करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. या वाढत्या संक्रमणामुळे जगभरातील हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. परंतु लक्षवेधी बाब म्हणजे गेल्या काही काळात आपण करोनापासून सुरक्षित राहण्याच्या नादात इतर आजारांकडे साफ दुर्लक्ष करतोय. २०१९ च्या आकडेवारीनुसार केवळ क्षयरोगामुळे एका तिमाहीमध्ये जवळपास २०,००० मृत्यू झाले होते. हा मृत्यूदर करोनापेक्षाही जास्त आहे. विशेष म्हणजे करोना आणि क्षयरोग हे दोन्ही संसर्गजन्य आजार आहेत. या पार्श्वभूमीवर दोघांची लक्षण देखील जवळपास एकसारखीच असतात. तरी देखील प्रश्न असा पडतो की मग क्षयरोग आणि करोना यामधील फरक ओळखायचा तरी कसा?

डॉ. अंकित बन्सल (फोर्टिस हॉस्पिटल, जयपूर) यांनी करोना आणि क्षयरोग यांमधील फरक ओळखण्यासाठी काही टीप्स दिल्या आहेत. या माहितीच्या मदतीनं तुम्ही सहजगतीने हा फरक ओळखून योग्य तो उपचार घेऊ शकाल.

लक्षणे : क्षयरोग आणि कोव्हिड-१९ चा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये साधारण सारखी लक्षणे दिसतात. या दोन्ही आजारांमध्ये फुफ्फुसांवर आक्रमण होते आणि ताप, खोकला आणि थकवा ही लक्षणे सामान्यपणे दिसून येतात.

फरक : क्षय रुग्णांची भूक मंदावते, रात्री घाम येतो, वजन कमी होते आणि अत्यंत थकवा येतो तर कोव्हिड-१९चा संसर्ग झालेल्या व्यक्तींचे नाक चोंदते, श्वास घेताना त्रास होतो आणि/किंवा अतिसार (डायरिया) होतो. कोव्हिडची लक्षणे ७ ते १४ दिवसांच्या कालावधीमध्ये दिसतात आणि निघून जातात (लोकांना संसर्ग असतानाही), पण क्षयरोगाची लक्षणे दीर्घ कालावधीसाठी राहतात.

संसर्गाची प्रक्रिया : क्षयरोगाचा फैलाव हवेवाटे (संसर्ग झालेली हवा श्वासावाटे आत घेतली तरच सुदृढ व्यक्तीला क्षयरोगाची लागण होऊ शकते) होतो. पण कोव्हिड-१९ च्या बाबतीत, जर तुम्ही कोव्हिड-१९ ची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलात आणि तुम्ही त्या व्यक्तीला स्पर्श केला आणि मग तुमच्या नाकाला, डोळ्यांना किंवा तोंडाला स्पर्श केला तर तुम्हाला हा आजार होऊ शकतो.

उपचार : टीबी पूर्ण बरा होऊ शकतो आणि वेळेवर चाचण्या आणि उपचार पूर्ण केले तर टीबी पुन्हा होत नाही. जेव्हा क्षयरुग्ण २-३ आठवडे सलग औषधे घेतो तेव्हा हा आजार संसर्गजन्य राहत नाही. रुग्णाला ६-९ महिने किंवा डॉक्टरांनी नेमून दिलेल्या कालावधीमध्ये सलग उपचार घ्यावे लागतात. कोव्हिड-१९ वर अजून औषध मिळालेले नाही. त्यामुळे घराबाहेर पडल्यावर नेहमी नाक आणि तोंड झाकून ठेवणे, नियमितपणे साबणाने हात धुणे आणि स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

वर नमूद केलेली लक्षणे तुमच्यात असतील तर तुम्ही तातडीने डॉक्टरांची भेट घ्यावी. टीबी आणि कोव्हिड-१९ ची चाचणी लवकर केली आणि उपचार लगेच घेतले तर तुमचा आणि तुमच्या आजुबाजूला असलेल्यांचा जीव वाचू शकतो.