जगभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव झालेला असतानाच भारतामध्येही करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतामध्ये करोनाबाधितांच्या आकड्याने ३१ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वचजण मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि हात धुणे यासारख्या गोष्टींकडे विशेष लक्ष देताना दिसत आहेत. करोनाच्या काळामध्ये लहान मुलं आणि वयस्कर व्यक्तींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे असं सांगितलं जात आहे. लहान मुलं आणि वयस्कर व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती ही तुलनेने कमी असल्याने त्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. नुकताच जागतिक आरोग्य संघटनेने (डब्यूएचओ) नवीन मार्गदर्शक तत्व जारी केले आहेत. यामध्ये कोणत्या वयाच्या मुलांना मास्क लावण्याची गरज आहे यासंदर्भात सविस्त माहिती देण्यात आली आहे.
करोनाबाधितांचा वाढता आकडा आणि तरुणांना होणाऱ्या संसर्गाची आकडेवारी पाहता डब्यूएचओने नवीन मार्गदर्शक तत्वांची यादी जाहीर केली आहे. यानुसार १२ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मुलांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करायलाच हवा असं म्हटलं आहे. या मुलांना मास्कचा वापर बंधनकारक असावा असं डब्ल्यूएचओचं म्हणणं आहे. ज्या प्रदेशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे त्या भागांमधील मुलांनी मास्क घातलेच पाहिजे असं डब्यूएचओने म्हटलं आहे.
नक्की वाचा >> “मुलांना शाळेत न पाठवल्याने होणारे परिणाम हे करोना विषाणूपेक्षा अधिक धोकादायक”
करोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या प्रदेशांबरोबरच जिथे तुलनेने कमी प्रादुर्भाव आहे अशा ठिकाणीही मुलांसंदर्भात पालकांनी सावध राहण्याची गरज असल्याचे डब्यूएचओनं म्हटलं आहे. प्रादुर्भाव कमी असला तरी मुलांना मास्क घालण्यास सांगावे असं डब्यूएचओने नमूद केलं आहे. वयस्कर व्यक्तींना करोनाचा जेवढा धोका आहे तितकाच धोका मुलांनाही आहे. त्यामुळेच जास्त गर्दी असणाऱ्या आणि कंटेंटमेंट झोनमधील १२ वर्षांवरील मुलांनी मास्क वापरलेच पाहिजे असं डब्यूएचओचं म्हणणं आहे.
लहान मुलांची काळजी कशी घ्याल?
डब्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार पाच वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालू नये. या वयोगटातील मुलांना करोनाचा धोका तुलनेने खूपच कमी असतो. जर एखाद्या परिस्थितीमध्ये मुलांना मास्क घातलेच तर त्यांच्यावर सतत मोठ्या व्यक्तीने नजर ठेवली पाहिजे. मोठ्या व्यक्तींच्या देखरेखीखालीच पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालू घ्यावेत असं डब्यूएचओनं म्हटलं आहे. तसेच ६ ते ११ वर्षांच्या वयोगटातील मुलं कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडत असतील तर त्यांनी मास्क घालावे असा सल्ला डब्यूएचओने दिलं आहे.
सुरक्षेसाठी ही काळजी घ्या
सर्दी आणि खोकल्याचा त्रास असलेल्या व्यक्तींपासून लहान मुलांना दूर ठेवा. लहान मुलांजवळ जाताना आपणही स्वच्छेसंदर्भात काळजी घेतली पाहिजे. स्वत:ही साबणाने हा धुवा आणि मुलांनाही तसे करण्यासाठी प्रोत्साहन द्या. विशेष करुन बाहेरुन आल्यानंतर हात स्वच्छ धुण्याची सवय त्यांना लावा.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 25, 2020 3:45 pm