महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. एकनाथ खडसे यांना २०१६ साली भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा देवेंद्र फडणवीस  सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही, त्यामुळे ते नाराज होते. वेळोवेळी त्यांनी आपली नाराजी बोलून सुद्धा दाखवली होती.

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याचा नेमका भाजपावर काय परिणाम होईल?
एकनाथ खडसेंसारख्या ज्येष्ठ, अनुभवी नेत्याच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयाचा निश्चित काही प्रमाणात भाजपावर परिणाम होईल. भाजपाची स्थापना होण्याआधी, भारतीय जनसंघाच्या दिवसापासून एकनाथ खडसे यांचे पक्षासोबत नाते आहे. कष्टकरी, मेहनती आणि निष्ठावान नेते अशी एकनाथ खडसे यांची ओळख आहे. भाजपाचा राज्यातील विस्तार आणि संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. एकनाथ खडसे यांच्या भाजपा सोडण्याच्या निर्णयाचा लेवा पाटील समाजावर निश्चित काही प्रमाणात परिणाम होईल. कारण खडसे या लेवा पाटील समाजातून येतात. खडसे त्यांच्यावर पक्षात अन्याय झाल्याचे पटवून देण्यात यशस्वी ठरले तर, निश्चितच काही प्रमाणात जनतेची त्यांना सहानुभूती मिळू शकते.

“खडसे इतकं टोकाचं पाऊल उचलतील, असं आम्हाला वाटलं नव्हतं. भेटून चर्चेच्या माध्यमातून मतभेदांवर तोडगा काढण्याचं आम्ही आश्वासन दिलं होतं. त्यांनी पक्ष सोडायला नको होता” असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

सध्याच्या राजकीय परिस्थितीत मोठया संख्येने कार्यकर्ते खडसेंसोबत जातील किंवा त्यांच्या पाठिशी उभे राहतील, असे भाजपाला वाटत नाही. खडसे यांना मिळणारा पाठिंबा मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघापुरता मर्यादीत आहे, अशी पक्षाची धारणा आहे. १९८९ ते २०१९ या काळात सलग सहावेळा एकनाथ खडसे मुक्ताईनगरमधून निवडणूक जिंकून विधानसभेवर गेले आहेत. पण याच मतदारसंघात मागच्यावर्षी त्यांच्या मुलीचा पराभव झाला. एकनाथ खडसेंना पक्षाकडून तिकिट नाकारण्यात आले होते.

खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी भाजपा सोडणार नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी २०१९ मध्ये जळगावच्या जिल्ह्याच्या रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली.

“भाजपा सोडण्याच्या निर्णयामध्ये पक्षापेक्षा खडसे यांचे जास्त नुकसान आहे” भाजपाचे सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी सांगितले. खडसे पक्षात मागे पडल्यानंतर त्यांच्याजागी गिरीश महाजन यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले. गिरीश महाजन सुद्धा उत्तर महाराष्ट्रातून येतात. खडसेंप्रमाणे ते सुद्धा ओबीसी नेते आहेत.

२०१९ मध्ये गिरीश महाजन यांना उत्तर महाराष्ट्राशासंबंधित राजकीय निर्णय घेण्याचे मोठया प्रमाणावर अधिकार मिळाले. यात उमेदवारांची निवड असो किंवा निवडणूक प्रचार. मागच्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांच्यावर कुठलीही जबाबदारी नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकारणात बंडाला काहीही स्थान नाहीय, असे भाजपामधील राजकीय तज्ज्ञांनी सांगितले.

खडसेंना घेऊन राष्ट्रवादीला काय फायदा होणार?
एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याआधी, त्यांनी सूनबाई रक्षा खडसे यांच्याकडून राजीनामा घेतला पाहिजे. त्यानंतरच त्यांना पक्षात स्थान द्या, असे राष्ट्रवादीतील काही जणांचे मत होते. पण तरीही शरद पवार यांनी एकनाथ खडसेंसाठी राष्ट्रवादीचे दरवाजे खुले केले आहेत.

उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस थोडी कमकुवत आहे. एकनाथ खडसे यांना घेऊन, तिथे पक्षाचा जनाधार भक्कम करायचा व भाजपाला कमकुवत करायचे, ही राष्ट्रवादीची रणनिती असणार आहे. एकनाथ खडसे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात टोकाचे मतभेद आहेत. खडसेंच्या मदतीने भाजपा आणि फडणवीसांची कोंडी करण्याची राष्ट्रवादीची खेळी असणार आहे.