‘बजेट’ हा शब्द आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. आपल्या उत्पन्नातून किती पैसे आपण कशाकशावर खर्च करणार याच्या अंदाजाला आपण सर्वसाधारणपणे ‘बजेट’ असं म्हणतो. परंतु ‘बजेट’ हा शब्द आला तरी कुठून? या शब्दाची नेमकी उत्पत्ती कशी झाली? किंवा ‘बजेट’ हा शब्द कसा प्रचलित झाला?

‘बजेट’ या शब्दाची निर्मिती फ्रेंच शब्द ‘बुजेत’पासून झाली आहे. या शब्दाचा अर्थ ‘चामड्याची पिशवी’ असा होतो. फ्रेंच मंडळी पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी चामड्याच्या पिशवीचा वापर करत. या पिशवीला ते ‘बुजेत’ असे म्हणत.

असा झाला बुजेतचा ‘बजेट’?

‘बजेट’ शब्द प्रचलित होण्यामागे एक गंमतीदार किस्सा आहे. १७३३ साली इंग्लंडचे माजी अर्थमंत्री सर रॉबर्ट वॉलपोल वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत आले होते. येताना त्यांनी स्वत:सोबत एक चामड्याची पिशवी देखील आणखी होती. याच पिशवीत त्यांनी अर्थसंकल्पाचे कागदपत्र ठेवले होते. ती पिशवी खोलताना त्यांनी ‘बुजेत इज ओपन’ असे म्हटले. परंतु ‘बुजेत’ हा शब्द त्यांनी अशा प्रकारे उच्चारला की सभागृहातील इतर मंडळींना तो ‘बजेट’ असा ऐकू आला.

त्यानंतर विरोधकांनी रॉबर्ट वॉलपोल यांची खिल्ली उडवण्यासाठी व आर्थिक नियोजनातील चुका दाखवण्यासाठी ‘बजेट इज ओपन’ या नावाने एक पुस्तिका प्रकाशित केली. परंतु वॉलपोल देखील कच्चे खेळाडू नव्हते. त्यांनी ही खिल्ली खिलाडूवृत्तीने स्वीकारत बुजेतला ‘बजेट’ असेच म्हणायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून बुजेतचे ‘बजेट’ असे नामकरण झाले.

बजेटची व्याख्या काय?

वित्तीय वर्षांतील सरकारचे अंदाजे खर्च व उत्पन्न यांची सर्व माहिती व त्याचबरोबर गतवर्षांच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा, नवीन कर योजना व भांडवली खर्च भागविण्याची व्यवस्था म्हणजे अर्थसंकल्प.
भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्प हा शब्द वापरलेला नसून वार्षिक वित्तीय विवरणपत्रक (Annual Financial Statement) हा शब्द वापरण्यात आला आहे. भारतामध्ये घटनेच्या ११२व्या कलमानुसार केंद्र सरकारचा तर २०२व्या कलमानुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो. मात्र असं असलं तरी भारताच्या राज्यघटनेत अर्थसंकल्प या शब्दाचा उल्लेख नाहीय याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटतं.