कालच्या राजांचा वर्तमान!
एकेकाळी सत्ता आणि राजवैभव उपभोगलेल्या राजेरजवाडे आणि संस्थानिकांचे आजचे वंशज कसे आयुष्य जगताहेत? त्यांना गतवैभवाचे ओझे पेलताना त्रास होतो का? आज सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जगताना त्यांच्या काय भावना आहेत?

पुण्यातल्या प्रभात रस्त्यावरच्या सातव्या गल्लीत ‘रघुनाथ’ नावाचा बंगला आहे. हिंदुस्थानच्या राजकारणावर सुमारे सव्वाशे र्वष प्रभुत्व गाजवलेल्या, दिल्लीच्या तख्तालाही धडकी भरवलेल्या आणि मराठी साम्राज्याचे झेंडे अटकेपार गाडणाऱ्या पराक्रमी पेशव्यांचे वंशज या बंगल्यात राहतात. श्रीमंत पेशवा घराण्याचे वंशज पुण्यात राहतात ही माहिती फारच थोडय़ा पुणेकरांना असेल. पेशव्यांच्या वंशजांना ‘रघुनाथ’मध्ये भेटायला जायचंय या कल्पनेनंच मनावर दडपण आलं होतं. पेशव्यांचं नाव निघालं की शनिवारवाडा डोळ्यासमोर येतो.. शनिवारवाडय़ाच्या प्रांगणात असलेला पराक्रमी बाजीराव पेशव्यांचा अश्वारूढ पुतळा आठवतो.. पुण्याची पर्वती.. पेशव्यांचा तळ्यातला गणपती.. पेशवेकाळात शनिवारवाडय़ापासून पर्वतीपर्यंत एक भुयारी रस्ता होता, ही पुण्यात सांगितली जाणारी कथा.. अशा एकेक गोष्टी आठवत राहतात..
‘रघुनाथ’ बंगल्याच्या प्रवेशद्वारावर संगमरवरी दगडात कोरलेली पाटी दिसली. पाटीवर कोरलेली ‘डॉ. वि. वि. पेशवा’ ही अक्षरं वाचली आणि पुण्यात राहणाऱ्या पेशव्यांच्या वंशजांपर्यंत आपण पोहोचलो आहोत याची जाणीव त्या पाटीने करून दिली. प्रभात रस्त्याच्या परिसरात प्रशस्त आणि सौंदर्य जपणारे अनेक बंगले आहेत, तसाच पेशव्यांचाही हा बंगला. खूप काही ऐतिहासिक वगैरे वस्तूंनी त्याची सजावट केलेली असेल अशी आपली कल्पना असते, किंवा पेशवा घराण्याचे वंशज इथे राहतात याचं दर्शन लांबूनच होईल असंही मनात येऊन गेलेलं असतं; पण तशी काही परिस्थिती इथे नाही. म्हणजे भव्य, उंच प्रवेशद्वार, कमानी, दारात जुन्या तोफा वगैरे असं इथे काही आढळत नाही. हे पेशव्यांचं निवासस्थान आहे याची कल्पना बाहेरून येत नाही. जुन्या थाटाच्या काही ऐतिहासिक वस्तू या कुटुंबानं हौसेनं जमा केल्या आहेत. त्या घराची.. दिवाणखान्याची शोभा वाढवतात. इतिहासाची साक्ष देतात. पण अशा वस्तूंनी ‘रघुनाथ’ बंगला भरलेला आहे असं मात्र बिलकूलच नाही. या भागात असलेल्या इतर बंगल्यांप्रमाणेच हादेखील एक बंगला.
डॉ. विनायकराव पेशवा, त्यांची पत्नी जयमंगलाराजे, मुलगा पुष्कर, सून आरती आणि रिया व सना या नाती असं पेशवा कुटुंब इथे राहतं. ही पेशवा घराण्याची दहावी पिढी. ७४ वर्षांचे विनायकराव भूगर्भशास्त्रज्ञ आहेत. आणि याच विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी पुणे विद्यापीठात ३३ वर्षे नोकरी केली. पुष्करचं वय ३८ आहे. आणि आर्किटेक्ट म्हणून तो एका कंपनीत नोकरी करतो. पुष्करला दोन बहिणी. एक- आदिती अत्रे आणि दुसरी- सुपर्णा देव.
पेशवा घराण्यातील दोन कुटुंबं पुण्यात आहेत. दुसरं पुण्यातलं कुटुंब म्हणजे डॉ. विनायकराव पेशवा यांचे ज्येष्ठ बंधू कृष्णराव पेशवा. रत्नपारखी म्हणून त्यांची ख्याती होती. त्यानिमित्ताने भारतभर त्यांनी प्रवास केला आहे. त्यांची पत्नी उषाराजे, मुलगा महेंद्र, सून सुचेता आणि नात पूजा हे कुटुंबदेखील प्रभात रस्त्यावरच राहतं. महेंद्र यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. कृष्णरावांना एक मुलगी- मोहिनी करकरे. आदिती आणि मोहिनी यांचं सासर पुण्यात, तर सुपर्णाचं सासर दिल्लीत आहे.
ही सगळी मंडळी पेशवा घराण्यातील अमृतराव पेशवा यांचे वंशज. पुण्यात असलेल्या या पेशवा घराण्याकडे वंशपरंपरागत वा पिढीजात मालमत्ता, जमीनजुमला असं काहीही आलेलं नाही. याचं मुख्य कारण म्हणजे इंग्रजांचा पेशव्यांवर असलेला विलक्षण राग. त्यांनी पेशव्यांच्या अनेक मालमत्ता ताब्यात घेऊन पेशव्यांच्या वंशजांकडे काही राहणार नाही याची आवर्जून काळजी घेतली. सन १८०० च्या आसपास अमृतराव वाराणसीत गेले. पुढील काही पिढय़ा तिकडेच राहिल्या. पण गेल्या दोन-तीन पिढय़ांच्य आधीची पेशवे मंडळी तिकडून पुण्यात आली. पेशव्यांचा वारसा सांगता येईल असं या पेशव्यांकडे काय आलं? तर दोन गोष्टी आल्या.. एक म्हणजे आडनाव आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंदिरं. अर्थात ही मंदिरं पुण्यात वा महाराष्ट्रात नाहीत. वाराणशीतील गणेश घाटावर असलेलं गणपतीचं मंदिर तसंच वाराणशीतल्या राजा घाटावरचं अन्नछत्र या पेशव्यांना परंपरागत मिळालेल्या दोन गोष्टी. त्यातलं अन्नछत्र आता अस्तित्वात नाही. पण त्या घाटावर अन्नपूर्णेचं व शंकराचं अशी काही जुनी मंदिरं आहेत. गणेश घाटावरच्या गणपती मंदिराची मात्र पूर्ण व्यवस्था आजही पुण्यातील पेशवा घराण्याकडे आहे. त्यासाठी पुण्यातील दोन्ही पेशवा कुटुंबीयांनी मिळून ट्रस्ट स्थापन केला आहे. त्याच्या माध्यमातून मंदिराची व्यवस्था पाहिली जाते. अतिशय चांगल्या स्थितीत मंदिर राखलेलं आहे. तेथे नियुक्त केलेले व्यवस्थापक, कर्मचारी वगैरे या मंदिराची दैनंदिन व्यवस्था पाहतात. हे मंदिर हा पेशवे घराण्याकडे चालत आलेला सध्याचा एकमेव वारसा. दरवर्षी या मंदिरात पेशव्यांतर्फे पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. पेशव्यांच्या घरातील गणपती सात दिवसांचा. तसाच तिकडच्या प्रथेप्रमाणे हा उत्सवही सात दिवसांचा असतो. तिथल्या परंपरेनुसार गणेशचतुर्थीच्या आधी दोन-तीन दिवस या गणेशोत्सवास सुरुवात होते. या उत्सवाचं स्वरूप मुख्यत: उत्तर भारतीय प्रथा-परंपरांप्रमाणे सांस्कृतिक असतं. त्यात संगीताच्या मैफिली, वादनाचे कार्यक्रम यांची रेलचेल असते. एक दिवस भोजनाचा मोठा बेत असतो. एक दिवस गणरायांच्या सजावटीचा असतो. तिकडच्या मराठी मंडळींचं, मंदिरात वर्षभर भक्तिभावानं येणाऱ्या गणेशभक्तांचं यानिमित्तानं जणू संमेलनच भरतं. परंपरागत आलेली एक वेगळी प्रथा या घराण्यात नवरात्रात पाळली जाते. नवरात्रात अष्टमीच्या दिवशी तांदळाच्या उकडीचा मुखवटा करून त्याची पूजा करण्याची प्रथा पेशवा घराण्यात वर्षांनुवर्षे चालत आली आहे. यानिमित्ताने अनेकजण दर्शनासाठी येतात. घटस्थापनेच्या दिवशी गहू पेरायचे आणि देवीसमोर लावलेल्या छोटय़ाशा शेतात जे गहू उगवतात ते दसऱ्याला सोनं म्हणून द्यायचे, अशीही एक प्रथा पेशवा घराण्यात आहे. दसऱ्याचं हे सोनं अशा वेगळ्या पद्धतीनं लुटलं जातं. बाकी सगळे सण-उत्सव नेहमीच्याच पद्धतीनं साजरे केले जातात. त्यात घराण्याचं म्हणून काही वेगळेपण नाही.
पेशवे म्हणून जगताना या मंडळींना काय अनुभव येत असतील याची उत्सूकता खूपजणांना असते. अनुभव दोन्ही प्रकारचे असतात. डॉ. विनायकराव, महेंद्र, पुष्कर यांच्या गाठीशी असे खूप अनुभव आहेत. एक मोठा वर्ग असा आहे की- मुख्यत: नवी पिढी.. या पिढीला पेशवे हे प्रकरणच माहिती नाही. त्यामुळे इतर अनेक आडनावं तसंच पेशवा हे एक आडनाव अशी त्यांची धारणा असते. पण त्याबरोबरच ज्यांना पेशव्यांचा इतिहास माहीत आहे, ज्यांना थोरल्या बाजीरावांचे असाधारण कर्तृत्व माहिती आहे, त्यांच्याकडून मात्र खूपच वेगळा अनुभव येतो. अशी मंडळी पेशवा कुटुंबीयांविषयी आजही खूप आदर व्यक्त करतात. मनापासून आस्था दाखवतात. हे आडनाव ऐकलं तरी लोकांकडून कृतज्ञतेची भावना व्यक्त होते. पेशवा घराण्यातील वंशज म्हणून आजच्या पिढीकडेही कौतुकानं बघितलं जातं. डॉ. विनायकरावांची वेगवेगळ्या निमित्तानं खूप भ्रमंती झालेली आहे. विद्यार्थ्यांना भूगोलाच्या अभ्यासासाठी ते विविध ठिकाणे दाखवण्यासाठी घेऊन जात, तर कधी पर्यटनाच्या निमित्ताने कुटुंबीयांबरोबर प्रवास घडे. अशा भ्रमंतीत पेशव्यांविषयी असलेल्या औत्सुक्याचा अनुभव त्यांना जागोजागी आलेला आहे. असेच इतरही खूप अनुभव या मंडळींना येत असतात. काही वेळा त्यातून मजेदार प्रसंगही घडतात. इतिहासाच्या धडय़ात पेशव्यांचा उल्लेख वाचल्यानंतर जवळच्याच एका मुलाने घरी खूप हट्ट धरला की, मला आपल्या घराजवळ जे पेशवे राहतात त्यांना भेटायचंय. त्यांना बघायचंय. त्याची समजूत कशी काढणार? अखेर त्याला घेऊन त्याची आई पेशव्यांकडे आली. मुलाच्या कल्पनेतले पेशवे म्हणजे त्याने इतिहासाच्या पुस्तकातील चित्रात पाहिलेले पेशवे. तेच चित्र त्याच्या मनात पक्कं होतं. मात्र, घराचा दरवाजा उघडताच जे कोणी पेशवे त्याने पाहिले, ते अगदी ‘नॉर्मल पेशवे’ निघाले. तरीही आपण पेशव्यांना बघितलं हा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता.
महेंद्र पेशवा यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. नव्यानं कोणाशी ओळख झाली की हमखास लोक गमतीनं म्हणतात, ‘अरे, तुम्ही तर पेशवे! तुम्हाला काय गरज आहे उद्योग-व्यवसायाची? ज्यांनी इतिहास वाचला आहे, ज्यांनी पेशवे वाचले आहेत, अशा मंडळींना मात्र पेशव्यांच्या वंशजांबद्दल खूप उत्सुकता असते, हा अनुभव त्यांना नेहमीच येतो. महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेशात पेशव्यांबद्दल खूप आस्था आणि आदर असल्याचा अनुभवही पेशवा वंशजांना येतो.
महेंद्र यांचे वडील कृष्णराव पेशवा. केंद्र सरकारमधील नोकरीनिमित्तानं त्यांचं वास्तव्य बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशात होतं. शिक्षणासाठी त्यांनी महेंद्र यांना पुण्यात ठेवलं. महेंद्र यांचा अनुभव असा की, पुण्यात जेवढी पेशव्यांविषयी माहिती लोकांना आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक जाण वा माहिती आणि आदर उत्तर प्रदेशात आहे. पेशव्यांना असलेलं जनमानसातील आदराचं स्थान तिकडे जाणवतं. पानिपतच्या रणसंग्रामाचा स्मृती समारंभ असो किंवा पेशव्यांविषयीचा एखादा कार्यक्रम असो; पेशवा घराण्यातील मंडळींना त्या ठिकाणी बहुमान दिला जातो, त्यांचा सन्मान केला जातो, असा महेंद्र यांचा अनुभव आहे- जो ते कधीच विसरू शकत नाहीत.
पेशवा आडनावामुळे येणारं अपेक्षांचं काहीसं ओझं असलं तरी एका गोष्टीबद्दल मात्र पेशव्यांच्या वंशजांसमोर तसा कोणताही प्रश्न वर्तमानकाळात उभा राहत नाही. इतर अनेक संस्थाने, राजेराजवाडे यांच्या पुढील पिढय़ांसमोर पूर्वजांकडून आलेली आणि गावोगावी पसरलेली विविध प्रकारची स्थावर मालमत्ता, जमीनजुमला जपण्याचे, त्यांची देखभाल करण्याचे प्रश्न वर्तमानकाळात निर्माण झाले आहेत. हे ओझं पेशवा घराण्यातील नव्या पिढय़ांवर बिलकूल नाही. कर्तृत्वानं मिळवायचं, ते राखायचं आणि ते वाढवायचं, हीच या घराण्यावर असलेली जबाबदारी. अशा घराण्यांमधील वंशजांवर दुसरी महत्त्वाची जबाबदारी असते, ती आपल्या दिग्गज पूर्वजांचं नाव कायम राखण्याची! कारण लोकांच्या मनात या घराण्यांबद्दल विशिष्ट प्रतिमा असते. त्यांच्यावर प्रचंड श्रद्धा असते. या दोन्ही कुटुंबातील पेशव्यांच्या वंशजांनी ही जबाबदारी चोख बजावल्याचं दिसतं.
खुद्द पेशव्यांना त्यांच्या पूर्वजांबद्दल काय वाटतं? महेंद्र आणि पुष्कर यांचा अनुभव असा की, शनिवारवाडा असो वा पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी अन्य कोणतंही ठिकाणं असोत- अशा ठिकाणी गेलं की नकळत ऊर अभिमानानं भरून येतो. आपल्या पूर्वजांचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो. या अभिमानातूनच या मंडळींनी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. बाजीराव पेशव्यांची जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम, पेशवा घराण्यातील इतरही पराक्रमी वीरांचे कार्यक्रम आयोजित करून स्मरण, ऐतिहासिक वास्तूंना भेटी देणाऱ्या सहलींचं आयोजन आदी अनेक उपक्रम करून ही मंडळी पेशव्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताहेत. व्याख्यानांचंही आयोजन केलं जातं. याच भावनेतून दहा वर्षांपूर्वी ‘मराठी राज्य स्मृती प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातूनही अनेक कार्यक्रमांचं आयोजन पुण्यात होत असतं. मुत्सद्दी, युद्धनीतीनिपुण आणि अपराजित योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव यांच्यावर टपाल तिकीट निघावं यासाठी बाजीराव पेशवेप्रेमींनी आणि पेशवा यांच्या नव्या पिढीनं अथक प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश आलं आणि प्रत्यक्ष तिकीट प्रकाशनाचा कार्यक्रम ज्या दिवशी झाला, तो दिवस पेशव्यांच्या नव्या पिढीसाठी मैलाचा दगड ठरला.
पण असं असलं तरी या मंडळींनी पेशवा आडनावाचं अवडंबर माजवलेलं नाही, हेही जाणवत राहतं. किंबहुना, साधी राहणी हीच त्यांची खासीयत. कोणताही बडेजाव न करता आयुष्य जगायचं, नेटकं राहायचं, ही या घराण्याची रीत. रोजचं जगणं आणि इतिहासातलं जगणं यात महद्अंतर असतं. हे ज्या मंडळींच्या लक्षात येत नाही अशांची बहुश: परवड होते. ‘आम्ही असे होतो,’ ‘आमचे पूर्वज असे होते,’ अशा कथा वर्तमानात कधीतरी सांगणं ठीक असतं; पण त्याची सांगड वर्तमानाशी घातली जात नसेल तर मात्र गडबड होते. मग जुना थाटमाट, जुन्या प्रतिष्ठा वर्तमानात जपताना अकारण ताण येतो. आपल्या पूर्वजांना जो मान मिळाला तो आपल्यालाही मिळावा अशी अपेक्षा निर्माण होते. अनेक राजकीय घराण्यांमध्ये, वलयांकित व्यक्तींच्या घराण्यांत हे प्रकर्षांनं दिसतं. पेशव्यांच्या वंशजांनी मात्र ही गोष्ट जाणीवपूर्वक टाळली आहे. पुढच्या पिढय़ांवरही तसेच संस्कार केले जात आहेत. त्यामुळे आडनाव हे पुढच्या पिढय़ांसाठी ओझं झालेलं नाही. उलट, वर्तमान जगताना दोन्ही पेशवा कुटुंबीयांचं जीवन आनंददायी झालं आहे. खरं तर ही गोष्ट तशी खूप अवघड. माणसांना मानमरातब, पद, बडेजाव सोडवत नाही. हे सारं मिळवण्यासाठी अशी माणसं वर्तमानातही धडपडत राहतात. ‘रघुनाथ’मधून बाहेर पडताना मात्र मनात आलं- अरे, हे तर सहज भेटणारे पेशवे.. इतिहासाचं ओझं न वागवता जगणारे!

Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!