मेष : स्वप्ने साकारतील
सतत कामात राहणे तुम्हाला आवडते. आपला महत्त्वाकांक्षी स्वभाव आपणास स्वस्थ बसू देत नाही. आपली साहसी, धाडसी वृत्ती आपणास यश मिळवून देत असते. नूतन वर्षी असेच काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घ्याल आणि ते पूर्ण कराल. हे नूतन वर्ष आपली स्वप्ने, इच्छा व आकांक्षा पूर्ण करणारे आहे.
ध्येयाचा ध्यास लागला की माणसास कामाचा त्रास वाटत नाही. आपलेही असेच आहे. कामे मनासारखी होईपर्यंत आपण स्वस्थ बसत नाही. वृषभ राशीतील गुरू ३१ मे २०१३ पर्यंत धनस्थानी शुभयोगात राहणार आहे. नोकरी-व्यवसायात छान प्रगती होईल. कर्तबगारीला संधीची जोड मिळेल.
नोव्हेंबर २०१२ : १६ नोव्हेंबपर्यंत तूळेचा सूर्य अनुकूल राहील. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. मनपसंत घटना घडतील. योग्य निर्णय घ्याल.
डिसेंबर २०१२ : प्रश्न सुटतील. ग्रहमान उत्तम आहे. सूचक घटनांद्वारे मार्गदर्शन मिळेल. अधिकारप्राप्ती होईल. नोकरीत बढतीच्या-आनंदाच्या बातम्या समजतील. आरोग्यात सुधारणा होईल. स्पर्धा, पैजा जिंकाल.
जानेवारी २०१३ : १४ जानेवारीपासून मकरेचा सूर्य अनुकूल होईल. आर्थिक लाभ होतील. उद्योगव्यवसायात प्रगती होईल. मंगळ, बुध, शुक्र, गुरू शुभयोगात आहेत. आरोग्य ठीक राहील. गृहसौख्य प्राप्त होईल.
फेब्रुवारी २०१३ : सूर्य, मंगळ, बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. प्रत्येक कामात यश मिळेल. आनंदवार्ता समजतील. नवीन ओळखी होतील. प्रवास कार्यसाधक होतील. विद्यार्थ्यांना यशप्राप्ती होईल.
मार्च २०१३ : महत्त्वाची कामे पूर्वार्धात करून घ्या. कुंभेचा सूर्य १४ मार्चपर्यंत अनुकूल राहील. उद्योगव्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल. स्पर्धा-पैजा जिंकाल. ग्रहमानाची मदत मिळेल. आरोग्य सुधारेल.
एप्रिल २०१३ : यत्न तो देव जाणावा. प्रयत्नात सातत्य ठेवावे. वृषभेचा गुरू शुभयोगात आहे. इतर ग्रहमान प्रतिकूल आहे. आरोग्यावर ताण पडेल. अनावश्यक खर्च टाळावा. संयमाने वागावे.
मे २०१३ : ३१ मेपर्यंत वृषभेचा गुरू अनुकूल राहील. महत्त्वाची कामे करून घ्या. ती यशस्वी होतील. वृषभेचा शुक्र शुभयोगात राहील. सुसंवाद साधाल. कामवाढ होईल. आरोग्यास जपावे.
जून २०१३ : १४ जूनपासून मिथुनेचा सूर्य पराक्रमस्थानी राहील. शुक्र अनुकूल आहे. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. इतरांना मदत कराल. आरोग्यास जपावे. बचतीकडे लक्ष द्यावे लागेल.
जुलै २०१३ : मिथुनेचा सूर्य १६ जुलैपर्यंत शुभयोगात राहील. मिथुनेचा मंगळ ४ जुलैनंतर अनुकूल होईल. शुक्र अनुकूल राहील. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. मनोबल वाढेल.
ऑगस्ट २०१३ : मिथुनेचा मंगळ पूर्वार्धात अनुकूल राहील. बुध-शुक्र शुभयोगात आहेत. प्रिय घटना घडतील. इस्टेटीचे प्रश्न सुटतील. कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळेल. विरोधक माघार घेतील.
सप्टेंबर २०१३ : १६ सप्टेंबरपासून कन्येचा सूर्य अनुकूल होईल. कामे मार्गी लागतील. मेहनतीस न्याय मिळेल. सामंजस्य दाखवाल. गृहसौख्य मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल.
ऑक्टोबर २०१३ : सूर्य-शुक्र शुभयोगात आहेत. अनपेक्षित लाभदायक घटना घडतील. आरोग्यात सुधारणा होईल. जमीनखरेदीमध्ये लाभ होतील. महिलांना गृहसौख्य लाभेल. आनंदवार्ता समजतील.
एकंदरीत हे वर्ष खूप चांगले जाणार आहे. ३१ मेपर्यंत म्हणजे पहिले सात महिने वृषभेचा गुरू धनस्थानी शुभ योगात असल्याने प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरी नसल्यास कामे मिळतील. नोकरी-व्यवसायात छान अर्थप्राप्ती होईल.
महिलांना हे वर्ष छान मन:स्वास्थ्य मिळवून देणारे आहे. कलाक्षेत्रात आणि गृहव्यवस्थापन क्षेत्रामध्ये छान यश मिळेल. मौल्यवान वस्तू खरेदी करता येईल.

वृषभ : दैव अनुकूल
आपले व्यवहारकौशल्य वाखाणले जाते. सहनशील वृत्ती आणि कामातील चिकाटी यामुळे प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी होत असता. कामे मनासारखी होईपर्यंत तुम्ही स्वस्थ बसत नाही. नूतन वर्षी आपणास देखणे यश प्राप्त होईल. तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या पार पाडाल.
माणसाचा स्वत:वर विश्वास असला की, दुसऱ्याविषयी विश्वास वाटू लागतो. तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येईल. विश्वासू माणसांचे वर्तुळ लाभेल.
ग्रहमान चांगले लाभले आहे. दैवाची मदत मिळेल. अनपेक्षित लाभदायक घटना घडतील. कर्तृत्वाला संधीची जोड मिळेल. हातून शुभकार्ये घडतील.
नोव्हेंबर २०१२ : ग्रहमान चांगले आहे. १६ नोव्हेंबपर्यंत तूळेचा सूर्य अनुकूल राहील. मनपसंत घटना घडतील. अनपेक्षित लाभदायक घटना घडतील. महिलांना आनंदवार्ता समजतील. स्वप्ने साकार होतील.
डिसेंबर २०१२ : ग्रहमान अनुकूल राहील. वैवाहिक सौख्य मिळेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. महिलांना मौल्यवान खरेदी करता येईल. आरोग्य ठीक राहील.
जानेवारी २०१३ : तूळेचा शनी षष्ठस्थानी शुभयोगात आहे. बुध-शुक्र शुभयोगात आहेत. प्रश्न सुटतील. मन:स्वास्थ्य मिळेल. कर्तृत्वाला संधीची जोड मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील.
फेब्रुवारी २०१३ : १२ फेब्रुवारीनंतर कुंभेचा सूर्य कर्मस्थानी शुभयोगात येईल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळेल. अर्थप्राप्ती होईल.
मार्च २०१३ : सूर्य, मंगळ, बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. कामे मार्गी लागतील. अर्थप्राप्तीत वाढ होईल. इतरांचे देणे फेडाल. प्रिय भेटीगाठी होतील. आरोग्यात सुधारणा होईल. आनंदवार्ता समजतील.
एप्रिल २०१३ : मीनेचा सूर्य १३ एप्रिलपर्यंत मदत करील. मंगळ. बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. प्रगती होईल. अनपेक्षित आर्थिक लाभ होतील. महिलांना मन:स्वास्थ्य मिळेल. स्पर्धा जिंकाल. प्रवास कार्यसाधक होतील.
मे २०१३ : ३१ मेपासून मिथुनेचा गुरू अनुकूल होईल. रेंगाळलेले प्रश्न सुटतील. गुरू-शनी शुभयोगात असल्याने प्रगती होईल. संधीचे सोने कराल. आरोग्यात सुधारणा होईल. कलावंतांना लाभ होतील.
जून २०१३ : ग्रहमान उत्तम आहे. तूळेचा शनी, मिथुनेचा गुरू शुभयोगात आहेत. इतरांचे सहकार्य मिळेल. उत्साह वाढेल. धार्मिक मंगल कार्यात भाग घ्याल. स्वप्ने साकार होतील. शरीरस्वास्थ्य, मन:स्वास्थ्य राहील.
जुलै २०१३ : दैवाची मर्जी राहील. अनपेक्षित लाभ होतील. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. इतरांची शाबासकी मिळवाल. हातून सत्कार्ये घडतील. प्रसंगावधान दाखवाल. महिलांना गृहसौख्य लाभेल.
ऑगस्ट २०१३ : महत्त्वाची कामे पूर्वार्धात करा. कर्केचा सूर्य १६ ऑगस्टपर्यंत अनुकूल राहील. धार्मिक कार्यात भाग घ्याल. बचत कराल. गृहसौख्य मिळेल. महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. अध्ययन ठीक चालेल.
सप्टेंबर २०१३ : नशिबाची साथ मिळेल. अनपेक्षित लाभ होतील. कर्तव्यपूर्तीसाठी वेळ व पैसे खर्च कराल. कार्यक्षमता वाढेल. मार्गदर्शन मिळेल. गृहव्यवस्थापन छान जमेल. महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल.
ऑक्टोबर २०१३ : १७ ऑक्टोबरपासून तूळेचा सूर्य अनुकूल होईल. कल्पकता दाखवाल. संयमाने वागाल. व्यवहारी राहाल. बुध, गुरू, शुक्र व शनी अनुकूल आहेत. प्रसन्नता लाभेल. अर्थप्राप्ती होईल. आरोग्य छान राहील.
या वर्षी उत्तम ग्रहमान लाभले आहे. तूळ राशीत राहणारा शनी वर्षभर अनुकूल आहे. ३१ मेपासून मिथुन राशीतील गुरू ग्रह धनस्थानी असल्याने शुभयोगात राहील. छान प्रगती होईल. वर्षांरंभी असलेले प्रश्न ३१ मेनंतर सुटतील. सर्व अडचणी दूर होतील. विरोधकांचा विरोध मावळेल. मार्गातील अडथळे दूर होतील. अर्थप्राप्ती चांगली होईल. राहत्या घराविषयीचे प्रश्न सुटतील.
महिलांना हे वर्ष गृहसौख्याचे आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळेल.

मिथुन : संयमाची गरज
आपली अभ्यासू वृत्ती खूप चांगली आहे. तुमची मते इतरांना व्यवस्थितपणे पटवून देत असता. तुमचे लिहिणे, बोलणे आणि कृती इतरांवर छाप पाडून जाते. प्रज्ञावंत म्हणून तुम्ही तुमच्या वर्तुळात ओळखले जाता. हे वर्ष जबाबदारी वाढविणारे असेल.
या वर्षी गुरू-शनीसारखे ग्रह आपणास मदत करू शकणार नाहीत. मेहनतीवरच भर द्यावा लागेल. प्रयत्नामध्ये सातत्य ठेवावे लागेल. बेफिकीर राहून चालणार नाही.
संयम, सावधानता आणि सहनशीलता ठेवावी लागेल. प्रलोभनांपासून दूर राहावे लागेल. म्हणजे हेही वर्ष प्रगतीचे जाऊ शकेल.
नोव्हेंबर २०१२ : सूर्य अनुकूल आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. आध्यात्मिक साधना यशस्वी होईल. मानसन्मान प्राप्त होतील. प्रिय भेटीगाठी होतील. प्रश्न कौशल्याने सोडवाल.
डिसेंबर २०१२ : पूर्वार्ध जास्त चांगला जाईल. प्रवास कार्यसाधक होतील. कार्यक्षमता वाढेल. मन:स्वास्थ्यास जपावे लागेल. पूर्वीच्या चुका दुरुस्त कराल. सुसंवाद साधून कामे कराल. व्यवहारचातुर्य दाखवाल.
जानेवारी २०१३ : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. ताणतणाव दूर होईल. धनूचा सूर्य पराक्रमस्थानी शुभयोगात राहील. मनोबल वाढेल. वेळेचा व संधींचा योग्य उपयोग कराल. स्पर्धा जिंकाल. आनंदप्राप्ती होईल.
फेब्रुवारी २०१३ : खर्च खूप होईल. संयमाने वागावे लागेल. प्रलोभनांपासून दूर राहावे लागेल. प्रश्न सामंजस्याने सोडवावेत. मन:स्वास्थ्यास जपावे लागेल. विरोधकांचा त्रास वाढेल. प्रयत्नात सातत्य ठेवावे लागेल.
मार्च २०१३ : १४ मार्चनंतर मीनेचा सूर्य अनुकूल होईल. छान प्रगती होईल. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. सहनशीलता, संयम व सावधानता ठेवावी लागेल. दूरदृष्टीने निर्णय घ्यावेत.
एप्रिल २०१३ : मेषेचा मंगळ १२ एप्रिलनंतर मदत करील. सूर्य, बुध व शुक्र अनुकूल आहेत. अर्थप्राप्तीत वाढ होईल. मनपसंत घटना घडतील. व्यवहारचातुर्य दाखवाल. प्रसंगावधान दाखवाल. यशस्वी व्हाल.
मे २०१३ : १४ मेपर्यंत मेषेचा सूर्य अनुकूल राहील. कामे यशस्वी होतील. अर्थप्राप्ती होईल. मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. नवीन आव्हाने स्वीकाराल. ती यशस्वी कराल. महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. अध्ययनात यश मिळेल.
जून २०१३ : मेहनतीवरच भर द्यावा लागेल. ग्रहमानांवर अवलंबून चालणार नाही. प्रलोभने टाळावीत. खर्च खूप होईल. कामात वाढ होईल. आरोग्यावर ताण पडेल. द्विधा मन:स्थिती राहील. निर्णय घेणे कठीण जाईल.
जुलै २०१३ : प्रयत्नात सातत्य ठेवावे लागेल. शुक्र वगळता इतर ग्रहमान अनुकूल नाही. कार्यतत्परता दाखवावी लागेल. संयम, सहनशीलता आणि सावधानता ठेवावी लागेल. संघर्ष टाळणे हिताचे होईल.
ऑगस्ट २०१३ : १६ ऑगस्टपासून सिंहेचा सूर्य अनुकूल होईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. बुध-शुक्र शुभयोगात आहेत. स्पर्धा-पैजा जिंकाल. नवीन ओळखी होतील. आनंदवार्ता समजतील. अर्थप्राप्ती होईल.
सप्टेंबर २०१३ : महत्त्वाची कामे १६ सप्टेंबरपूर्वी करून घ्या. सिंहेचा सूर्य तृतीयस्थानी शुभयोगात राहील. परोपकाराची संधी मिळेल. जमीन खरेदी-विक्री व्यवहारात लाभ होतील. आनंदवार्ता समजतील.
ऑक्टोबर २०१३ : मंगळ, बुध व शुक्र अनुकूल आहेत. प्रसन्नता लाभेल. कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळेल. प्रसंगावधान दाखवाल. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. महिलांना गृहसौख्य प्राप्त होईल.
नूतन वर्षी आपणास अधिक कौशल्य दाखवावे लागेल. परिणामांचा विचार करून कृती करावी लागेल. नूतन वर्षी खर्चाच्या नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रलोभनांपासून दूर राहावे लागेल.
ग्रहमान संमिश्र फल देणारे आहे. अर्थप्राप्ती झाली तरी खर्च जास्त होईल. कामात वाढ होईल. त्याचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता आहे.

कर्क : पूर्वार्ध चांगला
तुमचा स्वभाव सहनशील, प्रेमळ आणि भावनाप्रधान आहे. त्यामुळे तुम्ही इतरांची मने सहजपणे जिंकून घेता. आप्तेष्ट-मित्रांचे वाढते वर्तुळ सतत तुमच्या सोबतीला असते. नूतन वर्षी पूर्वार्ध जास्त चांगला जाईल.
रागाला मौनाने जिंकता येते. आपणदेखील रागावलेल्या माणसाला मौनाने प्रत्युत्तर देत असता. त्यामुळे संघर्ष वाढत नाही. विरोधक माघार घेतात. या नूतन वर्षी आपणास त्याचा अनुभव येईल. पूर्वीच्या चुका दुरुस्त करण्याची संधी नूतन वर्षी मिळेल.
नोव्हेंबर २०१२ : मंगळ, बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. महिलांना गृहसौख्य प्राप्त होईल. मौल्यवान वस्तूंची खरेदी करता येईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.
डिसेंबर २०१२ : १५ डिसेंबरपासून धनूचा सूर्य अनुकूल होईल. आर्थिक येणे वसूल होईल. छान सहकार्य मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील. अधिकारप्राप्तीचे योग येतील. आरोग्य छान राहील. अध्ययनात प्रगती होईल.
जानेवारी २०१३ : ग्रहमान उत्तम आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. सूर्य, बुध, गुरू व शुक्र प्रसन्न आहेत. बढतीचे योग येतील. अनपेक्षित लाभ होतील. महिलांना गृहव्यवस्थापनात यश मिळेल.
फेब्रुवारी २०१३ : महत्त्वाची कामे १२ फेब्रुवारीपर्यंत करून घ्या. मकरेचा सूर्य शुभयोगात राहील. यशप्राप्ती होईल. आप्तेष्ट, मित्रांशी हितसंबंध सुधारतील. महिलांना गृहसौख्य मिळेल. छंदासाठी वेळ द्याल.
मार्च २०१३ : बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. प्रश्न सुटतील. मन:स्वास्थ्य मिळेल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. सरकारी कामे मार्गी लागतील. ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. स्पर्धा-पैजा जिंकाल.
एप्रिल २०१३ : महत्त्वाची कामे १३ एप्रिलनंतर मार्गी लागतील. दैवाची मर्जी राहील. आर्थिक येणे वसूल होईल. बुध-गुरू प्रसन्न आहेत. मनाची एकाग्रता साधाल. सरकारी कामे मार्गी लागतील. आनंदवार्ता समजतील.
मे २०१३ : वृषभेचा गुरू ३१ मेपर्यंत अनुकूल आहे. नवीन कार्याचा परिचय होईल. प्रवास कार्यसाधक होतील. आप्तेष्ट मित्रांच्या भेटीगाठी होतील. कलावंतांना मान-सन्मान प्राप्त होईल.
जून २०१३ : ग्रहमान उत्तम आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. घरात प्रसन्नता राहील. नोकरीत बढती मिळेल. धार्मिक मंगलकार्यात सहभागी व्हाल. सुसंवाद साधून कामे कराल. आनंदवार्ता समजतील.
जुलै २०१३ : बेफिकीर राहून चालणार नाही. ग्रहमान प्रतिकूल आहे. शरीरस्वास्थ्यास आणि मन:स्वास्थ्यास जपावे लागेल. कामात वाढ होईल. संघर्ष टाळणे हिताचे होईल. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. प्रवासात वेळेचे भान ठेवावे.
ऑगस्ट २०१३ : द्विधा मन:स्थिती राहील. निर्णय घेणे कठीण होईल. सहनशीलता, सावधानता व संयम ठेवावा लागेल. विरोधकांचा त्रास संभवतो. खर्च खूप होईल. कामाचा ताण आरोग्यावर पडेल. मौल्यवान वस्तूस जपावे.
सप्टेंबर २०१३ : बुध-शुक्र शुभयोगात आहेत. परिस्थिती सुधारेल. चिंता करू नका. परिणामांचा विचार करून कृती करा.
ऑक्टोबर : २०१३ : महत्त्वाची कामे १७ ऑक्टोबपर्यंत करून घ्या. कन्येचा सूर्य अनुकूल राहील. कामे यशस्वी होतील. अर्थप्राप्ती होईल. खर्चही खूप होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.
अर्थप्राप्तीच्या दृष्टीने नूतन वर्ष अतिशय चांगले जाईल. नोकरी-व्यवसायात छान प्रगती साधता येईल. वृषभ राशीतील गुरू ३१ मेपर्यंत लाभस्थानी शुभयोगात राहील. त्यामुळे महत्त्वाची कामे शक्यतो ३१ मेपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील.
या वर्षी विवाहेच्छुकांचे विवाह होतील. गृहसौख्य प्राप्त होईल. स्वप्ने साकार होतील. आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष अतिशय चांगले जाईल. पूर्वीच्या आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील.
महिलांना हे वर्ष छान प्रगतीचे जाईल. कलाक्षेत्रात संधी प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना अध्ययनात उज्ज्वल यश प्राप्त होईल.

सिंह : छान ग्रहमान
अधिकारांचा योग्य वापर करण्यातील तुमचे कौशल्य खूप प्रभावी असते. तुमची दिलदार वृत्ती आकर्षक असते. इतरांचे लक्ष वेधून घेणे तुम्हाला चांगले जमते. तुमच्यामधील नेतृत्वगुण तुमच्या कामी येतात. नूतनवर्षी मोठय़ा योजना हाती घेऊन तुम्ही त्या यशस्वी करून दाखवू शकाल.
छान ग्रहमान तुम्हाला साथ देईल. इतरांना मदत, मार्गदर्शन करू शकाल. इतरांना साहाय्य करण्याचे पुण्य तुम्ही प्राप्त करून घेऊ शकाल. लक्ष देऊन काम करून तुम्ही नूतन वर्षी तुमचे लक्ष्य गाठू शकाल.
नोव्हेंबर २०१२ : महत्त्वाची कामे १६ नोव्हेंबरपूर्वी करून घ्या. तुळेचा सूर्य अनुकूल राहील. कामे यशस्वी होतील. घरगुती प्रश्न सुटतील. गृहसौख्य लाभेल. प्रिय भेटीगाठी होतील. परोपकाराची संधी मिळेल.
डिसेंबर २०१२ : मंगळ, बुध आणि शुक्र शुभयोगात आहेत. स्वप्ने साकार होतील. मार्गदर्शन मिळेल. कलावंतांना मानसन्मान प्राप्त होतील. मन:स्वास्थ्य, शरीरस्वास्थ्य चांगले मिळेल.
जानेवारी २०१३ : प्रारंभी अडचणी येतील. परंतु १४ जानेवारीनंतर मकरेचा सूर्य षष्ठस्थानी शुभयोगात येईल. अर्थप्राप्ती चांगली होईल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. मंगळ, बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत.
फेब्रुवारी २०१३ : तुळेचा शनी तृतीयस्थानी शुभयोगात आहे. सूर्य अनुकूल आहे. नोकरी-उद्योगात छान प्रगती होईल. आप्तेष्ट मित्रांचे सहकार्य मिळेल. आरोग्य ठीक राहील.
मार्च २०१३ : महत्त्वाची कामे १४ मार्चपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. कुंभेचा सूर्य अनुकूल राहील. मीनेचा शुक्र १७ मार्चनंतर मदत करील. तूळेचा शनी शुभयोगात आहे. यश प्राप्त होईल.
एप्रिल २०१३ : बुध, शुक्र व शनी अनुकूल आहेत. चिंता करू नका. प्रत्येक कामात यश मिळेल. नवीन ओळखी होतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. परोपकार कराल. आनंदवार्ता समजतील. स्वास्थ्य राहील.
मे २०१३ : ३१ मे पासून मिथुनेचा गुरू शुभयोगात येईल. आर्थिक लाभ होतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. आप्तेष्ट मित्रांच्या भेटीगाठी होतील. आनंदवार्ता समजतील.
जून २०१३ : तुमच्या प्रयत्नांना यश येईल. मिथुनेचा सूर्य, गुरू आणि तुळेचा शनी शुभयोगात आहे. प्रत्येक कामात यश प्राप्त होईल. धार्मिक मंगलकार्यात भाग घ्याल. विवाहेच्छुकांचे विवाह जमतील.
जुलै २०१३ : महत्त्वाची सर्व कामे १६ जुलैपूर्वी करून घ्या. मिथुनेचा सूर्य अनुकूल राहील. मंगळ, बुध, गुरू, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. प्रसन्नता राहील. दैवाची मर्जी राहील. अनपेक्षित लाभ होतील.
ऑगस्ट २०१३ : मिथुनेचा मंगळ लाभस्थानी आहे. तुळेचा शनी पराक्रमस्थानी आहे. नोकरी-व्यवसायात छान प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील. इतरांचे देणे फेडाल. मनावरचा ताण हलका होईल.
सप्टेंबर २०१३ : गुरू, शुक्र व शनी सिंह राशीवर प्रसन्न आहेत. आनंददायक घटना घडतील. उद्योग-व्यवसायात गुंतवणूक कराल. प्रिय घटना घडतील. प्रसंगावधान दाखवाल.
ऑक्टोबर २०१३ : प्रश्न सुटतील. १७ ऑक्टोबरपासून तुळेचा सूर्य पराक्रमस्थानी येईल. तो परिस्थितीत अनुकूल बदल करील. नवीन ओळखी होतील. स्पर्धा जिंकाल. आनंदवार्ता समजतील.
तूळ राशीतील शनी वर्षभर पराक्रमस्थानी शुभयोगात राहील. ३१ मे रोजी मिथुन राशीत प्रवेश करणारा गुरू ग्रह लाभस्थानी अनुकूल होईल. हे वर्ष तुम्हाला छान प्रगतीचे जाईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश येईल. छान अर्थप्राप्ती होईल. येणे वसूल होईल.
आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष अतिशय चांगले जाईल. तब्बेतीच्या पूर्वीच्या तक्रारी दूर होतील. कामात उत्साह राहील.
महिलांना नूतन वर्ष सौख्य प्राप्ती करून देणारे आहे. मन:स्वास्थ्य राहील. कल्पकता दाखवून कामे कराल.
विद्यार्थ्यांना अध्ययनात उज्ज्वल यश प्राप्त होईल.

कन्या : मेहनतीस यश
बुद्धीचातुर्याच्या जोरावर तुम्ही इथवर प्रगती केली आहे. प्रत्येक निर्णय घेताना तुम्ही सर्व बाजूंनी विचार करीत असता. त्यामुळे सहसा तुमचे निर्णय चुकत नाहीत. या नूतनवर्षीही काही अचूक निर्णय घ्याल आणि छान प्रगती करू शकाल. उद्योग-व्यवसायात विस्तार करू शकाल.
विजय हा मागून मिळत नसतो. तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो. या नूतनवर्षी तुम्हाला झगडून, मेहनत करून सर्व गोष्टी मिळवाव्या लागतील. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवावे लागेल. दूरदृष्टी ठेवून परिणामांवर नजर ठेवून कृती करावी लागेल.
नोव्हेंबर २०१२ : १६ नोव्हेंबरपासून वृश्चिकेचा सूर्य अनुकूल होईल. आíथक प्रश्न सुटतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. वेळेचा छान उपयोग कराल. महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. मन:स्वास्थ्य मिळेल.
डिसेंबर २०१२ : महत्त्वाची कामे १५ डिसेंबरपूर्वी करून घ्या. वृश्चिकेचा सूर्य अनुकूल राहील. प्रिय घटना घडतील. आपली मते इतरांना पटवून द्याल. दैवाची मर्जी राहील. प्रगतीच्या बातम्या समजतील.
जानेवारी २०१३ : बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. लाभदायक घटना घडतील. नोकरीत कामवाढ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. महिलांना गृहसौख्य लाभेल. आनंदवार्ता समजतील. ताणतणाव दूर होतील.
फेब्रुवारी २०१३ : १२ फेब्रुवारीनंतर कुंभेचा सूर्य षष्ठस्थानी शुभयोगात येईल. अडचणी दूर होतील. प्रश्न सुटतील. धार्मिक मंगलकार्यात भाग घ्याल. महिलांना आनंदवार्ता समजतील. स्पर्धा जिंकाल.
मार्च २०१३ : सूर्य, बुध व गुरू प्रसन्न आहेत. घरात प्रसन्न वातावरण राहील. इतरांचे छान सहकार्य मिळेल. महिलांना मन:स्वास्थ्य मिळेल. कामे यशस्वी होतील. आरोग्यात सुधारणा होईल.
एप्रिल २०१३ : महत्त्वाची कामे १३ एप्रिलपर्यंत करून घ्या. मीनेचा सूर्य अनुकूल राहील. कामे यशस्वी होतील. सामंजस्य दाखवाल. प्रश्न सुटतील. बुध, गुरू व शुक्र अनुकूल आहेत. अध्ययनात यश मिळेल.
मे २०१३ : बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. घरात प्रसन्नता राहील. आनंददायक घटना घडतील. व्यवहारी राहाल. बचत कराल. महत्त्वाचे निर्णय घ्याल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील.
जून २०१३ : मिथुनेचा सूर्य कर्मस्थानी शुभयोगात आहे. प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होतील. आप्तेष्ट मित्रांच्या भेटीगाठी होतील. बुध-शुक्र शुभयोगात आहेत. सरकारी कामे मार्गी लागतील. गृहसौख्य लाभेल.
जुलै २०१३ : सूर्य, बुध व शुक्र प्रसन्न राहतील. अर्थप्राप्ती होईल. मन:स्वास्थ्य मिळेल. महिलांना गृहसौख्य प्राप्त होईल. स्पर्धा जिंकाल. पूर्वीच्या चुका सुधारू शकाल. दिलेला शब्द पाळाल.
ऑगस्ट २०१३ : महत्त्वाची सर्व कामे पूर्वार्धात करून घ्या. कर्केचा सूर्य १६ ऑगस्टपर्यंत अनुकूल आहे. स्पर्धा- पैजा जिंकाल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील, उत्साह वाढेल. आरोग्य छान राहील.
सप्टेंबर २०१३ : कर्केचा मंगळ लाभस्थानी शुभयोगात आहे. तुळेचा शुक्र धनस्थानी अनुकूल आहे. अर्थप्राप्ती होईल. मनासारखा हौसेमौजेसाठी खर्च करू शकाल. इतरांचे सहकार्य मिळेल. अध्ययनात यश प्राप्त होईल.
ऑक्टोबर २०१३ : शुक्र वगळता इतर ग्रहमान मदत करणार नाही. प्रयत्नात सातत्य ठेवावे लागेल. मेहनत वाढवावी लागेल. द्विधा मन:स्थितीमुळे निर्णय घेणे कठीण जाईल. विद्यार्थ्यांना छान यश मिळेल.
वर्षांरंभापासून ३१ मेपर्यंत वृषभ राशीतील गुरू ग्रह भाग्यस्थानी शुभयोगात आहे. त्यामुळे इतरांना कठीण वाटणारी कामे तुम्ही यशस्वी करून दाखवू शकाल. अनपेक्षित लाभदायक घटना घडतील. अर्थप्राप्तीत वाढ होईल. आर्थिक गुंतवणुकीवर चांगला फायदा होईल.
आरोग्याच्या दृष्टीने नूतन वर्ष अधिक चांगले जाईल. पूर्वीच्या तक्रारी दूर होतील. मन:स्वास्थ्यही मिळेल.
महिलांना नूतन वर्ष उत्साहाचे जाईल. वर्षांरंभी आनंददायक घटना घडतील. विद्यार्थ्यांना स्पर्धामध्ये नेत्रदीपक यश प्राप्त होईल.

तूळ : छान प्रगती
आपली न्यायी वृत्ती वाखाणली जाते. साधेपणामुळे इतरांवर चांगली छाप पाडत असता. समतोलबुद्धीने तुम्ही योग्य निर्णय घेता. योग्य कृती करीत असता. साकल्याने विचार करून प्रश्न सोडवता. नूतन वर्षांच्या पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध जास्त चांगला जाईल.
चांगले विचार फार काळ टिकत नसतात, त्यामुळे त्यांचा प्रभाव असेपर्यंतच माणसाने कामे उरकून घेतली पाहिजेत. या वर्षी ही गोष्ट लक्षात ठेवून कृती करा. छान प्रगती होईल. तुमच्या निर्मळ अंत:करणामुळे सर्वत्र तुम्हाला चांगली माणसेच भेटतात. या नूतन वर्षीही चांगल्या, श्रेष्ठ, ज्येष्ठ माणसांशी ओळखी होतील. त्यामुळे चांगल्या कामांची प्रेरणा मिळेल.
नोव्हेंबर २०१२ : मेहनतीवरच भर द्यावा लागेल. प्रयत्नात सातत्य ठेवावे लागेल. डावपेच लढवावे लागतील. कामात वाढ होईल. द्विधा मन:स्थिती राहील. निर्णय घेणे कठीण जाईल. संयम ठेवावा.
डिसेंबर २०१२ : १५ डिसेंबरपासून धनूचा सूर्य शुभयोगात राहील. प्रिय भेटीगाठी होतील. बुध-शुक्र शुभयोगात आहेत. आरोग्यात सुधारणा होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.
जानेवारी २०१३ : पूर्वार्धात धनूचा सूर्य पराक्रमस्थानी शुभयोगात आहे. रेंगाळलेली कामे मार्गे लागतील. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. आनंदवार्ता समजतील. बुध-शुक्र शुभयोगात आहेत. यश मिळेल.
फेब्रुवारी २०१३ : बुध-शुक्र अनुकूल आहेत. इतर ग्रहमान प्रतिकूल राहील. खर्च खूप होईल. नोकरी व्यवसायातील कामात वाढ होईल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. अध्ययन ठीक चालेल.
मार्च २०१३ : ग्रहमान सुधारेल. चांगली कामे कराल. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. मीनेचा सूर्य १४ मार्चपासून अनुकूल होईल. मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. अर्थप्राप्ती होईल. आरोग्य ठीक राहील.
एप्रिल २०१३ : ग्रहमान उत्तम आहे. मेषेचा सूर्य शुभयोगात आहे. मीनेचा मंगळ १२ एप्रिलपर्यंत मदत करील. आर्थिक लाभ होतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. यशस्वी व्हाल.
मे २०१३ : ३१ मेपासून मिथुनेचा गुरू भाग्यस्थानी येत आहे. प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होतील. महत्त्वपूर्ण घटना घडतील. वेळेचा व संधीचा छान उपयोग कराल. आर्थिक प्रश्न सुटतील.
जून २०१३ : गुरू व शुक्र अनुकूल आहेत. लाभदायक घटना घडतील. व्यवहारी राहाल. बचत कराल. गृह व्यवस्थापनात यशस्वी व्हाल. स्पर्धा, पैंजा जिंकाल. कलावंतांना मानसन्मान प्राप्त होतील.
जुलै २०१३ : १६ जुलैपासून कर्केचा सूर्य अनुकूल होईल. सर्व प्रश्न सुटतील. मनावरचा ताण हलका होईल. मिथुनेचा गुरू भाग्यस्थानी शुभयोगात आहे. सिंहेचा शुक्र १७ जुलैपासून शुभयोगात येईल.
ऑगस्ट २०१३ : कर्तव्यपूर्तीकडे विशेष लक्ष द्याल. सूर्य अनुकूल आहे. बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रश्न सुटतील. इतरांची शाबासकी मिळवाल.
सप्टेंबर २०१३ : महत्त्वाची कामे १६ सप्टेंबपर्यंत करून घ्याल. सिंहेचा सूर्य लाभस्थानी राहील. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. आरोग्यात सुधारणा होईल. मिथुनेचा गुरू भाग्यस्थानी आहे.
ऑक्टोबर २०१३ : ५ ऑक्टोबरपासून सिंहेचा मंगळ शुभयोगात येईल. मिथुनेचा गुरू नवमस्थानी अनुकूल आहे. शुक्र शुभयोगात आहे. मनींची स्वप्ने साकार होतील. अर्थप्राप्ती होईल.
३१ मे रोजी मिथुन राशीत प्रवेश करणारा गुरू ग्रह तूळ राशीसाठी भाग्यस्थानी येत आहे. तो परिस्थितीत अनुकूल बदल घडवील. वर्षांरंभी निर्माण झालेले प्रश्न सुटतील. अडचणी दूर होतील.
आरोग्याच्या दृष्टीने नूतन वर्ष खूप चांगले असेल. कामात उत्साह राहील. मन:स्वास्थ्य प्राप्त होईल.
महिलांना नूतन वर्ष छान प्रगतीचे जाईल. मौल्यवान वस्तूंची खरेदी करता येईल. विद्यार्थ्यांना अध्ययनात यश प्राप्त होईल.

वृश्चिक : संधीचे सोने
कधी बोलावे आणि कधी बोलू नये, हे तुम्हाला चांगले कळते. वेळप्रसंगी सहनशीलता, सावधानता आणि संयम पाळून तुम्ही परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करीत असता. नूतन वर्षी आपणास प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होतील. त्यांचा आपण योग्य उपयोग करून घ्याल.
वर्षांरंभी काही अनुकूल घटना घडतील. अनपेक्षित लाभ होतील. बचत कराल. नवीन कार्यक्षेत्राशी परिचय होईल. अधिक जबाबदारीची कामे स्वीकारून तुम्ही ती यशस्वी करून दाखवाल. इतरांची शाबासकी मिळवाल. मानसन्मान प्राप्त होतील. संशोधकांच्या हातून महत्त्वाचे संशोधन होईल. उद्योग-व्यवसायात विस्तार कराल.
नोव्हेंबर २०१२ : गुरू-शुक्र शुभयोगात आहेत. चिंता करू नका. सर्व प्रश्न सुटतील. अर्थप्राप्ती होईल. नवीन ओळखी होतील. आश्वासने पाळाल. अनपेक्षित लाभ होतील. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील.
डिसेंबर २०१२ : मंगळ, बूध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. प्रत्येक कामात यश मिळेल. सुखद घटना घडतील. उद्योग-व्यवसायात लाभ होतील. सरकारी कामे मार्गी लागतील. आरोग्य छान राहील.
जानेवारी २०१३ : १४ जानेवारीनंतर मकरेचा सूर्य अनुकूल होईल. कर्तबगारी दाखविण्याची संधी मिळेल. वृषभेचा गुरू सप्तमस्थानी शुभयोगात राहील. प्रवास मनाजोगे होतील. धार्मिक कार्यात भाग घ्याल.
फेब्रुवारी २०१३ : मकरेचा सूर्य १२ फेब्रुवारीपर्यंत शुभयोगात राहील. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. बुध, गुरू व शुक्र प्रसन्न आहेत. आनंदवार्ता समजतील. गृहसौख्य मिळेल.
मार्च २०१३ : बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. तुमची स्वप्ने साकार होतील. समाजकार्यात भाग घ्याल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. महिलांना आनंदवार्ता समजतील.
एप्रिल २०१३ : १३ एप्रिलनंतर मेषेचा सूर्य मदत करील. कर्तव्यपूर्तीचे समाधान प्राप्त होईल. सुसंवाद साधाल. आप्तेष्ट मित्रांच्या गाठीभेटी होतील. मंगळ, बुध व गुरू अनुकूल आहेत. अध्ययनात यश मिळेल.
मे २०१३ : वृषभेचा गुरू ३१ मेपर्यंत अनुकूल राहील. कल्पकता दाखवाल. नोकरी-व्यवसायात छान प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल. गृहसौख्य लाभेल. प्रवासयोग येतील.
जून २०१३ : वृषभेचा सूर्य १४ जूनपर्यंत अनुकूल राहील. प्रिय घटना घडतील. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. विरोधक माघार घेतील. मार्गातील अडथळे दूर होतील. प्रिय घटना घडतील.
जुलै २०१३ : द्विधा मन:स्थितीमुळे निर्णय घेणे काहीसे कठीण होईल. बुध-शुक्र प्रसन्न आहेत. सावधानता, सहनशीलता आणि संयमाने वागावे लागेल. मेहनत वाढवावी लागेल. प्रयत्नात सातत्य ठेवावे लागेल.
ऑगस्ट २०१३ : १६ ऑगस्टपासून सिंहेचा सूर्य शुभयोगात येईल. अर्थप्राप्तीमध्ये वाढ होईल. कल्पकता दाखवून कामे कराल. इतरांना मदत कराल. आरोग्यात सुधारणा होईल. विद्यार्थ्यांना उज्ज्वल यश मिळेल.
सप्टेंबर २०१३ : सूर्य, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. प्रत्येक कामात यश मिळेल. इतरांचे लक्ष वेधून घ्याल. वेळेचा व संधीचा योग्य उपयोग कराल. हातून सत्कृत्ये घडतील. आरोग्यात सुधारणा होईल.
ऑक्टोबर २०१३ : महत्त्वाची कामे १७ ऑक्टोबरपूर्वी करून घ्या. कन्येचा सूर्य शुभयोगात आहे. नोकरी-व्यवसायात लाभ होतील. शुक्र शुभयोगात आहे. महत्त्वाचे निर्णय घ्याल. योग्य कृती कराल.
वृषभेचा गुरू ३१ मेपर्यंत सप्तमस्थानी शुभयोगात राहील. महत्त्वाची कामे पूर्वार्धात यशस्वी होतील. नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होतील. आपण त्या संधींचे सोने कराल. आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. इतरांचे देणे फेडाल. मनावरचा ताण हलका होईल. आर्थिक प्रश्न सुटतील.
आरोग्यात छान सुधारणा होईल. तब्येतीच्या पूर्वीच्या तक्रारी दूर होतील.
महिलांना कलाक्षेत्रात प्रगती साधता येईल. मार्गदर्शनाचा लाभ होईल. छान भेटीगाठी होतील. विद्यार्थ्यांना छान यश मिळेल.

धनू : दैवाची मर्जी!
ज्यावेळी देव देतो त्यावेळी अगदी भरभरून देत असतो, असे म्हणतात ते अगदी खरे आहे. या नूतन वर्षी आपणास याचा अनुभव येईल. ग्रहमान छान आहे. धनु राशीवर सध्या दैवाची मर्जी आहे. कर्तबगारी दाखविण्याची संधी प्राप्त होईल.
कष्ट नाही तर प्रगती नाही; साहस नाही तर प्रगती नाही! आपणास ही गोष्ट चांगलीच माहीत आहे. माणसाला ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही, याचा यावर्षी आपणास अनुभव येईल. नवीन चांगल्या गोष्टी शिकण्याची संधी प्राप्त होईल.
प्रत्येक काम एकाग्रतेने कराल. त्यामुळे कामाचे सोने होईल. समाज कार्यातही भाग घ्याल.
नोव्हेंबर २०१२ : महत्त्वाची कामे १६ नोव्हेंबरपूर्वी करून घ्या. तुळेचा सूर्य अनुकूल आहे. कामे यशस्वी होतील. संधीचे सोने कराल. आर्थिक लाभ होतील. इतरांना मदत कराल. शरीरस्वास्थ्य लाभेल.
डिसेंबर २०१२ : खर्च खूप होईल. अनावश्यक खर्च टाळावा लागेल. सुसंवाद साधून कामे करावी लागतील. संघर्ष टाळणे हिताचे होईल. कामात वाढ होईल. मिळणारा अनुभव मोलाचा असेल. सहनशीलता ठेवावी.
जानेवारी २०१३ : तूळेचा शनी लाभस्थानी आहे. आर्थिक येणे वसूल होईल. कार्यक्षमता वाढेल. व्यवहारचातुर्य दाखवाल. व्यवसायात अधिक गुंतवणूक कराल. आरोग्यावर ताण पडेल. अध्ययनात यश मिळेल.
फेब्रुवारी २०१३ : १२ फेब्रुवारीनंतर कुंभेचा सूर्य अनुकूल होईल. प्रश्न सुटतील. मन:स्वास्थ्य मिळेल. कर्तृत्वाला संधीची जोड मिळेल. नवीन ओळखी होतील. अध्ययनात अपेक्षित यश मिळेल.
मार्च २०१३ : महत्त्वाची कामे १४ मार्चपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. कुंभेचा सूर्य अनुकूल होईल. शुक्र-शनी शुभयोगात आहेत. मनीची चिंता दूर होईल. रेंगाळलेले प्रश्न सुटतील. अर्थप्राप्ती होईल.
एप्रिल २०१३ : बुध, शुक्र व शनी अनुकूल आहेत. खर्चाचे प्रश्न सुटतील. नोकरी व्यवसायात छान प्रगती होईल. अधिकारप्राप्तीचे योग येतील. प्रसंगावधान दाखवाल. महिलांना गृहसौख्य लाभेल.
मे २०१३ : ३१ मेपासून मिथुनेचा गुरू शभयोगात येईल. परिस्थितीत सुधारणा होईल. तुळेचा शनीही अनुकूल आहे. छान ग्रहमान आहे. जास्तीत जास्त यश प्राप्त होईल. गृहसौख्य मिळेल.
जून २०१३ : ग्रहमान उत्तम आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. सूर्य, मंगळ, गुरू व शनी शुभयोगात आहेत. कामे मार्गी लागतील. अर्थप्राप्ती छान होईल.
जुलै २०१३ : महत्त्वाची कामे १६ जुलैपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. मिथुनेचा सूर्य अनुकूल राहील. प्रिय घटना घडतील. समाजकार्यात भाग घ्याल. घरगुती प्रश्न सुटतील. गृहसौख्य लाभेल.
ऑगस्ट २०१३ : कर्केचा बुध अष्टमस्थानी शुभयोगात आहे. मिथुनेचा गुरू सप्तमात आहे. तुळेचा शनी लाभस्थानात राहील. ग्रहमान उत्तम आहे. छान प्रगती होईल. आरोग्यात सुधारणा होईल.
सप्टेंबर २०१३ : १६ सप्टेंबरपासून कन्येचा सूर्य कर्मस्थानी शुभयोगात येईल. कन्येचा बुध, मिथुनेचा गुरू, तुळेचे शुक्र-शनी अनुकूल आहेत. प्रत्येक कामात यश मिळेल. महिलांना आनंदवार्ता समजेल.
ऑक्टोबर २०१३ : सूर्य, बुध, गुरू, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. काही भाग्यवंतांना अनपेक्षित धनप्राप्ती होईल. लॉटरी, स्पर्धा, पैजा, यश मिळेल. अर्थप्राप्ती होईल. प्रवास कार्यसाधक होतील.
तूळ राशीत असणारा शनी संपूर्ण वर्षभर लाभस्थानी असल्याने धनु राशीसाठी अनूकूल आहे. ३१ मे रोजी मिथुन राशीत प्रवेश करणारा गुरू सप्तमस्थानी शुभयोगात येईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने नूतन वर्षी ग्रहमान खूप चांगले आहे. प्रवासाने रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष खूप चांगले जाईल.
महिलांना या वर्षी नूतन मौल्यवान वस्तूंची खरेदी करता येईल. विद्यार्थ्यांना अध्ययनात छान यश प्राप्त होईल.

मकर : प्रसन्नता लाभेल
बऱ्याच गोष्टी मिळविताना तुम्हाला झगडावे लागते. अधिक कष्ट घ्यावे लागतात. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर तुम्ही लगेच निराश होत असता. मनाला लावून घेत असता, गंभीर होत असता. या नूतन वर्षी पूर्वार्धात गुरूची अनुकूलता लाभल्याने आनंददायक घटनाघडतील. उत्तरार्धात मात्र तडजोडीचे धोरण ठेवावे लागेल.
अधिकारप्राप्तीचे योग येतील. त्याचा कौशल्याने उपयोग करून घ्याल. घराला घरपण घरातल्या वस्तुंमुळे येत नाही तर ते घरातील माणसांमुळे येत असते. आपणास हे चांगले माहीत आहे. म्हणून घरात प्रसन्न वातावरण राहण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल. सुखद घटना घडतील.
नोव्हेंबर २०१२ : सूर्य, बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. प्रश्न सुटतील. खर्च वाढेल परंतु तो न टाळता येणारा असेल. व्यवहारकौशल्य दाखवाल. महिलांना मन:स्वास्थ्य मिळेल. आवडत्या छंदासाठी वेळ द्याल.
डिसेंबर २०१२ : महत्त्वाची कामे १५ डिसेंबरपूर्वी करून घ्या. वृश्चिकेचा सूर्य अनुकूल असेल. आर्थिक येणे वसूल होईल. बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. सुखद घटना घडतील. महिलांना गृहसौख्य, शरीरस्वास्थ्य मिळेल.
जानेवारी २०१३ : वृषभेचा गुरू पंचमस्थानी शुभयोगात आहे. शुक्र अनुकूल आहे. खर्चावर बंधने घालावी लागतील. प्रलोभनांपासून दूर राहावे लागेल. संयम, सावधानता, सहनशीलता ठेवावी. आरोग्यास जपावे.
फेब्रुवारी २०१३ : गुरू प्रसन्न आहे. चिंता करू नका. सर्व प्रश्न सुटतील. इतरांना दिलेला शब्द पाळाल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. महिलांना आनंदवार्ता समजतील. आनंददायक घटना घडतील.
मार्च २०१३ : उत्तरार्धात मीनेचा सूर्य अनुकूल होईल. प्रसंगावधान दाखवाल. ओळखींचा छान उपयोग कराल. बचतीकडे जास्त लक्ष द्याल. मंगल धार्मिक कार्यात भाग घ्याल. कलावंतांना मानसन्मान प्राप्त होतील.
एप्रिल २०१३ : महत्त्वाची सर्व कामे १३ एप्रिलपूर्वी करून घ्या. ती यशस्वी होतील. मीनेचा सूर्य तृतीयस्थानी शुभयोगात आहे. हितकारक घटना घडतील. मार्गदर्शन मिळेल. प्रिय भेटीगाठी होतील. आरोग्यात सुधारणा होईल.
मे २०१३ : बुध, गुरू व शुक्र अनुकूल आहेत. कार्यक्षमता वाढेल. सर्व कामे मार्गी लागतील. सूचक घटनांद्वारे मार्गदर्शन मिळेल.
जून २०१३ : १४ जूननंतर मिथुनेचा सूर्य अनुकूल होईल. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. स्वप्ने साकार होतील. कामात उत्साह राहील. प्रवास मनाजोगे होतील. कर्तव्यपूर्तीचे समाधान प्राप्त होईल.
जुलै २०१३ : सूर्य, मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. मेहनतीस न्याय मिळेल. इतरांना कठीण वाटणारी कामे तुम्ही सहजपणे कराल. मेहनतीचे चीज होईल. वातावरण प्रसन्न राहील. अर्थप्राप्ती होईल.
ऑगस्ट २०१३ : पूर्वार्ध जास्त चांगला जाईल. कर्केचा सूर्य सप्तमस्थानी शुभयोगात राहील. सर्व कामे यशस्वी होतील. आरोग्यात सुधारणा होईल. दैवाची मर्जी राहील. संधीचे सोने कराल.
सप्टेंबर २०१३ : बुध, शुक्र शुभयोगात आहेत. खर्च वाढणार आहे. नवीन डावपेच लढवावे लागतील. कल्पकता दाखवावी लागेल.
ऑक्टोबर २०१३ : १७ ऑक्टोबरपासून तुळेचा सूर्य अनुकूल होईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. अध्ययनात यश मिळेल. व्यवहारचातुर्य दाखवाल. उद्योगव्यवसायात गुंतवणूक कराल.
वृषभेचा गुरू ३१ मेपर्यंत पंचमस्थानी शुभयोगात राहील. नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी संधी प्राप्त होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी प्राप्त होईल. अर्थप्राप्ती चांगली झाल्याने इतरांचे देणे फेडू शकाल. मन:स्वास्थ्य मिळेल. प्रिय भेटीगाठी होतील. आनंदवार्ता समजतील.
आरोग्यासाठी ग्रहमान उत्तम आहे. पूर्वीच्या तक्रारी दूर होतील. कामात उत्साह राहील. कार्यक्षमता वाढवून कामांचा उरक ठेवाल.
महिलांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी प्राप्त होईल. छान प्रगती होईल. गृहव्यवस्थापनात यश प्राप्त होईल.

कुंभ : उत्तरार्ध चांगला!
आपली जिद्द, चिकाटी आणि संशोधन करण्याची वृत्ती खूप महत्त्वाची आहे. निस्वार्थी निरपेक्ष स्वभाव हा एक महत्त्वाचा गुण आहे. अध्यात्मशक्तीच्या अभ्यासाची आवड तुम्हाला मन:स्वास्थ्य मिळवून देत असते. या नूतन वर्षी उत्तम ग्रहमान तुम्हाला सर्व गोष्टी मिळवून देईल.
जे हवेसे वाटते ते मिळविणे म्हणजे यश आणि ते मिळाल्यावर जे वाटते ते समाधान. नूतन वर्ष या सर्व समाधानाच्या गोष्टी तुम्हास मिळवून देईल. इतरांना कठीण वाटणारी कामे तुम्ही सहजपणे यशस्वी करून दाखवाल. प्रसंगावधान दाखवून नुकसान टाळू शकाल.
नोव्हेंबर २०१२ : १६ नोव्हेंबरपासून वृश्चिकेचा सूर्य अनुकूल होईल. अर्थप्राप्तीत वाढ होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. अधिकारांचा योग्य उपयोग कराल. महिलांना मौल्यवान वस्तूंची खरेदी करता येईल. गृहसौख्य प्राप्त होईल.
डिसेंबर २०१२ : अनपेक्षित फायदा करून देणाऱ्या घटना घडतील. संयमाने वागाल. कौटुंबिक प्रश्न कौशल्याने सोडवाल. आरोग्यात छान सुधारणा होईल. कामात उत्साह राहील. प्रवास लाभदायक होतील.
जानेवारी २०१३ : धनूचा सूर्य १४ जानेवारीपर्यंत अनुकूल आहे. महत्त्वाची कामे करून घ्या. ती यशस्वी होतील. प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होतील. उद्योगव्यवसायात लाभ होतील. महिलांना गृहसौख्य लाभेल.
फेब्रुवारी २०१३ : ग्रहमानाची मदत मिळणार नाही. प्रयत्नांवरच भर द्यावा लागेल. मेहनतीत सातत्य ठेवावे लागेल. सावधानता, सहनशीलता आणि संयम ठेवावा लागेल. बोलताना काळजी घ्यावी. आरोग्यावर ताण पडेल.
मार्च २०१३ : अजूनही अनुकूलता नाही. दक्षता घ्यावी लागेल. द्विधा मन:स्थितीमुळे निर्णय घेणे कठीण जाईल. सुसंवाद ठेवावा लागेल. विरोधकांच्या डावपेचांवर नजर ठेवावी. आरोग्यास जपावे.
एप्रिल २०१३ : १३ एप्रिलनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. मेषेचा सूर्य पराक्रमस्थानी येईल. मंगळ-शुक्र शुभयोगात आहेत. त्यांची मदत होईल. आरोग्यात सुधारणा होईल. अर्थप्राप्ती होईल. तणाव दूर होईल.
मे २०१३ : ३१ मे रोजी मिथुन राशीत प्रवेश करणारा गुरू शुभयोगात येईल. प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होतील. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. विरोधकांचा विरोध मावळेल.
जून २०१३ : बुध, गुरू व शुक्र अनुकूल आहेत. घरात प्रसन्नता राहील. अर्थप्राप्तीत वाढ होईल. दिलेला शब्द पाळाल. पतप्रतिष्ठा वाढीस लागेल. आरोग्यात सुधारणा होईल. स्पर्धा जिंकाल.
जुलै २०१३ : १६ जुलैपासून कर्केचा सूर्य अनुकूल होईल. परोपकाराची संधी प्राप्त होईल. व्यवहार कौशल्य दाखवाल. बुध-गुरू स्वप्ने साकार करतील. योग्य कृती कराल. आनंदवार्ता समजतील.
ऑगस्ट २०१३ : सूर्य, मंगळ, बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. छान प्रगती होईल. स्पर्धा, पैंजा जिंकाल. प्रिय भेटीगाठी होतील. मनोबल वाढेल. हातून चांगली कामे होतील. आरोग्य सुधारेल.
सप्टेंबर २०१३ : महत्त्वाची कामे १६ सप्टेंबरपूर्वी करून घ्या, ती यशस्वी होतील. सिंहेचा सूर्य अनुकूल राहील. मंगळ, बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. यशस्वी व्हाल. अर्थप्राप्ती होईल. आरोग्य सुधारेल.
ऑक्टोबर २०१३ : मिथुनेचा गुरू, तूळ-धनूचा शुक्र शुभयोगात आहेत. खर्च वाढला तरी तो आवश्यक असेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. घरगुती प्रश्न कौशल्याने सोडवाल. आरोग्यात सुधारणा होईल.
३१ मे रोजी मिथुन राशीत प्रवेश करणारा गुरू पंचमस्थानी शुभयोगात येईल. अर्थप्राप्तीसाठी तो मदत करील. उद्योगव्यवसायात अधिक गुंतवणूक करण्याची संधी प्राप्त होईल. शेअर्स खरेदी-विक्री व्यवहारात लाभ होतील.
आरोग्याच्या दृष्टीने ग्रहमान उत्तम आहे. तब्बेतीच्या पूर्वीच्या तक्रारी दूर होतील. पूर्वार्धात काही त्रास झाला तरी चिंता करू नका. उत्तरार्ध अधिक चांगला जाईल.
महिलांना प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त होईल.

मीन : कल्पकता दाखवाल
तुम्ही खूप भावनाप्रधान आहात. प्रत्येक कृती विचारपूर्वक करीत असता. आपला सात्त्विक स्वभाव इतरांचे प्रेम संपादन करीत असतो. नेहमी चांगल्या माणसांचे वर्तुळ आपल्याला प्राप्त होत असते. सामाजिक कार्यात भाग घेण्याची आपली परोपकारी वृत्ती इतरांचे लक्ष वेधून घेत असते. नूतन वर्षी आपणास याचा विशेष अनुभव येईल.
काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे चांगले, हे तुम्हास चांगले पटते. कमीत कमी गरजा ठेवून तुम्ही समाधानाचे धनी होणे पसंत करीत असता. नूतन वर्षी तुम्ही परिस्थितीवर मात करण्यासाठी कल्पकता दाखवाल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. इतरांना मदत कराल.
नोव्हेंबर २०१२ : खर्च खूप वाढेल. अनावश्यक खर्च टाळावा लागेल. प्रलोभनांपासून संयमाने दूर राहावे लागेल. नोकरी-व्यवसायात छान प्रगती होईल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. दैवाची मर्जी राहील.
डिसेंबर २०१२ : १५ डिसेंबरपासून धनूचा सूर्य अनुकूल होईल. इतरांना कठीण वाटणारी कामे तुम्ही करू शकाल. १८ डिसेंबरपासून मकरेचा मंगळ शुभयोगात येईल. मन:स्वास्थ्य प्राप्त होईल.
जानेवारी २०१३ : ग्रहमान उत्तम आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. छान प्रगती होईल. सूर्य, मंगळ व बुध अनुकूल आहेत. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. पूर्वीच्या अनुभवांचा उपयोग होईल.
फेब्रुवारी २०१३ : महत्त्वाची कामे पूर्वार्धात करून घ्या. मकरेचा सूर्य १२ फेब्रुवारीपर्यंत अनुकूल राहील. अनपेक्षित लाभ होतील. सुसंवाद साधाल. बुध-शुक्र शुभयोगात आहेत. महिलांना गृहसौख्य लाभेल.
मार्च २०१३ : या वेळी ग्रहमानाची मदत मिळणार नाही. मन:स्वास्थ्यास आणि शरीरस्वास्थ्यास जपावे लागेल. संयमाने प्रलोभनांपासून दूर राहावे लागेल. योग्य निर्णय घ्यावे लागतील. अधिकारांचा योग्य उपयोग कराल.
एप्रिल २०१३ : १० एप्रिलनंतर मेषेचा शुक्र अनुकूल होईल. सहनशीलता आणि सावधानता ठेवावी लागेल. आध्यात्मिक साधना यशस्वी होईल. प्रवास कार्यसाधक होतील. संयमाने वागावे लागेल. आरोग्यावर ताण पडेल.
मे २०१३ : १४ मेपासून वृषभेचा सूर्य पराक्रम स्थानी शुभयोगात येईल. परिस्थितीत सुधारणा होईल. मनावरचा ताण हलका होईल. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. महिलांना आनंदवार्ता समजतील.
जून २०१३ : महत्त्वाची कामे पूर्वार्धात करून घ्या. वृषभेचा सूर्य तृतीय स्थानी शुभयोगात राहील. अर्थप्राप्ती होईल. मनासारखा खर्च कराल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. इतरांची शाबासकी मिळवाल.
जुलै २०१३ : मंगळ, बुध, शुक्र शुभयोगात आहेत. कार्यक्षमता वाढेल. कामांचा उरक राहील. आरोग्यात छान सुधारणा होईल. कामात उत्साह राहील. व्यवहार चातुर्य दाखवाल. प्रगतीसाठी संधी प्राप्त होईल.
ऑगस्ट २०१३ : १६ ऑगस्टपासून सिंहेचा सूर्य अनुकूल होईल. कर्क-सिंहेचा बुध शुभयोगात आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. हातून चांगली कामे पार पडतील. तब्बेतीच्या तक्रारी दूर होतील.
सप्टेंबर २०१३ : ग्रहमान अनुकूल आहे. दैवाची मर्जी राहील. सूर्य, बुध, शुक्र शुभयोगात आहेत. नोकरी-व्यवसायात छान प्रगती होईल. वेळेचा छान उपयोग करून घ्याल. आरोग्यात छान सुधारणा होईल.
ऑक्टोबर २०१३ : महत्त्वाची सर्व कामे १७ ऑक्टोबरपूर्वी करून घ्या. कन्येचा सूर्य सप्तमात आहे. प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होतील. दैवाची मर्जी राहील. राजकारणातील डावपेच यशस्वी होतील.
गुरू-शनीची मदत मिळणार नाही; परंतु इतर ग्रहांची जरूर मदत मिळेल. आर्थिक प्रश्न कल्पकतेने सोडवाल. नवीन योजना कार्यान्वित कराल. बचतीकडे जास्त लक्ष द्याल. प्रलोभनांपासून मात्र कटाक्षाने दूर राहा, म्हणजे फसवणूक होणार नाही. संयमाने वागावे लागेल.
आरोग्याची कुरबूर चालूच राहील. तक्रारींकडे वेळीच लक्ष देणे योग्य ठरेल.
महिलांनी अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे म्हणजे टंचाई भासणार नाही. विद्यार्थ्यांना अध्ययनात छान यश मिळेल.