07 July 2020

News Flash

World Blood Donation Day: रक्तगट म्हणजे काय?; रक्तगटाचे फायदे तोटे असतात का?

‘जागतिक रक्तदान दिवसा’च्या निमित्ताने खास लेख

प्रातिनिधिक फोटो

– डॉ.दिलीप वाणी

‘रक्ताचे नाते’ हा शब्दप्रयोग आपण सर्रास वापरतो. पण आपल्याच रक्ताशी आपले नाते किती घट्ट असते?.. रक्ताच्या आत काय-काय असते याची कितपत माहिती असते? साध्या रक्तगटांच्या बाबतीतही आपल्याला अनेक प्रश्न पडतात. ‘जागतिक रक्तदान दिवसा’च्या निमित्ताने रक्तगट आणि रक्ताचे घटक यांच्याविषयी काही साध्या गोष्टी जाणून घेऊ…

रक्तगट समजून घेताना..

>
आपल्या तांबडय़ा रक्तपेशींच्या पृष्ठभागावर काही पदार्थ असतात. त्यांना ‘अँटिजेन’ असे म्हणतात. ज्यांच्याकडे ‘ए’ प्रकारचे अँटीजेन आहेत त्यांचा रक्तगट ‘ए’, ज्यांच्याकडे ‘बी’ प्रकारचे अँटीजेन आहेत ते ‘बी’ रक्तगटाचे, तर दोन्ही ‘अँटीजेन’ असलेली मंडळी ‘एबी’ रक्तगटाची. ज्यांच्याकडे दोन्ही अँटीजेन नाहीत ते साहजिकच ‘ओ’ रक्तगट. पण ही रक्तगटांची केवळ ‘ए-बी-ओ’ प्रणाली झाली. अशा प्रकारे रक्तगटांची विभागणी करणाऱ्या पस्तीसहून अधिक प्रणाली वैद्यकशास्त्राला ज्ञात आहेत.

>
‘बाँबे ब्लड ग्रुप’ हा शब्द सर्वाना कुठे ना कुठे ऐकायला मिळाला असेल. पण हा वेगळ्याच नावाचा रक्तगट कुठला हे मात्र अनेकांना माहिती नसते. हा रक्तगट प्रयोगशाळेत तपासल्यावर ‘ओ’ रक्तगटासारखाच दिसतो. पण इतर कोणत्याही ‘ओ’ रक्तगटाचे रक्त या रक्तगटाशी जुळत नाही. याचा शोध मुंबईला लागल्यामुळे ‘बाँबे ब्लड ग्रुप’ हे नावही रुढ झाले. या गटाच्या लोकांना बाँबे रक्तगटाचेच रक्त चालू शकते आणि हे लोक जगात फारच कमी संख्येने आढळतात. या रक्तगटाच्या व्यक्तीस जेव्हा प्रत्यक्ष रक्तदानाची गरज भासते तेव्हा त्याला रक्तदाता उपलब्ध होणे महत्वाचे आहे. आपल्या घरात एखाद्याचा रक्तगट ‘बाँबे रक्तगट’ असल्याचे समजले की इतर कुटुंबीयांचे रक्त त्याच रक्तगटाची शक्यता पडताळून पाहण्यासाठी तपासणे गरजेचे. या रक्तगटाच्या लोकांची एक राष्ट्रीय यादी असणे तर गरजेचे आहेच, पण या लोकांनीही स्वखुशीने त्या यादीत नाव नोंदवायला हवे.

>
‘ए-बी-ओ’ या रक्तगट प्रणालीनंतर रक्तगट ‘पॉझिटिव्ह’ की ‘निगेटिव्ह’ हे सांगणाऱ्या ‘आरएच’ प्रणालीचा क्रमांक येतो. रक्तात ‘आरएच’ अँटिजेन असलेल्या लोकांचा रक्तगट ‘आरएच पॉझिटिव्ह’ व हा अँटिजेन नसलेल्यांचा रक्तगट ‘आरएच निगेटव्ह’ असतो. आपल्या देशात जवळपास ९४ टक्के लोक ‘पॉझिटिव्ह’ रक्तगट असलेले आहेत. तर केवळ ६ टक्के लोकांचा रक्तगट ‘निगेटिव्ह’ असतो. ‘आरएच निगेटिव्ह’ रक्तगटाच्या व्यक्तीस अर्थातच ‘आरएच पॉझिटिव्ह’ रक्त चालत नाही. त्यामुळे या लोकांना ‘आरएच निगेटिव्ह’च रक्तदाता गरजेचा. जवळपास सर्व रक्तपेढय़ांकडे या ६ टक्के प्रकारच्या लोकांची यादी असतेच. त्यामुळे आपला रक्तगट ‘निगेटिव्ह’ असेल तर रक्तपेढीकडे नाव नोंदवायला हवे आणि रक्तपेढीकडून रक्तदानासाठी विचारणा होताच विनाविलंब रक्तदानही करायला हवे.

>
‘आरएच निगेटिव्ह’ रक्तगटाच्या व्यक्तींना ‘आरएच पॉझिटिव्ह’ रक्त चालत नसले तरी ते ‘आरएच पॉझिटिव्ह’ लोकांना रक्त देऊ मात्र शकतात.

>
मुलीचा रक्तगट ‘आरएच निगेटिव्ह’ असेल तर तिच्याशी ‘आरएच पॉझिटिव्ह’ गटाच्या मुलाने लग्न करावे की नाही, अशी एक विचित्र शंकाही समाजात दिसते. त्यापायी अनेकदा अशा मुलींची स्थळे नाकारली जातात. परंतु हा गैरसमज आहे. ‘आरएच निगेटिव्ह’ रक्तगटाच्या स्त्रीला ‘आरएच पॉझिटिव्ह’ रक्तगटाचे मूल झाले तर काय, हे या शंकेचे मूळ आहे, आणि त्यावर वैद्यकीय उत्तरही आहे. ‘आरएच निगेटिव्ह’ रक्तगट असलेल्या स्त्रीला प्रसूतीपूर्व काही चाचण्या कराव्या लागतात, तसेच प्रसूतीनंतर लगेच बाळाचा रक्तगट तपासला जातो आणि तो ‘आरएच पॉझिटिव्ह’ निघाला तर आईला ४८ तासांच्या आत एक इंजेक्शन दिले जाते.

>
‘रुग्णाला रक्त देताना योग्य त्या रक्तगटाचे दिले म्हणजे झाले. रक्त देण्याआधी रक्ताची जुळणी (क्रॉस मॅचिंग) का करतात,’ असा प्रश्नही अनेकांना पडतो. रक्तदात्याच्या तांबडय़ा पेशींवर जे अँटिजेन आहेत त्याच्याशी शत्रुत्व असणारे पदार्थ रुग्णाच्या रक्तात नाहीत ना, हे तपासणे म्हणजे रक्त जुळणी. ‘अँटिजेन’च्या विरोधात काम करणाऱ्या या द्राव्यांना ‘अँटिबॉडी’ म्हणतात. रुग्णाचे व दात्याचे रक्त जेव्हा रुग्णाच्या शरीरात एकत्र होईल तेव्हा ते एकमेकांशी जुळवून घेईल का, हे प्रयोगशाळेतील परीक्षानळीत पाहिले जाते. अशा प्रकारे रक्त जुळत असल्याचे सिद्ध झाले की रुग्णाला रक्त देता येते.

रक्तघटकांचे कोडे

>
रुग्णाला पूर्ण रक्त लागणार आहे, की रक्ताचा एखादा विशिष्ट घटक गरजेचा आहे, हेही पाहावे लागते. ते समजून घेण्यासाठी आधी प्रत्येक रक्तघटकाचे काम बघावे लागेल.

>
शरीराच्या कानाकोपऱ्यांमध्ये प्राणवायूचा पुरवठा करणे हे रक्तातील तांबडय़ा पेशींचे काम असते. त्यामुळे ज्यात हा पुरवठा होत नाही अशा ‘अ‍ॅनिमिया’सारख्या आजारांमध्ये रुग्णाला केवळ तांबडय़ा पेशी देतात.

>
पांढऱ्या पेशी आपल्याला रोगप्रतिकारशक्ती देतात. त्यामुळे ज्या आजारांमध्ये पांढऱ्या पेशी कमी होऊन रोगप्रतिकार शक्ती कमी होते त्यात पांढऱ्या पेशी दिल्या जातात.

>
‘प्लेटलेट’ आणि ‘डेंग्यू’ हे समीकरण सगळ्यांना माहीत असते. प्लेटलेट हा रक्तघटक रक्त गोठवण्याचे काम करतो. शरीराला जखम झाल्यानंतर रक्त गोठावे व सतत वाहात राहू नये यासाठी प्लेटलेटस् काम करतात. डेंग्यूसारख्या काही आजारांमध्ये शरीरातील प्लेटलेटस् कमी होतात. त्यामुळे त्या काळात रुग्णाच्या प्लेटलेटस्वर लक्ष ठेवले जाते. त्या विशिष्ट प्रमाणापेक्षा खाली आल्या तर प्लेटलेटस् द्याव्या लागतात.

>
रक्ताचा आणखी एक घटक म्हणजे ‘प्लाझमा’. या पेशी नव्हेत. प्लाझमामध्यही रक्त गोठण्यासाठी आवश्यक अशी तेरा द्रव्ये आहेत. वैद्यकीय भाषेत या द्रव्यांना ‘कोअ‍ॅग्युलेशन फॅक्टर’ म्हणतात. सगळ्या द्रव्यांनी एकमेकांना पूरक असा ‘सांघिक खेळ’ केला तरच रक्त गोठू शकते. प्लाझमामधील या द्रव्यांचेही दोन गट करता येतात. यातील एका गटातील द्रव्ये सहा तासांत नष्ट होतात. ही द्रव्ये टिकवण्यासाठी त्यांना -३० अंश तापमानात ती ठेवावी लागतात. प्लाझमाच्या या भागाला ‘क्रायोप्रेसिपिटेट’ असे नाव आहे. प्लाझमाच्याच दुसऱ्या गटातील द्रव्ये सहा तासांहून अधिक काळ टिकतात आणि त्याला ‘ह्य़ूमन प्लाझमा’ असेच म्हणतात.

>
‘प्लाझमा’च्या ‘क्रायोप्रेसिपिटेट’ या भागात ‘फॅक्टर ८’ किंवा ‘अँटी हिमोफिलिक फॅक्टर’ हे द्रव्य असते. ‘हिमोफिलिया’ या आजारात आनुवंशिक कारणांमुळे हा ‘फॅक्टर ८’ रुग्णाच्या शरीरात तयार होऊ शकत नाही आणि त्यामुळे रुग्णाला रक्तस्त्राव सुरू झाल्यास तो थांबत नाही. त्यामुळे हा ‘फॅक्टर ८’ रक्ताच्या ‘क्रायोप्रेसिपिटेट’ या भागाद्वारे बाहेरुन द्यावा लागतो.

‘अल्ब्युमिन’ हाही ‘प्लाझमा’चाच एक घटक असतो. शरीरात उतींमध्ये आणि रक्तप्रवाहात पाणी धरुन ठेवण्याचे काम अल्ब्युमिन करते, तर ‘इम्यूनोग्लोब्यूलिन’ हा घटक आपल्याला रोगप्रतिकारशक्ती देतो. हे दोन घटक मात्र रक्तपेढय़ांना वेगळे करता येत नाहीत. औषध कारखान्यांकडे ती यंत्रणा असते व औषधाच्या स्वरुपात रुग्णाला हे घटक देता येतात.

– डॉ.दिलीप वाणी, रक्तपेढी व रक्त संक्रमण तज्ज्ञ

(शब्दांकन- संपदा सोवनी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2020 4:52 am

Web Title: world blood donation day everything you want to know about type of blood groups scsg 91
Next Stories
1 समजून घ्या, सहजपणे… भारतातील कोविड विरोधी औषधांचा वापर
2 खोकला, अन्नपचन, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे अन् बरचं काही…; जाणून घ्या कोथिंबीरीचे १२ फायदे
3 समजून घ्या, सहजपणे… डोनाल्ड ट्रम्प यांना नेण्यात आलेल्या ‘त्या’ बंकरची गोष्ट
Just Now!
X