scorecardresearch

कोणास झेपेना त्याची चंद्रधून चांदण्यात ऊन.. पोळणारे।।

माझी आणि ग्रेस यांची भेट झाली त्यावेळी त्यांची दोन ते तीन छोटेखानी पुस्तकं प्रकाशित झाली होती. ‘संध्याकाळच्या कविता’ म्हणजे ‘देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी..’ या कवितासंग्रहाने दु:खाच्या अभिव्यक्तीचे एक नवेच परिमाण उलगडले गेले.

माझी आणि ग्रेस यांची भेट झाली त्यावेळी त्यांची दोन ते तीन छोटेखानी पुस्तकं प्रकाशित झाली होती. ‘संध्याकाळच्या कविता’ म्हणजे ‘देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी..’ या कवितासंग्रहाने दु:खाच्या अभिव्यक्तीचे एक नवेच परिमाण उलगडले गेले. शब्दार्थाना ओलांडून केवळ ती हुरहुर, कातरता, जिवाला चटका लावणारी व्याकुळता; ही आर्त स्वरांप्रमाणे काळजाला स्पर्श करू लागली.
पण केवळ शब्दार्थाच्या अंगाने प्रवास करणाऱ्या आस्वादकांना ते भावले, तरी ते फार धूसर व दुबरेध वाटले. कोणतीही नवी गोष्ट आली की आपलं संस्कारबद्ध मन त्याला निरखून जाणून घ्यायला तयार होत नाही. माझे विद्यार्थीही संमोहित होऊन आरडाओरडा करून म्हणू लागले, ‘मॅडम, या कवितांवरचं रसग्रहण लिहिता येतं का? परीक्षेत आम्ही काय लिहायचं?’ त्या वेळी मी त्यांना म्हटलं होतं की, ‘तुम्ही प्रत्यक्ष कवीला पत्र लिहून विचारा.’
यानंतर आम्हा बहिणींना नागपूरला जाण्याचा योग आला. तेथे आम्ही भैयासाहेब घटाटे यांच्याकडे राहिलो होतो. गाव म्हटलं की भोवतालची प्रेक्षणीय स्थळं असतात, तशाच अवलिया व्यक्तीही!  नागपूर ‘तरुण भारत’चे त्या वेळचे संपादक आम्हाला ग्रेस यांच्या घरी घेऊन गेले. ‘छोटंसं अंगण, त्यात औदुंबराचं झाड, झाडाला मोठी ढोली..’ सारं काही मी बारकाईनं पाहात होते.
एका खुर्चीवर ग्रेस हाताची घडी, तोंडावर बोट व भर दिवसा घरात गॉगल लावून (ते मला फार विचित्र वाटलं होतं.) बसले होते. म्हणजे काय, बाहेरच्या जगताकडे पाहायचंच नाही? इतकं कोण स्वत:ला सतत अंतरात गाडून घेतं? त्या वेळी मी नुकतेच मुंबईत जे. कृष्णमूर्ती यांचं प्रवचन ऐकलं होतं-  ‘विचार अव्याहतपणे प्रतिमा निर्माण करीत असतो. त्यामुळे आपल्याला वास्तव कधी पाहाताच येत नाही.’ हे ऐकल्यानंतर माझं विचारांचं वादळ  खूप शांत झालं होतं. त्या काळी खरोखरीच ग्रेस फार कमी बोलत असत. आणि त्यांच्या कवितेच्या संदर्भात व स्पष्टीकरणार्थ तर मौनच!. ‘कवितेचा दिवस’ हा माझा संग्रह तर त्यांच्या मागेच होता. अर्थात, तेथे खूपच छायाचित्रं होती. एखाद दुसरी नव्हे, ढिगांनी. ती  विचित्रच भासली होती. पुन्हा विचारप्रक्रिया सुरू झाली.. वामनरावांनी हळूच संवाद पेरले. पण तिथे काहीच जुळेना, रंगेना. एखाद्या वास्तूत इतकी विषण्णता भरून असते, जणू काही त्यांच्या त्या ‘संध्याकाळच्या कविता’ कानाकोपऱ्यातून स्पंदत होत्या. ‘तुटलेली ओळख विणता प्राणांची फुटते वाणी..’ हो, पण तशी वाणी फुटायला ओळखही लागते म्हणा.. काही माणसं संभाषणात कमजोर असतात. एक अवघडलेपण फार वेळ नको वाटतं.
यापूर्वी मी अनेक कलावंत पाहिले होते. त्यात किशोरीताई ही माझी अतिशय जवळची मैत्रीण! तिचे कासाविस करून टाकणारे रियाझ मी ऐकलेले आहेत. शब्दांपेक्षा स्वर फार प्रसरणशील असतो का? विचारांचं विश्व गमतीचं असतं.. ग्रेसनी ‘चर्चबेल’मध्ये किशोरीताईंवर लिहिलेला लेख तिला मुळीच समजला नव्हता. ‘वाट्टेल ते अनवट राग आम्ही सुरेल करतो. जाऊ देत, संवाद होत नसला तरी नकारात्मक मानसभूमी मात्र निर्माण करू नये असे जाणवले.’
निघताना मात्र म्हणाले, ‘तुमच्या कविता मी वाचल्याहेत. त्याबद्दल काही विचारायचय. पुन्हा या.’  ‘पुन्हा या’, म्हणण्यात आग्रह होता. त्या घरातून बाहेर पडल्यावर सगळ्यांनी सुस्कारा सोडला. ‘त्याच्या नदीच्या पात्रात भय कालियाचे मोठे..’ ग्रेस हे कशाने तरी विलक्षण झपाटलेले आहेत व त्यांची उदासीनता तर परिसर काळवंडून टाकणारी आहे. आपण जो विचार किंवा चिंतन करतो, तो आपल्या भोवती व घरातही उतरतो.
नागपूरहून मिरजला परत आल्यानंतर ग्रेस यांची काही फार सुंदर पत्रे आली. त्यांची शब्दकळा अत्यंत तरल असल्याने चांदण्यात वाऱ्याने झाडांच्या आकृती सतत बदलाव्यात त्याप्रमाणे त्यांच्या शब्दछटा गूढगंभीर करत जातात. एका पत्रात त्यांनी मला विचारले होते, ‘मी एक उद्ध्वस्त धर्मशाळा’ अजूनही वैराण करतोय. मग तुमच्याकडून त्याच्यासाठी काय येईल?’ सतत अशा गूढ लिपीतून बोलणारी माणसं ही खरीच तंद्रावस्थेत असतात व स्वत:चा जीव पिंजून पिंजून  स्वत:ला का विषण्ण आणि दु:खी करून घेतात, असं मला वाटलं.
आता वाटतंय, त्या दु:खाच्या महाकवीची ही पत्रे त्यांच्या आजच्या असंख्य चाहत्यांना वेगळी वाटली असती, आणि आवडलीही असती. मी हे का म्हणते, की आमच्या भेटीला तीस वर्षे होऊन गेलीयेत. ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’ हे पुस्तक त्यांनी मला भेट म्हणून दिले. त्यावर त्यांनी लिहिले होते, ‘कोणीही या कविता गटारगंगेत  फेकून देऊ शकेल. पण या प्रदेशाची सहल मात्र कोणालाही करता येणार नाही.’ क्षणभर वाटलं, ‘ही व्यक्ती इतकी बेचैन, अस्वस्थ व विषण्ण का आहे?’ हा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर ते म्हणाले, ‘अहो, जन्माच्या आधीपासून ज्वालामुखी पेटलाय. व ज्या वेळी भूकंप होतो, ते उष्ण चटके वपर्यंत येतात. त्याच वेळी माझी कविता अवतरते.’
पुन्हा एकदा मी व्याख्यानांसाठी नागपूरला गेले होते. तेव्हा ग्रेस व त्यांच्या मुलीने मला आवर्जून घरी बोलावलं. हे घर कुणीतरी एकटेपणात फेकून दिलंय, असं मला तीव्रतेनं वाटायचं. ग्रेसने एकदा मला विनंती केली, की माझ्या भौतिक जगातील खाणाखुणा तुम्हाला दाखवायला आवडतील. ग्रेस यांचं आत्मचरित्र कधीच सुसंगतपणे हाती येत नाही. त्यामुळेच कवितेच्या अगदी जवळचा असा ललितबंध त्यांनी स्वीकारला. त्यातूनच त्यातील नावं-गावं त्यांच्या सृजनविश्वातून येतात. त्याला प्रत्यक्षाचा, वास्तवाचा आधार लागत नाही. म्हणूनच तत्परतेने या आमंत्रणाचा स्वीकार केला.
 त्याला नाही सखा। आणि रे सलोखा
जन्माचा इलाखा। दुभंगला ।।१।।
आईच्या गर्भात। झालेला उत्पात
कोण वाताहत। थांबवील? ।।२।।
आईच्या पोटासी। फेकिली चादर
तेव्हाचा फकीर। मित्र झाला ।।३।।
नाही सहोदर। सारेच सावत्र
म्हणोनी सौमित्र। म्हणविले ।।४।।
ग्रेस आम्हाला ताजुद्दिन बाबांच्या दग्र्यात घेऊन गेले. त्या घुमटीत त्यांच्या कवितेसारखेच ऊद-धुपाचे दर्वळ पसरले होते. ग्रेसची आई गर्भार असताना अत्यंत द्विधा मन:स्थितीत त्या दग्र्यापाशी आली होती. तेथील मौलवीनं शुभसंकेताची हिरवी चादर तिच्या पोटावर फेकली, म्हणून तो गर्भ वाढवायला ती धजावली असणार. ग्रेस मला म्हणाले, ‘माझ्याकडे पाहून माझ्या आईचं रूप ठरवू नका. ती फार देखणी होती. अस्वस्थ, सदैव बेचैन. देवळात, मठात, मशिदीत भिरभिरत राहायची.’ माझ्या मनात आलं, त्यांच्या आईकडूनच हे सारं त्यांच्यात तंतोतंत उतरलं होतं. ग्रेस ज्या शब्दाला स्पर्श करतात, तो शब्द अतिशय सुंदर होऊन येतो. त्यांच्या आईचं नाव ते ‘सुमित्रा’ सांगायचे. या प्रतिमेभोवती त्यांच्या निर्मितीच्या क्षेत्रातले प्रतिमाविश्व विलक्षण समृद्ध व्हायचे. आईचा ओझरता उल्लेख ‘चर्चबेल’ मध्ये आला आहे.
डॉ. जयंत परांजपे म्हणतात, ‘आईविषयी वाटणारे आकर्षण, तिचा द्वेष, लैंगिक जाणिवा व्यक्त करणाऱ्या प्रतिमांशी असलेला संपर्क, सावत्र पित्याविषयीच्या शत्रुत्वभावना, हे घटक मातृविषयक गंडाकडे अंगुलीनिर्देश करतात. यातूनच दुबरेधता निर्माण होते. या गंडाचा कवीच्या भावजीवनाशी व नीतीविषयक कल्पनांशी इतका जवळचा संबंध आहे, की कवी स्वत:च्या नकळत आपल्या हेतूंना स्वप्नसदृश दुबरेधतेच्या धुक्यात वितळवून टाकतो.’ त्यांची आईवरची गाजलेली जी कविता आहे, ती उत्कट स्वरांमुळे अधिक व्याकूळ करणारी आहे. त्यात जो ‘एकटा कंदील’ आहे त्यानेच ग्रेसच्या पायाला दिलेला चटका तिने दाखवला. ग्रेसच्या या सगळ्याच आठवणी विदीर्ण करणाऱ्या व आपल्याला दिङ्मूढ व आश्चर्यचकित करणाऱ्याही आहेत. ‘वैशाखात मी जन्माला आलो. भर मध्यान्हात. माझ्या गाठीशी आईच्या आठवणी फार नाहीत. अगदी थोडय़ा आहेत. मी लहान असताना ती गेली. माझी आई मला फारशी आवडत होती की नाही, ते मला सांगता येणार नाही. पण देहस्विनी, मनस्विनी होती. चंदनाच्या पोटी इंधन जन्माला यावे, तसा मी आलोय..’ ‘इंधन’ हा शब्द वापरताना ते मोठय़ाने ओरडले. त्यांची अशी देहबोली पाहिली की त्यांच्या कवितेसंबंधी आस्था नसणाऱ्या माणसांना हे वेडय़ाचंच लक्षण वाटावं. त्यांच्या कवितालेखनाचं आणखी एक स्थान म्हणजे अंजनी चर्च-यार्ड. येथे बसून ते दु:ख मोकळं करीत, किंवा आकांत. त्यांच्या या सर्व भूतकाळातील आठवणींचं विसर्जन कधी होणारच नाही. कारण ज्या ज्या वस्तूंशी बालपणापासून त्यांचा संपर्क आला, ती सर्व अडगळ त्यांनी गोळा केली होती. त्यांनी त्यांच्या मुलींना सांगितलं होतं, ‘या साऱ्या वस्तू माझ्या एकटेपणात माझ्याशी बोलतात. एकाकीपण, एकटेपण व एकांत हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मूलभूत घटक आहेत. दु:खसंचिताच्या गतकाळातच त्यांची कविता माधुर्यानं, सौंदर्यानं चिंब होऊन येते. वाचक व चाहते त्या संभ्रमातच चिंब होतात, त्यामुळे वास्तविकता कधीच उकलत नाही.
आचार्य अत्रेंची कन्या कवयित्री शिरीष पै हिने ती ‘मराठा’ची संपादक असतानाची एक गोष्ट मला सांगितली. १९६२ मध्ये तिने प्रथमच वृत्तपत्रातून कवितेचं सदर सुरू केलं. तिने माणिक गोडघाटे या नावानं ग्रेसच्या कविता प्रसिद्ध केल्या होत्या. पण ‘ग्रेस’ या नावानं जेव्हा कविता आली, त्या वेळी ती छापली गेली नाही.
 ग्रेस यांच्या प्रारंभीच्या व अखेरच्या अशा कविताच नाहीत. तिचं अवतरणच अतिशय समृद्ध, श्रीमंत व सौंदर्याने ओतप्रोत भरलेलं. ही त्यांची विशीतली कविता-
‘सुदीर्घ दूर सावल्या तसे क्षितिज भासले
कुण्या फुलास पांघरू तरूंस मेघ लागले..
सशिल्प दु:ख मंदिरी धुळी रेखतां तुला
उभ्या निजेत जागणे दिसे न गाव आपुला’
डॉ. वीणा आलासे या ग्रेस यांच्या कवितेच्या उत्तम अभ्यासक आहेत. त्या म्हणतात, ‘त्यांच्या इतर साहित्याचा स्वरसुद्धा ‘संध्याकाळच्या कविता’मधला ओळखीचा सूर आहे. तशाच वृत्तबद्ध आणि हळव्या कोवळ्या कविता म्हणजे ग्रेस यांचा प्रवास ‘संध्याकाळच्या कविता’ पासून सुरू होऊन संध्याकाळातच येऊन पोहोचतो की काय? म्हणजे हे संपूर्ण वर्तुळ कळसापासून सुरू होऊन पुन्हा कळसावरच येऊन संपतं.’ ग्रेस यांच्या कवितेचा कळस आणि पाया काहीही असला तरी सावत्र वडिलांनी बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर त्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हतं. ते म्हणत, ‘चार भिंती आणि एक छप्पर म्हणजेच घर. असं घर प्रत्येकालाच हवं असतं. कधी हाडे तासायला, तर कधी त्वचा शृंगारायला.’ हे वास्तव भिडणारं होतं. म्हणून त्यांच्यावरच्या एका अभंगात मी म्हटलंय,
‘नका हो उघडू। त्याचे ते कवाड
स्वत:चेच हाड। उगाळतो।।’
असे ते अधांतरीचे दिवस होते. या अत्यंत नाजूक व निसरडय़ा काळात त्यांची व डॉ. लीला माटेंची भेट झाली. नागपूरला मला अनेक लोक भेटत व ग्रेस यांच्यासंबंधी खूप काही सांगत. कुणी म्हणालं, ‘या बाईंचं नाव होतं सुमती.’ आता यात तक्रार करण्यासारखं काय आहे? अजूनही लग्नानंतर नावं बदलतातच की. पु. शि. रेग्यांची एक कविता आहे -‘लिलीचे फूल खुडताना। डोळा पाणी मी मी पाहिले
आता लिलीचे फूल केव्हाही पाहता। डोळा पाणी हे साकडे।।’
एकूणच, ग्रेस यांच्यासंबंधी लोक विसंगती, विरोधाभास, संभ्रम यांची वादळे निर्माण करत. ती शमली असतील वा नसतील, पण कविता ही अखंड चालत राहिली आहे.  त्यांच्या जीवनातील संघर्ष मात्र अटळ दिसतात. लग्नानंतर लिलाताईने संसार प्रारंभ केला. तीन मुलांचा जन्म झाला. त्यावेळची परिस्थिती डॉ. माधवी ग्रेस या त्यांच्या मुलीनं ‘पंथविराम’ या लेखात अतिशय वास्तवपूर्ण लिहिली आहे. लीलाताई पुन्हा कॉलेजमध्ये जाऊ लागल्यावर घराची सारी जबाबदारी एखाद्या गृहिणीसारखी ग्रेस यांनी घेतली. चहा-पाणी, नाश्ता, शाळेचा टिफिन, केर-वारे, मुलींची वेणी-फणी त्यांनी मनोभावे केलं. लिलाताई यांनी ग्रेसची प्रचंड सृजनशील शक्ती अचूक ओळखली होती. म्हणूनच नंतरच्या काळात ज्यावेळी त्यांच्यात कलह, संघर्ष निर्माण झाला, दुरावा आला; त्यावेळी दुबरेधतेचे काहूर उठवणाऱ्या त्यांच्या श्रोतृवर्गाला त्या म्हणाल्या, ‘ग्रेसची कविता, त्यातील पाळे-मुळे, अभिव्यक्ती मला पारदर्शी दिसते.’ १९७७ साली लिलाताईंच्या मृत्यूचा चिरवियोग त्यांच्या वाटय़ाला आला. लहानगी लेकुरे, फाटलेला संसार कुठे आणि किती शिवणार?
‘ओली हळवी जखम, त्याला नाही हो मलम।।’
‘चर्चबेल’ या पुस्तकात मात्र ग्रेस यांनी वेलोरच्या हॉस्पिटलमधला उल्लेख केला आहे, ‘लिली माझी वाट पाहात असेल, या मुसळधार पावसात तिला आणखीनच एकाकी वाटत असेल. तिच्या समोरची टेकडी डोळ्यांत एकदम शिरते, असे बरे नसते. अनुनय हवा थोडा, नाही? परिचय घडत नाही एरवी. मग सराव कसा होणार? सरावाशिवाय कोणीही पेरू नये आकांत!’ ग्रेस यांचा हा आकांत ललितबंधात येतो त्यावेळीही तो धूसर असतो. त्यांच्या ललितगद्दय़ात कोठेही आत्मकथन नसते. आत्मसन्मुख व समाजविन्मुख असणारी व्यक्ती  त्या काळात वास्तवासंबंधी फारशी बोललीच नाही. जीवन झटकून द्यावं, डोळे मिटून घ्यावेत अशा अपरंपार दु:खानं ते बुडाले होते. तेव्हा त्या दु:खतरंगातूनही शब्द फुटायचे, तेव्हा त्यांच्या कवितेतील उखाणे आपण शोधायचे, नाहीतर चर्चबेलच्या निनाददिशेने जाऊन काही संदर्भ मिळतात का ते बघायचे, एवढेच शिल्लक राहते ना? त्यांच्या निर्मितीक्षेत्रात ज्यावेळी याचा स्फोट होईल, त्यावेळी यातील घुसमट पराकोटीला जायची.
‘‘कसा होता नीलकंठ, त्याने प्राशिले जहर।
भिनले ते काठोकाठ, होई प्राणाचा कहर।।’’
त्यांनी त्यांच्याभोवती जे काहूर निर्माण केलं होतं, ते फार भयावह होतं. हृदयात भिरभिरणारी वादळं, स्मरणशिल्पांचा स्फोट, आठवणींचे ज्वालामुखी ते रिचवत होते. पाहात होते. झिंगले होते. दंगले होते. आणि अभिव्यक्तीची दारे उघडत त्यावेळी हे प्रगट होई. संध्याकाळ म्हणजे संधिकाल, अंधार नव्हे- पण त्या  मुहूर्ताशी त्यांची जी गाठ बांधली होती, ती फार काचत होती. रोजच्या जीवनातही फार ओढाताण होती. ग्रेस मला एकदा म्हणाले, ‘ते औदुंबराचे झाड, त्याची ढोली म्हणजे माझं काळीज आहे. त्यात एक अशी ‘जादुई कुपी’ असते की, ती मला एकटं ठेवत नाही.
आई गेल्यानंतर मुलीही फार बावचळल्या होत्या. वडिलांवर बारीक लक्ष ठेवून काळजी करीत.  अलीकडे मला डॉ. तीर्थराज यांनी सांगितलं की, शेवटच्या या दहा वर्षांत त्यांनी मद्दय़ाला हात लावला नाही. देवघरात लिलाताईंचा फोटो होता त्यासमोर संध्याकाळी ते रोज दिवा लावीत.
मी पाहिलेला तो काळ अतोनात उलथापालथीचा होता. दुबरेध कविता म्हणून टीकाकारांनीही शिक्कामोर्तब केलं होतं. १९६० ते १९७० च्या दरम्यानचे त्यांचे मित्र होते जीए., आरती प्रभू, मधुकर केचे. प्रभाव कोणाचाही नाही, पण कोणाची तरी मित्र म्हणून ओढ असावी लागते, ती मात्र नक्की होती. कातर होऊन जीएंच्या पत्राची वाट बघणे आणि कोणत्या तरी संध्याकाळचा मुहूर्त शोधून सगळ्यांपासून दूर जाऊन थरथरत्या मनाने ती पत्रे वाचणे..
कवी मधुकर केचे हे मला शिरीषताईंमुळे माहीत होते. ते शिरीषताईला १९५९ सालच्या मालवण येथील साहित्यसंमेलनात भेटले होते. त्यांनी त्यांचा एक कवितासंग्रह तिला अर्पण केलाय.
‘‘माझ्या देहाची पुण्याई मला विठ्ठल हसला।
माझा जात्यातील जीव पीठ होऊन हासला ।।’’
कधी कधी मला वाटायचे, या लोकांचं जीवन विळखा घातलेल्या नागासारखं आहे. या लोकांच्या जीवनात डंख, दंश हे शब्द वारंवार येतात.  ‘नाकातील बेसरबिंदीचा डंख’ ही तर ग्रेस यांची जीवाभावाची प्रतिभा आहे. ग्रेसना तुकारामांचा आकांतही फार भावलेला होता. ‘शब्दाच्या मागेपुढे तुकारामांच्या व्यक्तित्वाचा आकांत उभा आहे. कधी ती ओस झालेल्या दिशांच्या प्रवाहातून वाहतो, तर कधी जलावेगळ्या मासोळीच्या वेदनेतून तडफडतो. शब्द म्हणजे ईश्वराच्या उपासनेचे पूजाद्रव्य. माणूस आपल्या जीवनशैलीतील साधम्र्य शोधत राहतो. ग्रेसही आकांतपेरणीच्या भूमीत वैफल्याची बीजं पेरीत राहतात.’
भौतिक जीवनातील अटळ व्यवहार पार पाडतानाची होणारी धडपड, ओढाताण, कासाविशी नंतर त्यांच्या निर्मितीच्या प्रदेशात शिरली.
ग्रेस यांची मिरजेच्या घरी येणाऱ्या पत्रांचं आम्ही सामूहिक वाचन करीत असू. कारण आम्हा प्रत्येकालाच शब्द, सूर, रंग, रेषा यांचे जबरदस्त प्रेम असल्यामुळे, अनेक कलावंतांचे स्वागत या ‘चैतन्या’च्या आवारात झाले होते. त्यांनी एका पत्रात लिहिले होते, ‘काही वेळा प्रदीर्घ असा अंध:कार असतो, की पुन्हा उगवतीचे आमंत्रण नाही.’ आमच्या घराने त्यांना आग्रहाचे निमंत्रण दिले, आणि तेसुद्धा चाचरत अनिश्चितपणे का होईना, पण घरी आले. एके दिवशी दुपारी नागपूर-कोल्हापूर ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ने ते आले. मी व माझी मोठी बहीण त्यांना आणण्यासाठी स्टेशनवर गेलो होतो. त्यांना अपूर्वाई वाटली.
त्यावेळी आमच्या बंगल्याचं नाव ‘चैतन्य’ असं होतं. डॉ. सतीश इनामदारांचं खाली हॉस्पिटल होतं. डॉ. दिलीपही तेथेच होते. या वास्तूने मोठमोठय़ा कलाकारांना निवांतपणा दिला होता. कारण या वास्तूनेही त्यांचे कलावैभव साठवलेले होते.
या घरात सगळ्यांनाच असलेली कलांची मन:पूत आवड पाहून आणि अभिव्यक्तीचे बळ पाहूनही ग्रेस खूप मोकळे होऊन खळाळून हासताना मी पाहिले. ते म्हणाले, ‘माझ्या लक्षात असं आलंय, की या घरात कृष्णमूर्ती, कुमार गंधर्व व किशोरी आमोणकर या ‘के’पासून सुरुवात होणाऱ्या नावांचा कौतुकसोहळा आहे. तुम्ही माझी कविता स्वीकारताना दिसता. तेव्हा या ठिकाणी मी ‘कुंतीपुत्र कौंतेय’ व्हायला तयार आहे.
मिरज-कोल्हापूर भागात ते प्रथमच येत होते. तेव्हा आम्हाला वाटलं की त्यांची व काही लोकांची भेट होणं अगदी अगत्याचं आहे. पण ते निर्धारानं ‘नाही’ म्हणाले, तेव्हा मात्र मी हट्टाने श्री दत्ता बाळांची व सांगलीला म. द. हातकणंगलेकर सरांची भेट घडवून आणली. हे कसेबसे झाले. पण ज्यावेळी जीएंना भेटण्यासाठी धारवाडला जाण्याची गोष्ट निघाली, तेव्हा मात्र त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते किंचाळले. म्हणाले, ‘अहो, तुम्ही मला सुरुंग लावताय. मी फार घाबरून गेलोय. त्यांना भेटण्याची ताकद या कुडीत नाही. त्यांचं पत्रही मी लगेच फोडत नाही. त्यासाठी मला कुठेतरी लांब लांब जावं लागतं.’
प्रत्यक्षात त्यांनी निर्माण केलेल्या प्रतिमेला जर तडा गेला असता, तर त्यांचं भावविश्व खाक झालं असतं.  हे प्राणांतिक भय मनात होतं व कमालीची असुरक्षितताही! मग मात्र मला तीव्रतेनं वाटलं, प्रत्यक्षातील वास्तव ते नाकारताहेत व त्यांच्या निर्मितीच्या प्रदेशातच कवितेच्या माध्यमातून ते संपर्क व संवाद साधतात.
वास्तवात त्यांची कायमच फसगत व फारकत झाली आहे. त्यांच्या मन:स्थितीला सहज साद देणारं कुणी भेटलं नव्हतं. सर्वत्र उदासीनता, वैषम्य, आकांत याच महापुराने त्यांच्या नदीचे किनारे कायमचे तडकून गेलेत. त्यातूनच फुटलेला हा हंबरडा होता.
‘गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे
बुडता बुडता सांजप्रवाही अलगद भरून यावे।’
ही संध्याकाळ त्यांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी होती. त्या मावळतीत मारव्याचे आर्त सूर भरून गेले की आपण शब्द सोडून आणि त्या विकल वातावरणात शब्दांपलिकडील काहीतरी अनुभवतो.
१९८६ साली मिरजेला घराचा निरोप घेऊन ते गेले तेव्हा आमच्या मातोश्रींना ते भेटले होते. ‘आई’ म्हणून तिला पाहिल्यानंतर मात्र एका चिठ्ठीत त्यांनी लिहून ठेवले, ‘या अतिनाजूक शरीरातील तेज आणि मधुरता पाहिल्यावर, मांगल्याचा व वात्सल्याचा जो एक स्पर्श झाला, त्यासाठीच माझे येथे येणे झाले. आता हा अत्यंत दुर्मिळ स्पर्श कोठे लपवून ठेवावा या बांधणीत मी आहे.’ २८ ऑक्टोबर १९८६ साली रमा एकादशीला तिचे निर्वाण झाले, तेव्हा म. द. हातकणंगलेकर यांनी ग्रेस यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रातील मजकूर त्यांनी मला पाठवला होता. ‘त्या केव्हाही जाणार होत्या, कारण त्या इच्छामरणी होत्या.’ यावर ग्रेस पत्रात म्हणाल होते, ‘इतका निरिच्छ व पारदर्शी जीव मरणाची तरी इच्छा कशाला करेल? ही योजना निसर्गाने त्यांच्यासाठी केली होती.’
ग्रेस यांचे मला आलेले हे शेवटचे पत्र, पण त्याचा प्रारंभ व शेवट अशी दोन टोके मला वाटतच नाहीत. कारण त्यांची कविता ही नित्य वर्तमानात असते. पण ज्यावेळी ग्रेस गेल्याची बातमी मी टीव्हीवर पाहिली, त्यावेळी माझी लेखणी आपोआप झरली.
‘‘आत रडला रडला
शब्द झाली गंगामाई
हात तिने फिरविला
डोळे मिटले अंगाई’’

आणि असेही वाटले, की गंगामाईच्या अंगाईत त्यांना ते मनस्वी पवित्रपण लाभले.

संजू-सुषमा नावाच्या
दोन बहिणींचे हात
चार ओळींच्यासारखे
आले एकाच घरांत

एका हलक्या धाकाने
गेला डोंगराचा तोल
झाडे शोधाया लागली
स्वत: आपलेच फूल

मग दुपारच्या वेळी
एक पाहुणा आणला
त्याचे बोट धरताना        
श्वास कल्याणीचा ओला

परिचयांत दाटला
जुन्या फुलांचा सुवास
मग कल्याणी म्हणाली
याचे नांव आहे ग्रेस.

एक हसली जोराने
दुजी सरळ नाकाची
लागे बेसर शोधाया
कुण्या चंद्रमाधवीची

तिला जाईन घेऊन
तळहाताच्या तोलाने
मग कल्याणीने द्यावे
माझे परत उखाणे..

ग्रेस

मराठीतील सर्व दिवाळी अंक २०१२ ( Ls-2012-diwali ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi poet grace and kalyani kishor