News Flash

Summer Health Tips: जाणून घ्या पाणी का प्यावे, कसे प्यावे आणि किती प्यावे

जास्तीत जास्त पाणी पिण्याचे शरीराला होणारे फायदे कोणते?

File Photo

पाणी म्हणजे जीवन! आपल्या आरोग्यासाठी नियमित आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. सामान्यपणे उन्हाळा सुरु झाल्यानंतर उन्हाळ्यात पाणी जास्त प्यावे असा सल्ला दिला जातो. त्यानिमित्तानेच खरच जास्त पाणी प्यावे का?, कसे प्यावे आणि किती प्यावे यासंदर्भात थोडं मार्गदर्शन..

आपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता का?

आपल्या शरीरामध्ये ६० टक्के पाणी असते. शरीरामध्ये लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्त्वांचे परिवहन, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन, चयापचयातील विषारी पदार्थाचे विसर्जन आदी क्रिया होण्यासाठी पाणी अत्यावश्यक असते. मेंदूच्या मागच्या भागात असलेल्या ग्रंथीच्या(पिच्युटरी ग्लॅण्ड) माध्यमातून मेंदू आणि मूत्रपिंड यांच्यामध्ये समन्वय साधला जातो आणि मूत्राद्वारे किती पाणी बाहेर फेकावे ते ठरते. जेव्हा आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासते, तेव्हा मेंदू शरीरातील तहान लागण्याची भावना जागृत करतो. अशा वेळी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाणी किंवा सरबत, ताक यांसारखे द्रवपदार्थ पिणे आवश्यक आहे. मात्र तहान लागल्यानंतर अल्कोहोलयुक्त द्रवपदार्थ पिणे टाळावे. कारण अल्कोहोलमुळे मेंदू आणि मूत्रपिंडामधील समन्वयामध्ये बाधा येऊन प्रमाणापेक्षा जास्त पाणी मूत्राद्वारे शरीरातून बाहेर फेकले जाते. ज्यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासू शकते.

आपण पुरेसे पाणी पितो का?

मूत्राचे प्रमाण आणि रंग यावरून आपण पुरेसे पाणी पितो का याची खात्री केली जाऊ शकते. जर दर दोन किंवा चार तासांनी मूत्रविर्सजन करत असून त्या वेळी मूत्राची मात्रा मुबलक प्रमाणात आणि रंग फिकट असेल तर ते शरीराला पुरेसे पाणी मिळत असल्याचे लक्षण आहे. जर सुमारे आठ तास मूत्रविसर्जन करत नसाल तर हे धोकादायक असून शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याचे लक्षणे आहे.

तहान लागल्यावर पाणी उपलब्ध नसल्यास काय करावे?

तहान लागल्यानंतर पाणी पिणे हेच योग्य आहे. मात्र काही वेळा पाणी उपलब्ध नसल्यास अल्कोहोलजन्य पदार्थ वगळता कोणत्याही द्रवपदार्थाचे सेवन करावे. फळे व अन्नामध्येदेखील पाणी असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मांसामध्ये ६० टक्के पाणी असते.

साधे पाणी पिणे कंटाळवाणे वाटत असेल तर काही लोक पाण्यामध्ये फळांचे तुकडे किंवा पुदिना आदी पदार्थ घालून पाणी पितात.

पाणी शरीराला घातक आहे का?

दिवसभरात जास्त शारीरिक कामे करत नसू तर दिवसाला साधारणपणे दोन लिटर पाणी पुरेसे आहे. हृदय, मूत्रपिंड आणि यकृताच्या आजारांमध्ये काही वेळा पाण्याचे सेवनावर काही प्रमाणात प्रतिबंध घातले जातात. पिण्याचे पाणी र्निजतुक नसेल तर विषाणूंचा प्रादुर्भाव होऊन अतिसार, कावीळ, विषमज्वर यासारखे आजार होऊ शकतात. काही वेळा पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असल्याने असे पाणी पचायला जड असते.

जास्तीत जास्त पाणी पिण्याचे शरीराला होणारे फायदे कोणते?

शारीरिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी पाण्याची मदत होते. शरीरातील दोन टक्के पाणी कमी झाले तरी पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. व्यायामामधून घाम येऊन शरीरातील पाणी कमी होत असते. खेळाडूंनी हे लक्षात ठेवून जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी कमी प्यायल्यास त्यांना व्यायाम करते वेळी थकवा येणे, शरीरातील तापमान नियंत्रण न होणे आदी त्रास होऊ शकतो. आपल्या शरीरातील सर्व स्नायूंमध्ये पाण्याचे प्रमाण ८० टक्केअसते. शारीरिकदृष्टय़ा जास्त थकवणारे व्यायाम करताना स्नायूंमध्ये निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी शरीरामध्ये पाणी मुबलक पाणी असणे आवश्यक आहे.

>
वैद्यकीय अभ्यासानुसार, शरीरातील सुमारे १ ते ३ टक्के पाणी कमी झाल्याने देखील मनाचा कल, स्मरणशक्ती आदी मेंदूच्या विविध कार्यावर परिणाम होऊ शकतो. १ ते ३ टक्के पाण्याची कमतरता भासल्याने होणारे परिणाम हे साधारणपणे ६८ किलो वजनाच्या व्यक्तीचे ०.५ ते २ किलोपर्यंतचे वजन कमी होण्याने होणाऱ्या परिणामांइतके आहेत.

>
शरीराला आवश्यक एवढय़ा पाण्याचे सेवन न केल्यास काही व्यक्तींना डोकेदुखी, अर्धशिशी यांसारखे आजार उद्भवू शकतात.

>
बद्धकोष्ठता सध्या सर्वसाधारणपणे आढळला जाणारा आजार आहे. जास्तीत जास्त पाण्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेचा आजार मोठय़ा प्रमाणामध्ये दूर होऊ शकतो.

>
जास्तीत जास्त पाणी प्यायल्याने, मूत्रपिंडाद्वारे बाहेर पडणाऱ्या मूत्राची मात्रा वाढल्याने त्यासोबत शरीरातील क्षारही बाहेर फेकले जातात. त्यामुळे मूतखडा निर्माण होण्याची शक्यता कमी होते.

>
मुबलक प्रमाणात पाणी प्यायल्याने वजनदेखील कमी करण्यास मदत होते. पाण्यामुळे चयापचयाचे प्रमाण वाढते. अर्धा लिटर पाणी प्यायल्याने चयापचयाचा दर सुमारे २४ ते ३० टक्के वाढतो. याप्रमाणे जर दिवसभरामध्ये दोन लिटर पाणी प्यायल्याने शरीरातील जवळपास ९६ कॅलरी जाळल्या जातात.

>
त्वचा तजेलदार आणि तुकतुकीत दिसण्यासाठी पाण्याची मदत होते. त्वचेमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असून शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी त्वचा संरक्षणात्मक म्हणून काम करत असते. शरीरातील पाणी कमी झाल्यास त्वचा कोरडी होऊन सुरकुत्या पडतात. तेव्हा त्वचेवर मॉईश्चरायझर लावल्याने शरीरातील पाणी कमी होण्यापासून रोखले जाऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 5:16 pm

Web Title: summer health tips everything you wanted to know about water drinking habits during summer scsg 91
Next Stories
1 जाणून घ्या कधी आहे मदर्स डे, कशी झाली आईला सन्मान देणाऱ्या दिवसाची सुरुवात
2 नोकरीदरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणाऱ्या पेन्शनच्या नियमांत बदल
3 महाराष्ट्र दिन विशेष: महाराष्ट्राबद्दल तुम्हाला या ६० गोष्टी ठाऊक आहेत का?
Just Now!
X