वाडी सुंदर, शिरोडा बंदर,
मोचेमाड गुळी, आरवली खुळी
अतिशाणो कुडाळ, गवळदेवाचो माळ
शिरोडा शिटुक आणि आरोंद्यान् रेडीच्या
xxत मारल्यान् बेटुक
मालवणी मुलखात गेल्या कित्येक पिढय़ांपासून प्रसिद्ध असलेले हे लोकगीत! या लोकगीतात सावंतवाडी संस्थानात समाविष्ट असलेल्या भूप्रदेशांची आणि तिथल्या लोकांची सगळी नमुनेदार भौगोलिक आणि सांस्कृतिक वैशिष्टय़े सामावलेली दिसतात. यात सावंतवाडीचा उल्लेख ‘वाडी सुंदर’ असा आला आहे, तोही यथार्थ असाच आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी सावंत-भोसल्यांनी सावंतवाडीला आपल्या संस्थानाची राजधानी बनवण्याआधी निसर्गसौंदर्याने संपन्न असलेल्या या प्रदेशाला ‘सुंदरवाडी’ असेच संबोधले जात होते. सुंदरवाडीला संस्थानाचे मुख्यालय केल्यावर सावंत-भोसले या राजघराण्याच्या नावावरून सुंदरवाडीचे नामकरण ‘सावंतांची वाडी’ म्हणून ‘सावंतवाडी’ असे केले गेले. या संस्थानात प्रारंभी कुडाळदेश व भीमगड (गोमंतकाचा पेडणे ते सांखळी असा काही भाग) या दोन परगण्यांचा समावेश होत असे. सावंत-भोसल्यांनी हे दोन्ही मुळात स्वतंत्र असलेले परगणे जिंकून त्यांचा समावेश आपल्या अधिपत्याखालील संस्थानात केला होता. मात्र पुढे इंग्रज, पोर्तुगीज, कोल्हापूरकर संस्थानिक, गोव्यातील बारदेशकर यांनी या परगण्यांतर्गत काही भागांवर कब्जा केला. त्यामुळे आज ‘सावंतवाडी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्थानामध्ये सावंत-भोसल्यांच्या ताब्यातील उर्वरित भूप्रदेशापैकी आंबोली, चौकुळ, गेळे, सुंदरवाडी, चऱ्हाटा, ओटवणे, माजगाव, बांदा अशा काही निवडक गावांचाच समावेश असल्याचे दिसते. तत्पूर्वी सावंतवाडी आणि आसपासचा सर्व प्रदेश विजापूरकरांच्या अंमलाखाली असताना १५५०-५५ च्या दरम्यान सावंत-भोसल्यांचे पूर्वज विजापूरच्या बादशहाच्या चाकरीच्या निमित्ताने या परिसरात आले आणि आदिलशाही राजवटीदरम्यान येथेच स्थिरावले. या सावंत-भोसले घराण्याचा पहिला ज्ञात कर्तबगार पुरुष मांग सावंत हा आदिलशाहीत सुभेदार होता. मूळच्या उदेपूर येथील शिसोदिया घराण्यातील असलेल्या मांग सावंताचे सूर्यवंशीय उपनाव ‘भोसले’ असे होते. सावंतवाडीजवळच्या होडावडे या गावात त्यांनी आपले मुख्य बस्तान बसवले होते. शेजारील मठ गावात त्यांची छत्री आहे. हा भाग आजही ‘मांगेल्याचा मठ’ या नावाने ओळखला जातो. या गावात सापडलेल्या शिलालेखावरूनही तत्कालीन राजकीय परिस्थितीविषयीची थोडीफार माहिती मिळते.
प्रारंभापासूनच हे संस्थान विजापूरकर ते इंग्रज अशांच्या सहकार्यावर अवलंबून आपला राज्यकारभार सांभाळत आल्याने अन्य संस्थानांच्या तुलनेत डोळे दिपवणारी आर्थिक संपन्नता येथे क्वचितच आढळते. दुसरे असे की, संस्थानचे बहुसंख्य राजे हे समाजाभिमुख व अध्यात्मप्रिय वृत्तीचे असल्यानेही त्यांनी रयतेवर ओझे टाकून व्यक्तिगत बडेजाव, ऐषोरामी जीवनशैली अपवादानेच स्वीकारलेली दिसते. त्यामुळेच लोकशाहीला पूरक ठरणाऱ्या सामाजिक समता, स्त्रीस्वातंत्र्याविषयी आदरभाव, सहकार अशा मूल्यांना या संस्थानात नेहमीच प्राधान्य दिले गेले. दलितांना मंदिरप्रवेश, स्त्रीशिक्षण, देवरायांच्या माध्यमातून पर्यावरणरक्षण, लोककलाकारांना उत्तेजन, सहकारी संस्थांच्या माध्यमातून गावाचा विकास, शेती व पिण्यासाठी पाणीपुरवठय़ाच्या सोयी अशा लोकहितकारी गोष्टींतून राजेशाहीऐवजी लोकशाही मूल्यांचीच रुजवण करण्याच्या दृष्टीने त्यांचे धोरण राहिले. म्हणूनच सावंतवाडीला कोकणातील अन्य राजकीयदृष्टय़ा सतत धगधगत असलेल्या गावांच्या तुलनेत सुसंस्कृत, संयमी व विवेकी बनवण्यामध्ये संस्थानाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
पहिल्या खेम सावंतांशी निगडित एक दंतकथा प्रचलित आहे. सावंत-भोसले घराण्याचा पहिला ज्ञात पराक्रमी योद्धा पुरुष मांग सावंत १५८० साली कुडाळदेशस्थ प्रभू यांच्याशी झालेल्या संघर्षांत मारला गेला. त्याच्या सात स्त्रियांपैकी सहाजणी त्याच्या दहनाच्या वेळी सती गेल्या. मात्र, त्याची एक पत्नी त्यावेळी गरोदर असल्यामुळे सती न जाता ओटवणे येथे तिच्या आप्तांकडे जाऊन राहिली. तिला झालेला मुलगा म्हणजे फोंड सावंत. या फोंड सावंताची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. त्याचा मुलगा खेम सावंत ओटवणे येथील वर्दे नावाच्या ब्राह्मणाकडे गुरे राखत असे. एकदा संध्याकाळपर्यंत तो परत न आल्याने त्याचा शोध घेत रानात गेलेल्या ब्राह्मणास तो एका वडाच्या झाडाखाली निजलेला दिसला. त्याचवेळी खेम सावंताच्या डोक्यावर एक नाग फणा काढून असलेला त्याने पाहिला. त्यावरून हा मुलगा पराक्रमी निपजेल, स्वतंत्र राज्य स्थापन करेल असे भाकीत त्याने केले. पुढे खेम सावंताने विजापूरकरांच्या चाकरीत राहून त्यांच्या साहाय्याने स्वत:चे सन्य तयार केले. काही प्रांत जिंकून घेऊन चराठा भागात आपली सत्ता स्थापन करून सावंतवाडी संस्थानची मुहूर्तमेढ रोवली. सावंत-भोसल्यांच्या राजसिंहासनावर असलेली नागाची प्रतिमा किंवा ओटवणे येथे नागाच्या दगडी प्रतिमेचे पूजन करण्याची प्रथा यामुळेच निर्माण झाली असावी असे वाटते.
लखम सावंत, नार सावंत, फोंड सावंत (दुसरे), जयराम सावंत, श्रीराम सावंत, बापूसाहेब महाराज (१८९७- १९३७) हे त्यानंतरचे सावंतवाडीचे राजे! सावंतवाडी संस्थानाला लाभलेल्या बहुतांश राजांची कारकीर्द अल्पकालीन होती. मात्र, तरीही त्यांतील बहुतेकांनी प्रजेच्या कल्याणार्थ अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. केवळ सावंतवाडी संस्थानावरच नव्हे, तर आसपासच्या परिसरातील जनजीवनावरही या योजनांचा प्रभाव पडल्याचे दिसून येतो. पंचम खेम सावंत ऊर्फ बापूसाहेबमहाराजांच्या काळात (१९३०) महात्मा गांधी आंबोलीला प्रकृतिस्वास्थ्यासाठी काही काळ येऊन राहिले होते. त्यावेळी बापूसाहेब महाराजांनी म. गांधींना निसर्गसंपन्न रांगणा, मनोहर-मनसंतोषगड पाहायला नेण्याची व्यवस्था केली होती अशी नोंद सापडते.
पाणीपुरवठय़ासाठी नसर्गिक झऱ्यांचा केलेला वापर, दलितोद्धारासाठी व सामाजिक समतेसाठी केलेले कायदे, विविध कोटकिल्ल्यांचा नितांतसुंदर परिसर याविषयी जाणून घेतल्यावर म. गांधींनी बापूसाहेब महाराजांना ‘रामराजा’ व त्यांच्या कारभाराला ‘रामराज्य’म्हणून गौरवले होते.
संस्थानातील बहुसंख्य लोकांच्या उपजीविकेचा मुख्य व्यवसाय शेती हाच असल्याने रयतेच्या शेतीला पाणीपुरवठा व्हावा म्हणून बापूसाहेब महाराजांनी बांधलेले तलाव आजही उपयुक्त ठरत आहेत. छोटे संस्थान, मर्यादित महसूल, परकीय आक्रमणाची सततची धास्ती, ब्रिटिशांची करडी नजर अशा सगळ्या प्रतिकूल गोष्टी असूनही रयतेच्या कल्याणामध्ये कोणतीही कसर राहू नये यासाठी बापूसाहेब महाराज नेहमीच काळजी घेत. स्वत: फिरून जनतेमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर त्यांचा भर असे. स्वतंत्र कृषी खाते निर्माण करून शेतीसाठी पुरविलेल्या अशा सुविधा, आरोग्य, स्त्रीशिक्षण, व्यसनमुक्ती यासाठी केलेले प्रयत्न, गांधीजींच्या सूतकताईच्या प्रयोगाचा प्रसार, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी रात्रशाळांची सोय, फिरते वाचनालय, बलसंवर्धनासाठी व्यायामशाळा, देशी-विदेशी खेळांना प्रोत्साहन, सहकारी पतसंस्थांची स्थापना यांमधून त्यांची सामाजिक बांधिलकीची वृत्ती व दूरदृष्टी दिसून येते. सावंतवाडी आणि परिसरातील लोकांसाठी अतिशय उपयुक्त ठरलेले जानकीबाई प्रसूतिगृह महाराजांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ स्वखर्चाने बांधले होते. ते आजही कार्यरत आहे. अशा लोकोपयोगी संस्थांच्या व कार्याच्या रूपाने या लोकराजाच्या स्मृती सावंतवाडी संस्थानाच्या जनतेच्या मनात कायम राहिल्या आहेत.
सावंतवाडी संस्थानाला लागूनच असलेल्या गोमंतकातील पेडणे महाल, सत्तरी, मंगेशी, काणकोण तसेच अन्य ठिकाणी असलेल्या देवस्थानांमध्ये देवाच्या सेवेकरी म्हणवल्या जाणाऱ्या भाविणी, नायकिणी, देवदासी अशा स्त्रियांचे शोषण व अवहेलना करणाऱ्या प्रथा प्रचलित होत्या. सावंतवाडी संस्थानाशी संबंधित असलेल्या व नजीकच्या काही देवस्थानांमध्येही अशा प्रथा रूढी व परंपरेच्या नावाखाली सुरू होत्या. मात्र, स्त्रीसुधारणाविषयक कळकळ असलेल्या बापूसाहेब महाराजांनी संस्थानामध्ये देवदासी प्रतिबंधक कायदा करून या प्रथा बंद करायला लावल्या. सावंतवाडी संस्थानामध्ये समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आणि स्त्रियांना आत्मसन्मान प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने स्वातंत्र्यपूर्व काळात उचलले गेलेले हे एक महत्त्वाचे पाऊल होते, हे नक्की. स्त्रीला सन्मानाची वागणूक देण्याचा हा वारसा संस्थानाच्या विलीनीकरणानंतर आज सावंत-भोसले राजघराण्याच्या वर्तमान पिढीतील मंडळींनीही कायम राखला आहे. महिलांसाठी स्वतंत्र आरोग्यसुविधा देणाऱ्या संस्था, शाळा, वसतिगृह, शासनसंस्थेतील सहभाग, कलाप्रशिक्षण केंद्र अशा माध्यमांतून स्त्री-सक्षमीकरणासाठी संस्थानशी संबंधित मंडळी जातीनिशी साहाय्य करत असतात. यामुळेच जानकीबाई सूतिकागृह, राणी पार्वतीदेवी हायस्कूल, पंचम खेमराज कॉलेज इत्यादी ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांत स्त्रीवर्गाचा सहभाग लक्षणीय आहे.
गावोगावच्या ग्रामदैवतांचे वार्षिक उत्सव, दसऱ्यासारखे काही सण इत्यादींच्या निमित्ताने रेडा, बकरा यांसारखे पशू बळी देण्याची अमानुष प्रथाही परंपरेने संस्थानातील काही गावांमधून चालत आलेली होती. प्राण्यांविषयीच्या भूतदयेपोटी व पर्यावरणरक्षणाच्या हेतूने पशूबळी प्रतिबंधक कायदाही सावंतवाडी संस्थानात करण्यात आला. त्याची काटेकोर अंमलबजावणी आजही होत असल्याने कोकणातील अन्य गावांच्या तुलनेत सावंतवाडीत सण-उत्सवांच्या निमित्ताने होणाऱ्या रूढी व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी पशुहत्या फारशी आढळत नाही.
सामाजिकतेच्या बरोबरीने विधायक सांस्कृतिक दृष्टिकोन असलेला असाही हा राजा होता. संस्थान परिसरातील दशावतारी नाटके, गोफनृत्य, धनगर समाजाचे चपयनृत्य, विविध जातीजमातींच्या पारंपरिक लोककला, लोकगीत, भजन, स्त्रीगीते यांना उत्तेजन मिळावे म्हणून त्याकाळी विविध धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने या लोककलाकारांचे वार्षिक मेळे भरवले जात. कलाकारांना त्यांच्या कला लोकांसमोर पेश करण्याची संधी दिली जाऊन त्यांना सन्मानपूर्वक बिदागी दिली जाई. आजच्या काळात भरणाऱ्या साहित्यिक-सांस्कृतिक संमेलनांसारखे काहीसे या मेळ्यांचे स्वरूप असे. आजही जिल्ह्य़ात अन्य कुठेही नाही इतक्या मोठय़ा प्रमाणावर वेगवेगळ्या सांस्कृतिक सोहळ्यांनिमित्ताने सावंतवाडीत पारंपरिक लोककला सादर केल्या जातात. साहित्य संमेलने, काव्यसंमेलन, ग्रंथमेळावे, लोककला महोत्सव अशा साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांचे येथे सातत्याने आयोजन केले जाते. कणकवली, कुडाळ यांसारख्या राजकीयदृष्टय़ा सतत अशांत असलेल्या गावांशी तुलना करता सावंतवाडी राजकीय व सामाजिकदृष्टय़ाही नेहमीच सुसंस्कृत राहिली आहे, याची कारणेही इथल्या संपन्न सांस्कृतिक वातावरणात असू शकतात. एकूणच, सावंतवाडीला जिल्ह्य़ाची सांस्कृतिक राजधानी म्हटली जावी अशा प्रकारची श्रीमंती या सुंदरवाडीने जपली आहे. त्यामागे बापूसाहेब महाराजांनी सुरू केलेली ही परंपरा कारणीभूत आहे.
साधारण तीन-साडेतीनशे वर्षांपासून सावंतवाडीत लाकडी खेळणी बनवणाऱ्या कलाकारांची घराणी वास्तव्यास आहेत. मूळच्या राजस्थानच्या असलेल्या या चिताऱ्यांनी या भागातील जंगलांतून विपुल प्रमाणात सापडणाऱ्या पांगारा या झाडांसाठी येथे वास्तव्य केले होते. या झाडाचे खोड वजनाने हलके, मऊ आणि टिकाऊ असते. त्यामुळे त्याच्यावर कोरीवकाम करण्याच्या दृष्टीने ते अतिशय उपयुक्त ठरते. अशा झाडांच्या लाकडाच्या शोधात आलेल्या या कलाकारांना सावंतवाडीकर संस्थानिकांनी केवळ राजाश्रय दिला नाही, तर त्यांची कला अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी म्हणून साहाय्यही केले. या चितारी कलावंतांनी लाखकाम करून बनवलेल्या ‘गंजिफा’ या श्रीमंत व राजेलोकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या खेळाच्या गोलाकार लाकडी चकत्या, ‘ठकी’सारख्या वेगवेगळ्या आकर्षक बाहुल्या, विविध फळांच्या प्रतिकृती, अन्य खेळणी यांची भारतात सर्वत्र प्रसिद्धी व्हावी, त्यांना मागणी यावी यासाठी जयरामराजे, शिवरामराजे, राजमाता सत्त्वशीलादेवी यांनी मोठय़ा प्रमाणावर प्रयत्नकेले. आजही येथील राजवाडय़ात असलेला लाकडी खेळणी बनवण्याचा कारखाना पाहायला मिळतो. सत्त्वशीलादेवींच्या प्रोत्साहनामुळे अनेक नवनव्या कलाकारांना ही पारंपरिक कला शिकण्याची आणि त्यातून स्वयंरोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
सावंतवाडी संस्थानातील गावांना नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून १८९३ पासून नळपाणी योजना सुरू करण्यात आली. जयरामराजांच्या काळात केसरी या सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांत वसलेल्या गावात असलेल्या नसर्गिक जलस्रोतांचे पाणी सावंतवाडीतील चिवार टेकडी येथे आणून तेथून सर्वत्र पुरवले जात असे. या चिवार टेकडीला हे नाव तेथे असलेल्या ‘चिवा’ किंवा ‘चिवारी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या बांबूच्या एका प्रजातीवरून पडले आहे. साहित्यिक कै. वि. स. खांडेकर सावंतवाडी मुक्कामी असताना त्यांचे फिरायला जाण्याचे हे एक आवडते ठिकाण होते.
सावंतवाडी संस्थान हे भारतातील अन्य संस्थानांप्रमाणे आर्थिकदृष्टय़ा संपन्न आणि सुरक्षित कधीही नव्हते. एका बाजूने कोल्हापूरकर, दुसऱ्या बाजूने पोर्तुगीज, याशिवाय कुडाळदेशकर, विजापूरचा आदिलशहा, इंग्रज आणि छत्रपती शिवाजीमहाराजांशी घेतलेले वैर यांमुळे सतत या संस्थानात राजकीय अस्थिरता राहिली. याचा परिणाम आर्थिक स्थर्यावर झालेला दिसतो. मात्र, असे असले तरी समाजसुधारणा, त्यासाठी आवश्यक असलेली बांधकामे, सांस्कृतिक संस्था, वास्तू यांचा संपन्न वारसा निर्माण करण्याचे आणि तो जतन करण्याचे महत्त्वाचे काम या संस्थानाने केले.
सावंतवाडीतील माठेवाडा येथे असलेले स्वयंभू आत्मेश्वर मंदिर, ओटवण्याचे रवळनाथ मंदिर, आकेरी येथील काष्ठ व दगडी शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेले रामेश्वर मंदिर अशी अनेक प्राचीन मंदिरे संस्थानकाळापासून भाविकांची श्रद्धास्थान बनून राहिली आहेत. या मंदिरांच्या स्थापनेमागे येथील अनेक संस्थानिकांशी संबंधित दंतकथाही प्रचलित आहेत. आकेरी येथील रामेश्वराचा कलात्मक लाकडी रथ श्रीराम महाराजांनी बनवून घेतला होता. पहिल्या खेम सावंतांच्या काळात माठेवाडय़ातील आत्मेश्वर मंदिरातील बारमाही जिवंत पाणी असलेली तळी बांधून घेण्यात आली. या ठिकाणी तेव्हा असलेल्या घनदाट जंगलात दामोदर भारती या साधूपुरुषाचे वास्तव्य होते. खेम सावंत शिकारीसाठी या जंगलात आले असता त्यांना तहान लागल्याने भटकत ते या साधूपुरुष असलेल्या जागेपाशी आले. आपल्या हातातील त्रिशूल जमिनीत मारून पाणी काढून त्यांनी राजांची तहान शमवली. तेथेच पुढे ही तळी बांधण्यात आली. आजही त्यातून अखंड पाणी पाझरताना दिसते. दामोदर भारती यांची समाधीही या मंदिरापाशीच आहे. या मंदिरांना पूजाअर्चा, उत्सव इत्यादी खर्चासाठी संस्थानकाळात जमिनी व इनामे देण्यात आली. संस्थानातील अनेक राजांशी येथील योगीपुरुषांशी निगडित अशा कथा इथल्या जनमानसात प्रचलित आहेत.
संस्थानी काळातील अनेक वास्तू, देवालये, स्मारके इ. वास्तु हे शिल्पकलेचे अप्रतिम नमुने आहेत. सावंतवाडीकर भोसल्यांचा तीनशे वर्षांपूर्वीचा जुना राजवाडा सावंतवाडीच्या पश्चिमेला असलेल्या नरेंद्र डोंगरावर बांधलेला होता. आज त्याचे केवळ अवशेष शिल्लक असले तरी एका दुर्गम ठिकाणात केले गेलेले गडकोटाचे वैशिष्टय़पूर्ण बांधकाम म्हणून त्याचे महत्त्व नाकारता येत नाही. जायबंदी राजाला घेऊन या राजवाडय़ापर्यंत गेलेल्या घोडय़ाचे डोंगराच्या पायथ्याशी दगडी स्मारकही आहे. या घराण्यातील एक पराक्रमी राजा म्हणून ओळख असलेल्या जयरामराजे सावंत यांच्या ‘बोरमाणकी’या घोडीचंही स्मारक बांदा येथे आहे. या राजाने कुडाळ कोटाच्या जवळ ‘घोडेबाव’ नावाची एक मोठी विहीर बांधली होती. स्वाराला घोडय़ावरून खाली न उतरताच त्याला पाणी पाजण्यासाठी पायऱ्या उतरून पाण्यापर्यंत जाता यावे, या उद्देशाने या विहिरीची रचना केलेली आहे. आजही ही वैशिष्टय़पूर्ण विहीर अस्तित्वात आहे. सुंदरवाडीला संस्थानाची राजधानी बनवल्यानंतर रमणीय मोती तलावाकाठी बांधला गेलेला नवा राजवाडा, त्याचे कमानीदार प्रवेशद्वार, राणीमहालाची इमारत, न्यायालयीन इमारत, संस्थानकालीन विठ्ठल मंदिर, आत्मेश्वर मंदिर, आकेरीचे रामेश्वर मंदिर, संस्थानकाळात सावंतवाडीचे प्रवेशद्वार असलेला कोलगाव दरवाजा, संस्थानिकांच्या स्मरणार्थ बांधलेली माठी अशा काही वास्तू शैलीदार बांधकामासाठी पाहता येतील. पर्यटक, इतिहासप्रेमी आणि वास्तुशिल्पकलेचे अभ्यासक यांच्यासाठी संस्थानकालीन अशा अनेक वास्तू कायम आकर्षण ठरत आल्या आहेत. सावंतवाडी संस्थानच्या पूर्वेकडे असलेल्या सह्य़ाद्री पर्वतरांगांमध्ये बांधलेले संस्थानी काळातील अनेक किल्ले इतिहासाचे अभ्यासक, दुर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरावेत असे आहेत. त्यापैकी माणगाव-शिवापूरजवळील दुर्गम खोऱ्यात असलेले मनोहर-मनसंतोष गड हे जुळे किल्ले वैशिष्टय़पूर्ण आहेत. संस्थानचे गतवैभव आज अनुभवण्यासाठी राजवाडा, विविध महाल व हे किल्ले यांचेच साहाय्य घ्यावे लागते.
सावंतवाडीकर राजघराण्याने प्रारंभापासूनच आध्यात्मिक शिकवण देणारे संत, साक्षात्कारी पुरुष, कवी व पंडित यांना आश्रय दिला. त्यांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांना किंवा त्यांच्या समाधीस्थळांना श्रद्धास्थानांचा दर्जा देऊन त्यांचे जतन केले. १७८० मध्ये तेलंगणातून आलेल्या कुंदबोयझल नावाच्या पंडिताने राजश्री खेम सावंताच्या आज्ञेवरून ‘सामंतविजय’नावाचा ग्रंथ रचला होता. त्यात सावंत-भोसले घराण्याच्या आद्यपिढय़ांविषयी गुणगान केले होते. ‘अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, हरीभजनाविण काळ घालवू नको रे’ असा संदेश देणारे संतकवी सोहिरोबानाथ आंबिये यांचे वास्तव्य असलेले बांदा गाव, सोहिरोबानाथांना आत्मसाक्षात्कार ज्या टेकडीवर झाला तो परिसर या संस्थानिकांनी विशेष लक्ष पुरवून विकसित केला. बापूसाहेब महाराजांचे आध्यात्मिक गुरू असलेल्या संत साटम महाराज या अवलिया महापुरुषाचे वास्तव्य असलेला दाणोली हा आंबोलीच्या पायथ्याचा जंगली परिसराने वेढलेला भाग संस्थान काळापासून आजतागायत भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. तत्कालीन कुडाळ महालात समाविष्ट असलेल्या तेंडोली या गावी बागलाची राई हा एक नितांत रमणीय आणि दाट जंगली वनश्रीने नटलेला भाग आहे. या भागात पूर्णानंदस्वामी या महंतांचे वास्तव्य होते. तेथे त्यांचे शिष्य चिदानंदस्वामींचाही मठ आहे. आधुनिक मराठी साहित्यातील एक प्रतिभावंत कवी व लेखक कै. आरती प्रभू तथा चिं. त्र्यं. खानोलकर यांची चिदानंदस्वामींवर विशेष श्रद्धा होती. त्यांच्या कवितांमध्येही याचे संदर्भ सापडतात. याखेरीज सद्गुरू मियाँसाहेब हे अवलिया पुरुषही हिंदू व मुस्लीम भाविकांमध्ये लोकप्रिय असलेले महंत होते. अशा सर्व संत-महंतांना संस्थानच्या मंडळींनी आश्रय दिला होता. कुणकेरी येथील देवी भवानीचा वार्षिक हुंडा महोत्सवही संस्थानच्या राजांच्या प्रेरणेतून लोकप्रिय झाला. जात-धर्म विसरून सर्व स्तरांतील लोक या उत्सवात उत्साहाने सहभागी होताना दिसतात. लोकसंघटन, जनजागृती, जातपातविरहित समता या आंतरिक उद्देशानेच अशा श्रद्धा व उत्सवांना संस्थानच्या राजांनी नेहमी पाठिंबा दिलेला दिसतो. आजही ही समाधीस्थळे, वार्षिक उत्सव यांसाठी संस्थानातर्फे सहकार्य केले जाते. यातील अनेक श्रद्धास्थळांच्या विश्वस्त मंडळावरही संस्थानच्या आजच्या पिढय़ांतील मंडळी कार्यरत आहेत.
बापूसाहेब महाराज सावंत-भोसले यांनी रयतेच्या मुलांसाठी फिरत्या वाचनालयाची योजना राबवली होती. त्यांच्या वडिलांच्या नावाने उभारलेले श्रीराम वाचन मंदिर गेल्या १६० वर्षांपासून या परिसरातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र बनून राहिले आहे. बापूसाहेबमहाराज हे शिक्षणप्रेमी व आधुनिक विचारांचे संस्थानिक होते. विशेषत: स्त्रिया आणि दलितांना शिक्षण मिळून त्यांच्या आत्मोद्धाराची संधी त्याद्वारे त्यांना मिळाली पाहिजे असे त्यांचे विचार होते. त्यासाठी खास मुलींची शाळा त्यांच्या काळात सावंतवाडीत त्यांनी सुरू केली. १८९०-९१ मध्ये आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. सावंतवाडीतील वास्तव्यात त्यांनी ‘संध्याकाळ’ ही प्रसिद्ध कविता लिहिली. याच शाळेचे नामकरण पुढे बापूसाहेब महाराजांच्या पत्नीच्या नावे ‘राणी पार्वतीदेवी हायस्कूल’ असे करण्यात आले. बेळगाव येथेही याच नावाचे कॉलेज अस्तित्वात आहे, तेही मूळचे ‘राणी पार्वतीदेवी हायस्कूल’ होय. प्लेगच्या साथीमुळे बेळगाव येथे काही काळासाठी त्याचे स्थलांतर करण्यात आले होते. नंतर त्याच नावाने तेथे स्वतंत्र कॉलेज सुरू करण्यात आले. सावंतवाडीतील आजची राणी पार्वतीदेवी हायस्कूलची इमारत ही मुळात संस्थानच्या मालकीची राणीमहालाची वास्तू होती. मात्र, ९९ वर्षांच्या नाममात्र भाडेकरारावर ही इमारत हायस्कूल चालविणाऱ्या ‘शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आली. पंचम खेमराज ऊर्फ बापूसाहेब महाराज यांच्या नावाने चालविण्यात येणाऱ्या महाविद्यालयाची इमारत हीसुद्धा मुळात राजप्रासाद होता. या वास्तूसह आसपासची २० ते २५ एकर जागा या शिक्षणसंस्थेला देण्यात आली. संस्थानातील मंडळींची शिक्षणाविषयीची आस्था व सामाजिक उत्तरदायित्वातून कोणत्याही भौतिक लाभाची अपेक्षा न करता संस्थानच्या मालकीच्या वास्तू व जमिनी विविध संस्थांना समाजोपयोगी कामांसाठी देण्यात आल्या आहेत. शाळा व कॉलेज इमारतींप्रमाणेच हॉस्टेलची इमारत, तालुका न्यायालयाची इमारत, एस्. टी. स्टॅन्डचा परिसर (जिथे पूर्वी संस्थानच्या मालकीची घोडय़ांची पागा होती.), प्रशासकीय कार्यालयांसाठी दिलेला नव्या राजवाडय़ातील काही भाग अशा अनेक बाबींचा उल्लेख करता येईल. सावंतवाडीकर संस्थानिक कोल्हापूर, सातारा या अन्य संस्थानांशी तुलना करता ऐश्वर्यसंपन्न नसतानाही विलीनीकरणानंतर संस्थानच्या मालकीच्या जुन्या वास्तू, पॅलेस इ. कोल्हापूर वा अन्य संस्थानांप्रमाणे हॉटेल, म्युझियम्स वगरेंत रूपांतरीत न करता शैक्षणिक व शासकीय संस्थांना विनामूल्य वा नाममात्र मोबदल्यात दिल्या गेल्या आहेत. यामागे या संस्थानाने सतत जाोपासलेला भारतीय संस्कृतीतील संतत्वाचा निरिच्छवादी विचार, सामाजिक ऋणातून मुक्त होण्याची उदात्त भावना या गोष्टीही असू शकतात.
सावंतवाडी संस्थान विलीन होण्यापूर्वी राजेपदाची धुरा सांभाळलेले शेवटचे अधिकृत संस्थानिक कै. शिवरामराजे भोसले यांनी महसूल व न्याय क्षेत्राच्या अभ्यासाबरोबरच सैनिकी प्रशिक्षणही घेतले होते. विलीनीकरणानंतर देशाच्या व राज्याच्या राजकारण-समाजकारणात ते सक्रिय राहिले. काँग्रेस पक्षात सामील होऊन त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ व लोकसभेसाठी राजापूर मतदारसंघातून निवडणुका लढविल्या. लोकसभा निवडणुकीत त्यांना जनता दलाच्या प्रा. मधु दंडवतेंकडून पराभव स्वीकारावा लागला असला तरी १९५७ ते १९७३ या कालावधीत सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून जाऊन त्यांनी सावंतवाडीचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्र राज्य नागरिक सुरक्षा कमिटी, राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र विधानसभा कायदे मंडळ, वनविभाग सल्लागार मंडळ, हस्तकला मंडळ, अल्पबचत सल्लागार समिती, निवृत्त सैनिक पुनर्वसन निधी समिती अशा शासकीय समित्यांवर त्यांनी उल्लेखनीय काम केले. शिवरामराजांना संगीत, चित्रकला, हस्तकला यांत उत्तम गती होती. सावंतवाडी संस्थानातील लाकडी खेळणी बनवणाऱ्या पारंपरिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावे व त्यांची कला राज्याबाहेरही पोचावी म्हणून त्यांनी विशेष परिश्रम घेतले. निवडक कलाकारांना प्रशिक्षण देणे, विविध राज्यांतील अन्य लोककलाप्रकारांशी व कलाकारांशी त्यांचा परिचय करून देणे, सावंतवाडीतील चिताऱ्यांनी बनवलेल्या खेळण्यांना परदेशी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, प्रसार माध्यमांपर्यंत कलाकारांना नेऊन त्यांच्या कलेची ओळख करून देणे अशा अनेक प्रकारे त्यांनी या प्राचीन कलेला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी योगदान दिले. लाकडी खेळणी, काष्ठशिल्प, लाखकाम, गंजिफा खेळाच्या साहित्याची निर्मिती, विविध हस्तकला व्यवसाय, काथ्याकाम, महिला गृहोद्योग इ.ना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य हस्तव्यवसाय मंडळ’ या संस्थेची निर्मिती केली होती.
सध्या हयात असलेल्या शिवरामराजेंच्या पत्नी राजमाता सत्त्वशीलादेवी याही कलानिपुण असल्याने त्याही सावंतवाडीतील हस्तकला परदेशात पोहोचवण्यासाठी परिश्रम घेत असतात. त्या स्वत:ही एक उत्तम कलाकार असल्याने त्यांनी राजवाडा परिसरात कलात्मक वस्तूनिर्मितीचा कारखाना सुरू केला आहे. येथे बनवण्यात येणाऱ्या कलात्मक लाकडी वस्तूंना देशविदेशातून मोठी मागणी आहे. त्यात हिंदू पुराणांतील देवदेवता, दशावतार यांच्या पारंपरिक शैलीतल्या प्रतिमा चितारलेल्या गंजिफा, बुद्धिबळाच्या लाकडी सोंगटय़ा, बाहुल्या, मूर्ती, देव्हारे, चौरंग, काष्ठशिल्प, अभिषेकपात्रे, नारळाच्या करवंटीपासून बनवलेल्या प्रतिमा, देवाचे सामान, पेयपात्रे इ. वस्तू विशेष लोकप्रिय आहेत. या वस्तू बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा, कारखान्यातील नियोजन, व्यवस्थापन, विक्रीव्यवस्था, जाहिरात यासाठी या कलाकारांना संस्थानिकांच्या आजच्या पिढीतील मंडळींकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात आस्थेने मदत केली जाते. शिवरामराजे भोसले स्मृतिसंग्रहालयात सावंतवाडी संस्थानच्या गतेतिहासाच्या खाणाखुणा जपणाऱ्या ऐतिहासिक वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी सावंत-भोसले मंडळींनी इतिहासप्रेमींना मोलाचे सहकार्य केले आहे. राजमाता सत्त्वशीलादेवी यांचा पुत्र खेम सावंत सध्या बेंगरुळूला असतो.
सावंत-भोसल्यांच्या सुसंस्कृतपणाचे एक उदाहरण सहज देता येईल. विठ्ठल पुरुषोत्तम पिंगुळकर यांनी संस्थानच्या इतिहासाची दुर्मीळ साधने गोळा करून ‘सावंतवाडी संस्थानाचा इतिहास’ हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. हे पुस्तक छापण्यासाठी आर्थिक मदतीची गरज होती. मात्र, या ग्रंथात आजच्या काळाच्या दृष्टिकोनातून सावंतवाडीकर संस्थानाविषयी प्रतिकूल मत बनावे अशा अनेक गोष्टी होत्या. सावंत-भोसल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांना असलेला विरोध, विजापूरकर मुस्लीम सत्ताधीशांची मदत घेऊन शिवाजीराजे व कुडाळदेशकरांच्या विरोधात केलेल्या कारवाया, पोर्तुगीज व ब्रिटिश मालवाहू जहाजांची लूट, घराण्यातील भाऊबंदकी, हत्या, राजस्त्रियांची गुप्त कारस्थाने अशा काही गोष्टी ऐतिहासिकदृष्टय़ा सत्य असल्या तरी या संस्थानिकांची जनमानसातील प्रतिमा कलुषित करणाऱ्या होत्या. याची जाणीव असूनही संस्थानातर्फे या पुस्तकाच्या छपाईसाठी आर्थिक मदत देण्यात आल्याने हे पुस्तक अभ्यासकांसमोर येऊ शकल्याची कृतज्ञतापूर्ण नोंद लेखकाने प्रस्तावनेत केली आहे. इतिहासाची किंवा भूतकाळातील पूर्वजांची चिकित्सा करून काही ऐतिहासिक सत्य सांगू पाहणाऱ्याला आज अविवेकी झुंडशाहीच्या रोषाला कसे सामोरे जावे लागते, हे लक्षात घेता सावंतवाडीकरांनी दाखवलेला हा सुसंस्कृतपणा ठसठशीतपणे जाणवतो. कोल्हापूरच्या छत्रपती शाहूमहाराजांप्रमाणेच बापूसाहेब महाराजांच्या आठवणी आजही येथील लोकांच्या मनात ताज्या आहेत.

राजकारणापेक्षा समाजकारण करण्यावर नेहमी भर देणारे, राजेशाहीपेक्षा लोकशाही मूल्यांचा सातत्याने पाठपुरावा करणारे व आक्रमकता, हुकूमशाही, दंडेलशाही, मनगटशाही यापेक्षा विवेक, संयम, सुसंस्कृतता या मूल्यांवर विश्वास असणारे सावंत-भोसले घराण्यातील सर्वच संस्थानिक जनमानसामध्ये नेहमीच
‘वाडीचो राजा आमचो थोर
सावंत-भोसले कुळी सरकार
रयतेच्या हितास देती थार
तयांच्या औदार्या नाही पार
देवाजीचो जसो चोख येव्हार
तयांवरी संतकृपा अनिवार
दुमदुमे किरत प्रीतवीच्या पार..’
अशा आपुलकीच्या भावनेने चिरस्थान मिळवून राहिले आहेत.

Traditional and Kolhapuri style Maharashtrian Recipe Katachi Amti Gives more flavor to puranpolli Note recipe
झणझणीत, कोल्हापुरी स्टाईल ‘कटाची आमटी’; पुरणपोळीला देईल अधिक स्वाद, पाहा सोपी रेसिपी…
mla ruturaj patil praise shahu chhatrapati work
संकटकाळात शाहू छत्रपतींनी जिल्ह्याचे पालकत्व निभावले- आमदार ऋतुराज पाटील
khajina vihir Vitthal temple
सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल मंदिरात चोरी
do you see 700 year old Shiv temple in Pune
Pune : पुण्यातील ७०० वर्ष जूने प्राचीन शिवमंदिर पाहिले का? श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर महादेव मंदिराचा व्हिडीओ होतोय व्हायरल