करोना संकटामध्येच एक सप्टेंबरपासून देशात अनलॉकच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात होईल. पुढील महिन्यापासून अनेक बदल होणार आहेत. याचा सरळ परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर पडणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही अनेक महत्वाचे बदल झाले होते. सरकारने नुकतेच एक सप्टेंबरपासून होणाऱ्या बदलाबाबात संकेत दिले आहेत. एलपीजी सिलिंडर, महागडी विमान यात्रा, अनलॉक ४ ची सुरुवात, लोन मोरेटोरियम आणि जीएसटी भरणा यासोबत निगडित आहे.

१ सप्टेंबरपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एलपीजीच्या किंमतीत बदल होतो. ऑगस्ट महिन्यातही बदल झाला होता. नागरी उड्डान मंत्रालयने एक सप्टेंबरपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून आधिक विमानन सुरक्षा शुल्क (एएसएफ) घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विमान यात्रा महागण्याची चिन्हे आहेत.

केंद्र सरकार १ सप्टेंबरपासून देशात अनलॉकचा पुढील टप्पा राबवणार आहे. यामध्ये अनेक गोष्टींना सूट मिळण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत अनलॉक ४ ची नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये राज्यांना मेट्रो ट्रेन सुरु करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तसेच अनेक गोष्टी सुरु होण्याची शक्यता आहे. जीएसटी भरणा उशीरानं करणाऱ्यांना एक सप्टेंबरपासून व्याज द्यावं लागणार आहे. सरकारनं नुकतीच याची घोषणा केली आहे.