23 January 2021

News Flash

जाणून घ्या: अ‍ॅसिडिटी कशामुळे होते?; अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी काय करता येईल?

जाणून घ्या अ‍ॅसिडिटी झाल्यावर काय करावे आणि लक्षणे काय?

अ‍ॅसिडिटी (प्रातिनिधिक फोटो)

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या त्रासांमध्ये अ‍ॅसिडिटी किंवा आम्लपित्ताचा विकार सामान्य झाला आहे. २० वर्षावरील प्रत्येकालाच अ‍ॅसिडिटीचा हा त्रास कधी ना कधी होतोच.

अ‍ॅसिडिटी म्हणजे काय?

आपल्या जठरात आम्ल असतेच. खाल्लेल्या अन्नाचे विघटन करणे, अन्नातील विषाणूंना मारणे आणि अन्नातील सर्व घटक एकत्र करून ते पचनसंस्थेत पुढे सरकण्यास मदत करणे हे त्या आम्लाचे नेहमीचे काम. जठरातील आम्लाचे उत्पादन वाढून जो त्रास होतो, तो म्हणजे अ‍ॅसिडिटी (आम्लपित्त). यात जळजळ होणे, पोटात दुखणे ही लक्षणे दिसू शकतात. हे पोटात दुखणेही जळजळ झाल्यासारखे दुखते किंवा तीव्र दुखते.

अ‍ॅसिडिटीत पोटात तीव्र दुखत असेल तर जठराच्या आतील अस्तर उघडे पडून तिथे अल्सर (व्रण) झालेला असू शकतो. खरे तर जठराचे आतले आवरण मजबूत असते. आम्ल सहन करण्याची क्षमता त्यात असूनही काही वेळा ते अशा प्रकारे फाटू शकते. असा अल्सर होतो तेव्हा त्या ठिकाणच्या नसा उघडय़ा पडतात आणि त्यावर आम्लाची प्रक्रिया होऊन पोटात दुखते.

जठरातील आम्ल अन्ननलिकेत आले, तर छातीमागे जळजळ होणे, छाती दुखणे, आंबट ढेकर येणे, तोंडात करपट पाणी येणे, उलटय़ा होणे अशी लक्षणेही दिसू शकतात. याला ‘रीफ्लक्स डिसिज’ म्हणतात. अलीकडे अ‍ॅसिडिटीवरील ‘ओव्हर द काऊंटर’ औषधांचा वापर वाढला आहे. अ‍ॅसिडिटी झाल्यावर कोणती गोळी किंवा कोणते सिरप घ्यावे हे सर्वाना माहीत असते. अ‍ॅसिडिटी क्वचितच झालेली आणि साधी असेल तर हे औषध घेऊन पाहता येईल. पण सततच अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल किंवा ती तीव्र स्वरूपाची असेल, तर सारखी ही औषधे घेत राहण्यापेक्षा डॉक्टरांकडून आधी तपासून घेतलेले बरे.

प्रत्येक जळजळ किंवा उलटी ही अ‍ॅसिडिटीच असेल असे नाही. पोटात वा छातीत तीव्र किंवा सतत वेदना होणे, वजन कमी होणे, खायची इच्छा कमी होणे, सतत उलटय़ा होणे, उलटी किंवा शौचावाटे रक्त जाणे, शौचास काळ्या रंगाची होणे अशी लक्षणे दिसत असतील, तर मात्र त्याला केवळ अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्षित करू नका. अशा परिस्थितीत डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायला हवी. काही रुग्णांच्या बाबतीत ही लक्षणे अन्ननलिकेच्या किंवा जठराच्या कर्करोगाची असू शकतात, गाठ झाल्यामुळे किंवा अल्सरची काही गुंतागुंत उद्भवल्यानेही ही लक्षणे दिसू शकतात. अशा परिस्थितीत दुर्बिणीने तपासणी (एण्डोस्कोपी) केली जाते. कोणत्याही रक्ताच्या चाचणीतून अ‍ॅसिडिटी वा अल्सर आहे की नाही ते कळत नाही. रुग्णाला तपासून त्याच्या लक्षणांवरूनच निदान होते. सर्वच रुग्णांना चाचण्या लागतही नाहीत. ८० ते ९० टक्के रुग्णांना डॉक्टरांनी सुचवल्यानुसार ठरावीक काळ गोळ्या-औषधे घेऊन बरे वाटते.

अ‍ॅसिडिटी व अल्सरचे असेही संभाव्य कारण

‘एच पायलोरी’ नावाचा एक विषाणूदेखील अ‍ॅसिडिटी वा अल्सरसाठी कारणीभूत ठरू शकतो. अस्वच्छतेची समस्या असणाऱ्या जवळपास सर्वच विकसनशील देशांमध्ये तो आढळतो. साधारणपणे १० वर्षांनंतरच्या ८० ते ९० टक्के  लोकसंख्येस दूषित अन्नपाण्यातून या ‘एच पायलोरी’ची लागण झालेली असते. अर्थात या सर्वाना अ‍ॅसिडिटी वा अल्सर होतोच असे नाही. पण जेव्हा अ‍ॅसिडिटी वा अल्सरची तीव्र स्वरूपाची लक्षणे रुग्णास दिसत असतात, तेव्हा तपासणी केली असता या विषाणूचे निदान होऊ शकते. त्यानुसार पुढील औषधे दिली जातात.

अ‍ॅसिडिटीची नेहमीची कारणे

* चुकीची जीवनशैली

*  सततचे वा अति धूम्रपान किंवा मद्यपान

*  अतिशय तिखट मसालेदार अन्नाचे सेवन

* ताणतणावपूर्ण जीवन

* व्यायामाचा अभाव

* दोन खाण्यांच्या मध्ये खूप वेळ उपाशी राहणे

लक्षणे 

* छातीत जळजळणे

* पोटात दुखत राहणे

* मळमळणे

* पित्ताच्या आंबट उलट्या होणे

* जेवल्यावर पोट फुगणे

* ढेकरा येणे

* अन्नावर वासना नसणे

सतत धावपळ करणाऱ्या, व्यवसाय-धंद्यात मनावर खूप ताण-तणाव असणाऱ्या, खाण्या-पिण्याच्या वेळा सांभाळणे न जमणाऱ्या व्यक्तींना हा त्रास होत असतो. अन्नपचनासाठी जठरात असलेल्या पाचक रसांमध्ये आहारातील प्रथिनांचे पचन होण्यासाठी हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड असते. आहारातील काही घटक, खाण्यात आलेले इतर पदार्थ अशा गोष्टींमुळे जठरातील हे अ‍ॅसिड गरजेपेक्षा जास्त प्रमाणात स्त्रवून वरच्या बाजूने म्हणजे अन्ननलीकेच्या दिशेने उसळ्या मारते. यामुळे छातीत जळजळ होते. अन्ननलिका आणि जठर यांच्यामध्ये एक झडप असते. अन्ननलिकेतून अन्न जठरात आल्यावर ती बंद होते. मात्र काही व्यक्तींमध्ये ही झडप सैल पडते, त्यामुळे जठरातील अ‍ॅसिड सहजरित्या अन्ननलिकेत जाऊन रुग्णाला अ‍ॅसिडिटीचा प्रचंड त्रास होतो. याला ‘गॅस्ट्रोइसोफेजीयल रीफ्लक्स डिसीज’ म्हणतात.

दुष्परिणाम-

अ‍ॅसिडिटी जास्त प्रमाणात, सतत आणि खूप दिवस होत राहिल्यास रुग्णाला अन्ननलिकेत, जठरात, लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात जखमा होतात, यालाच अल्सर म्हणतात. या रुग्णांना पचनसंस्थेच्या याच भागांचे कर्करोगदेखील होऊ शकतात.

अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी उपाय –

* उपाशीपोटी राहण्याची सवय टाळा. आजच्या जीवनात पोट रिकामे ठेवून दिवसभर कामात व्यस्त राहणाऱ्या व्यक्तींना हा त्रास खात्रीने होतो.

* जेवणाच्या वेळा ठराविक असाव्यात. दर चार तासांनी थोडे थोडे खावे.

* आहारामध्ये जास्त तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे टाळा

* जेवताना हळूहळू आणि प्रत्येक घास चावून खावा.

* घाईगडबडीने जेवल्याने अपचन, अ‍ॅसिडिटी असे त्रास होतात.

* जागरणे टाळावीत. किमान साडेसहा ते सात तास झोप घेणे आवश्यक असते.

* दुपारी जेवून लगेच आडवे होण्याने हमखास अ‍ॅसिडिटी वाढते. त्यामुळे दुपारची वामकुक्षी टाळावी.

* रात्रीचे जेवण लवकर करावे. जेवणानंतर ३ तासांनी झोपावे. रात्री खूप उशीरा जेवू नये.

* रात्री जेवल्यावर अर्धा तास शतपावली करावी.

* धूम्रपान, तंबाखूसेवन, मद्यप्राशन अशी व्यसने, त्याचप्रमाणे चहा-कॉफी, कोला पेये यांचा अतिरेक टाळावा.

* मानसिक ताण, काळजी यामुळे अ‍ॅसिडिटी वाढते, त्याकरिता या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेडीटेशन, रीलॅक्सेशन टेक्निक्स करावे.

* डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ऍस्पिरीन, सांधेदुखीची औषधे, पेनकिलर्स परस्पर घेऊ नयेत.

* चालण्याचा व्यायाम करून वजन आणि विशेषतः पोट कमी करावे.

अ‍ॅसिडिटी झाल्यावर काय करावे?

* अर्धा ग्लास थंड दूध प्यावे. या दुधामध्ये खाण्याचा सोडा १ चमचा टाकून घेतल्यास अ‍ॅसिडिटी त्वरित कमी होते.

* व्हॅनिला आईस्क्रीम किंवा मिल्कशेक घ्यावा.

* अ‍ॅसिडिटी झाल्यावर दूधभात, दूध-चपाती किंवा दूध-भाकरी खावी.

* सतत अ‍ॅसिडिटी होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासण्या कराव्यात आणि उपचार करावेत.

– डॉ. नितीन पै (उदरविकारतज्ज्ञ) आणि डॉ. अविनाश भोंडवे (फॅमिली फिजिशियन)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2020 5:14 pm

Web Title: acidity causes treatment and home remedies scsg 91
Next Stories
1 चक्रीवादळं म्हणजे काय?, चक्रीवादळांचा इशारा कधी दिला जातो?, त्यांना नावं कशी दिली जातात?
2 जाणून घ्या: मोबाइल फोनच्या बॅटरीचा स्फोट कशामुळे होतो?
3 जाणून घ्या: GDP म्हणजे नेमकं काय? तो कसा मोजतात?, त्याचा सामान्यांशी कसा संबंध असतो?
Just Now!
X