News Flash

World Bicycle Day 2021 : गोष्ट सायकल शर्यतींची… जाणून घ्या १४३ वर्षांचा रंजक इतिहास

जगातील सर्वात पहिली अधिकृत सायकल स्पर्धा तिसरा नेपोलियन याने ३१ मे, १८६८ रोजी पॅरिसनजीक सेंट क्लाउड पार्क येथे आयोजित केलेली

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य: रॉयटर्स)

लहानपणी सायकल वापरली आणि सायकलची शर्यत लावली नाही असा माणूस विरळाच. पण भारतात सायकल हा खेळ म्हणून तुलनेने फारसा प्रसिद्ध नाही. मात्र युरोप आणि अमेरिकेत सायकल शर्यतींना विशेष महत्त्व आहे. एवढंच काय तर ऑलिम्पिक खेळांमध्येही त्याचा फार पूर्वीच समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या लेखात आपण सायकल शर्यतीच्या इतिहासाबद्दल थोडं जाणून घेणार आहोत.

सायकल स्पर्धाची सुरुवात साधारणपणे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धानंतर झाल्याची नोंद आहे. जगातील सर्वात पहिली अधिकृत सायकल स्पर्धा तिसरा नेपोलियन याने ३१ मे, १८६८ रोजी पॅरिसनजीक सेंट क्लाउड पार्क येथे (१२०० मीटर अंतर)आयोजित केली होती. जेम्स मूर या इंग्रज सायकलस्वाराने ती स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर १८६९ साली पॅरिस आणि रूआन या दोन शहरांदरम्यान पार पडलेल्या सर्वात लांबच्या अंतराची (१२३ किलोमीटर) पहिली सायकल स्पर्धाही मूर यांनीच अवघ्या १० तास ४० मिनिटांमध्ये जिंकली होती.

व्यावसायिक सायकल स्पर्धाचा उदय १८७१ मध्ये झाला. तेव्हापासूनच आखीव धावपट्टीवरील सायकल स्पर्धाच्या (ट्रॅक रेस) प्रकारास चालना मिळाली. १८७८ साली इंग्लंडमध्ये ‘द नॅशनल सायक्लिस्टस युनियन’ (एन्सीयू) या राष्ट्रीय सायकलपटू संघटनेची स्थापना करण्यात आली. याच वर्षी अमेरिकेतही सायकल स्पर्धाना सुरुवात झाली. अमेरिकेतील ‘सेंट लुईस सायकलिंग क्लब’ हा जगातील सर्वात जुना सायकल क्लब. १८८७ साली या क्लबची स्थापना झाल्यापासून आजवर या क्लबने अनेक सायकलपटू तयार केले. त्यामध्ये विविध आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धामधील विजेते आणि ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. पुढे १८९२ मध्ये ‘इंटरनॅशनल सायकलिस्ट असोसिएशन’ (आयसीए) या आंतरराष्ट्रीय सायकलपटू संघटनेची स्थापना झाली. मात्र आयसीएवरील ब्रिटिश वरचष्मा सहन न झाल्याने ‘द युनियन सायक्लिस्ट इंटरनॅशनल’ (यूसीआय) ह्य़ा संघटनेची जिनिव्हा येथे १९०० मध्ये स्थापना करण्यात आली. बेल्जियम, इटली, स्वित्र्झलड, अमेरिका ही तिची संस्थापक सदस्य राष्ट्रे होती. नंतर काही वर्षांनी ग्रेट ब्रिटनही या संघटनेत सामील झाले.

नक्की वाचा >> World Bicycle Day 2021: सायकल घेताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावं?; वाचा १२ स्मार्ट टीप्स

सायकलची लोकप्रियता जसजशी वाढत गेली, तशा स्पर्धाही वाढल्या. सर्वसाधारणपणे रस्ते खराब असल्याने खास स्पर्धासाठी आखीव धावपट्टय़ा बनविल्या जाऊ लागल्या. लंडनमधील हर्निहिल व पॅडिंग्टन येथे चांगल्या दर्जाच्या धावपट्टय़ा बनविण्यात आल्या. पुटनी येथे सिमेंट-काँक्रीटचा वापर करून पहिले खुले सायकल क्रीडागार (व्हेलोड्रोम) बांधण्यात आले. अथेन्स येथे १८९६ साली पार पडलेल्या पहिल्या अर्वाचीन ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांमध्येही सायकल शर्यतीचा समावेश करण्यात आला होता. त्यात २००० मीटर अंतराची सायकल स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर हा स्पर्धा प्रकार ऑलिम्पिक सामन्यांत नियमितपणे समाविष्ट झाला. महिलांची सायकल शर्यत १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेपासून खेळवली जाऊ लागली. आधुनिक काळात सायकल शर्यतीचे मुख्यत: तीन प्रकार जास्त प्रचलित आहेत. धावपट्टीवरील शर्यती (ट्रॅक स्पोर्ट्स), रस्ता शर्यती (रोड रेस) आणि सायक्लो-क्रॉस शर्यत.

नक्की वाचा >> World Bicycle Day 2021 : सायकल संस्कृती… मुंबईसारख्या शहरांमध्ये प्रदूषण, वाहतूक कोंडीच्या समस्यांवरील रामबाण उपाय

डोंगर-दऱ्यांमध्ये सायकलिंग करणे हा एक साहसी व रोमहर्षक असा क्रीडाप्रकार आहे. जगभरात अशा स्पर्धा वर्षभर खेळवल्या जातात आणि त्या अत्यंत लोकप्रिय आहेत. ‘टूर दी फ्रान्स’ ही सायकल स्पर्धा आपल्याला माहीत असलेल्यांपैकी एक होय. ‘टूर ऑफ द ड्रॅगन’ म्हणजेच ‘भूतान डेथ रेस’ ही जगातील आणखी एक अत्यंत अवघड अशी सायकल स्पर्धा. हिमालयाच्या पर्वतरांगांमधून सायकलवरून २६८ किलोमीटरचं अंतर एका दिवसात तेही चार खिंडी पार करत कापणे म्हणजे शारीरिक, मानसिक क्षमतेची खऱ्या अर्थाने परीक्षाच असते. तर जगातील सर्वात प्रदीर्घ अंतराची सायकल स्पर्धा म्हणजे ‘रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका’ होय. अमेरिकेत कॅलिफोर्निया येथील ओशियन पीएर येथून सुरू होणारी ही स्पर्धा अ‍ॅनापोलिस, मेरीलँड (इस्ट कोस्ट) येथील सिटी डॉक येथे संपते. अमेरिकेतील १२ राज्ये आणि ८८ काऊंटी पार करत जवळपास ४८०० किलोमीटरचा हा पल्ला अवघ्या १२ दिवसांमध्ये पार करायचा असतो. स्वाभाविकच स्पर्धा वेळेत पूर्ण करण्यासाठी दररोज ४०० किलोमीटर सायकल चालवणे गरजेचे असते.

भारतातही हिमालयातील पर्वतराजीतील सायकल-मोहिमांसाठी काथगोदाम ते नैनिताल, कालका ते सिमला, चंदिगढ ते मनाली हे साहसी सायकलपटूंचे पहिल्या पसंतीचे मार्ग आहेत. हिमालयातील सायकल प्रवासाच्या मोहिमा आखण्यासाठी ‘इंडियन माउंटनिअरिंग इन्स्टिटय़ूट’ ही संस्था पुढाकार घेते. ‘द अल्टिमेट उत्तराखंड हिमालयन एमटीबी चॅलेंज’ ही भारतातील प्रसिद्ध माऊंटन बाईकिंगची स्पर्धा आहे. त्याशिवाय नॅशनल माऊंटन बाईक चॅम्पियनशीप, नॅशनल ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशीप, कमी-अधिक अंतराच्या बीआरएम यांच्यासोबतच लहान-मोठय़ा सायकल स्पर्धाचेही आता मोठय़ा प्रमाणावर आयोजन आपल्याकडे होऊ लागले आहे.

नक्की वाचा >> World Bicycle Day 2021 : सायकलच्या टूल किटमध्ये या १५ गोष्टी असायलाच हव्यात

महाराष्ट्रात मुंबई-पुणे ही सायकल शर्यत अनेक वर्षे सुरू आहे. दीर्घ पल्ल्याची (१५३ किमी.) व अवघड घाटवळणांची ही शर्यत लोकप्रिय आहे. घाटाचे अंतर कमीत कमी वेळात सर्वप्रथम पार करणाऱ्या स्पर्धकाला ‘घाटाचा राजा’ हा मानाचा किताबही दिला जातो. गेली काही वर्षे पुण्यात नॅशनल एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे ‘इंडय़ुरो’ स्पर्धेचे आयोजनही केले जाते. स्पर्धा विविध वयोगट आणि गटांसाठी असते. प्रत्येक गटासाठी ठरावीक अंतराच्या आव्हानामध्ये ट्रेकिंग, सायकलिंग, हाईक अ‍ॅण्ड बाईक, रिव्हर क्रॉसिंग, नेमबाजी अशा अनेक घटकांचा समावेश असला तरी सायकलिंगचा रस्ता लांबचा आणि आव्हानात्मक असतो.

– प्रशांत ननावरे

(हा लेख ‘लोकभ्रमंती’मधील ‘दुचाकीवरून’ या सदरामध्ये ‘सायकल स्पर्धा’ या मथळ्याखाली प्रकाशित करण्यात आलेला. आज जागतिक सायकल दिनानिमित्त तो पुनः प्रकाशित करत आहोत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 11:02 am

Web Title: world bicycle day 2021 history of cycle competition scsg 91
Next Stories
1 World Bicycle Day 2021 : सायकलच्या टूल किटमध्ये या १५ गोष्टी असायलाच हव्यात
2 World Bicycle Day 2021: सायकल घेताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावं?; वाचा १२ स्मार्ट टीप्स
3 व्हॉट्सअ‍ॅपवर होणार करोनाचे निदान, XraySetu अ‍ॅप लाँच; समजून घ्या कशी आहे प्रक्रिया
Just Now!
X