01 June 2020

News Flash

‘स्लिप डिस्क’ म्हणजे काय?; त्याची लक्षणं कोणती आणि उपचार कसा करता येतो?

‘स्लिप डिस्क’ हे शब्द आता सर्वाना परिचयाचे आहेत

प्रतिनिधिक फोटो

‘स्लिप डिस्क’ हे शब्द आता सर्वाना परिचयाचे आहेत. असह्य़ कंबरदुखी, माकडहाडापासून मांडी आणि पोटरीपर्यंत जाणारी कळ ही त्याची प्रमुख लक्षणे. स्लिप डिस्क झाल्यावर शस्त्रक्रियाच करावी लागेल असा अनेकांचा समज असतो. पण आता त्यावरील उपचारांमध्ये बरीच आधुनिकता आली असून बहुतांश रुग्णांच्या बाबतीत शस्त्रक्रियेविनाही उपचार शक्य झाले आहेत.

‘स्लिप डिस्क’ म्हणजे काय?

आपल्या पाठीच्या कणा साधारणत: सायकलच्या चेनसारखा असतो. त्यात ३३ मणके असतात. आपला ‘स्पायनल कॉर्ड’ म्हणजे ‘मज्जारज्जू’ हे मेंदूच्या नसांचेच शेपूट असते. मेंदू आणि शरीराच्या इतर अवयवांमधील संदेशवहन क्रिया त्याद्वारे चालते. अतिशय नाजुक असलेला हा मज्जारज्जू मेंदूपासून माकडहाडापर्यंत मणक्यांच्या पोकळीतून गेलेला असतो. मणक्यामुळे त्याचे धक्का लागण्यापासून संरक्षण होत असते. प्रत्येक मणका पुढील मणक्यांना सांध्याने जोडलेला असतो. त्यांच्या मध्ये गादीसारखा सांधा असतो. या सांध्याचेही दोन भाग असतात. त्याचा बाहेरचा भाग घट्ट चकतीसारखा असतो, तर आतला भाग मऊ जेलीसारख्या पदार्थाचा बनलेला असतो. पाठीच्या कण्याची हालचाल होते तेव्हा मणक्यांच्या मधले हे सांधे ‘शॉक अब्सॉर्बर’सारखे काम करतात.

वार्धक्यामुळे, अकाली झालेल्या मणक्याच्या झीजेमुळे किंवा एखाद्या अपघातामुळे मणक्यांमधील चकतीचे आवरण फाटण्याची शक्यता असते. नंतर हालचाल करताना त्या चकतीवर दाब पडून आतील जेलीसारखा भाग बाहेर येतो. या जेलीसारख्या पदार्थाचा मणक्यातून गेलेल्या मज्जारज्जूवर थेट दाब पडतो किंवा चकतीतून बाहेर आलेल्या पदार्थाच्या रासायनिक गुणधर्माचा मज्जारज्जूला त्रास होतो. ‘सायाटिका’ हे लक्षण अशा वेळी प्रामुख्याने दिसते. त्यात नितंबापासून मांडी आणि पोटरीपर्यंत कळ जाते. काही रुग्णांमध्ये सकाळी उठल्यावर टाचा दुखतात. अशी टाचादुखी वा गुडघेदुखीही सायाटिकाचाच एक प्रकार असू शकतो. कंबरदुखी हे तर स्लिप डिस्कचे नेहमीचे लक्षण आहे.

कारणे

काही जणांमध्ये जन्मत:च शरीररचनेतील कमकुवतपणामुळे मार न लागता किंवा न पडताही स्लिप डिस्क होऊ शकते तसेच वयानुसार होणारी मणक्यांची झीजही त्याला कारणीभूत ठरू शकते. स्लिप डिस्कच्या तरूण वा मध्यमवयीन रुग्णांची संख्याही कमी नाही. व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, सततचे बैठे काम, बसण्याची चुकीची पद्धत किंवा नोकरीनिमित्त काहींना करावा लागणारा रोजचा दुचाकीवरील मोठा प्रवास अशा विविध कारणांमुळे स्लिप डिस्क होऊ शकते.

शस्त्रक्रियेशिवायचे आधुनिक उपचार : सिलेक्टिव्ह नव्‍‌र्ह रूट ब्लॉक प्रोसिजर

आधी म्हटल्याप्रमाणे मणक्याच्या चकतीच्या आतील पदार्थ बाहेर येऊन त्याच्या रासायनिक गुणधर्मामुळे जेव्हा मज्जारज्जूला त्रास (इरिटेशन) होऊ लागतो तेव्हा त्यासाठी ‘सिलेक्टिव्ह नव्‍‌र्ह रूट ब्लॉक प्रोसिजर’ ही आधुनिक पद्धती आता वापरली जाऊ लागली आहे. यात रुग्णाला स्थानिक भूल देऊन एक सुई सायाटिक नव्‍‌र्हच्या भोवतीच्या विशिष्ट जागेत घातली जाते आणि तिथे औषध सोडले जाते. या उपचाराने या प्रकारच्या दुखण्यापासून दीर्घकाळासाठी सुटका होऊ शकते. बाह्य़रुग्ण विभागात हे उपचार होऊ शकतात. यात चकतीचा फाटलेला वा उसवलेला भाग शिवला जात नाही हे लक्षात घ्यायला हवे. तो भाग सांधण्याची प्रक्रिया आपोआप नैसर्गिकरित्या व्हावी लागते. वय वाढल्यावर होणाऱ्या मणक्याच्या झीजेमुळे किंवा रोजच्या जीवनशैलीत अनुकूल बदल न केल्यास त्रास पुन्हाही उद्भवू शकतो. त्यामुळे वैद्यकीय उपचारांनंतरही नेहमीसाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे फार गरजेचे ठरते. स्नायूंची ताकद वाढवणे, प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिजे पुरेशा प्रमाणात असलेला पोषक आहार घेणे, वजन आटोक्यात ठेवणे हे आवश्यकच.

बिनटाक्याची व बिनभुलीची एन्डोस्कोपी

जेव्हा मणक्याच्या चकतीतून जेलीसारखा पदार्थ बाहेर येऊन त्याचा नव्‍‌र्हवर दाब पडत असतो तेव्हा बिनटाक्याची व बिनभुलीची एन्डोस्कोपी हा नव्याने विकसित झालेला उपचार आहे. यात एन्डोस्कोपी करताना रुग्ण जागा असतो व बोलूही शकतो. त्यामुळे नव्‍‌र्हला धक्का न लागण्याच्या दृष्टीने ती सुरक्षित आहे. शिवाय या एन्डोस्कोपीत टाके घालावे लागत नाहीत. यात स्थानिक भूल देऊन स्लिप डिस्क झालेल्या जागी एक सुई टाकली जाते आणि त्यावरून ६ मिमीची टय़ूब टाकून त्यातून चकतीतून बाहेर आलेला पदार्थ दूर केला जातो. बहुतांश रुग्णांच्या बाबतीत हा उपाय प्रभावी ठरू शकतो.

– डॉ. मिलिंद गांधी, अस्थिरोगतज्ज्ञ
docmilind@gmail.com

शब्दांकन- संपदा सोवनी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2020 4:02 pm

Web Title: what is slipped herniated disc symptoms causes and effects scsg 91
Next Stories
1 PF खात्यावर दोन लाख असतील तर किती रक्कम काढू शकता? पाहा नियम
2 नोकरी गेली तरी घाबरु नका; मोदी सरकारने आणली नवी योजना, २ वर्ष मिळणार पैसे
3 Summer Health Tips: जाणून घ्या पाणी का प्यावे, कसे प्यावे आणि किती प्यावे
Just Now!
X