मंदीतून वाहन उद्योग बोहेर येत असून गेल्या दोन महिन्यांत खरेदीदारांनी वाहन खरेदीला पसंती दिली आहे. यासाठी इतर अनेक कारणे आहेत, त्यात अर्थपुरवठा करणाऱ्यांनी दाखवलेली लवचीकता (व्याजदरात कपात) हीही महत्त्वाची आहे. यासाठी कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती वाहन खरेदीदाराला असली तर त्याची फसवणूक होत नाही..

वाहन खरेदी हा महत्त्वाचा निर्णय आहे. गाडीची रचना, इंजिन, मॉडेल व वैशिष्टय़ांपर्यंत असंख्य बाबींचा आपण विचार करीत असतो. यात आणखी एक महत्त्वाची बाब असते ती वाहनकर्ज. साधारपणे अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था वाहन खरेदीसाठी तीन प्रकारची कर्ज देतात. यात नवीन कारसाठी कर्ज, वापरलेल्या कारसाठी कर्ज आणि विद्यमान कारवर दिले जाणारे कर्ज. या लेखात आपण नवीन वाहन खरेदीसाठी घेतल्या जाणाऱ्या अर्थपुरवठय़ाबाबत माहिती घेऊ..

Mumbai, expensive mobile phones
मुंबई : ऑनलाईन फसवणूक करून महागड्या मोबाईलची खरेदी
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका

किंमत, कालावधी आणि व्याजदर निश्चित करा

आपण आपल्या आवडीचे वाहन निवडले असेल आणि त्याच्या किमतीचा अंदाज बांधला असेल. अर्थात, या अर्थनियोजनात दरवर्षी कार चालवण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा समावेश नक्की करा. पुढील बाब म्हणजे व्याजदर. सामान्यत: बँकेशी यापूर्वीही व्यवहार केलेल्या कर्जदारांना तुलनेने कमी व्याजदराने अर्थपुरवठा केला जातो. काही बँका तर अगदी वार्षिक ८ ते ९.५ टक्के एवढय़ा कमी दराने अर्थपुरवठा देऊ  करतात. तुम्हाला गाडीच्या किमतीच्या ८० टक्के अर्थपुरवठा केला जाऊ  शकतो. यातही कोणती अर्थपुरवठा करणारी संस्था सर्वोत्तम दर देत आहे, याची प्रथम माहिती घ्या. तुम्ही परतफेडीसाठी कमीत कमी कालावधीचा पर्याय निवडलात तर दीर्घकाळात पैशाची बचत करण्यासाठी ते उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ : तुम्हाला ७ वर्षांच्या कर्जमुदतीसाठी छोटी ईएमआय रक्कम देऊ  केली जाऊ  शकते, पण त्यासाठी तुम्हाला दीर्घकाळ बरेच व्याज भरावे लागेल.

कर्जाच्या पर्यायांची तुलना करा

वाहनाच्या एक्स-शोरूम किमतीवर किंवा ऑनरोड किंमतीवर (यामध्ये शोरूममधील दर तसेच नोंदणी शुल्क व अ‍ॅक्सेसरीजचा खर्च समाविष्ट होतो) कर्ज घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारचे कर्ज हवे हेही निवडता आले पाहिजे. तुमचे बजेट कमी असेल, तर निश्चित (फिक्स्ड) व्याजदराचा पर्याय तुम्ही निवडू शकता. तुम्ही बजेटबाबत धोका पत्करू शकत असाल तरच परिवर्तनीय (व्हेरिएबल) व्याजदराचा पर्याय निवडा. याशिवाय तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कर्ज योजनांचाही विचार करू शकता. पगारदार व्यक्तींसाठी ‘स्टेप अप स्कीम’ उपलब्ध आहे. यात कर्जदाराचा पगार वाढत जाईल असे गृहीत धरून ‘ईएमआय’मध्ये दरवर्षी १० टक्के वाढ केली जाते.

शुल्क व आकारांचा माहिती घ्या

प्रक्रिया शुल्क अर्थात प्रोसेसिंग फीची चौकशी करा. कारण वेगवेगळे कर्जदाते वेगवेगळे शुल्क लावतात आणि म्हणून विविध कर्ज पर्यायांची तुलना करून तुम्ही माहितीपूर्ण निर्णय घेऊ  शकता. ग्राहकाला लावले जाणारे सामान्य आकार व शुल्क म्हणजे कर्ज प्रक्रिया शुल्क, दस्तावेज आकार, क्रेडिट रिपोर्ट आकार, नोंदणी प्रमाणपत्र संपादन आकार, मुद्रांक शुल्क, विलंब भरणा दंड, अमोर्टायझेशन शेडय़ुल शुल्क, कर्ज रद्दीकरण शुल्क, स्वॅप शुल्क, बाउन्स दंड आदी, अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थेची निवड करण्यापूर्वी तुम्ही तुलनात्मक अभ्यास करणे गरजेचे आहे.

प्रीपेमेंटची चौकशी

कर्जदाराने कर्जदात्याकडे चौकशी करणे आवश्यक असलेला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रीपेमेंट (मुदतपूर्व परतफेड) शुल्क. कर्जदाराला मुदत पूर्ण होण्यापूर्वीच कर्ज फेडायचे असेल तर अनेक बँका प्रीपेमेंट शुल्क, फोरक्लोजर शुल्क आणि अन्य आकार लावतात. अशा कारणांसाठी किमान शुल्क लावणारी बँकच तुम्ही निवडली पाहिजे. अनेक बँका कर्ज मंजूर झाल्याच्या तारखेला दोन वर्षे उलटून गेल्यानंतर फोरक्लोजर शुल्क लावत नाहीत. फोरक्लोजर शुल्क न लावणाऱ्या किंवा अगदी कमी प्रमाणात लावणाऱ्या बँकांना प्राधान्य देणे कधीही चांगले.

कर्जाचा विमा महत्त्वाचा

शेवटचा मुद्दा म्हणजे कारचा विमा काढणे जसे महत्त्वाचे आहे, तसेच कर्जासाठीही विमा काढणे महत्त्वाचे आहे. ‘लोन सुरक्षा’ या मुद्दय़ाचा विचार तुम्ही केला पाहिजे. आकस्मिक परिस्थितीत हा विमा प्राणरक्षक ठरू शकतो.

योजना व सवलतींचे परीक्षण करा

सणासुदीच्या काळात बँका व वित्तीय संस्था अनेक आकर्षक ऑफर्स आणि सवलती देतात. तुमची क्रेडिट प्रोफाइल भक्कम असेल तर तुम्ही अनेक कस्टमाइझ्ड डील्स प्राप्त करू शकता व त्यांतून अनेक लाभ मिळवू शकता.

तुमच्या वाहनासाठी योग्य अर्थपुरवठा निवड करण्यासाठी या सूचना उपयुक्त आहेत. याशिवाय आपण कर्जविषयक अधिकारी किंवा अधिकृत डीलर्सची मदतही घेऊ  शकता. पण वाहन खरेदी करण्यापूर्वी या पर्यायांबाबत माहती असणे कधीही उत्तम.

– भास्कर करकेरा (लेखक एयू स्मॉल फायनान्स बँकेचे अधिकारी आहेत.)