मिर्झा गालिब आणि गुलजार यांचं एक अनोखं नातं आहे. गालिबचं चरित्र त्यांनी लिहिलं आहे. गालिबच्या जगण्याचा श्वास त्याची शायरी होती. त्याचा मनोज्ञ वेध गुलजारांनी या चरित्रात घेतला आहे. त्याचा मराठी अनुवाद अंबरीश मिश्र करीत आहेत. ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी त्यातील दोन प्रकरणे..
अंबरीश मिश्र हे मराठीतील एक चतुरस्र लेखक. गालिब आणि गुलजार या दोघांवरही त्यांचं नितांत प्रेम. ते जसे अभिजात लेखक आहेत तसेच उत्तम अनुवादकही आहेत. त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला हा भावानुवाद..

प्रकरण : एक

१.
कासिम जान गल्ली..
पहाटेचा झुंजुरका. चहूबाजूला अद्याप काळोख. पण क्षितिजावर थोडी लाली. गोष्ट दिल्लीची- १८६७ इसवी सन साल. दिल्लीतल्या ऐतिहासिक इमारती. जुनेपुराणे भग्नावशेष. थंडीचे दिवस. धुकं सर्वदूर. तिमुर वंशाची निशाणी लाल किल्ला. हुमायूनची समाधी. जामा मशीद.
कासिम जान गल्ली. अध्र्यामुध्र्या काळोखात. एक तुटलेला कोपरा.
दारांवर लोंबकळणारे जुने, जीर्ण चिकाचे पडदे. देवडीवर एक बकरी बांधलेली. धुक्यातून वाकून पाहणारे मशिदीचे मिनार. पानवाल्याचं दुकान बंद आहे. जवळपासच्या भिंतींवर पानाच्या पिचकाऱ्या. याच गल्लीत गालिब राहायचा. या अशा धूसर चित्रांवरून रेंगाळतोय एक आवाज :
बल्ली मारां की वो पेचीदा दलीलों की-सी गलियां
सामने टाल के नुक्कडम् पे बटेरों के कसीदे
गुडम्गुडमती हुई पान की पीकों की वो दाद, वो वाह-वा
चंद दरवाज़्ाों पे लटके हुए बोसिदा से कुछ टाट के परदे
एक बकरी के मिमियाने की आवाज़्ा!
और धुंधलाई हुई शाम के बेनूर अंधेरे
ऐसे दिवारों से मँुह जोडम् के चलते हैं यहां
चूडम्ी वालान के कडम्े की बडम्ी बी जैसे
अपनी बुझती हुई आंखों से दरवाज़्ो टटोले
इसी बेनूर अंधेरी-सी गली क़ासिम से
एक तरतीब चिरागों की शुरू होती है
एक क़ुरान-ए-सुख्म्न का सफ़ा खुलता है
असद उल्लाह ख़ान ग़ालिब का पता मिलता है..
दारावर लटकणारा चिकाचा पडदा हलला. दोन पाय दिसताहेत. दोन म्हातारे, थकलेले पाय. मोजडी जरा जुनाट झालेली. तळ घासलेला, दबलेला- पोचा पडलाय जोडय़ाला. हातात एक मजबूत सोटा. त्याचा आधार घेत, जोडे घासत-झिजवत गालिब चाललेत मशिदीच्या दिशेनं. सकाळचे सूर आसमंतात तरळताहेत अजून. नमाज अदा करण्याचा हा आर्त पुकारा. भाविकांना ही घातलेली साद.
गालिब यांनी गल्ली ओलांडली. मशिदीच्या जवळ आले, अन् एक खोल नि:श्वास सोडला. जिन्यापाशी पायातले जोडे काढले. पहिला दादर चढले अन् थांबले. अज़ान पूर्ण झाली होती.
एक मौन.
मान वर करून पाहिलं. मशिदीची सताड उघडी दारं. त्यावर मिनार. अन् मागे आकाश! ग़ालिबनी पुन्हा एक नि:श्वास सोडला. डोळे थोडे ओलसर झाले. अन् त्या चेहऱ्याभोवती घुमत राहिला हा शेर :
ये मसाई ले तसव्वुफ़ यह तेरा बयान ग़ालिब
तुझे हम वली समझते जो न बादख्म्वार होता
मिर्झा ग़ालिब आल्या पायी परतले. पायात जोडे चढवले अन् गल्ली ओलांडून घराच्या दिशेनं चालू लागले. आणि एक शेर वातावरणात फिरू लागला :
हुए मर के हम जो रूसवा, हुए क्यूं न ग़र के दर्या
न कभी जनाज़ा उठता, न कहीं मज़ार होता
मिर्झा ग़ालिब गल्ली पार करताहेत. कुण्या एकानं त्यांना ‘आदाब’ केला. मिर्झानी जेमतेम हात उचलून त्याच्या ‘आदाब’ला ओठातल्या ओठांत पुटपुटत उत्तर दिलं. मिर्झा घरी आले. दाराजवळच्या दगडावर अंमळ बसले. आतून बेग़मचा (बायकोचा) पुकारा झाला.
‘‘आलात परत?’’
मिर्झानी बेगमकडे पाहिलंसुद्धा नाही. तसेच बसून राहिले.
‘‘आज अगदी पहाटेच उठलात!’’
बेगम आणि मिर्झा ग़ालिब एकाच वयाचे. काही बोलले नाहीत मिर्झा. हातातला सोटा जमिनीवर हलके हलके थापटत राहिले. बेगम पडद्यामागनं थोडंसं पाहत होती डोकावून. तिचे डोळे आपल्या पाठीला टोचताहेत असं मिर्झाना वाटलं. बेगम थोडी निराश झाली.
‘‘गेला नाहीत?’’
मग थोडंसं थांबून म्हणाली-
‘‘अजून वेळ गेलेली नाहीए. जुळवून घ्या देवाकडे.’’
एवढं ऐकल्यावर मिर्झानी तोंड उघडलं. स्वत:शीच बोलत असल्याप्रमाणे :
‘‘काय तोंड घेऊन जाऊ देवाकडे? सत्तर र्वष झाली तो बोलावतोय. दिवसाला पाच वेळा तो मला हाक मारत असतो. परमेश्वराच्या एकनिष्ठांच्या मांदियाळीत मी नव्हतो.. आता मला माझी लाज वाटते.. त्याची नाही.’’
अचानक मिर्झाची नजर एका गोटीवर पडली. धुळीत चमचमत होती काचेची गोटी. मिर्झानी ती उचलली. अन् तिला निरखतच राहिले.
‘‘काय आहे?’’ बेगमनं तिथूनच प्रश्न केला.
‘‘गोटी आहे,’’ मिर्झा म्हणाले.. ‘‘कुणा पोराची असेल. राहून गेली.. खेळतेस?’’
‘‘गोटय़ाच खेळत होते, अन् तुम्ही लग्न करून मला इथं आणलंत,’’ बेगम म्हणाली.
मिर्झाना गंमत करावीशी वाटली. डोळ्यांत एक न्यारी धुंदी उतरली.
‘‘तू.. माझ्या गोटय़ा लपवल्या होत्यास ना.. बेगम? त्या परत मिळवण्याचा एकच मार्ग होता.. घरीच घेऊन आलो ना तुला.. गोटय़ांसकट!’’
‘‘ये.. खेळत्येस?’’ मिर्झा बेगमच्या जवळ गेले; अन् जुन्या आठवणींच्या खुमारीत त्यांनी पत्नीला विचारलं.
बेगमच्या लक्षात आलं. स्वत:चं वय, मिर्झाचं वय.
‘‘होय! आता गोटय़ा खेळण्याचं वय आहे ना हे!,’’ बेगम म्हणाली.
‘‘खेळायला नातवंडंसुद्धा नाहीत ना! नाहीतर खेळलो असतो की!,’’ मिर्झा मस्करीत म्हणाले. परंतु बेगमला वाटलं की नवऱ्याच्या स्वरात तक्रार आहे.
‘‘मला कशाला उगा दोष लावताय? मी तर तुम्हाला देवाच्या कृपेनं सात मुलं दिली होती की..! आता ती जगावीत असं परमेश्वराच्या मनात नव्हतं, त्याला मी काय करणार?’’
मिर्झा बेगमला उद्देशून म्हणाले, ‘‘तूच दूषणं देतेस परमेश्वराला. मी तर कधी काही बोललोच नाही. कसलीच तक्रार कधी केली नाही.’’
यावर बेगम काही बोलली नाही. आत निघून गेली. मिर्झानी तिला आत जाताना पाहिलं आणि घराच्या अगदी दारासमोर गोटय़ांचा खेळ मांडला.

२.
कासिम जान गल्ली.
तीच मिर्झा ग़ालिब यांची हवेली. अन् तेच मिर्झासाहेब. गोटय़ांचा पसारा मांडून बसलेले. तेवढय़ात मिर्झाना कुणाची तरी चाहूल लागली. गेलं कुणीतरी इथनं. मिर्झानी मागे वळून पाहिलं. एक तरुण जवळून जात होता. त्याच्या हातात एक कबुतर होतं. त्या तरुणानं मिर्झाना सलाम केला.
‘‘सलाम वालयकुम असद मिर्झा!,’’ तो म्हणाला.
‘‘वालयकुम सलाम.. काय मियां, लुक़के आहेत काय?’’
‘‘कुठले लुक़के असणार लखनौचे? फिरंगी आले अन् सगळे गेले उडून.’’
‘‘या दिल्ली शहरात कबुतरं उडत नाहीत?,’’ मिर्झानी विचारलं.
‘‘काय बोलताय, राव!,’’ तो तरुण म्हणाला. ‘‘कधीतरी किल्ल्याकडे एक फेरफटका मारून या. तुम्ही तर काय, या कासिम जान गल्लीतनं बाहेरच पडत नाही ना! चेहरा कसा उतरलाय बघा!’’
‘‘जायचं तरी कुठं?’’ मिर्झानी एक सुस्कारा सोडला. ‘‘कसला किल्ला? कोणत्या गडात जाऊ म्हणतोस? बादशा जफ़र तर मातृभूमी सोडून गेले. इंग्रजांनी त्यांना रंगूनला धाडलं. राजपुत्रांना फासावर लटकवलं.. आता त्या किल्ल्यात कोण आहे माझं.. सांग.’’
तरुणाला मिर्झाचं उत्तर रुचलं नाही. ‘‘इंग्रज तर आहेत ना! त्यांनी तुम्हाला पेन्शन दिलीये ना.. तुम्हाला आनंद झाला असेल. इंग्रजांकडून पेन्शन लागू झाली. बादशा नसला म्हणून काय झालं?’’ हा टोमणा मिर्झाना झोंबला.
‘‘हे पहा- माझ्यापाशी भुणभुण करून काही उपयोगाचं नाही. आधी स्वत:ला विचार. राष्ट्र, राज्य किंवा वंश लोकांमुळे होत असतो; राजामुळे नाही. अन् तुम्ही कबुतरं उडवण्याच्या खेळात असे दंग झाला नसतात ना, तर आज हा देश काही वेगळाच असता. अन् हा समाजही निराळा असता.. जा, उडवा कबुतरं,’’ मिर्झा म्हणाले.
मिर्झा गालिब यांचं हे बोलणं तरुणाला लागलं. मिर्झानी त्याच्या मुळावरच घाव घातला होता. मिर्झाना उत्तर न देणंच योग्य, असा विचार करून तो तरुण काहीही न बोलता निघून गेला. मिर्झानी गोटय़ांवर पुन्हा नेम साधला. अन् एवढय़ात एक अंध गोसावी सूरदासाचं भजन गात गात क़ासिम जान गल्लीत दाखल झाला.
‘सब नदियां जल भर..’ गोसावी गात होता. एक मुलगी त्याचा हात धरून होती. सूरदास मिर्झाच्या घरापाशी थांबला.
‘‘माई!’’ त्यानं घराच्या दिशेनं साद घातली.
पिठाचा वाडगा घेऊन उमराव बाहेर आली. त्यांनी अंध गोसाव्याच्या झोळीत वाडगा रिकामा केला. हात उंचावून गोसाव्यानं आशीर्वाद दिला अन् पुढे गेला. खूप वेळ त्याचा आवाज गल्लीत घुमत राहिला. मिर्झा ऐकत होते. मग म्हणाले-
‘‘हा ब्राह्मण चांगलं गातो.’’
मिर्झाना बाहेर उभं पाहून बेगम म्हणाल्या-
‘‘आता आत नाही यायचंय काय?’’
‘‘आत काय आहे, बेगम? काही रिकाम्या बाटल्या आणि तुटलेले पेले, ना? बस्स!’’
बाटली-पेल्यांचा उल्लेख बेगमना अर्थातच रुचला नाही. फणकाऱ्यानं म्हणाल्या-
‘‘बाहेर फेकायला सांगू का?’’
मान नकारार्थी हलवून मिर्झानी एक शेर पेश केला :
गो हाथ को जुंबिश नहीं, आंखों में तो दम है
रहने दो अभी साग़र-ओ-मीना मेरे आगे..
बेगम वैतागून म्हणाल्या, ‘‘आत या आता. काहीही नसलं तरी घर तर आहे! तुटकंफुटकं का असेना!’’
बेगम घरात गेल्या. मिर्झानी हसून एक शेर सादर केला :
घर में था क्या कि तेरा ग़म उसे ग़ारत करता
वो जो रखते थे हम इक हसरते तामीर सो है..
पुन्हा गोटय़ांचा डाव. हात पुन्हा वर उंचावलेला. उभं राहण्याची तीच पद्धत. मिर्झानी नेम अचूक साधला. गोटी बरोबर मधोमध जाऊन पोहोचली. भूतकाळातल्या एका आठवणींनं डोकं जरा वर काढलं.

३.
कासिम जान गल्ली.
तीच हवेली. तिथं देवडीपाशी गोटय़ांचा डाव. मूठभर गोटय़ा टाकण्यात आल्या. काहींचा नेम लागला. काही बाहेर फेकल्या गेल्या. जो मुलगा जिंकला होता त्यानं जिंकलेल्या गोटय़ा गोळा केल्या. एक मुलगा म्हणाला-
‘‘असद.. चल, आता तुझ्यावर डाव आहे.’’ गोटय़ा एकमेकांना भिडल्या. आपल्या गोटय़ा उचलण्यासाठी असद नावाचा मुलगा पुढे सरसावला, तर एका वयोवृद्ध माणसाशी त्याची टक्कर झाली. असद खाली पडला आणि रागाच्या भरात ओरडला-
‘‘बघून चालत नाही म्हातारा.’’
मुलाचा हा उद्धटपणा त्या वृद्ध गृहस्थाला आवडला नाही. त्यानं ‘‘ऐ पोरा, वडीलधाऱ्यांकडे बोलण्याची ही रीत?’’ असा दम भरला असदला.
असद बधतो कसला? त्यानं फार्शी भाषेत त्या वृद्धावर वार केला :
बुज़ुर्ग ब अक़ल अस्त न ब साल..’
वृद्धाला फार्शी समजत नव्हती. तरीही एका लहान मुलानं असा जिभेचा पट्टा चालवणं त्याला रुचलं नाही.
‘‘काय..?’’ वृद्धानं विचारलं.
‘‘म्हातारे आहात तुम्ही. बुज़ुर्ग नाही!’’
‘‘काय नाव तुझं?’’
‘‘असदउल्लाह.’’
‘अच्छा. इलाहीबख़्शचा जावई ना तू? कुठंय तुझा सासरा?’’
असद वैतागला. त्यानं रोखठोक उत्तर दिलं-
‘‘तुम्ही मला धक्का मारलात. आणि सासऱ्याचा ठावठिकाणा विचारताय?’’
‘‘खूप लांब आहे तुझी जिभली..’’ तो वृद्ध म्हणाला.
‘‘होय. फार्शी बोलतो ना मी. कळते तुम्हाला?’’
भाषेचा, भाषेच्या सौंदर्याचा अन् नजाकतीचा विचार करण्याइतपत धीर कुठं होता त्या वृद्धाला? असदला कानाला धरून तो इलाहीबख़्शच्या घरात शिरला.
‘‘चल आत.. सांगतो सगळं तुझ्या बुजुर्गाना. त्यांच्यासमोर सांग जरा. म्हातारा आहे की..’’

४.
असदचा कान धरून म्हातारा देवडीत तावातावानं दाखल झाला खरा; परंतु येण्याची पूर्वसूचना आपण दिलेली नाही, हे त्याच्या लक्षात आलं. त्यानं बाहेरूनच असदचे सासरे इलाहीबख्म्श मारुफ़ यांना हाक मारली-
‘‘मारुफ़मियां, येऊ का आत?’’
मारुफ़मिया आपले मित्र मौलाना समदसाहेबांबरोबर बुद्धिबळाचा डाव मांडून बसलेले. मारुफ़मियांच्या हातात प्यादं होतं. त्यांनी बाहेर नजर टाकली. मियां रमज़ानींचा चेहरा ओळखीचा तर होताच. तिथनं उत्तर आलं-
‘‘कोण? रमज़ानी? या, या. तुमचा आवाज तर जवळूनच आल्यासारखा वाटतोय.’’
वृद्ध रमज़ानी आत आला. त्यांच्या पुढे पुढे चालत होता असद. आणि रमज़ानीच्या हातात असदचा कान. असदला इलाहीबख्म्श यांच्या पुढय़ात ढकलून म्हातारा रमज़ानी म्हणाला-
‘‘चल सांग. काय बोललास ते सांगून टाक.’’
हुक्क्य़ाची नळी तोंडातून काढत इलाहीबख्म्श मारुफ़ यांनी विचारलं-
‘‘काय झालं? केलंय काय असदनं?’’
‘‘होय.. त्याचं म्हणणं आहे की, मी म्हातारा आहे; बुजुर्ग नाही.’’
मारुफ़नी आपले मित्र मौलवीसाहेब यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं.
‘‘काय असदमियां? तुम्ही असं बोललात?’’
असद हजरजबाबी होता. पट्कन म्हणाला-
‘‘जी नहीं. खरं तर हे शेख़ सादी यांनी सांगितलंय. मी तर फक्त पुनरुक्ती केली.’’
मारुफ़ आणि मौलवीसाहेब यांनी एकमेकांकडे पाहिलं. आता मौलवीसाहेब विचारते झाले-
‘‘काय म्हणाले होते शेख़ सादी?’’
‘‘म्हणाले होते की-
‘बुज़ुर्ग ब अक़ल अस्त न बसाल
अमीर ब दिल अस्त न बमाल..’’
दोघे मित्र खळखळून हसले. म्हाताऱ्याला खूप वाईट वाटलं. त्याचा राग अनावर झाला.
‘‘तुम्ही हसताय या गोष्टीवर?’’
मारुफ़मियांना म्हाताऱ्या रमज़ानीची अवस्था पाहवेना. असदनं तिथं थांबू नये असं त्यांना प्रकर्षांनं वाटलं. ते त्याला म्हणाले-
‘‘बेटा, चिलीम घेऊन जा अन् भरून आण.’’
चिलीम घेऊन असद आत गेला.
मारुफ़मिया रमज़ानीला समजावू लागले-
‘‘नाही रमज़ानी.. शेखम् सादी यांनी हे तुम्हाला उद्देशून नाही सांगितलेलं.’’
रमजमनीला मारुफ़मिया यांचं असं आडवळणानं बोलणं आवडलं नाही.
‘‘हे पहा, मियां इलाहीबख़्श! थट्टेवारी नेऊ नका हे सगळं. या मुलाला शिस्त लावा काहीतरी. नाहीतर..’’
‘‘नाही तर? नाही तर काय कराल?’’ मारुफ़मिया यांनी एकदम वेगळाच पवित्रा घेतला.
‘‘लुहारांच्या नवाबांकडे तक्रार करीन,’’ मियां रमज़ानी टेचात म्हणाले.
मारुफ़मियांना हसू फुटलं.
‘‘ते माझे थोरले भाऊ आहेत. तुमची तरफदारी नाही करणार ते. एक काम करा, मियां! किल्ल्यावर जा. बादशाह आहेत. त्यांच्याकडे तक्रार करा. त्यांना काही जमलं नाही तर ते कंपनीबहाद्दूरकडे तुमची तक्रार जरूर पोचवतील.’’
परिस्थिती हाताबाहेर चालली आहे हे मौलवीसाहेबांच्या ध्यानात आलं. मामला मिटवून टाकण्याच्या इराद्यानं ते म्हणाले-
‘‘तुम्ही लहान मुलांसारखे तंटा करू लागले, मारुफ़भाई! रमज़ानीभाई, तुम्ही जा. आम्ही असदची समजूत काढू. यापुढे असं वागायचं नाही.. सांगू आम्ही त्याला.’’
‘‘छोटे मियां तो छोटे मियां, बडम्े मियां सुभानअल्ला!’’ रमज़ानीमिया बडबडत निघून गेले.
रमज़ानी गेल्याचं पाहून मियांमारुफ़ आपल्या मित्राला म्हणाले, ‘‘चाल खेळा, मौलवीसाहेब. उगा खेळात खंड पाडला रमज़ानीने. बाहेर मुलांकडेही असंच काहीतरी केलं असेल त्यानं.’’
मौलवीसाहेब यावर काहीच बोलले नाहीत. त्यांचं लक्ष बुद्धिबळाच्या पटाकडं होतं. इतक्यात चिलमीला फुंकर घालत असद आला. मौलवीसाहेबांनी आपला मोहरा पुढं चालवला. असदनं चिलीम हुक्क्य़ावर नीट बसवली खरी; परंतु त्याचं लक्ष पटावर होतं.
‘‘तुम्ही आता चाल चलायची, बंदानवाज़्ा!’’
मौलवीसाहेब आपली चाल खेळले. असदनं एकदम उसळून आपल्या सासऱ्याला सल्ला दिला-
‘‘घोडय़ाला पळवा, अब्बाजान.’’
मारुफ़मियां विचारात पडले. मौलवीसाहेबसुद्धा दचकले.
‘‘ऊंऽऽ?’’
असद पुन्हा म्हणाला, ‘‘पळवा.’’
‘‘ते वजीर मारतील, भाऊ!’’
‘‘मारू द्यात.’’
‘‘काय बोलताय? वजीर दिल्यावर मग खेळ कसला?’’ – मौलवीसाहेबांनी विचारलं.
‘‘तुम्ही मारू तर द्या ना!’’
मौलवीसाहेब पेचात पडले-
‘‘असं कसं, राव? तुला बुद्धिबळ येतं?’’
‘‘तुम्ही वजीर मारा.. मग सांगतो,’’ असद म्हणाला.
मारुफ़मियां आपली चाल खेळले. मौलवीसाहेबांनी वजीर मारला. असदनं घोडा चालवला-
‘‘ही घ्या शह अन् ही मात.’’
मारुफ़मियां आणि मौलवीसाहेब पाहातच राहिले.
‘‘अरे वा.! हे तर सुचलंच नाही.’’
असदनं दोघांना ‘आदाब’ केला. मौलवीसाहेब तर एकदम हरखूनच गेले. त्यांनी मारुफ़ना विचारलं- ‘‘मुलगा हुशार आहे. बुद्धिबळ कुणाकडून शिकला? तुमच्याकडून?’’
मारुफ़ हसले. म्हणाले, ‘‘काय बोलायचं? अहो, आमच्याकडून शिकला असता तर अशी बुद्धीची चमक असती काय? आग्य््रााला मौलवी मुअज्जमसाहेबांकडून फार्शी शिकला अन् बुद्धिबळसुद्धा. आणि या वयात फार्शी अन् उर्दूत शेर लिहितो.’’
‘‘बहोत खूब. उपनाम काय घेतलंय?’’
‘‘असद.’’
‘‘आग्य््राालाच राहणं आहे काय?’’ मौलवीसाहेबांनी चौकशीच्या सुरात विचारलं.
‘‘नाही.. घरजावई करून घेतलंय त्याला. आता इथं दिल्लीतच राहतील,’’ मारुफ़मियां म्हणाले.
बुद्धिबळाचा नवा डाव खरं तर सुरू करायचाय; पण मौलवीसाहेब असदबद्दल विचारत होते.
‘‘मग आग्य््राात कोण कोण आहे?’’
‘‘आई आहे आणि एक धाकटा भाऊ आहे- युसुफ अली खान.’’
‘‘आणि वडील?’’
‘‘वडील नाहीयेत. अलवर संस्थानचे राजा बख्म्तावर सिंग यांच्याकडे नोकरीला होते असदचे वडील. दरबारातल्या अंतर्गत कलहात गोळी लागून गेले. असदचे काका नसरुल्लाह बेग. त्यांनी या मुलाला आपल्याकडे घेतलं- आग्य््राात.’’
‘‘ते तर मराठय़ांचे इथले सुबेदार झाले होते ना?’’
‘‘होय. मला वाटतं अकबराबादकडे. परंतु आग्रा इंग्रजांनी घेतलं. सुबेदारी गेली, कमिश्नरी आली. आणि एका वर्षांपूर्वी एका मोहिमेवर असताना नसरुल्लाह बेग अचानक वारले. हत्तीवरून पडले अन् गेले.. हे काय मौलवीसाहेब? मी हत्तीवर अन् तुम्ही घोडा चालवलात काय?’’ मारुफ़मियां बुचकळ्यात पडले.
‘‘जरा वेगळी चाल खेळली पाहिजे ना!,’’ मौलवीसाहेब हसता हसता म्हणाले- ‘‘यापुढे असदमियाकडून शिकून घेतलं पाहिजे.’’
चाल खेळता खेळता मारुफम्मियांनी मौलवीसाहेबांना विनंती केली.
‘‘एक मेहेरबानी करा मौलवीसाहेब. असदला आपल्या तालमीत घेऊन टाका. तेज घोडा आहे तो. सुटला की सुसाट पळेल म्हणून समजा.’’

५.
संध्याकाळ मावळली होती. दिवे लागले होते. बैठकीच्या खोलीत मारुफ़मियाँ असदला पत्राचा मजकूर सांगत होते..
‘‘पुढचं सगळं तूच लिहून टाक, गडय़ा. मला काय विचारायचं? दहा हजार पगार होता. कापून-छाटून पाच हजार झालाय. अध्र्या पगारावर तुझा आणि तुझ्या भावाचा हक्क आहे. अन् अर्धा शम्सला जातो. शम्स म्हणजे तुझ्या काकाचा मुलगा. आता पगारात आणखी एक वाटेकरी पैदा झालाय. लॉडलेकला सगळं नीट समजावून सांग. लिहून कळव त्याला, की हाजी- तो नवा वाटेकरी- तुमच्या नात्यातला नाही. निष्कारण वाटेकरी झालाय म्हणावं.’’
‘‘मला तर यात शम्स आणि हाजी यांचं साटंलोटं दिसतंय,’’ असदनं आपल्या मनातलं सांगून टाकलं.
‘‘हेच लिहून टाक. समजाव सगळं त्या लॉडलेकला.’’
इलाहीबख़्श मारुफ़ आपल्या दिवाणखान्यात शतपावली करू लागले. नंतर बैठकीवर बसले. असद लॉडलेकच्या नावानं अर्ज लिहीत होता. दरीवर बसून. समोर लिहिण्याचं मेज, कागद-कलम आणि दौत. मारुफ़मियाँनी बैठकीवर पडलेलं एक उर्दू मासिक उचललं अन् पानं पलटू लागले. अचानक एका गजलवर त्यांची नजर खिळून राहिली. ओठातल्या ओठांत वाचली आणि मग मोठय़ानं गजल म्हणू लागले :
इस जफ़ा पर बुतों से वफा की
मेरे शेर शाबाश रहमत खुदा की
‘‘काय शेर लिहिलायेस? असद, फार वाईट शेर आहे हा,’’ मारुफ़मियां म्हणाले.
‘‘हा शेर माझा नाहीये, चचाहुजूर. हा असद कुणी वेगळा आहे,’’ असद म्हणाला.
‘‘तर मग यांचे सगळे शेर तुझ्या नावावर नोंदले जातील,’’ मारुफ़मियांनी आपल्या मनातली शंका बोलून दाखवली.
‘‘होय आणि माझे चांगले शेरसुद्धा माझ्या नावावर जाणार नाहीत.’’
‘‘मग तू तुझं टोपणनाव बदल की!’’
‘‘जी.. ‘गमलिब’ असं नाव घेईन म्हणतो. विचार करतोय.’’
मारुफ़मियांना जावयाचं टोपणनाव आवडलं. पुन्हा पुन्हा ते उच्चारून पाहू लागले-
‘‘गमलिब. असदउल्लाह गमलिब. चांगलं आहे. परंतु वयानं खूप मोठा आहेस असं वाटतं, गडय़ा! नाव ऐकलं की दाढी-मिशा दिसू लागतात डोळ्यांसमोर. ‘गमलिब’- ‘गमलिब देहलवी’- नको, नुस्तं ‘गमलिब’.’’
‘‘आवडलं तुम्हाला?’’ असदनं विचारलं.
‘‘अं.. जरा विचार करू. जरा शोधकार्य करू. तुझी मदत लागेल मला.’’
असदनं मारुफ़मियांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं.
‘‘कपाटात सरबताची बाटली आहे. ती घेऊन ये.’’
असद हसत हसत उठून उभा राहिला. कपाटातून त्यानं एक चौकोनी बाटली काढली. अर्धी रिकामी होती. असदनं बाटलीचं बूच ओढून काढलं अन् जिभेवर ठेवलं. सरबताची चव घेतली. मग बाटली घेऊन मारुफ़मियांकडे गेला. मारुफ़मियांनी असदकडून बाटली घेतली.

‘‘जरा ग्लाससुद्धा आण, गडय़ा. आणि होय, खाली सांग. म्हणावं जरा बदाम-पिस्ते भाजून द्या.’’
‘‘खाली कुणाला सांगू?’’
‘‘उमरावला सांग.. तुझ्या बायकोला.’’
‘‘तिला काही येत नाही. एवढीशी तर आहे! उगा हात वगैरे भाजून घ्यायची ती,’’ असद म्हणाला. यावर मारुफ़मियांना हसू फुटलं.
‘‘ओ हो! इतकी काळजी करू नकोस तू.’’
मारुफम्मियां लिहिण्याच्या मेजाकडे गेले आणि र्अध लिहिलेलं पत्र वाचू लागले. इतक्यात असदमियां खालून वर आले. असदकडे मारुफ़मियांच्या ‘चिंतना’चं सगळं सामान होतं. चाखण्याकरता म्हणून सुकामेवा, पाण्याची सुरई आणि एक काचेचा नक्षीदार ग्लास.
‘‘हा ग्लास दिलाय. यात तुम्ही..’’ असद सांगू लागला. अचानक असदचा तोल गेला.
‘‘जपून रे..’’ मारुफ़मियांनी ताकीद दिली.
परंतु त्याअगोदरच नक्षीदार ग्लास खाली पडला अन् किणकिणत्या आवाजात खळ्ळकन् फुटला. सगळे तुकडे तुकडे इतस्तत: पसरले. मारुफ़मियां असदकडे पाहत राहिले.

६.
तेच घर. तोच दिवाणखाना. असद मिर्झा ग़ालिब आता २५ वर्षांचे आहेत. आणि आपले काही शेर ते चालीत वाचताहेत :
और बाज़ार से ले आये अगर टूट गया
साग़रे जम से मेरा जामे सिफ़ाल अच्छा है
संध्याकाळ दाटून आलीये. दिवा घेऊन उमराव दिवाणखान्यात आल्या. मिर्झानी हसून पुढचा शेर वाचला :
उनके देखे जो आ जाती है मुंहपर रौनक़
वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है
शेर सांगता सांगता मिर्झानी आपल्या रुमालाला गाठी बांधल्या आणि लिहिण्याच्या मेजापाशी आले.
देखिए पाते हैं उश्शाक़, बुतों से क्या फ़ैज़्ा
इक ब्रम्हन ने कहा है कि ‘यह साल अच्छा है’

हमको मालूम है, जन्नत की हक़ीक़त, लेकिन
दिल के खूश रखने को, ‘ग़ालिब’ यह ख्याल अच्छा है

प्रकरण : दोन

१.
दिवसाचा तिसरा प्रहर. कासिम जान गल्लीत एक छकडा दाखल झाला आणि मिर्झा गमलिब यांच्या घरापाशी थांबला. मिर्झाचे बालमित्र लाला बन्सीधर यांनी छकडा थांबवला.
‘‘बस, भाऊ. इथंच उभा करा.’’
‘‘हेच मिर्झाचं घर काय?’’ गाडीवानानं विचारलं.
‘‘होय. ही टोपली बरीक उतरव खाली,’’ लाला म्हणाले.
गाडीवानानं फळांची टोपली खाली उतरवली. मिर्झाचं घर बारकाईनं न्याहाळून झाल्यावर गाडीवान लाला बन्सीधरना म्हणाला-
‘‘आग्य्रातल्या कला महलपेक्षा हे मकाण बरंच छोटं वाटतंय.’’
‘‘अच्छा.. मिर्झाना आग्य्रापास्नं ओळखतोस काय?’’
गाडीवानाची मिर्झाशी ओळख होती. जानपछानसुद्धा.
‘‘होय, जी,’’ गाडीवान म्हणाला. ‘‘लहानपणी तुम्ही दोघं राजा बलदेवसिंह यांचे पुष्कळ पतंग कापायचे. तुम्ही आणि मिर्झा कला महलच्या गच्चीवर पतंग उडवत असायचे आणि तुम्ही कापलेले पतंग आम्ही गोळा करायचो.’’
एवढय़ात मिर्झाची नोकराणी वफ़ादार दारात आली. लाला बन्सीधरना पाहून तिनं त्यांना आपल्या बोबडय़ा भाषेत ‘आदाब’ केला.
‘‘मिर्झा आहेत घरी?’’ लालांनी वफ़ादारला विचारलं.
‘‘अंघोल कलताहेत.’’
‘‘आणि बेगम?’’
‘‘जनान्यात (स्त्रियांचं अंत:पुरातलं दालन) आहेत. काही शेजालणी आल्याहेत. त्यांच्याशी मसलत कलताहेत.’’
‘‘ठीक आहे. बेगमना आमचा सलाम सांगा. आणि त्या कल्लूला इथं पाठव. ही टोपली घेऊन जा आत म्हणावं. सैंपाकघरात ठेवायला सांग.’’
वफ़ादार कल्लूला बोलवायला गेली.
बन्सीधर गाडीवान बिट्टूमियांला म्हणाले :
‘‘बिट्टूमियां, जवळच धर्मशाळा आहे. तिथं टांगा मोकळा कर. आग्य्राला आता उद्याच जायचं. आज रात्री मी मित्राच्या घरीच मुक्काम करणारेय.’’
गाडीवानाला आपल्या मुलीची आठवण आली. इतक्या दूरवर आलोच आहोत तर भेटून जाऊ तिला! त्यानं लाला बन्सीधरना आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली.. ‘‘तर मग मीसुद्धा मुलीकडे मुक्काम करतो. इथंच लग्न करून आलीये ती. उद्या दिल्लीत सकाळी येईन.’’
बन्सीधरना यावर ‘नाही’ म्हणण्याचं कारणच नव्हतं.
‘‘अगदी बरोबर.. मग एक काम कर. इथं ये. हा मोठाला टरबूज घेऊन जा मुलीसाठी. रिकाम्या हातांनी जाऊ नये.’’
बिट्टूमियांनं टरबूज उचललं.
‘‘शुक्रिया, साहेब. खूप खूप आभार.’’
बिट्टूमियां छकडा घेऊन गेले. कल्लूनं फळांची टोपली उचलून आत नेली. त्याच्या मागे मागे बन्सीधर घरात दाखल झाले. परंतु अगोदर थोडं खाकरले.

२.
लाला बन्सीधर व्हरांडय़ात उभे. आणि चिकाच्या पडद्याच्या आड बेगम येऊन उभ्या राहिल्या.
‘‘आदाब अज़्र्ा करते, लालाजी.’’
बन्सीधर थांबले –
‘‘आदाब, वहिनी. कशा आहात तुम्ही?’’
‘‘कृपा आहे अल्लाची,’’ बेगम म्हणाल्या.
‘‘मिर्झा कसे आहेत? आमच्या मित्राला तर तुम्ही बस दिल्लीचं करून टाकलंत. आग्य्राची वाटच विसरले ते.’’
‘‘परवाच तुमची आठवण काढत होते,’’ बेगमनी आपली बाजू सावरत सांगितलं.
औपचारिक बोलून झालं आणि बन्सीधर मूळ मुद्दय़ावर आले.
‘‘किल्ल्यावर जाण्याचा काही वशिला हाती लागला काय?’’
उमराव बेगम गप्प राहिल्या. या मौनात एक वादळ होतं.
‘‘वहिनी, तुमच्या मौनात तक्रारीचा सूर ऐकू येतो. काय झालंय?,’’ बन्सीधरनी आपला मुद्दा पुढं वाढवत पृच्छा केली.
‘‘काय सांगायचं? यांचा हट्टी, मानी स्वभाव तर तुम्हाला ठाऊकच आहे.’’ बेगमचा बांध फुटला. त्या पुढे बोलू लागल्या, ‘सुका मेवा विकणाऱ्यांकडून उसने पैसे आणतात. परंतु एखाद्या मोठय़ा अधिकाऱ्याचे उपकार घ्यायला तयार नाहीत.’
बन्सीधरना आपल्या जिवलग मित्राची वृत्ती ठाऊक होती.
‘कर्ज मागताना मागचं-पुढचं पाहणार नाहीत. पण एखाद्यानं आपल्यावर मेहेरबानी करावी हे पटत नाही त्यांना. खूप संकोच होतो त्यांना त्या गोष्टीचा,’ बेगम म्हणाल्या.
बन्सीधरनी एक दीर्घ, गार सुस्कारा सोडला.
‘वडील होते तेव्हा ठीक होतं. ते कुठंतरी यांच्यासाठी शब्द टाकायचे. आता ते नाहीत. आता शिफारस कोण करणार?’ बेगम आपल्या मनातलं सांगत होत्या. बेगम खिन्न झाल्या. गळ्यात एक आवंढा आला. बन्सीधरना लक्षात आलं ते. बेगमच्या भरलेल्या गळ्यातला दर्द त्यांच्या लक्षात आला.
‘उठणं-बसणंदेखील अशा हीन लोकांमध्ये असतं. मला बिल्कुल पटत नाही ते. दारू, जुगार.. शोभतं का हे सगळं त्यांना?’
बेगमचे आरोप निराधार नक्कीच नव्हते. बन्सीधर यांची नजर खाली झुकली.
बेगमनंही स्वत:ला थोडं सावरलं.
‘अरे देवा! मी नवऱ्याची तक्रार करतेय असं समजू नका. तुम्ही त्यांचे बालपणीचे मित्र- म्हणून जीभ थोडी सैल झाली.’
एवढय़ात मिर्झा ग़ालिब अंघोळबिंघोळ आटपून ताजेतवाने झाल्यासारखे पहिल्या मजल्यावर आले. त्यांनी मित्राला पाहिलं. चिकाच्या पडद्याआड उभ्या बेगमलाही पाहिलं. हसून बन्सीधरना म्हणाले-
‘अरे बन्सीधर, आल्या आल्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली म्हणायची. इतके महिने कुठं होतात?’
‘तुम्ही कुठं येता? मी तरी एक फेरी केली ना इथली!,’ बन्सीधरनी तक्रार केली.
हे असं बोलणं सुरू असताना मिर्झानी टरबुजाची टोपली पाहिली. मिर्झाना हसू फुटलं.
‘अरे, हे काय? टरबूज, कोबी उचलून आणले इथं, लाला?
‘आता असं बघा- की आंब्याचा हंगाम बारा महिने नसतो, मियां.’
बेगमला आपल्या आतिथ्यशीलतेचं स्मरण झालं.
‘वर या तुम्ही. मी सरबत पाठवते.’
बेगम आत गेल्या. बन्सीधर गच्चीकडे वळले.
बन्सीधर गच्चीवरून जुन्या दिल्लीचा परिसर चहुबाजूनं न्याहाळत होते. ही गच्ची अन् इथली ही खोली मिर्झाना विशेष प्रिय होती. एकांताची हीच एकमात्र जागा. मिर्झा बन्सीधरच्या जवळ आले अन् म्हणाले-
‘बेगमच्या तक्रारीत तथ्य आहे, लाला. मला ठाऊकाय..’ मिर्झा खुलासा करत होते.
‘ठाऊकाय ना? मग काही करत का नाही?,’ लालांनी गंभीर स्वरात विचारलं.
‘काय करू? तू सांग.. घरी बसून दिवस काढू?’
बन्सीधर यावर काही बोलले नाहीत. ठेच एकीकडे आणि कळ दुसरीकडे. काय बोलायचं! मिर्झाच्या स्वरात वेदना होती.
‘माझा पहिला मुलगा मृत जन्माला आला, तर दुसरा काही महिन्यांतच वारला. तुला ठाऊकाय सगळं. बेगमच्या डोळ्यांतलं पाणी खळत नाही. घरी असलो तर तिच्या डोळ्यांकडे पाहवत नाही. अजून विलाप करताहेत तिचे डोळे असं वाटतं.’
मिर्झानी एक दीर्घ सुस्कारा सोडला.
‘देवावर तिची पहिल्यापास्नं नितांत श्रद्धा. परंतु आता तर सज़्ादा करता करता स्वत:ला मातीत गाडून घेईल की काय असं वाटतं.’
बन्सीधर गप्प होते. काय उत्तर द्यायचं! तेवढय़ात कल्लूमियां नेमका हजर झाला हे बरंच झालं. सरबत आणि सुका मेवा घेऊन तो आला होता. मिर्झानी हाताच्या खुणेनं त्याला ‘नाश्ता ठेवून परत जा-’ असं फर्मावलं.
‘नोकरी वगैरेचं काही जमतंय का?,’ बन्सीधरनी विचारलं.
मिर्झानी परत एक सुस्कारा सोडला अन् म्हणाले-
‘किल्ल्यात प्रवेश मिळेल असा वशिला हाती लागत नाहीए. काकांची पेन्शन थांबलीये. किंवा, जमा होतेय असं म्हणा.’
‘तर मग वेळ कसा जातो?’
‘हाजी मीरच्या दुकानात काही तास जातात. थोडा वेळ काही समविचारी जुगाऱ्यांच्या सहवासात जातो. जुगार खेळतो. (हे सांगून मिर्झा हसतात.) कवडय़ा खूप प्रेमानं टाकतो पटावर, लाला. सराव सुरू आहे. एक असा डाव नशिबाचा टाकीन मी- सगळ्या कवडय़ा परत मिळवेन.’
‘तुझे सासरे वारले तर मला वाटलं- आग्य््रााला परत येशील. आपल्या भावाकडे.. परंतु तू दिल्ली सोडशील असं वाटत नाही,’ बन्सीधरनी एवढं बोलून सरबताचा ग्लास उचलला.
मिर्झा तक्तपोशीवर बसले. मोठय़ा लोडावर हाताचा कोपरा हलकेच टेकवला आणि एक शेर पेश केला.
है अब इस मामूरे में कहत-ए-ग्मम-ए उल्फ़त, असद
हमने यह माना, कि दिल्ली में रहें खायेंगे क्या?
३.
हज़्ारत ज़्ाौक़ यांनी आपला शेर गाऊन दाखवला-
गर्चे है मुलके दकन में इन दिनों क़दरे-सुख़न
कौन जाये ज़्ाौक़ पर दिल्ली की गलियां छोडम्कर
काही दरबारी होते, काही ज़्ाौक़यांचे शिष्य. शेर ऐकल्यावर सगळीकडे ‘वाह-वाह’ची गूंंज झाली. हा आहे हज़्ारत ज़्ाौक़ यांच्या घरातला दिवाणखाना. मोठमोठे कंदील. मखमल मढवलेल्या खुच्र्या आणि फरशीवर जाजम. बसण्यासाठी मऊ मऊ गाद्या आणि लोढ-तक्क्ये. घरातलं एकूण वातावरण भव्य. सगळ्या सोयी हात जोडून उभ्या. हज़्ारत ज़्ाौक़ यांचा शेर ऐकून दरबारी मंडळींनी ‘वाह, सुब्हान अल्लाह’चा एकच जल्लोष केला.
‘किती मोहक पद्धतीनं मुद्दा मांडलाय!’
एक शिष्य लेखणी-दौत घेऊन बसला होता. त्यानं विनंती केली-
‘उस्ताद साहेब! जरा लिहून घेतो हा शेर!’
परंतु, ज़्ाौक़ यांना आपल्या कामाचा विसर पडला नव्हता. त्यांनी आपल्या शिष्याला आठवण करून दिली-
‘तुला काव्यसंमेलनाची यादी करायला सांगितलं होतं.. काय झालं, बाबा?’
शिष्यानं मोठय़ा अदबीनं एक यादी गुरूंच्या पुढे पेश केली.
हज़्ारत ज़्ाौक़ यांनी ती काळजीपूर्वक वाचली.
‘काही नवी नावं दिसताहेत.. हे साहेब कोण आहेत? असदअल्लाह ख़ान ग़ालिब?’
‘आग्य््रााहून आलेत. बल्ली मारां मोहल्ल्यात राहतात,’ शिष्यानं माहिती पुरवली.
ज़्ाौक़साहेबांनी स्वत:पुरतं एक-दोनदा ते नाव उच्चारलं-
‘आग्य््राातले.. असदउल्लाह ख़ान गालिब.’
एका दरबारी गृहस्थानं ग़ालिब यांची थोडी अधिक माहिती ज़्ाौक़साहेबांना पुरवली-
‘यांचे आजोबा समरकंदहून भारतात आले. शाह आलमच्या काळात. आणि तुर्की भाषा बोलत.’
दुसऱ्यानं थोडी जास्त माहिती सांगितली-
‘ग़ालिब यांचे वडील अब्दुल्लाह बेग ख़ान इथंच जन्माला आले. इथं, हिंदुस्थानात. परंतु त्यांच्या भाषेबद्दल काही ठाऊक नाही. ते कोणत्या भाषेत बोलत, ठाऊक नाही.’
‘आणि असदउल्लाह ख़ान? ते कोणत्या भाषेत बोलतात?,’ ज़्ाौक़ यांनी पृच्छा केली.
‘स्वत:ला फारशीचे शायर मानतात.’
‘ते स्वत:ला स्वत:च फारशीचे शायर मानतात? की इतरही मानतात?’
‘दिल्लीवाल्यांना मनवण्याचा प्रयत्न करताहेत.’
ज़्ाौक़ विचारात मग्न झाले-
‘हूं.. असद.. ग़ालिब..’
४.
सकाळी लाला बन्सीधर यांची निघण्याची तयारी सुरू झाली. बिद्दूमियां छकडा घेऊन हजर झाले. दारात दोन्ही मित्रांनी मोठय़ा प्रेमानं हातात हात गुंफले. एकमेकांना आलिंगन दिलं.
ग़ालिब तक्रारीच्या स्वरात म्हणाले-
‘आणि हे असं सहामाही येऊ नकोस रे. आग्रा कितीसं दूर आहे रे?’
‘मी तर वेळोवेळी येतच असतो. तू येत नाहीस त्या बाजूला.’
‘आता येईन. जरा रोजच्या कटकटीतून सवड मिळाली की पोहोचतो तुझ्याकडे. युसुफमियांनाही भेटून बरेच दिवस झालेत.’
‘तुझे पैसे त्याच्याकडे पोचते करीनच असद. परंतु एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावीशी वाटते..’
‘काय? सांग ना!’
‘हे बघ. माझी परिस्थिती सध्या बरी आहे. थोडे पैसे ठेवून घे.’
ग़ालिबनी बन्सीधरच्या खांद्यावर हात ठेवला. बन्सीधर लगेच म्हणाले-
‘सोय झाली की पैसे परत कर.’
ग़ालिब हसले.
‘आणि परत नाही करू शकलो समज.. तर?’
‘ तुझेच पैसे आहेत. माझी सचोटी अन् माझा खिसा- दोन्हींवरचं ओझं कमी होईल की!’
ग़ालिबनी बन्सीधरच्या खांद्यावर थोपटल्यासारखं केलं.
‘हे बघ लाला, पैसे उसने देणं हा काही लोकांचा रोजगार असतो. त्यांचा व्यवसाय का बुडवतोयेस? ते बेकार होतील ना! अन् मी तर अजून तुझ्या सुतळी अन् मांज्याची उधारी परत केली नाहीये.’
दोघे हसले.
एवढय़ात एक अनोळखी माणूस आला.
‘आदाब पेश करतो.’
दोघांनी नमस्काराला प्रति-नमस्कार केला.
‘जनाब असदउल्लाह ख़ान ग़ालिब यांच्याकरता एक निरोप आहे. तुम्हीच का?’
‘कुणाचा निरोप आहे?’
‘ज्यांची देशभर ख्याती आहे असे हज़्ारत शेख मो. इब्राहिम ज़्ाौक़ यांच्याकडून पत्र आहे.’
बन्सीधर आणि ग़ालिब यांनी एकमेकांकडे पाहिलं. ग़ालिब यांनी त्या अनोळखी माणसाकडून निमंत्रण घेतलं.
‘महोदय, उत्तरासाठी मी थांबायचं? की?’
‘मी उत्तर पाठवीन त्यांना.’
तो अनोळखी माणूस सलाम करून आल्या वाटेनं परत गेला. ग़ालिबनी निमंत्रण उघडलं अन् वाचलं.
‘काय म्हणताहेत इब्राहिम?’ बन्सीधरनी विचारलं.
‘किल्ल्यावर काव्य-संमेलन आहे. राजकुमार फम्खम्रू यांच्या अध्यक्षतेखाली. मी मुशायऱ्यात भाग घ्यावा म्हणून हे निमंत्रण.’
बन्सीधरचा चेहरा उजळला. डोळे पाणावले.
‘मित्रा, अभिनंदन! खूप, खूप अभिनंदन. मुशायरा जिंकशील तू. मला खात्री आहे.’
५.
गमलिब लाल किल्ल्यातल्या मुशायऱ्याला हजर राहिले. मुशायरा सुरू झाला. हज़्ारत मोमिन यांनी आपली रचना ऐकवली-
तुम्हें याद हो कि न याद हो
कभी हम में तुम में भी चाह थी
कभी हम भी तुम भी थे आशना
तुम्हें याद हो कि न याद हो
उस्ताद ज़्ाौकम् राजकुमार फम्खम्रूच्या शेजारी बसले होते. मोमिनच्या रचनेनंतर ‘शम्ए महफिल’ (मैफलीचा दिवा) मिर्झा गमलिब यांच्यासमोर ठेवण्यात यावी अशी खूण राजकुमारनं केली. त्यानुसार शम्ए महफिल मिर्झा असदउल्लाह खमन गमलिब यांच्या पुढय़ात ठेवण्यात आली. ही त्या काळातली पद्धत होती. शम्ए महफिल कवीच्या समोर ठेवण्यात आली की त्यानं आपल्या रचना सादर करायच्या असा रिवाज. मिर्झानी अवतीभवती पाहिलं. अचानक मैफल नि:शब्द झाली. गमलिब यांना काही लक्षात येईना. त्यांनी राजकुमाराला आदाब करून विचारलं-
‘परवानगी आहे?’
‘इर्शाद.’
‘नक्म्श फम्रियादी है किसकी शोखिम्-ए-तहरीर का’
सगळीकडे सगळं गप्पगार. कसला म्हणून आवाजच नाही. कुणीही तोंड उघडलं नाही. ग़ालिबना ऐकू आली ती फक्त आपल्याच काळजाची टिकटिक. त्यांनी शेर पुन्हा म्हटला-
नक्म्श फम्रियादी है किसकी शोखिम्-ए-तहरीर का
कागम्जी है पैरहन हर पैकर-ए-तस्वीर का
श्रोत्यांमध्ये एक चमत्कारिक शुकशुकाट. पुढचा शेर वाचला-
कावे कावे सख्म्त जानी हाए तन्हाई न पूछ..
परत तशीच खामोशी. गमलिब मैफलीला उद्देशून म्हणाला-
‘मिसरा उठाएं, हजरात.’
शेरची पहिली ओळ शायरनं सादर केली की श्रोत्यांनी ती पुन्हा म्हणायची अशी पद्धत आहे. तिला ‘मिसरा उठाना’ म्हणतात.
‘मिसरा उठाएं, हजरात..’ ग़ालिब म्हणाले.
कुणीही काव्यपंक्ती ‘उचलली’ नाही. हलक्या आवाजात लोक म्हणताहेत-
‘नाही उचलली जात. खूप जड आहे.’
यावर हास्याची कारंजी फुटली. सगळे खो-खो हसताहेत न् काय! इब्राहिम ज़्ाौकम् यांच्या घरी पाहिली होती ती प्रतिष्ठित माणसंही या मैफलीत हजर होती. राजकुमार फमखम्रूंनी त्यांच्याकडे एकदा दृष्टिक्षेप टाकला. नंतर गमलिबकडे पाहिलं. ज़्ाौक़यांनी मान खाली वाकवली. काय चाललंय ते मिर्झा ग़ालिबना कळेना. आपल्याविरुद्ध काही कट रचलाय काय? ग़ालिबनी मनाचा निश्चय केला. मैफलीला उद्देशून ते म्हणाले-
‘गज़्ालचा शेवटचा शेर ऐकवतो.’
मैफलीत हलकी हलकी खळबळ.
‘तुम्ही गज़्ाल पूर्ण केली नाही?,’ राजकुमारनं विचारलं.
‘महोदय, मिसरा ‘उचलायला’ हमाल मिळाले नाहीत,’ गमलिबनी उत्तर दिलं.
‘फक्त दोनच शेर म्हटलेत? सुरुवातीचा अन् शेवटचा?,’ मुफ्म्तीसाहेबांनी विचारलं.
‘जी नहीं, मुफ्म्तीसाहेब. गज़्ाल तर मी पूर्ण सादर केली. परंतु पहिला मिसरा इतका जड होता, की श्रोत्यांना तो उचलता येईना. बाकीचे शेर वाचून दाखवले असते तर या मंडळींना जागेवरून उठणं कठीण झालं असतं.’
‘तुम्ही अखेरचा शेर पेश करा..’ राजकुमार म्हणाला.
बस कि हूं, गमलिब, असीरी में भी आतश ज़्ोर-ए-पा
मू-ए-आतशे-दीद है हल्का मेरी ज़्ांजीर का
मैफलीत पुन्हा शुकशुकाट. मिर्झा गमलिब यांनी राजकुमाराला लवून सलाम केला आणि मैफलीतून बाहेर पडले. मैफलीतला हास्यस्फोट आपला पाठलाग करतंय असं त्यांना वाटलं.
६.
रात्री मिर्झा गमलिब घरी आले. देवडीपाशी वफादार त्यांची वाट पाहत उभी होती.
‘कसा झाला मुशायरा?,’ तिनं आपल्या बोबडय़ा शब्दांत विचारलं.
गमलिब नुस्तं हसले आणि उंबरठा ओलांडून व्हरांडय़ात आले. त्यांच्या मागे मागे वफादार.
‘तुम्ही तर अख्खा मुशायरा जिंकलाच असेल. बादशाहने आपल्या डोक्यावरचा मुकूट काढून तुमच्या डोक्यावर ठेवला असेल.’
‘नाहीतर काय? पण मी माझी टोपी काढली नाही,’ मिर्झा गमलिब गमतीनं म्हणाले.
त्यांना अंगणात उमराव बेगम दिसल्या नाहीत. त्यांना सुनं सुनं वाटलं सगळं. हाक मारली-
‘बेगम..?’
बेगम आत पलंगावर बसून काहीतरी क्रोशाचं विणत होत्या. मिर्झा खोलीत दाखल झाले तर बेगमनी विचारलं-
‘कसं झालं?’
मिर्झा नुस्तं हसले. उत्तर दिलं नाही. बेगमनी परत विचारलं-
‘काव्य-संमेलन कसं झालं? काही सांगत का नाही?’
मिर्झानी डोकं हलवून ‘सांगण्यासारखं काही खास नाही’ असं सुचवलं. मग हसून म्हणाले-
‘ऐक. जरा पेला आणि बाटली काढ.’
‘जरा मनाविरुद्ध काही झालं की पेला. जरा काही वाकडंतिकडं झालं की जुगाराच्या कवडय़ा. बस्स. हीच तुमची सवय मला आवडत नाही.’
‘मी तर आवडतो ना! माझ्या सवयींशी तुला काय देणंघेणं?’ मिर्झानी बेगमला थोडं छेडलं.
‘प्रेम कधी कूस बदलेल सांगता येत नाही. बाजी पलटली तर मनात द्वेष उत्पन्न होईल,’ बेगम म्हणाल्या.
मिर्झा गमलिब यांनी एक सुस्कारा सोडला. अन् एक शेर म्हटला-
पिला दे ओक से साक़ी जो हमसे नफम्रत है
प्याला गर नहीं देना, न दे, शराब तो दे
बेगम विणकाम करताहेत. मिर्झा गमलिब पुढचा शेर पेश करतात-
दिखा के जुंबिशे लब ही तमाम कर हम को
न दे जो बोसा तो मँुह से कहीं जवाब तो दे
या शेरचा रोख आपल्याकडे आहे हे बेगमनी ओळखलं. त्यांनी वफमदारला हाक मारली-
‘वफमदार!’
वफमदार हाजिर झाली.
‘जी बेगम.’
‘साहेबांचा पेला, बाटली चौकात मांडायला सांग.’
वफमदार आत गेली. बेगमनी पुन्हा विचारलं-
‘सांगत का नाही? काय झालं किल्ल्यावर?’
‘काही सांगण्यासारखं असतं तर सांगितलं असतं. तिखट-मीठ लावून सांगितलं असतं. परंतु दुर्भाग्य असं, की तिथं काही झालंच नाही. एकदम सभ्य लोक आहेत. भांडतसुद्धा नाहीत.’
‘खरं सांगायचं तर दिल्लीवाल्यांना तुम्ही आवडत नाही.’
‘का? माझं तोंड वाकडं आहे काय?’
‘तोंड वाकडं असेल तुमच्या दुश्मनाचं. मी म्हणते की..’
एवढय़ात काच फुटल्याचा आवाज झाला. बेगम मोठय़ा स्वरात म्हणाल्या- ‘सांभाळून गं, वफमदार.’
मिर्झा घाबरले.
‘अगं, बाटली तर नाही ना फुटली?’
‘तुमच्या खोलीत तर ती जातच नाही. घाबरते. तुमच्या खोलीत हडळ राहते, असं ती म्हणते.’
‘खरंच आहे वफमदारचं. माझ्याहून मोठी हडळ कोणती असणार तिथं?’
‘ऊंह..!’
काहीतरी आठवून बेगमनी वफमदारला हाक मारली.
‘वफमदार! कल्लूला म्हणावं पाठवून दे.’
मग मिर्झासाहेबांकडे वळून बेगम म्हणाल्या-
‘मी म्हणते आग्य्राला परत जाऊ. दिल्लीवाले इथं तुम्हाला आपलंसं करणार नाहीत.’
‘हिंदू-मुसलमान, शिया-सुन्नी या विभागण्या कमी म्हणून की काय, लोकांनी दिल्ली, लखनौ आणि आग्य्राच्या भिंती उभ्या केल्या. मला जग फार छोटं वाटतं, बेगम.. हे जग..’
अचानक गमलिब बेगमच्या पाठी उभे राहिले आणि शेर म्हटला-
‘बाज़्ाीचाये अतफाल है दुनिया मेरे आगे.’
बेगमनी मिर्झाकडे पाहिलं. मिर्झानी त्यांना समजावलं-
‘बाज़्ाीचा.. खेळायचं मैदान.’
बेगम चिडल्या-
‘होय. आणि अतफाल म्हणजे मुलं. बाजीचाये अतफाल म्हणजे लहान मुलांचं खेळाचं मैदान. एवढं उर्दू तर मलासुद्धा येतं म्हणते मी.’
मिर्झा हसले आणि चालीत शेर म्हटला-
बाज़्ाीचाये अतफाल है दुनिया मेरे आगे
होता है शबओ रोज तमाशा मेरे आगे
मिर्झानी बेगमच्या दुपट्टय़ाच्या कोपऱ्याला एक गाठ बांधली-
इक खेल है औरंग सुलेमां मेरे नज़्ादीक
इक बात है एजाजम्े मसीहा मेरे आगे
मिर्झानी आणखी एक गाठ दुपट्टय़ाला लावली आणि पलंगाच्या दुसऱ्या पायाशी जाऊन बसले-
होता है निहां गर्द में सहरा, मिरे होते
घिसता है ज़्ाबीं खमक पे दरिया मेरे आगे
मत पूछ कि क्या हाल है मैरा तेरे पीछे
तू देख कि क्या रंग है तेरा मेरे आगे
ईमां मुझे रोके है, जो खेंचे हैं मुझे कुफ्र
काबा मेरे पीछे है, कलीसा मेरे आगे
(अरुण शेवते यांच्या ऋतुरंग प्रकाशनातर्फे गुलजार लिखित आणि अंबरीश मिश्र अनुवादित ‘मिर्झा गालिब’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.)