मुंबईपासून अवघ्या ११० किमी अंतरावर पालघरजवळ निसर्ग चक्रीवादळ मंगळवारी रात्री आठच्या सुमारास किनारपट्टीला धडक देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी ११५ ते १२५ किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा स्कायमेट या खासगी वेधशाळेने दिला आहे. असं असतानाच चक्रीवादाळाचा मुंबईसहीत ठाणे, पालघर आणि रायगडमधील काही भागांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय जल आयोगाने सिंधुदूर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, मुंबई आणि नाशिकमधील काही भागांमध्ये फ्लॅश प्लड (म्हणजेच अचानक मोठ्याप्रमाणात आलेला पाण्याचा प्रवाह) येण्यासंदर्भातील इशारा दिल्याचेही स्कायमेटनं म्हटलं आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये तसेच गुजरामध्येही उंच लाटा उसळतील असा इशाराही स्कायमेटनं दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात एनडीआरएफच्या १६ तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत.  मात्र असं चक्रीवादळ आल्यावर काय करावं आणि काय नाही यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने काही सुचना जारी केल्या आहेत. यापैकीच काही सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना वाचू दाखवल्या. काय आहेत या सुचना आपण जाणून घेऊयात..

या २० गोष्टी करा

१)
घराबाहेर असलेल्या सैल वस्तू बांधून टाका किंवा त्यांना घरामध्ये हलवा

२)
महत्त्वाचे दस्तावेज आणि दागिने प्लास्टिकच्या पिशवीत सील करुन ठेवा

३)
बॅटरीवर चालणारे उपकरणं तसेच पॉवर बँक चार्ज आहे ना, याची खबरदारी घ्या.

४)
दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या सूचनांकडे लक्ष द्या.

५)
आपत्कालिन परिस्थितीत करावयाच्या कृतींचा अधून-मधून सराव करा.

६)
आपलं घर कच्च नसेल किंवा झोपडी नसेल तर आपल्या घरातील एक भाग आपत्कालिन निवारा म्हणून निश्चित करा. घरातील सर्व सदस्यांनी चक्रीवादळाच्या वेळी त्या जागेचा उपयोग कसा करता येईल, याचा सराव आणि नियोजन करा.

७)
आपत्कालिन उपयोगी वस्तूंची बॅग म्हणजेच इमर्जन्सी कीट तयार ठेवा

८)
खिडक्यांपासून दूर राहा. काही खिडक्या बंद व काही खिडक्या उघड्या ठेवा जेणेकरुन दाब समान राहील.

९)
खोलीच्या मध्यभागी जा, कोपऱ्यांपासून दूर रहा, कारण भऱ्याचदा मोडतोड झालेले सामान कोपऱ्यात जमा होते.

१०)
बाक किंवा जड टेबल किंवा डेस्क यासारख्या मजबूत फर्निचरच्या खाली जा. ते धरुन ठेवा.

११)
डोकं आणि मानेच्या संरक्षणासाठी हाताचा उपयोग करा.

१२)
मोठे छप्पर असलेल्या जागा टाळा. यामध्ये प्रामुख्याने प्रेक्षागार, मोठी सभागृहे आणि मोठ्या दुकानांचा समावेश होतो.

१३)
जर एखादी उघडी जागा आणि पुरेसा वेळ असेल तर योग्य निवारा शोधा किंवा सर्वात जवळच्या छोट्या खड्ड्यात किंवा चरात पडून रहा.

१४)
आधी ठरवून ठेवलेल्या किंवा प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणी स्थलांतरीत व्हा

१५)
आपत्काळात न लागणाऱ्या सर्व उपकऱणांचा व साधनांचा विद्युत पुरवठा खंडीत करा

१६)
पिण्याचे पाणी स्वच्छ ठिकाणी साठवून ठेवा (जग बाटल्या इत्यादी)

१७)
वादळात अडकलेल्या किंवा जखमी लोकांना मदत करा. त्यांना आवश्यकतेनुसार प्रथमोपचार द्या.

नक्की वाचा >चक्रीवादळं म्हणजे काय?, चक्रीवादळांचा इशारा कधी दिला जातो?, त्यांना नावं कशी दिली जातात?

१८)
वायुगळती तपासा. जर तुम्हाला गॅसचा वास आला किंवा गळतीचा आवाज आला तर तातडीने खिडक्या उघडा व इमारतीमधून बाहेर पडा. शक्य असल्यास गॅसची कॉक बंद करा आणि गॅस कंपनीला कळवा.

१९)
विद्युत उपकरणे तपासा. जर तुम्हाला ठिणग्या, उघड्या तारा दिसल्या किंवा रबर जळल्याचा वास आला तर मुख्य विद्युत पुरवठा खंडीत करा आणि इलेक्ट्रेशियनला सल्ल्यासाठी फोन करा.

२०)
ज्यांना विशेष मदतीचा गरज आहे अशांना, लहान मुलांना, शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना, वयोवृद्ध माणसांना आणि शेजाऱ्यांना शक्य असल्यास मदत करा.

या पाच गोष्टी टाळा

१)
अफवा पसरवू नका व अफवांवर विश्वास ठेवू नका

२)
चक्रीवादळाच्या दरम्यान गाडी किंवा दुचाकी वाहन बाहेर काढण्याचा प्रयत्न करुन नका.

३)
नुकसान झालेल्या इमारतींपासून दूर राहा

४)
अधिक इजेचा प्रत्यक्ष धोका असल्याशिवाय गंभीर जखमींना हलवण्याचा प्रयत्न करुन नका. त्यामुळे त्यांना अधिक इजा होऊ शकते.

५)
सांडलेली औषधे, तेल व इतर ज्वालाग्राही पदार्थ पसरु देऊ नका, त्यांना ताबडतोब स्वच्छ करा.