टाळेबंदी शिथीलीकरणानंतर व्यवहार पूर्वपदावर आले असल्याने सर्वानाच कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे. प्रश्न आहे तो प्रवासाचा. अनेकांनी सार्वजनिक वाहनांतून प्रवास टाळत स्वत:च्या वाहनांतून प्रवासाला प्राधान्य दिले आहे. गेल्या दोन महिन्यांत चारचाकी व दुचकी वाहनांच्या खरेदीतही वाढ झाली आहे. मात्र स्वत:च्या वाहनातून प्रवास करतानाही काळजी घेणे गरजेचे बनले आहे. कारण वाहनाची स्वच्छता न ठेवल्यास ते करोना संक्रमणाचे वाहक ठरू शकते.

स्वत:चे वाहन असले म्हणजे आपण सुरक्षित आहोत, असे समजण्याचे कारण नाही. कारण वाहनाची  स्वच्छता व काळजी घेतली नाही तर तेही संक्रमणाचे माध्यम होऊ शकते. त्यामुळे वैयक्तिक स्वच्छतेबरोबर वाहनाच्या स्वच्छतेलाही महत्त्व दिले पाहिजे. त्यासाठी वाहनातून प्रवास करण्यापूर्वी व प्रवास करताना काही नियम पाळणे गरजेचे आहे. विशेषत: गाडीची आतून व बाहेरून स्वच्छता.

करोना विषाणू कारची आसन व्यवस्था, दाराची पकड, स्टेअिरगसह वातानुकूलन यंत्रणेत असू शकतो. या विषाणूपासून बचावासाठी सुरक्षा हाच उपाय जास्त महत्त्वाचा आहे. त्यासाठी काही सुरक्षात्मक बाबींचे पालन केल्यास करोना विषाणूपासून आपण स्वत:बरोबर कुटुंबालाही सुरक्षित ठेवू शकतो.

गाडी चालवण्याआधी व नंतर हात स्वच्छ धुवणे, कारमध्ये ‘हॅण्ड सॅनिटायझर’ अवश्य ठेवावे. त्याचा वापर कार सुरू करण्याआधी लक्षपूर्वक करावा. तसेच आपल्यासोबत सहप्रवाशांना त्याचा वापर करायला लावा. तसेच एकत्र प्रवास करताना मुखपट्टय़ांचा वापर करणे गरजेचे आहे.

कार बाहेरून स्वच्छ व चकचकीत दिसण्यासाठी आपण प्राधान्य देत असतो. त्यामानाने कारच्या आतील भागातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असते. मात्र सध्याच्या परिस्थितीत हे धोक्याचे ठरू शकते. करोनानंतर कारची आतील स्वच्छताही महत्त्वाची आहे. करोना विषाणू कारच्या आसन व्यवस्था, स्टेअिरगसह वातानुकूलन यंत्रणेत असू शकतो, त्यामुळे प्रवासाला प्रारंभ करण्यापूर्वी कारचा आतील भाग र्निजतुक करा. यामुळे कोणताही विषाणू असेल तर तो नष्ट होऊन तुमचा प्रवास सुरक्षित होईल. या स्वच्छतेसाठी हल्ली बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. शिवाय यासाठी तुम्ही व्हॅक्युम क्लीनरचा वापरही करू शकता. कारमध्ये जर पडदे असतील तर त्यांची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे.

तसेच आपण कारच्या ज्या भागांना वारंवार स्पर्श करतो त्यावर अधिक लक्ष द्यावे. विशेषकरून कारच्या दाराचे हॅण्डल, ज्याचा वापर वारंवार होतो. त्यामुळे त्याची स्वच्छता वारंवार करावी. या स्वच्छतेनंतर लगेचच हॅण्ड सॅनिटायझरचा वापर व्हावा. यानंतर सर्वाधिक वापर होतो तो स्टेअिरगचा. गिअर बॉक्स, ब्रेक, सन वीजर्स, आसन मागेपुढे करण्याचे लिव्हर, आसन सुरक्षा पट्टा, डॅशबोर्ड आदींची स्वच्छताही महत्त्वाची. यासाठी कारमध्ये जंतुनाशक असावे तसेच स्वच्छ कापडाने सर्व भाग पुसून घ्यावेत.

वातानुकूलन यंत्रणा सुरू करण्यापूर्वी..

वातानुकूलन यंत्रणेची स्वच्छता सर्वाधिक महत्त्वाची. कारण त्यामध्ये विषाणू सर्वाधिक सक्रिय राहू शकतात. यंत्रणा सुरू होताच ते कारमध्ये पसरू शकतात व प्रवाशांना बाधित करू शकतात. त्यामुळे यंत्रणा सुरू करण्यापूर्वी जंतुनाशक स्प्रेच्या साहाय्याने ती स्वच्छ करा.

सहप्रवास टाळा

करोनाकाळात सर्वाधिक सुरक्षिततेचा उपाय म्हणजे सहप्रवाशांपासून शक्यतो दूर राहणे. मित्र, परिचितांसोबत प्रवास टाळा. तरीही सहप्रवास करण्याचा योग आल्यास सॅनिटायझर व मुखपट्टीचा वापर

बंधनकारक करा. प्रवासात सर्व आर्थिक व्यवहार डिजिटल करण्याचा प्रयत्न करा. कारण विषाणू नोटांवर असू शकतात व ते आपल्या हाताच्या संपर्कात आल्यास धोका संभवू शकतो.

हवा शुद्धीकरण यंत्र

शहरांतील प्रदूषणाची वाढलेली मात्रा व आता करोनाचे संकट यामुळे वाहनांमध्ये हवा शुद्धीकरण यंत्राची मागणी वाढली आहे. बाहेरील हवेपेक्षा कारमधील हवा सध्याच्या काळात जास्त धोकादायक ठरू शकते. हवा मोकळी राहण्यासाठी कारमध्ये पुरेशी जागा नसल्याने मोटारीत जिवाणू, विषाणूंसह धुलीकण पसरलेले असतात. त्यामुळे येणारा दर्पही श्वसनाच्या विकाराला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे गाडीत हवा शुद्धीकरण यंत्राची गरज निर्माण झाली आहे. यापूर्वी हे यंत्र गरज व इच्छेनुसार वापरले जात असे. आता ती गरज बनली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत आलेल्या नवीन कारमध्ये एअर प्युरिफाअर (हवा शुद्धीकरण) हे कंपनी फिटेड येत आहेत.

रात्री कारमध्ये कीटकनाशक फवारणी करावी

कोणताही विषाणू कारच्या आसन व्यवस्थेवर चिकटलेला असू शकतो. तो वाहनचालकासह सहप्रवाशांच्या हात व कपडय़ांवर सहज पसरतो. त्यासाठी शक्यतो रात्री कारमध्ये कीटकनाशक फवारणी करा. त्यामुळे रात्रभरात सर्व जिवाणू, विषाणू नष्ट होतील.