News Flash

सोनं इतकं मौल्यवान असण्यामागील कारणं ठाऊक आहेत का?

सोन्याची चकाकी हे त्याच्या मूल्यामागील एकमेव कारण नव्हे

फोटो : पीटीआय

सणवार, लग्नसराई असली की सोने खरेदीचा हंगाम! लोक हौसेने सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात. अतिशय मौल्यवान धातू असल्याने लोक थोडे-थोडे करून सोने जमवतात. सोने इतके मौल्यवान असण्यामागे त्याची चकाकी हे एकमेव कारण नव्हे. अतिशय चकाकणाऱ्या या धातूचे काही अन्य गुणधर्मदेखील आहेत. धातूंचा गुणविशेष म्हणजे ते टणक असतात व चकाकतात. पण सोन्याची चकाकी काही वेगळीच. त्याच्या मोहात न पडणारी व्यक्ती विरळाच. मन मोहणाऱ्या चकाकीशिवाय सोन्याचा विशेष गुणधर्म म्हणजे तो निष्क्रिय (राजस) धातू आहे. त्यावर हवा, पाणी किंवा इतर रासायनिक पदार्थाचा परिणाम होत नाही. लोखंड गंजते, तांब्यावर हिरवट रंगाचा थर येतो, पण सोन्याचे क्षरण (कोरोझन) होत नाही. चांदीची चकाकीदेखील लोकांना आकर्षित करते; परंतु चांदी लवकर काळी पडते. हवेत जर सल्फर असेल तर चांदीच्या वस्तू लगेच काळवंडतात. चांदीची सल्फरबरोबर क्रिया होऊन चांदीचा सल्फाइड तयार होतो. या सल्फाइडचा रंग काळा असतो.

या चकाकणाऱ्या धातूंचे दागिने कर्णफुले, हार, बांगडय़ा इ. बनवायचे असेल तर त्याला चांगल्या प्रकारे आकार देता आला पाहिजे. इथे सोन्याची तन्यता व वर्धनीयता या गुणधर्माचा उपयोग होतो. सोन्याचा अतिशय पातळ पत्रा बनवता येतो व सोने ताणून त्याची बारीक तारदेखील तयार करता येते. सर्व धातूंमध्ये सोने द्वितीय क्रमांकाचा तन्य व वर्धनीय आहे. १ ग्रॅम सोन्यापासून अंदाजे अडीच किमी लांब सोन्याची तार बनवता येते. सोन्यापाठोपाठ या गुणधर्माच्या बाबतीत क्रमांक लागतो तो चांदीचा. या दोन गुणधर्मामुळे सोने, चांदी यांना हवा तो आकार देता येतो. केवळ दागिनेच नाही तर मंदिरांमध्ये कलशावर सोन्याचा पत्रा बसवला जातो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमृतसर येथील भव्य सुवर्णमंदिर!

नक्की पाहा >> Top 10 : या दहा देशांकडे आहे सर्वाधिक सोनं, पहिल्या स्थानावर आहे…

सोने व चांदीपासून बनवलेल्या तारांचा उपयोग रेशीम साडी-वस्त्रांवर जरीचे काम करण्याकरिता होतो. पैठणी, बनारसी शालू यांची शोभा या जरीकामाने वाढते. जरी चांगल्या प्रतीची असल्यास एका पिढीतून पुढच्या पिढीपर्यंत दागिन्यांप्रमाणेच या साडय़ा/ शालूदेखील ठेव म्हणून सांभाळल्या जातात.

सोने व चांदीच्या वैशिष्टय़पूर्ण गुणधर्मामुळे त्यांचा वापर अलंकारांपर्यंत मर्यादित नसून इतर अनेक ठिकाणी दोन्ही धातू वापरले जातात. सर्व धातू विद्युतचे सुवाहक आहेत. सर्वोत्तम विद्युतवाहक धातू चांदी आहे. मौल्यवान असल्यामुळे आपण घरी किंवा इतर ठिकाणी ज्या विद्युतवाहक तारा वापरतो त्या तांब्याच्या असतात. चांदीनंतर तांबे हा दुसऱ्या क्रमांकाचा विद्युत सुवाहक आहे. कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स- जिथे विद्युत सर्किट अतिशय सूक्ष्म असतात व जिथे कार्यक्षमता उच्च असावी लागते तिथे सोने किंवा चांदीच्या तारा वापरण्यात येतात. तसेच सौरघटमध्ये चांदीच्या विद्युतवाहक तारा असतात. सोने  निष्क्रिय असल्याने त्याचे क्षरण होत नाही व विद्युत सर्किटचे आयुष्य दीर्घकाळ टिकते.

सोने शुद्ध स्वरूपात मृदू असते. त्यामुळे वापरण्याआधी त्यात चांदी किंवा तांबे मिश्रित करून मग दागिने बनवले जातात. रोझ गोल्ड जे आजकाल लोकप्रिय होत आहे त्यात तांबे मिश्रित करून सोन्याचा रंग गुलाबी करण्यात येतो. सोन्याची शुद्धता कॅरेट या एककात मोजली जाते. २४ कॅरेट सोने शंभर टक्के शुद्ध असते. दागिने बनवण्याकरिता भारतात २२ कॅरेट सोन्याचा वापर प्रचलित आहे.

आज सोने-चांदीबरोबरच प्लॅटिनम हा धातूदेखील लोकप्रिय होत आहे. प्लॅटिनम धातूंमध्ये सर्वाधिक तन्य आहे. अशा चकाकणाऱ्या वैविध्यपूर्ण गुणधर्म असलेल्या धातूंनी आपल्याला भुरळ घातली नाही तरच नवल!

– सुधा मोघे – सोमणी (मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 2:18 pm

Web Title: why gold is so expensive scsg 91
Next Stories
1 समजून घ्या : अर्थव्यवस्था म्हणजे काय? आणि अर्थव्यवस्थेचे प्रमुख प्रकार कोणते?
2 पितृपक्ष म्हणजे काय?
3 समजून घ्या : राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय?, तो कोणाकडून आणि कधी जाहीर केला जातो?
Just Now!
X