29 May 2020

News Flash

CoronaVirus: इयत्ता पहिली ते JEE कोणत्या परिक्षा रद्द?, कोणत्या पुढे ढककल्या? जाणून घ्या

करोनामुळे शिक्षण विभागाने आणि वेगवेगळ्या संस्थांनी परिक्षासंदर्भात महत्वाच्या घोषणा केल्या आहेत

महाराष्ट्रामध्ये करोनाचे ५२ रुग्ण अढळून आल्याने भितीचे वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षण विभागाने शालेय शिक्षासंदर्भातील मोठी घोषणा आज केली. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता पहिले ते ११ वीच्या परिक्षासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांची घोषणा वर्षा गायकवाड यांनीच केली. राज्यातील शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयांनुसार कोणत्या परीक्षा होणार आहेत आणि कोणत्या रद्द होणार आहेत याची माहिती खालीलप्रमाणे…

इयत्ता पहिली ते आठवी

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना सरासरी वार्षिक कामगिरीच्या आधारावर पुढच्या इयत्तेमध्ये दाखल करण्यात येईल असं शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

नववी आणि अकरावी

राज्यातील नववीच्या आणि अकरावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्याबाबत निर्णय झाला आहे असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

दहावी

सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु असून त्यांचे केवळ दोनच पेपर बाकी राहिले आहेत. यापैकी एक पेपर उद्या म्हणजेच २१ मार्च रोजी आहे तर दुसरा सोमवारी म्हणजेच २३ मार्च रोजी आहे. केवळ दोनच पेपर शिल्लक राहिल्यामुळे नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच दहावीची परीक्षा पार पडेल असं शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान पार पडल्याने १२ वीच्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना कोणताही फटका बसलेला नाही.

सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा पुढे ढककल्या

करोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सीबीएसई आणि आयसीएसई शिक्षण बोर्डानं १९ फेब्रुवारी रोजी मोठं पाऊल उचलत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही बोर्डानं आपल्या १० आणि १२ वीच्या परीक्षांना स्थगिती दिली आहे. तसेच परिस्थितीचा आढावा घेऊन या परीक्षांचं पुढील टाइम टेबल लवकरच प्रसिद्ध केलं जाणार असल्याचंही त्यांनी प्रसिद्धी पत्रकांद्वारे कळवलं आहे. आयसीएसई बोर्डाच्या नियोजित वेळापत्रकानुसार, बारावीची परीक्षा ३ फेब्रुवारीपासून सुरु होऊन ३१ मार्चपर्यंत चालणार होती. तर दहावीची बोर्डाची परीक्षा २७ फेब्रुवारीला सुरु होऊन ३० मार्च दरम्यान चालणार होती. मात्र, आता सर्व परीक्षा बोर्डाने स्थगित केल्या आहेत. सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, “भारत आणि परदेशात सीबीएसईकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन त्या पुन्हा सुरु करण्यात येतील. त्याचबरोबर सध्या सुरु असलेलं पेपर तपासणीचं काम देखील या काळात बंद राहणार आहे.”

एनटीए आणि जेईईलाही फटका

राष्ट्रीय परीक्षण एजन्सीद्वारे (एनटीए) आयआयटी आणि इंजिनिअरिंगसाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) मुख्य २०२० देखील स्थगित करण्यात आली आहे. एनटीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “जेईईची मुख्य परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. नव्या तारखांची घोषणा ही बोर्डाच्या परीक्षा आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांचे टाइमटेबल पाहून जाहीर केले जाईल.” जेईई मुख्य परीक्षा २०२० ही ५ एप्रिल ते ११ एप्रिल या काळात होणार होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2020 3:58 pm

Web Title: coronavirus everything you want to know about reschedule exam timetable scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 जाणून घ्या: मास्क कसा वापरावा?, त्याची विल्हेवाट कशी लावावी? मास्क लावताना काय काळजी घ्यावी
2 लॉक डाऊन म्हणजे काय? महाराष्ट्रात काय होणार?
3 करोना व्हायरस : जास्त सॅनिटायझर वापरण्याचे कोणते दुष्परिणाम आहेत का?
Just Now!
X