News Flash

World Bicycle Day 2021 : सायकलच्या टूल किटमध्ये या १५ गोष्टी असायलाच हव्यात

सायकल दुरुस्तीसंदर्भात बोलताना साधारणपणे टायर पंक्चर होणे, ब्रेक न लागणे, गीअर व्यवस्थित शिफ्ट न होणे या समस्या भेडसावतात

प्रातिनिधिक फोटो

कोणतेही नवीन वाहन घेताना ते दुरुस्त होईल का, त्याचे सुटे भाग सहज मिळतील का, हा विचार केला जातो. पूर्वी निदान सायकलबाबत निश्चिंत राहता येत होते. कारण सायकल दुरुस्तीची दुकाने नाक्यानाक्यांवर होती; परंतु सायकलचा वापर कमी झाला आणि लहान दुकानांनीही गाशा गुंडाळला. मात्र, सायकलला पुन्हा प्राप्त होणारे महत्त्व आणि त्याचा वाढता वापर लक्षात घेऊन अनेक दुकानांनी कात टाकली, हेसुद्धा तितकंच खरं.

भारतीय आणि परदेशी बनावटीच्या सायकलचे असंख्य ब्रँड सध्या बाजारात आहेत; परंतु पूर्वीच्या साध्या सायकलप्रमाणे आजच्या आधुनिक सायकलींमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे त्यांचे सुटे भाग. आधुनिक सायकलींचा वापर गेल्या चार-पाच वर्षांत ज्या वेगाने वाढला तेवढय़ाच वेगाने त्याला पूरक यंत्रणाही उभी राहिली ही आनंदाची बाब म्हणावी लागेल. असे असले तरी आपल्या सायकलची दुरुस्ती आपणच शिकून घेणे केव्हाही उत्तम. त्याची दोन प्रमुख कारणे म्हणजे नव्या सायकलींची दुरुस्ती सोपी आहे आणि आडवाटेला गेल्यानंतर तुम्ही स्वत:च सायकलची दुरुस्ती केली तर तुमची भटकंती विनाअडसर होऊ शकते.

नक्की वाचा >> World Bicycle Day 2021: सायकल घेताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावं?; वाचा १२ स्मार्ट टीप्स

सायकल दुरुस्तीसंदर्भात लेखी आणि व्हिडीओच्या स्वरूपात खूप ऑनलाइन माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे तुमची सायकल कुठलीही असो, त्याचा ब्रँड किंवा ती समस्या ऑनलाइन शोधलात तर त्यावर हजारो उत्तरे सापडतील. त्यामध्ये हाताला लागलेले ग्रीस कसे साफ करायचे ते जुन्या सायकलला नवा साज कसा चढवायचा, इथपर्यंत सगळी माहिती मिळेल. सायकल दुरुस्तीसंदर्भात बोलताना साधारणपणे टायर पंक्चर होणे, ब्रेक न लागणे, गीअर व्यवस्थित शिफ्ट न होणे या समस्या अनेकांना भेडसावतात. थोडय़ा प्राथमिक प्रशिक्षणाने आणि अनुभवाने या समस्या तुम्ही स्वत: सहज दूर करू शकता; परंतु ज्या गोष्टी तुम्हाला दुरुस्त करता येत नसतील तेथे संबंधित तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेणे आवश्यक आहे.

टूल किटमध्ये काय असावे?

पंक्चर किट – ग्लू, सॅन्ड पेपर, टायर लीवर आणि हवा भरण्याचा पंप. तुमच्याकडे खाली नमूद केलेल्या बाकीच्या गोष्टी नसल्या तरी चालतील, पण पंक्चर किट असलाच पाहिजे.

सायकल पंप – नवीन सायकल पंप हे नॉब बदलून साध्या सायकलसोबतच प्रेस्टा आणि श्रेडर अशा दोन्ही प्रकारच्या टय़ूबसाठी वापरता येतात.

अ‍ॅलन की – आधुनिक गीअर सायकलींसाठी वापरले जाणाऱ्या या टूलमध्ये वेगवेगळ्या आकारांच्या की असून सायकलजोडणी, ब्रेक आणि गीअरच्या सर्व कामांसाठी ते वापरता येते.

वायर कटर – ब्रेक वायर असो वा गीअर वायर, दोन्हीसाठी तुम्हाला याचा उपयोग होईल. बारीक तारांनी तयार केलेल्या वायर कापण्यासाठी कटरच वापरावे.

इलेक्ट्रिकल (डक्ट) टेप – सायकलचा एखादा भाग तुटला किंवा काही चिकटवण्यासाठी तात्पुरती, पण खात्रीलायक मलमपट्टी या टेपने करता येऊ शकते.

चेन टूल – सायकल ज्या गोष्टीवर धावते त्या चेनमध्ये काही दुरुस्ती करायची असल्यास अतिशय महत्त्वाचे असे साधन.

वंगण – सायकलला जोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्क्रूमध्ये आणि चेनमध्ये टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. केवळ सायकलच्या चेनसाठीही वेगळे वंगण हल्ली बाजारात उपलब्ध आहे.

स्क्रू ड्रायव्हर – ब्रेक किंवा गीअरच्या स्क्रूसाठी स्क्रू ड्रायव्हर जवळ बाळगले पाहिजे.

नक्की वाचा >> सायकल संस्कृती… मुंबईसारख्या शहरांमध्ये प्रदूषण, वाहतूक कोंडीच्या समस्यांवरील रामबाण उपाय

टायर लीवर – टय़ूब पंक्चर झाल्यावर टायरमधून टय़ूब बाहेर काढताना टायर आणि रिम यांच्यामधील दुवा म्हणून हे टूल तुमचं काम सोप्पं करतं.

लहान हातोडी – सर्वाना आपली सायकल प्रिय असली तरी काही वेळेला लहान फटकेच कामी येतात. अशा दुरुस्तीसाठी हातोडी हवी.

कात्री – झिप टाय किंवा त्याच प्रकारातल्या जाडसर गोष्टी कापण्यासाठी कात्रीचा वापर करावा.

पाना – पेडलसारख्या अतिमहत्त्वाच्या भागासाठी लहान-मोठा करता येणारा पाना उपयोगी ठरतो.

गीअर ब्रश – कुठलाही गंज, माती किंवा अति ग्रीसमध्ये न माखलेली व चकाकणारी चेन असणारी सायकलच वेगाने धावूऊ शकते. ते साफ करण्यासाठी आवश्यक. जुना टूथब्रशही यासाठी उपयोगात आणू शकता.

स्पोक पाना – स्पोक तुटला असेल तर तो बदलण्यासाठी काढताना आणि लावताना याचा वापर आवश्यक ठरतो.

बाइक दुरुस्ती स्टँड – हल्ली बाजारात हे स्टँड उपलब्ध आहेत. कुणाचीही मदत न घेता स्टँडवर सर्व टूल्स ठेवून आणि त्याला सायकल लटकवून दुरुस्ती करता येते. तुमची आíथक ऐपत असेल तर हा स्टॅन्ड अवश्य घ्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 10:12 am

Web Title: world bicycle day 2021 complete bicycle repair tool kit scsg 91
Next Stories
1 World Bicycle Day 2021: सायकल घेताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावं?; वाचा १२ स्मार्ट टीप्स
2 व्हॉट्सअ‍ॅपवर होणार करोनाचे निदान, XraySetu अ‍ॅप लाँच; समजून घ्या कशी आहे प्रक्रिया
3 समजून घ्या : करोनानंतर लहान मुलांना होणारा MIS-C आजार आणि त्याच्या सात लक्षणांबद्दल
Just Now!
X