भारतामधील १३० कोटी जनतेने एकाच वेळी घरातील लाइट बंद केले तर काय होईल?

याच प्रश्नावर सध्या देशामधील वीजनिर्मिती करणाऱ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आणि इंजिनियर्स विचार करत आहे. याचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला केलेलं एक आवाहन आहे. करोनाच्या महासाथीविरोधात देशावासीयांना पुन्हा एकत्र येत रविवारी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी लोकांनी आपापल्या घरातील दिवे बंद करावेत व मेणबत्ती, मोबाइलचा दिवा वा बॅटरीचा दिवा लावून दिव्यांचा झगमगाट करावा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.

यानंतर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही अशाप्रकारे एकाच वेळेस लाईट बंद केल्यास ट्रिप होऊन सेंट्रल ग्रीड निकामी होईल आणि राज्यासहीत संपूर्ण देश अंधारात जाईल अशी भिती व्यक्त केली आहे. मात्र खरोखरच अशाप्रकारे जर देशातील १३० कोटी जतनेचे घरातील लाईट एकाच वेळी बंद केले तर काय होईल याबद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत जाणून घेतले असता नक्की काय होईल हे सांगणे कठीण असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. “हे म्हणजे गाडी वेगाने सुरु असतानाच ब्रेक लावण्यासारखं किंवा अचानक अँक्सेलेटर देण्यासारखं आहे. असं केल्यास नक्की गाडीचं काय होईल हे सांगणं कठीण आहे तसचं हे आहे. मात्र गाडी काम करते त्यापेक्षा हे अधिक गुंतागुंतीचं आहे,” असं मत वीजनिर्मिती क्षेत्राशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केलं आहे. त्या नऊ मिनिटांसाठी नियोजन करण्यासाठी वीजनिर्मिती क्षेत्रातील अधिकारी आणि तज्ज्ञांकडे दोन दिवसांचा कालावधी आहे असंही या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. “हे आमच्यासाठी हे आव्हान आहे. हे टाळता येण्यासारखंही नाही. मात्र हे आम्ही करु शकतो,” असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. मात्र भारतीयांनी एकाच वेळी दिवे बंद केल्याने वीजनिर्मिती क्षेत्राचे टेन्शन का वाढणार आहे हे समजून घेण्यासाठी आधी वीजनिर्मिती क्षेत्राचे काम कसे चालते, वीजनिर्मिती कशी होते हे समजून घेणं गरजेचं आहे.

तुमच्या घरात वीज कशी येते?

तुमच्या घरापर्यंत वीज पोहचवणाऱ्या यंत्रणेमध्ये तीन मुख्य घटक आहेत. वीज निर्माण कऱणाऱ्या कंपन्या. यामध्ये टाटा पॉवर, राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ अर्थात एनटीपीसी यासारख्या आणि इतर कंपन्यांचा समावेश होतो. त्यानंतर येतात वितरक कंपन्या म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) सारख्या राज्य स्तरावरील वितरक कंपन्या. शेवटचा महत्वाचा घटक म्हणजे स्टेट लोड डिस्पॅच सेंटर म्हणजेच एसएलडीसी. एसएलडीसीच्या माध्यमातून वीजनिर्मीती आणि त्याचा पुरवठा यामधील समतोल राखला जातो. “हे म्हणजे विमान, विमानतळ आणि वाहतूक नियंत्रण कक्ष (एटीसी) यासारखे काम आहे. वाहतूक नियंत्रण कक्ष ज्याप्रमाणे विमानांचे उड्डाण आणि लॅण्डीग वेळेवर होण्यासाठी नियंत्रकाचे काम करता तसेच काए एसएलडीसी करतात,” अशी माहिती मनी कंट्रोल या वेबसाईटशी बोलताना गोपाल जैन यांनी दिली. गोपाल जैन हे सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील आणि वीज नियंत्रण आणि नियमन प्रकरणांसंदर्भातील सल्लागार सदस्य आहेत.

“…तर संपूर्ण राज्य आणि देश एका आठवड्यासाठी अंधारात जाईल”; राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केली भीती

फ्रिक्वेन्सी किती असावी लागते?

एसएलडीसी हे वीज निर्माती करणाऱ्या कंपन्या आणि वीज वितरक कंपन्यांदरम्यान समन्वय साधण्याचं काम करतात. एखाद्या ग्रीडमध्ये किती वीज पुरवली जावी हे एसएलडीसी मागणीनुसार ठरवते. एका दिवसाचे ९६ भाग केलेले असतात. प्रत्येक भाग हा १५ मिनिटांचा असतो. या ९६ भागांनुसार प्रत्येक राज्यातील एसएलडीसी त्यांचे वेळापत्रक तयार करुन ठेवतात. ही खूप तांत्रिक आणि स्वयंचलित यंत्रणा असते. त्यामुळे वीज निर्मिती आणि वीज वितरण करताना एसएलडीसीची भूमिका महत्वाची असते. पॉवर ग्रीडमध्ये असणाऱ्या वीजेची फ्रिक्वेन्सी ही ४८.५ ते ५१.५ हर्ट्हसमध्ये ठेवण्याची जबाबदारी एसएलडीसीवर असते. जर ही फ्रिक्वेन्सी अचानक वाढली अथवा कमी झाली तर वीजपुरवठा करणाऱ्या लाईन्स ट्रिप होऊ शकतात आणि गोंधळ उडू शकतो, असं सतीश मुखर्जी यांनी सांगितलं. सतीश मुखर्जी हे वीजनिर्मिती आणि वितरण क्षेत्राशी संबंधित वकील आहेत.

२०१२ साली  झालेल्या ब्लॅक आऊटदरम्यान असचं झालं होतं. हा जगातील सर्वात मोठा ब्लॅख काऊट होता. यावेळी अचानक विजेची मागणी वाढली आणि ट्रिपिंग झालं. त्यावेळी साठ कोटी भारतीयांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.

पुरवठा नियंत्रण…

पाच एप्रिल रोजी मोदींनी सांगितल्याप्रमाणे देशातील अनेक नागरिकांनी एकाच वेळी लाईट बंद केल्यास वीजेची मागणी अचानक कमी होईल. त्यामुळे वीजनिर्मिती आणि वीजपुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होऊन फ्रिक्वेन्सी नियंत्रणात न राहिल्याने लाईन ट्रिप होतील. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होईल. मात्र योग्य नियोजन केल्यास हा गोंधळ टाळता येईल असं काही वरिष्ठ इंजिनियर्सचं मत आहे. पाच एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास पुरवठा नियंत्रित करणं गरजेचे असल्याचं मत या इंजिनियर्सनी व्यक्त केलं आहे.

भारतामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वीजनिर्मिती केली जाते. यामध्ये थर्मल (औष्णिक), हायड्रो (जलविद्युत) , गॅस, वारा आणि सौरऊर्जा अशा वेगळ्यावेगळ्या माध्यमांचा समावेश आहे. मात्र या माध्यमातून होणारी वीजनिर्मिती नियंत्रित करता येईल का?

“रात्री सौरऊर्जा निर्माण होत नाही. वारा हा सतत वाहत असल्याने त्याच्यापासून होणारी वीजनिर्मिती थांबवता येणार नाही. मात्र हायड्रो पॉवर स्टेशन्स आणि गॅसवर चालणारे वीजनिर्मिती थांबवता येणं शक्य आहे,” असं इंजिनियर्स म्हणतात. तसेच या दोन्ही पद्धतीची वीजनिर्मती केंद्र पुन्हा सुरु करणं फारसं त्रासदायक नसल्याचंही या इंजिनियर्सचं म्हणणं आहे. “थर्मल वीजनिर्मिती केंद्रांमधील वीजनिर्मिती थांबवणं कठीण आहे. कारण ही केंद्र बंद केली तर ती पुन्हा सुरु करण्यासाठी काही तास जातील,” असं इंजिनियर्स सांगतात.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यामुळे अनेक कंपन्या आणि उद्योग बंद असल्याने वीजेची मागणी कमी आहे. त्यामुळेच ही थर्मल वीजनिर्मिती केंद्रे कमी प्रमाणात वीजनिर्मिती करत आहेत ही या परिस्थितीमध्ये सकारात्कम बाब आहे. ही केंद्रे बंदही करता येणार नाही. त्यामुळे पाच एप्रिल रोजी त्या नऊ मिनिटांसाठी या केंद्रांच्या कीमान क्षमतेवर वीजनिर्मती केल्यास मागणी आणि पुरवठ्याचा मेळ राखला जाण्याची शक्यता आहे. मोदींनी भारतातील जनतेला लाईट बंद ठेवण्याचं आवाहन केलं तेव्हापासून वीजनिर्मिती क्षेत्रातील वीज निर्मिती कंपन्या, वितरक आणि एसएलडीसी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात नियोजन करण्यास सुरुवात केल्याचे समजते.

ते नऊ मिनिटं

वीजेची मागणी आणि पुरवठा यासाठी वापरण्यात येणाऱ्या दिवसाच्या प्रत्येकी १५ मिनिटं याप्रमाणेच्या ९६ भागांपैकी एका भागामध्ये हे नऊ मिनिटं असणार आहेत. मोदींनी सांगितलेला काळ हा पूर्ण १५ मिनिटांचा नसून एका भागातील केवळ ९ मिनिटांसाठी मागणी कमी होणार आहे. १५ मिनिटांचे हे चक्र एखाद्या ठराविक दिवसासाठी पूर्णपणे बदलता येणं शक्य नसल्याने वीज निर्मिती कंपन्या, वितरक आणि एलएलडीसीसमोर हे मोठं आव्हान असणार आहे.

वीज क्षेत्राला समाधानाची बाब म्हणजे केवळ घरातील लाईट्स बंद केले जाणार आहेत. “लोक त्या नऊ मिनिटांदरम्यान त्यांच्या घरातील एसी किंवा फॅन बंद करणार नाहीत. तसेच सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या लाईट्स आणि पथदिवे सुरु राहणार आहेत. तसेच काही लोकं लाईट बंदही करणार नाहीत हे थोडं दिलासादायक आहे,” असं इंजिनियर्स म्हणतात. या नऊ मिनिटांदरम्यान मागणी पुरवठ्यामधील तफावत ही नऊ ते दहा टक्के असू शकते असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. “हे प्रमाण जास्त नाहीय. मात्र त्याचवेळी पुरवठा नियंत्रणात ठेवणंही सोप्प नसल्याने हे एक प्रकारचं आव्हानच आहे,” असं तज्ज्ञ म्हणतात.

त्या नऊ मिनिटांनंतरचा दहावा मिनिटं खूप आव्हानात्मक असणार आहे. या मिनिटाला अनेकजण घरातील दिवे सुरु करताली. अचानक ही मागणी वाढल्याने पुरवठा तेवढ्या प्रमाणात होणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. “नक्की काय होणार हे आता त्या दिवशीच समजेल,” अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने नोंदवली आहे.