घरोघरी एका कोपऱ्यात बसणाऱ्या डेस्कटॉप संगणकाची जागा आता लॅपटॉपने घेतली आहे. कुठेही घेऊन जाता येणारा, वजनाने हलका, हाताळणीत सहज आणि वेगवान आणि नवनवीन वैशिष्टय़ांसह असलेल्या लॅपटॉपलाच आता ग्राहक घरगुती कामासाठी प्राधान्य देऊ लागले आहेत. मात्र, अन्य सर्व गॅजेटप्रमाणे लॅपटॉपच्या तंत्रज्ञानातही सातत्याने बदल होत आहेत. प्रोसेसर, रॅम, ग्राफिक्स कार्ड, बॅटरी, स्टोअरेज क्षमता अशा यंत्रणांमध्ये नवनवीन बदल होऊ लागल्याने अगदी वर्षभरापूर्वी घेतलेला लॅपटॉपही संथ वाटायला लागतो. ‘जुना’ लॅपटॉप देऊन व त्यात भर टाकून नवीन लॅपटॉप खरेदी करावा, म्हटलं तर जुन्याला खरेदीच्या २० टक्केही किंमत मिळत नाही. मग काय करायचं?

याचं साधं उत्तर म्हणजे, आपला लॅपटॉप ‘अपग्रेड’ करायचा. ज्याप्रमाणे संगणकातील अ‍ॅप्लिकेशन, सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम यांच्यात नियमितपणे अपडेट अर्थात अद्यतने होत असतात, त्याप्रमाणे लॅपटॉपमधील हार्डवेअरमध्येही सुधारणा करण्याची सुविधा असते. अर्थात यातून तुम्ही प्रत्येक गोष्ट अपग्रेड करू शकत नाही. मात्र, काही भाग बदलून तुम्ही तुमच्या लॅपटॉपची कार्यक्षमता वाढवू शकता. तुमचा लॅपटॉप जुना असेल तर त्यामध्ये अशी बदलाची सुविधा असू शकते. मात्र, जर लॅपटॉप नव्या धाटणीचा असेल तर अशा ‘अपग्रेड’ची सुविधा आहे की नाही, हे तुम्हाला तज्ज्ञ मंडळींकडून तपासून पाहता येईल.

काय बदलू शकता?

रॅम

लॅपटॉपमधील ‘रॅम’ हे त्याची कार्यक्षमता निश्चित करत असतात. संगणकाच्या विविध प्रक्रियांसाठी लागणारी ‘मेमरी’ रॅम पुरवत असते. ‘रॅम’ जितके जास्त तितका लॅपटॉप अधिक वेगाने काम करतो. त्यामुळे तुमचा विद्यमान लॅपटॉप चार जीबी रॅमचा असेल तर तुम्ही तो आठ जीबी किंवा अगदी १६ जीबीपर्यंत वाढवू शकता. अर्थात यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे, ‘रॅम’ बदलण्याची सुविधा आणि दुसरं म्हणजे त्यासाठी अतिरिक्त जागा. बहुतांश लॅपटॉपमध्ये रॅमची क्षमता मागाहून वाढवण्याची सुविधा असते. यात एकाच स्लॉटमध्ये विद्यमान रॅम काढून नवीन रॅम बसवता येतात. दुसऱ्या पद्धतीत पुरवण्यात आलेल्या अतिरिक्त स्लॉटमध्ये जादा रॅम बसवण्याची सुविधा असते.

रॅम बदलण्यापूर्वी किंवा वाढवण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञांची मदत घेणे. लॅपटॉपमधील व्यवस्था अतिशय गुंतागुंतीची असते. त्यामुळे स्वत: ‘तंत्रज्ञ’ बनण्याच्या भानगडीत न पडता खऱ्याखुऱ्या तंत्रज्ञाकडे हे काम सोपवा. दुसरे म्हणजे, रॅम बदलताना त्याचा मॉडेल क्रमांक आणि बाकी तपशील नोंदवून घ्या. या तपशिलाशी सुसंगत रॅमच खरेदी करा. तुम्हाला ईकॉमर्स संकेतस्थळांवर किंवा लॅपटॉप कंपनीच्या संकेतस्थळावर हे रॅम मिळू शकतील.

बॅटरी

बॅटरी बदलणं हा खरं तर लॅपटॉपला वेगवान करण्याचा पर्याय नाही. मात्र, जर तुमचा विद्यमान लॅपटॉप कमी वेळातच ‘डिस्चार्ज’ होत असेल तर बॅटरी बदलून त्याचा चार्जिग कालावधी वाढवता येऊ शकेल. जुन्या प्रकारच्या लॅपटॉपमध्ये बहुधा लॅपटॉपच्या मागील बाजूने बॅटरी काढण्याची सुविधा असते. मात्र, नवीन लॅपटॉपमध्ये याकरिता थोडी अधिक खटपट करावी लागते. बॅटरी बदलण्यापूर्वी ती तुमच्या विद्यमान लॅपटॉपला सुसंगत आहे का, हे तपासून पाहा. त्याचप्रमाणे बाजारात नकली किंवा बनावट बॅटरीही उपलब्ध असतात. त्यामुळे बॅटरी खरेदी करताना जाणकार व्यक्तीची मदत घेणे कधीही चांगले.

स्टोअरेज

लॅपटॉपचा जसजसा वापर वाढत जातो, तसतसे त्यातील जागा कमी कमी होत जाते. याचा सरळ परिणाम लॅपटॉपच्या कार्यक्षमतेवर होतो. मग लॅपटॉप सुरू होण्यास किंवा बंद होण्यास प्रमाणापेक्षा अधिक वेळ लागणे, एखादा प्रोग्रॅम सुरू करण्यात विलंब होणे अशा तक्रारी उद्भवतात, पण त्यासाठी स्टोअरेजमधील जागा मोकळी करणे हा पर्याय नाही. त्यासाठी तुम्ही तुमच्या स्टोअरेजची क्षमता वाढवू शकता. यातील एक पर्याय म्हणजे, लॅपटॉपच्या विद्यमान हार्डडिस्कच्या जागी दुसरी अधिक जागा असलेली हार्डडिस्क बसवणे. अर्थात यासाठी तुम्हाला तुमचा लॅपटॉप पूर्णपणे ‘रिसेट’ करावा लागेल. मग त्यात बॅकअप घेणे, रिस्टोअर करणे आलेच; पण हे करताना तुम्ही थोडे अधिक पैसे खर्च करून ‘एसएसडी’ स्टोअरेजचा अंतर्भाव करू शकता. ‘सॉलिड स्टेट ड्राइव्ह’ हा पारंपरिक हार्डडिस्कला वेगवान पर्याय आहे. पारंपरिक हार्डडिस्क हे एखाद्या सीडीप्रमाणे आवर्तन पद्धतीने काम करतात. ही आवर्तने जितकी वेगाने फिरतात तितक्या वेगाने हार्डडिस्क काम करते. मात्र, कालांतराने त्या आवर्तनांवर परिणाम होऊ लागतो. याउलट ‘एसएसडी’ हे एखाद्या ‘पेन ड्राइव्ह’सारख्या काम करतात. त्यासाठी कमी वीज लागते आणि प्रोसेसरवरही त्या ताण येऊ देत नाहीत. मात्र, यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतात. सर्वसाधारण हार्डडिस्कपेक्षा तिप्पट किमतीत तुम्हाला ‘एसएसडी’ मिळते किंवा तुम्हाला कमी क्षमतेची ‘एसडीडी’ घ्यावी लागते. मात्र, जर तुमच्या लॅपटॉपमध्ये सुविधा असेल तर ऑपरेटिंग सिस्टीमसाठी तुम्ही स्वतंत्र ‘एसडीडी’ बसवू शकता. तुमचा लॅपटॉप नवीन लॅपटॉप इतक्यात वेगाने काम करू लागेल. ‘एसडीडी’ २५६, ५१२ जीबी किंवा एक टीबी इतक्या क्षमतेच्या मिळतात.