सध्याच्या या महामारीच्या काळात मुलांना घरात कोंडून राहावं लागत आहे. शाळा बंद, मित्रमैत्रिणींना भेटू शकत नाही, बाग, मैदानं बंद, करमणुकीचे मार्गच बंद झाल्याने त्यांच्या मानसिकतेवरही परिणाम होऊ शकतो. अशावेळी पालकांचं हे काम आहे की आपल्या मुलांच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यावी. कारण, मानसिक स्वास्थ्य हेही शारिरीक स्वास्थ्याइतकंच महत्त्वाचं आहे.

पालक म्हणून कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करु नयेत हे समजून घ्या. सध्याच्या काळात मुलांना नैराश्य, डिप्रेशन, मूड स्विंग्ज, अनियमित झोप अशा समस्यांना सामोरं जावं लागत आहे. वेगवेगळ्या देशातल्या १५ अभ्यासांमधून ही गोष्ट समोर आली आहे. ज्यांची मानसिक अवस्था आधीपासूनच ठीक नाही, ज्यांना गतिमंदपणा, मतिमंदपणा आहे अशा मुलांची मानसिकता जपणं अधिक गरजेचं आहे. अशावेळी पालकांनी आपल्या मुलाच्या वयाचा विचार करुन त्याच्याशी बोललं पाहिजे, त्याला वेळ दिला पाहिजे.

पालक आणि लहान मुलं-

  • पालकांनी आपल्या मुलांना पुरेसा वेळ देणं, त्यांच्याकडे लक्ष देणं आणि त्यांना सतत विश्वास देणं हे महत्त्वाचं आहे.
  • लहान मुलांना करोना आजाराबद्दल योग्य आणि सत्य माहिती द्यायला हवी. यासाठी जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ अशा महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह संस्थांच्या माहितीचा आधार घेता येईल.
  • लहान मुलांनी जास्त बातम्या पाहू, वाचू नये. त्यांना शक्य तितकी माहिती द्यावी जी आकडेवारीवरआधारित असेल.
  • मुलांना खेळण्याबागडण्यासाठी, विश्रांतीसाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. मानसिकता टिकवण्यासाठीचे प्रयत्न हा सगळा वेळ देऊन सातत्याने केला पाहिजे.

आणखी वाचा- समजून घ्याः लहान मुलांमध्ये करोनाची लक्षणं दिसली तर काय कराल?

पालक आणि किशोरवयीन मुलं-

  • या वयातली मुलं पालकांचं अनुकरण करणारी असतात. ही मुलं पालकांच्या भावना, व्यक्त होण्याची पद्धत, ताणनियोजन या सगळ्याचं अनुकरण करत असतात.
  • लहान मुलांपेक्षा या वयातल्या मुलांना करोनाबद्दल अधिक माहिती असते. त्यामुळे त्यांच्याशी या विषयावर मोकळेपणाने बोलणं आणि त्यांच्या शंकांचं निरसन पालकांनी करायला हवं.
  • हा काळ म्हणजे मुलांसाठी आणि पालकांसाठीही एक संधी आहे. या काळात मुलं घरची कामं, जबाबदारी घेणं, घरात मदत करणं, स्वतःची कौशल्यं विकसित करणं हे करु शकतात. पालकांनी त्यांना त्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं, त्यांना संधी उपलब्ध करुन द्यायला हव्यात.
  • इंटरनेटचा अतिवापर या काळात टाळायला हवा. विशेषतः करोनाविषयीची माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा उपयोग करु देऊ नका. गेम्स खेळणंही मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकतं.
  • पालकांनी पाल्याबरोबरच स्वतःच्याही मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यायला हवी.