तो पूर्वी मला मागवायला लागायचा. आता तो मला कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडेही मिळतो. एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आता मार्केटमध्ये सहज मिळू लागले आहेत. लोकांना त्याची माहिती व्हायला लागली आहे. डिजिटल क्रांतीमुळे हे जे बदल घडले आहेत, ते चांगलेच आहेत असं मी मानतो. दुसरं म्हणजे डिजिटल क्रांतीमुळे फक्त पाश्चिमात्य पदार्थच आपल्याकडे येताहेत असं नाही. मला अशी कित्येक मुलं-मुली माहिती आहेत, जे अवघड भारतीय पदार्थही या माध्यमातून बनवायला शिकले आहेत. अनेकजण इंटरनेटवर पाहून बिर्याणी बनवायला शिकले आहेत. आमच्या लहानपणी कमलाबाई ओगलेंची पुस्तकं होती, शिवाय ‘रुचिरा’ आणि ‘अन्नपूर्णा’ आदी पाककृतींची पुस्तकं होती. माझ्या बहिणींनी तर त्यावेळी केकच्या रेसिपीज्ची एक वहीच बनवली होती. ती जुनी, देखणी, पाने मुडपलेली वही होती. त्यात केकची कुठलीही रेसिपी पाहिली की त्या उतरवून ठेवायच्या. आमच्या घरातली सगळ्यात मौल्यवान वस्तू होती ती. त्या काळात स्वयंपाकघरात शिरणं, पदार्थ कसे बनवायचे ते समजून घेणं आणि ते शिकणं खूप अवघड होतं. लहानपणी मी स्वयंपाकघरात काही नवीन पदार्थ बनवायचं म्हटलं की माझी भावंडे माझी चेष्टा करीत असत. आता स्वयंपाक शिकणे इंटरनेटमुळे तितकंसं अवघड राहिलेलं नाही.

मी कुठल्याही शहरात गेलो की आधी सामान टाकतो आणि पहिल्यांदा सुपरमार्केटमध्ये जातो. तिथल्या सगळ्या गोष्टी आणतो. आणि मग इंटरनेटवर जाऊन, त्या शहराचं नाव टाकून, तिथल्या सगळ्या रेसिपीज् पाहतो. मग मी स्वयंपाक करतो. मला बाहेर खायला अजिबात आवडत नाही. हे सहजतेने उपलब्ध होणं आहे. त्यामुळे खाद्यसंस्कृती वेगाने विस्तारते आहे.

अर्थात, खाद्यसंस्कृतीतले हे बदल समजून घ्यायचे असतील तर तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या घरापासून दूर राहिलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या घरात आहात तोवर तुम्ही हे करून बघण्याचा आनंदच घेऊ शकणार नाही. तुमचं स्वत:चं घर असलंच पाहिजे. आणि पहिलं म्हणजे तुम्हाला स्वयंपाक न करण्याचा हक्क असला पाहिजे. वरवर हा विरोधाभास वाटू शकेल; मात्र आपल्या देशात मुलामुलींना स्वयंपाक करू नका, हे पहिल्यांदा शिकवलं पाहिजे. आपल्याकडे मुलींवर कायम स्वयंपाक करण्याचं बंधन घातलं जातं. काम करणाऱ्या मुली असतील तर त्यांनी कामही करायचं आणि स्वयंपाकही करायचा, हे गृहीतच धरलं जातं. मुलाला मात्र म्हणतात, ‘तू डबा लाव.’ मला असं वाटतं की, प्रत्येक मुलाला आणि मुलीला स्वयंपाकाला नाही म्हणण्याचा हक्क असला पाहिजे. आणि मग त्यांनी ‘हो’ही म्हटलं पाहिजे. एकदा आपण आई-वडिलांच्या धाकातून सुटलो की मग आपण आपल्या चवींचा शोध घ्यायला सुरुवात करतो. आपण शाकाहारी खाण्याच्या धाकात वाढलो असू तर आपण मांसाहारी पदार्थाची चव घ्यायला सुरुवात करतो. पण त्यासाठी लवकरात लवकर मुलामुलींनी आई-वडिलांचं घर सोडलं पाहिजे, तरच खरं म्हटलं तर आपण खाद्यसंस्कृतीतील या डिजिटल विश्वाचा फायदा करून घेऊ शकतो. त्याआधारे आपण आपली स्वत:ची संस्कृती घडवतो. ती संस्कृती आई-वडिलांनी लादलेल्या बंधनातून आलेली नसते. मग आपण आपल्या आई-वडिलांकडून काय घ्यायचं, तर त्यांचं शहाणपण घ्यायचं, त्यांच्या रेसिपीज् घ्यायच्या. म्हणजे उदाहरणादाखल सांगायचं तर माझी आई आमटीचा गोडा मसाला उत्तम बनवते. माझे वडील थालीपिठाची भाजणी फार खमंग बनवतात. शेंगदाण्याची चटणी बनवणे ही त्यांची खासियत आहे. मला जर आईकडून काही शिकायचं असेल तर मी काय खावं, काय खाऊ नये, हे शिकणार नाही. ते शिकेन- जे मला बनवता येत नाही. मी माझ्या आईकडे गेलो की बाटलीभर गोडा मसाला घेऊन येतो, कारण मला तो बनवताच येत नाही. त्यामुळे आई-वडिलांकडून शहाणपण घ्यावं, पण त्यांचा धाक घेऊ नये. हे झालं तर डिजिटल संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीचा हा जो मेळ साधला गेला आहे, त्यातून सुंदर काही निर्माण होईल, हे मी खात्रीने सांगतो.

माझी लहान शहरातील एक मत्रीण आहे. ती जेव्हा मुंबईत पहिल्यांदा आली तेव्हा तिला चायनीज पदार्थ चॉपस्टिक्सनी खाता येत नव्हते. तिला ते कुणी शिकवत नव्हते. पण सगळे तिची चेष्टा मात्र करायचे. मात्र, ती घाबरली नाही. ती इंटरनेटवर बघून ते शिकली आणि आज ती चायनीज रेस्टॉरंटमध्ये जाऊन सराईतपणे चॉपस्टिक्सने खाते. इंटरनेट नसतं तर ती हे शिकू शकली नसती. माझे अनेक पुरुष मित्र सहजपणे व्हिडीओ बघून पदार्थ करायला शिकले आहेत. ही सहजता इंटरनेटने प्राप्त करून दिली आहे. आपल्या खाद्यसंस्कृतीत इंटरनेटमुळे पाश्चिमात्य पदार्थाचा प्रभाव वाढतो आहे, पौर्वात्य पदार्थाचा नाही, असा दावा केला जातो. मुळात खाण्याच्या बाबतीत पौर्वात्य-पाश्चिमात्य असा भेद या पिढीत तरी उरलेला नाही. हा आपल्या आधीच्या पिढीचा प्रश्न होता. माझे अनेक ब्रिटिश मित्र आहेत, जे उत्तम इडली बनवतात. इडली बनवणं खूप सोपं आहे. भारतात येऊन ते इडलीपात्र घेऊन गेले. काही अमेरिकन मित्र आहेत, ज्यांनी अप्पे बनवायचं भांडं तिथं नेलं. तुम्हाला स्वयंपाक करणं जर आवडत असेल तर पौर्वात्य-पाश्चिमात्य असा फरक तुमच्या मनात उरतच नाही. आज अनेक लहान मुलं व्हिडीओ बघून केक बनवायला शिकली आहेत. नाहीतर आपल्या घरात नेहमी धाकाचा आणि भीतीचाच पाढा असतो. ‘‘तुला त्यातले काय कळणार?, हे सांडू नकोस, याला हात लावू नकोस, हे मुलींचे काम आहे, तुझे नाही; हे गरम आहे, त्याला हात नको लावू नकोस, असं नको करूस..’’ असे सल्ले देऊन आपल्याकडे मुलांना धाडस करूच दिलं जात नाही. मात्र, डिजिटल तंत्रज्ञानामुळे आपल्या खाद्यसंस्कृतीत अनेक बदल होताहेत. आणि त्याबद्दल मी अतिशय सकारात्मक आहे.

आता आपल्याकडे देशांतर्गतही ठरावीक प्रांतांतील पदार्थच लोकप्रिय झालेले दिसतात. मात्र, त्यासाठी डिजिटलायझेशन नाही, तर भारतीय मानसिकता कारणीभूत आहे. आपण जितक्या अभिमानाने, नेटाने आपले प्रांतीय पदार्थ बनवून ते जगासमोर ठेवू, तितके ते लोकप्रिय होतील. माझ्याकडे कुठलाही युरोपीय माणूस आला आणि मी जर कांदाभजी, पिठलं-भाकरी बनवून त्याला खायला दिलं तर त्याला ते आवडणारच आहे. पण आपण हा विचारच करत नाही, की आपलं मराठी जेवणही इतकं सुंदर असेल. मी नेहमी मराठी जेवण बनवतो. मला जर माझ्या जेवणाविषयी न्यूनगंड वाटत नसेल तर मी ते बनवायला हवं. माझं जेवण लोकांपर्यंत पोहोचवणं हे माझ्या हातात आहे. चिनी, इटालियन लोकांनी त्यांचं जेवण आपल्याकडे आणण्यासाठी मेहनत केली आहे. ते आपोआप आलेलं नाही आपल्याकडे. त्यांनी रेस्टॉरंट्स उघडली, त्यांनी त्यांचे मेनू प्रसिद्ध केले. आणि मुळात यासाठी त्यांनी प्रवास केला. आपण एकतर प्रवासच करत नाही. आपली अशी अपेक्षा आहे की, आपण घराबाहेरही न पडता आपलं सगळं जगप्रसिद्ध व्हावं. जे देश श्रीमंत असतात आणि मिलिटरीच्या दृष्टीने सबळ असतात, त्यांची संस्कृती नेहमी जगभर पोचते. तुम्ही तुमची भाकरी लोकप्रिय करा. तुम्ही कांदाभजी, पिठलं-भाकरी किती सुंदर दिसते, ती खायलाही कशी चविष्ट लागते, हे सांगणारे व्हिडीओ बनवले आहेत का? इन्स्टाग्रामवर तसा एकही व्हिडीओ नाही. ‘गुलाबजाम’ चित्रपटामध्ये तुम्ही जर शेवटचे माँटाज् पाहिलेत तर त्यात आजच्या काळाच्या पद्धतीप्रमाणे पदार्थ बनवून ते लोकांसमोर ठेवले आहेत. भजीचं किंवा गुलाबजामचं प्रमाणही त्यात एका माणसापुरतंच आहे. खाद्यसंस्कृतीचा प्रसार करताना काही गोष्टींचं भान आपल्याला ठेवावं लागतं. एक म्हणजे आपल्याकडे रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर सब्जी-रोटी मागवली तर ती अगदी कढई भरून दोन-तीन किलो अशी बटबटीत रूपात समोर आणली जाते. तुम्ही एका माणसाचा विचार करणार आहात की नाही? परदेशात तीन माणसं जर जेवायला गेली तर तीन प्लेट्स मागवाव्या लागतात. कारण तिथे ‘वन प्लेट मील’ मिळतं. त्यामुळे उपलब्धता, प्रमाण आणि सौंदर्य याचा विचार ते करतात. तर आपण नेहमी सोय, कुटुंब आणि दहा लोकांचं पोट भरणं याचा सतत विचार करतो. त्यामुळे एका अर्थाने आपला ढिसाळपणा आणि गलथानपणा आपल्या पदार्थाच्या प्रसाराच्या आड येतो. पदार्थाची सहज उपलब्धता, त्याचं पटकन् बनणं, त्याचं डिझाइन आणि त्याकरताची व्यावसायिक कुशलता यामुळे त्यांचे पदार्थ जास्त लोकप्रिय झाले आहेत. हे सगळं कशातून निर्माण होतं? तर आपल्या जगण्याविषयी असलेल्या प्रेमातून ते होतं.

आधुनिकतेकडे आणि व्यक्तिस्वातंत्र्याकडे आपण खूप तुच्छतेने पाहतो. शहरात स्वतंत्रपणे राहून आपापली कामं करणाऱ्या मुला-मुलींना आपण अजिबात पािठबा देत नाही. आपण त्यांच्या पाठीशी तेव्हाच उभे राहू, जेव्हा ते कुटुंबाचे नियम पाळतील, लवकर लग्न करतील, मुलं जन्माला घालतील. असे त्यांनी करून आपल्यासारखे निरस आणि कंटाळवाणे आयुष्य जगले की त्यांना आपण म्हणतो, की आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तुला काय करायचे ते कर. पण तोपर्यंत त्या मुलात किंवा मुलीत जगायची ऊर्जा संपून ते पोरांचे लेंढार वाढवत बसलेले असतात. ते काय नवीन करणार? तुम्ही आपल्या सतरा-अठरा वर्षांच्या मुलीला म्हणू शकत नाही का, की तू तुला हवं ते कर, आणि काही गरज लागली तर आम्हाला सांग. तू आमच्यासारखे जगायची सक्ती करून घेऊ नकोस. तू तुला हवे ते खा-पी, हवे ते काम कर, आवडेल त्या माणसाच्या सोबतीने राहा. आपण असे आपल्या पुढील पिढीला कधीच म्हणत नाही. त्यामुळे आपली जगण्याची पद्धत आणि पर्यायाने खाद्यसंस्कृती मर्यादित आणि झापडबंद होत जाते. आणि आपण सगळे सतत चक्का आणण्यासाठी रांगेत उभे राहणारा समाज बनतो.

दुसऱ्याची खाद्यसंस्कृती काय आहे हे मी समजून घेतलं पाहिजे. आपला डबा आणि शेजारच्याचा डबा यांतला फरक आपल्याला कळला पाहिजे. आपण असं कधी कुणाला मोकळेपणाने म्हणत नाही, की ‘मला तुझा डबा चाखायचा आहे.’ माझा कोणी आगरी मित्र असेल तर मला पहिलं त्याचं जेवण जेवायचं असतं. कारण मला त्यांचे मसाले खूप आवडतात. आपल्याला जमणारच नाही तसे मसाले बनवायला. मालवणी जेवणाची चव ही त्या वाटलेल्या मसाल्यांमध्ये आहे. तुमच्यात ही उत्सुकता असली पाहिजे, की मला या विविध चवी चाखायच्या आहेत. तरुण पिढीमध्ये हा जातिभेद उरलेला नाही. लोकांना हे लक्षात येत नाहीये की दिल्ली, मुंबई, बंगळुरुसारख्या शहरांमध्ये काम करत असताना या जातीधर्माच्या, व्यक्तिगत आवडीनिवडींच्या िभती एका क्षणी गळून पडल्या आहेत. माझे अनेक शाकाहारी मित्र घरी न सांगता बाहेर मांसाहार करतात. मला त्यांचं वागणं योग्य वाटतं, कारण ते आई-वडिलांना न दुखावता आपला आनंद घेताहेत.

या सगळ्याबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे, आणि तीही इंटरनेटमुळेच. ते म्हणजे लोक आपल्या आरोग्याबद्दल अधिक सजग झाले आहेत. हेल्दी फूडविषयीचा प्रचार सातत्याने सुरू आहे. तुम्हाला बाकी काही माहिती नसलं तरी तुम्हाला ऋजुता दिवेकरचं नाव माहिती असतं. तुम्हाला काब्र्ज माहिती असतात, पांढरी साखर आरोग्याला धोकादायक असते हे तुम्हाला माहिती झालं आहे. हे सगळं कुठून येतं, तर ते फेसबुक, इन्स्टाग्रामवरून आपल्यापर्यंत पोहोचत राहतं. तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी काय खायचं, काय नाही, हे इंटरनेटवरून समजतं. त्याचा प्रत्यक्ष अवलंब करायचा की नाही, हे तुमच्यावर आहे. मात्र, त्याबद्दलची सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते, हा डिजिटल क्रांतीचा खूप मोठा फायदा आहे.

डिजिटल क्रांतीने खाद्यसंस्कृतीला दिलेली आणखी एक मोलाची गोष्ट म्हणजे खाण्यातून आपला परस्परांशी संवाद वाढला. काही माणसांनी फूड ब्लॉग सुरू केले. आजपर्यंत घरात वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या स्त्रियांना कधी ओळख मिळाली नव्हती. आज त्यांचे त्यांच्या स्वयंपाकघरातले व्हिडीओ, त्यांच्या पाककृती इंटरनेटवर प्रकाशित होतात. त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. अत्यंत साध्या बायका आहेत त्या. अनेकजणी तर कॅमेऱ्याकडे पाहायलाही घाबरत असतात. पण आज त्यांचं शहाणपण हे या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचलं आहे. घरी कदाचित त्यांची कोणी दखलही घेतली नसती. घरात त्यांना कुणी विचारतही नसेल. पण इथे तसं नाही. त्यांचे टीव्ही चॅनेल्स असल्यासारखे हे त्यांचे यूटय़ूब चॅनेल्स आहेत. मला वाटतं, या माध्यमामुळे त्यांना खरी प्रतिष्ठा मिळाली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वयंपाक करण्याबद्दल पुरुषांना जी लाज वाटत होती ती निघून गेली आहे. आता शेफ आपल्याला सगळीकडे रेसिपी बनवताना दिसतात. पूर्वी आपण हॉटेलमध्ये जायचो तेव्हा तिथेही पुरुषच सगळं जेवण करत होते. आपल्याला मात्र ते कळायचं नाही. हे डिजिटल क्रांतीमुळे खाद्यसंस्कृतीला जोडून आलेले नवे सामाजिक, सांस्कृतिक बदल आहेत. ज्यामुळे िलगभेद गळून पडताहेत. जातीच्या, धर्माच्या िभती गळून पडताहेत. आपण एकमेकांना स्वीकारायला लागलो आहोत. माझ्या आसामी मित्रासारखे कपडे मी घालू शकत नाही. त्याच्यासारखी भाषाही बोलू शकत नाही. पण त्याला न सांगता त्याच्या पद्धतीचे पदार्थ बनवून त्याला आश्चर्याचा धक्का मी देऊ शकतो. किंवा गुजरात आणि महाराष्ट्र हे शेजारी शेजारी आहेत, पण गुजरातमध्ये चार ते पाच प्रकारच्या खाद्यसंस्कृती आहेत हेच आपल्याला माहिती नसतं. काठियावाडी वेगळी आहे, सुरतची वेगळी, अहमदाबादची वेगळी. हे सगळं आता आपल्याला इंटरनेटमुळे कळायला लागलं आहे.

डिजिटल क्रांतीचा परदेशातील खाद्यसंस्कृतीवरही खूप चांगला परिणाम झाला आहे. परदेशात मी १९९९ साली पहिल्यांदा गेलो तेव्हा मला तिथे स्वयंपाकघराचा ऱ्हास झालेला दिसत होता. त्यालाही कारणं होती. एक म्हणजे प्रचंड स्पर्धा आणि कामाचे ताणतणाव. तिथे रेस्टॉरंटमध्ये घरच्यासारखं आणि त्याच किमतीला मिळणारं जेवण हेही एक कारण आहे. परदेशात खाद्यपदार्थाच्या बाबतीतले नियम खूप कडक आहेत. मी रस्त्यावरच्या फूड जॉइंट्सबद्दल बोलत नाहीए. मॅकडोनल्ड किंवा केएफसी हे कुठल्या एका देशाचे नाहीत. फास्ट फूडचा प्रसार करणारे हे स्वत:च एक देश आहेत. त्यांच्याविषयी न बोललेलं बरं. फ्रान्समधली फ्रेंच रेस्टॉरंटस् किंवा हंगेरीतील हंगेरियन रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या पदार्थाचा दर्जा आणि त्यांची किंमत दोन्ही घरच्या जेवणासारखंच असल्याने त्यांनी घरी स्वयंपाक बनवणं सोडून दिलं. त्यावेळी माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की आपला बराचसा वेळ हा स्वयंपाकघर तयार करण्यात आणि मग तिथे जेवण बनवण्यात जातो. त्यांचं दुसरं वैशिष्टय़ म्हणजे तिथे घरी आलेल्या माणसाला खूप सारं खायला घालून त्याला झोपाळून टाकणं ही संस्कृतीच नाहीए. त्यांच्याकडे आधी पाहुण्याला मान दिला जातो, हे ठरवण्याचा- की तो जेवायला येणार आहे की नुसतंच भेटायला. सणांच्या वेळी असा विचार होत नाही, कारण सण सगळीकडेच एकत्र साजरे केले जातात. त्यामुळे आपल्याला त्यांच्याकडे गेल्यावर बोलायला, एखाद्या गोष्टीवर चर्चा करायला खूप वेळ असतो. ते गोष्टी खूप सोप्या करतात, हे मला समजलं. नाहीतर आपल्याकडे नेमके पाहुणे आले की आपण स्वयंपाकघरात पळतो आणि एक विचित्र अवघडलेपण निर्माण होतं. किंवा सर्वसामान्य घरातील बायकांना आलेल्या पाहुण्यांशी जोडूनच घेता येत नाही. ती स्वयंपाकघरातच अडकते. परदेशात आणखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे अठराव्या वर्षीपासून आपलं प्रत्येक बिल आपणच भरतो. अगदी कुटुंबासोबत गेलो, तरीही. त्यामुळे आपण जो प्रत्येक घास घेतो आहे, तो आपणच कमावलेला असतो. या भावनेमुळे तुमच्या मूल्यव्यवस्थेत निश्चितच फरक पडतो, ही खूप चांगली गोष्ट मला तिथे जाणवली.

मला स्वत:ला घरी आलेल्या माणसाला खायला घातल्याशिवाय पाठवायला आवडत नाही. पण तरीही तिथल्या लोकांचा यामागचा विचार मला पटतो. तिथे अनेकदा नवरा-बायको दुपारी ऑफिसच्या कँटीनमध्ये जेवतात आणि रात्री रेस्टॉरंटमध्ये एकत्र जेवतात. बाहेर खाण्याने त्यांच्या आíथक व्यवस्थेवर ताण पडत नाही किंवा तब्येतीवरही ताण येत नाही. अनेकदा रविवारी ते घरी आनंदाने स्वयंपाक करतात. त्यांनी तो सुटसुटीतपणा ठेवला आहे. त्यामुळे त्यांची स्वयंपाकघरंही आटोपशीर आहेत. तिथे चाळिशीनंतर अनेक जण लग्न करतात, कारण तोवर एकतर त्यांची करिअरची ध्येयं पूर्ण झालेली असतात. त्यामुळे मग मोठं घर घेणं, स्वयंपाकघर या गोष्टी होतात. त्यांच्या मते, ज्यांच्याकडे रिकामा वेळ आहे तो श्रीमंत. त्यांच्याकडे श्रीमंती ही पशात मोजली जात नाही. चाळिशीला येईपर्यंत ते रिकामा वेळ कमावतात. चाळिशीनंतर माझ्याकडे इतका रिकामा वेळ असला पाहिजे, या उद्देशाने ते १८ वर्षांपासून ४० वर्षांपर्यंत काम करतात. चाळिशीनंतर ते फिरतात, पुस्तकं वाचतात, नवीन गोष्टी शिकतात. त्यावेळी ते रेसिपीज् शिकतात आणि स्वयंपाक करायला लागतात. म्हणजे तिथे आपल्यापेक्षा एकदम उलट आहे. आपल्याकडे आपण तीस वर्षांचे होईपर्यंत पोळ्या करायलाही शिकवत नाहीत. काहींना साधा चहाही करता येत नाही. आणि आपल्याकडचं बाहेरचं खाणं हे परवडणारंही नाही आणि तब्येतीला मानवणारंही नसतं.

खाण्याच्या बाबतीत विचार केला तर ज्यामुळे मर्यादा येतील अशी कुठलीच गोष्ट मला आवडत नाही. मी जिथे जाईन तिथे मला जे वाढलं जाईल ते मी खातो. खाण्याच्या बाबतीत मला जात मान्य नाही, फक्त चव मान्य आहे. अनोळखी संस्कृतीबद्दल मला कायम आकर्षण वाटतं. त्यांची ओळख करून घ्यायची असेल तर त्यांचे पदार्थ आधी खाल्ले पाहिजेत. अनोळखी खाद्यसंस्कृतीपकी मला तमिळ जेवणाची चव खूप आवडते.  फ्रेंच पदार्थाची चवही आवडते. जेवण बनवण्याच्या प्रक्रियेवर फ्रेंच लोक जसं प्रेम करतात तसं कोणीच करत नाही. तुम्ही जर रविवारी यूरोपमधील शहरातून फिरत असाल तर तिथे रविवारी शेतकरी बाजार भरतो. त्या दिवशी कोणी सुपर मार्केटला जात नाही. शेतकरी आपापल्या ट्रकमधून मासे, कोंबडय़ा, भाज्या सगळं घेऊन येतात. रस्त्यांवर त्यांचे स्टॉल लागतात. तिथले लोक मग आठवडाभराची ताजी वाइन, भाज्या सगळं खरेदी करून फ्रिजमध्ये ठेवतात आणि हळूहळू त्यांचा आस्वाद घेतात. फ्रेंच जेवण म्हणजे जन्नत असते. जगात सर्वोत्तम जेवण हे फ्रेंच जेवण आहे, हे मी ठामपणे सांगू शकतो.

आपली आणखी एक अडचण अशी की, दुसऱ्यांची खाद्यसंस्कृती आपण आहे तशी स्वीकारत नाही. ती आपली सवयच नाही. आपण चायनीज्, इटालियन पदार्थही आपल्या पद्धतीने बनवून खातो. मला एका मुंबईच्या गुजराती उपनगरातील सुपर मार्केटमध्ये एगलेस मेयोनीज दिसलं. तुम्ही अंडी खात नाही ना? मग नका खाऊ मेयोनीज. अंडय़ाशिवाय मेयोनीज नाही बनू शकत. तुम्ही अंडय़ाशिवाय ऑम्लेट खाऊ शकता का? आपण खरोखर चायनीज पदार्थ खाल्ले तर त्यात ‘आणखी थोडा शेजवान मसाला घाल रे. थोडा कांदा अजून घाल रे..’ असं म्हणू.

आजच्या पिढीत चुकीची फास्ट फूड संस्कृती रुजण्यास पालकच कारणीभूत आहेत. फास्ट फूड हे पालकांचे वाईट संस्कार आहेत. अनेकदा मुलं गप्प बसत नाहीत म्हणून त्यांच्या हातात टॅब कोंबला जातो आणि फ्रेंच फ्राइज समोर ठेवले जातात. पालक सुट्टीत मुलांना मॅकडोनल्डमध्ये खायला का घेऊन जातात, असा प्रश्न मला नेहमी पडतो. बहुधा पालकांना हे खाणं किती भयंकर आहे, हे माहीतच नसावं. आपल्या मुलांच्या तब्येतीला हानी पोहोचवणारं खाणं तुम्ही देऊच कसं शकता? बरं, आपल्या वेळी जेव्हा आपल्याला चटपटीत खायची इच्छा व्हायची तेव्हा पर्याय होतेच. मेदूवडा किंवा आपल्या समोर गाडीवर बनलेला वडापाव, भजीपाव हे ते पर्याय होते. आपण तसे पर्याय आता शोधायला हवेत. फास्ट फूडही दोन प्रकारचे आहेत. एक- जे आपल्याला बाहेर मिळताहेत ते आणि दुसरे- आपण घरी चटकन् बनवतो ते. फोडणीची पोळी हे सगळ्यात चांगलं फास्ट फूड आहे. थालीपीठ असेल तर त्यात आपण वेगवेगळ्या भाज्या, उरलेली आमटीही घालून धिरडीसारखा प्रकार करू शकतो. मुळात घरच्या घरी सहज, चटकन करता येतील असे हेल्दी, पण चवीला तितकेच टेस्टी, कुरकुरीत असे पदार्थ प्रत्येक संस्कृतीत असतात. इटलीमध्ये पिझ्झा त्याच प्रकारचा आहे. मात्र, तिथला पिझ्झा खूप हेल्दी असतो. त्याचा बेस गव्हाचा आणि पातळ पोळीसारखा असतो. त्यावर खूप साऱ्या प्रोटीनयुक्त भाज्या असतात. तिथे चीजही ताजं ताजं डेअरीतून आणलेलं असतं. आपण ज्याला फास्ट फूड म्हणतो ते त्यांचं एक वेळचं जेवण असतं. ते त्यांच्याकडे तितक्याच हेल्दी पद्धतीने बनवलेलं असतं.

जसं फास्ट फूड आहे, तसंच प्रत्येक देशात- अगदी आपल्याकडेही ‘स्लो फूड’ नावाची एक पारंपरिक पद्धत आहे. फास्ट फूडच्या अगदी विरुद्ध असलेली ही पद्धत म्हणजे घरगुती जेवण. ते बनवायला बराच वेळ लागतो. जसं परदेशात चीज बनवण्याची एक प्रक्रिया असते. आपलं चीज म्हणजे पनीर, चक्का. ते बनवायला विशिष्ट वेळ द्यावा लागतो. अनेक देशांमध्ये आता लहान मुलं घरात असतील तर जाणीवपूर्वक स्लो फूडचा प्रसार केला जातो आहे. लहान मुलांना सांगितलं जातं की, आज जे तुला जेवण हवंय, ते बनवायला मी काल रात्रीपासून सुरुवात केली आहे. हे ते मुलांना मुद्दाम दाखवून देतात. ही स्लो फूडची परंपरा पाश्चात्त्य देशांत वेगाने पसरतेय. ते त्याचं अवडंबर माजवत नाहीत. मात्र, ते जाणीवपूर्वक त्यावर काम करताहेत. त्यामुळे चीज ताजं पाहिजे, भाज्या ताज्या पाहिजेत. मांसही फ्रोझन नको, खाटिकाकडून ते ताजं आणलं पाहिजे. ही प्रत्येक गोष्ट ते मुलांना दाखवतात, प्रत्येक ठिकाणी त्यांना घेऊन जातात आणि हळूहळू त्यांच्यावर हे ‘स्लो फूड’चे संस्कार बिंबवले जाताहेत. ‘स्लो फूड’ हा जगभरात आता ट्रेंड होतो आहे. आणि डिजिटल युगातील खाद्यसंस्कृतीत बदलाची ही मोठीच नांदी ठरणार आहे.

शब्दांकन : रेश्मा राईकवार

मराठीतील सर्व दिवाळी अंक २०१८ ( Ls-2018-diwali ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: World food culture

ताज्या बातम्या