अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज, सोमवारपासून ३६ तासांच्या भारतभेटीवर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मोठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. तसंच त्यांच्यासाठी सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे.  त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली जाते. ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी त्यांची गाडीही तशीच तयार करण्यात आली असून त्यांच्या ड्रायव्हरची नियुक्ती करतानादेखील काही खास गोष्टी विचारात घेतल्या जातात.

जगातील सर्वात शक्तीशाली नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी कॅडीलॅक बिस्ट (Cadillac Beast) ही खास गाडी तयार करण्यात आली आहे. ही गाडी केवळ राष्ट्राध्यक्षांसाठीच तयार करण्यात येते. त्यामुळे ही गाडी सर्वसामान्य नागरिक विकत घेऊ शकत नाहीत. याच कारणास्तव ही गाडी अमेरिकेतील अन्य कोणत्याही नागरिकाकडे पाहायला मिळणार नाही. विशेष म्हणजे ट्रम्प ज्यावेळी विदेश दौऱ्यावर जातात त्यावेळी ते कॅडीलॅक बिस्ट (Cadillac Beast) हीच गाडी घेऊन जातात.

गाडी चालविण्यात तरबेज असलेल्या व्यक्तीची कॅडीलॅक बिस्टचा (Cadillac Beast) ड्रायव्हर म्हणून नियुक्ती केली जाते.  ही व्यक्ती गाडी चालविण्यात माहीर असली तरीदेखील तिला खास ट्रेनिंग दिलं जातं. तसंच या ड्रायव्हरचा रोज रिव्ह्यु आणि वैद्यकीय तपासणी केली जाते. कॅडीलॅक बिस्ट (Cadillac Beast) गाडीच्या ड्रायव्हरला यूएस सिक्रेट सर्व्हिस (US Secret Service) खास ट्रेनिंग दिलं जातं. या ट्रेनिंगमध्ये पास झाल्यानंतर त्या व्यक्तीची कॅडीलॅक बिस्टचा (Cadillac Beast) ड्रायव्हर म्हणून नियुक्ती होते. विशेष म्हणजे या ड्रायव्हर कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाता आलं पाहिजे. त्यामुळेच त्याला संरक्षण प्रशिक्षणही दिलं जातं. इतकंच नाही तर हा ड्रायव्हर कॅडीलॅक बिस्ट (Cadillac Beast) या मोठ्या गाडीला तब्बल १८० डिग्री J- टर्नमध्ये वळवू शकतो.

दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची सुरक्षितता लक्षात घेता या गाडीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्याप्रमाणेच ट्रम्प यांच्या पद्धतीने गाडी डिझाइन करण्यात आली आहे. या गाडीची किंमत जवळपास ११. ५ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं. या गाडीची निर्मिती कॅडीलॅक (Cadillac) ही कंपनी करते. यापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या गाडीची निर्मितीही कॅडीलॅक (Cadillac) या कंपनीने केली होती. त्यांच्या गाडीचं नाव कॅडीलॅक वन (Cadillac One) असं होतं.