नात्याचा धागा अत्यंत नाजूक असतो, असे म्हणतात. कारण- नाते तयार व्हायला अनेक वर्षे लागतात आणि नाते तुटायला एक क्षणही लागत नाही. पती-पत्नी यांच्यातील नातेही असेच असते. पती-पत्नींमध्ये कित्येकदा अनेक गोष्टींवरून वाद होतात; पण त्यामुळेही त्यांचे नाते हळूहळू बहरत जाते आणि घट्ट होते. पण, कधी कधी काही गोष्टींमुळे त्यांच्यातही दुरावा निर्माण होतो आणि हा दुरावा घटस्फोटापर्यंतही जाऊन पोहोचतो. गेल्या काही वर्षांत घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. सध्या बॉलीवूडमधील जोडपे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या संसारात अडचणी निर्माण झाल्या असल्याची माहिती आहे. अभिषेक बच्चन याने घटस्फोटासंबंधी एक पोस्ट लाइक केल्यानंतर या वृत्तांना दुजोरा मिळाला आहे. यात 'ग्रे डिव्होर्स'ची चर्चा सर्वत्र रंगली आहे. ग्रे डिव्होर्स म्हणजे काय? जोडपी ग्रे डिव्होर्स का घेतात? याचे प्रमाण का वाढत आहे? याविषयी तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घेऊ. हेही वाचा : गोव्यातील ‘सनबर्न फेस्टिवल’वर बंदी? स्थानिकांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांचा या महोत्सवाला विरोध का? चित्रपटसृष्टीतील वलयांकित जोडपे आणि घटस्फोटाची चर्चा अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन चित्रपटसृष्टीतल्या वलयांकित जोडप्यांपैकी एक आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या या दोघांचेही वैयक्तिक आयुष्य चर्चेचा विषय राहिले आहे. बॉलीवूडची 'ब्युटी क्वीन' ऐश्वर्याने अनेक चित्रपट गाजवले. परंतु, ऐश्वर्या चित्रपटांव्यतिरिक्त सलमान आणि तिच्या नात्यामुळेही चर्चेत राहिली. हम दिल दे चुके सनम या सिनेमातून त्यांच्या नात्याला सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. त्या काळात दोघांच्या लग्नाच्या चर्चांनीही जोर धरला होता. परंतु, हे नाते फार काळ टिकू शकले नाही. त्यानंतर ऐश्वर्याचे नाव विवेक ओबेरॉयबरोबर जोडलं गेलं. पण, हे नातेही कधी लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. दुसरीकडे अभिषेकला त्याच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक अपयशांचा सामना करावा लागला. अभिषेकचा पहिला सिनेमा 'रेफ्युजी'पासून 'युवा'पर्यंत त्याचे एकापाठोपाठ एक सिनेमे फ्लॉप ठरत होते. याच काळात त्याची भेट अभिनेत्री करिश्मा कपूरशी झाली. अमिताभ यांनी त्यांच्या ६० व्या वाढदिवशी अभिषेक व करिश्मा यांच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. त्यावेळी सर्वांना त्यांच्या प्रेमाविषयी समजले. परंतु, जया बच्चन यांच्या अटीमुळे हे लग्न होऊ शकले नाही, असे बोलले जाते. लग्नानंतर करिश्माने सिनेसृष्टीत काम करू नये, अशी अट त्यांनी घातली होती. त्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक यांची भेट झाली. 'बंटी और बबली' चित्रपटातील गाण्याच्या शूटिंगदरम्यान दोघे प्रेमात पडल्याचे सांगितले जाते. ही २००५ ची गोष्ट आहे. बराच काळ एकमेकांबरोबर वेळ व्यतीत केल्यानंतर अभिषेकने गुरू या चित्रपटाच्या प्रीमियरनंतर न्यूयॉर्कमध्ये ऐश्वर्याला प्रपोज केले आणि १४ जानेवारी २००७ रोजी दोघे लग्नबंधनात अडकले. अभिषेकवर बॉलीवूडचे शहेशनहा अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांचा मुलगा असल्याचे दडपण होतेच. मात्र, लग्नानंतर पत्नीही एक यशस्वी अभिनेत्री असल्याने त्यात भर पडली. ४ जानेवारी २००७ रोजी ऐश्वर्या आणि अभिषेक लग्नबंधनात अडकले. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस) दोघांचे लग्न फार काळ टिकणार नाही, असे बोलले जात होते. मात्र, या सर्व दाव्यांना खोटे ठरवीत ते इतकी वर्षे एकत्र होते. परंतु, आता हे दावे कुठेतरी खरे ठरताना दिसत आहेत. मागील काही दिवसांत ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीयांत दुरावा निर्माण झाल्याचे वृत्त वारंवार पुढे येत आहे. त्यांच्या नात्यात काही आलबेल नसल्याची साक्ष देणारे अनेक पुरावेही समोर आले आहेत. त्यातच अभिषेकने घटस्फोटाची एक पोस्ट लाइक केल्याने त्यांच्या 'ग्रे डिव्होर्स'विषयीच्या चर्चेत भर पडली आहे. 'घटस्फोट कुणासाठीही कधीच सोपा नसतो' अशा आशयाची ती पोस्ट होती. ग्रे डिव्होर्स म्हणजे काय? अनेक वर्षे लग्नात एकत्र राहिल्यानंतर घेण्यात येणारा घटस्फोट म्हणजेच ग्रे डिव्होर्स. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास लग्नानंतर अगदी १५ ते २० वर्षे एकत्र राहिल्यानंतर जोडपे एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेते, त्यालाच 'ग्रे डिव्होर्स' म्हणतात. 'ग्रे डिव्होर्स' घेणार्या लोकांचे वय ५० वर्षे किंवा त्याहून अधिक असते. लग्नानंतर एवढी वर्षे एकत्र घालवल्यानंतर विभक्त झालेल्या जोडप्यांना 'सिल्व्हर स्प्लिटर' म्हणून ओळखले जाते. 'ग्रे डिव्होर्स'चे प्रमाण जगभरात वेगाने वाढत आहे. 'प्यू रिसर्च सेंटर'च्या म्हणण्यानुसार, अमेरिकेमध्ये दोन दशकांमध्ये घटस्फोटाच्या ४० टक्के प्रकरणांमध्ये ५० किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश आहे. १९९० पासून या घटस्फोटांचे प्रमाण दुप्पट झाले आहे. वय वाढल्यानंतर केस पांढरे होतात; ज्याला इंग्रजीत 'ग्रे हेयर' म्हणतात, त्यावरूनच ग्रे डिव्होर्स हा शब्द प्रचलित झाला. अनेक वर्षांच्या संसारानंतर जोडपी घटस्फोट का घेतात? आर्थिक बाब, नवीन जोडीदार आवडणे, निवृत्ती, मनासारखे जगण्याची इच्छा, मुले दूर गेल्यावर नात्यात रस न राहणे यांसारख्या अनेक कारणांमुळे 'ग्रे डिव्होर्स'चे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जाते. मुले मोठी झाल्यानंतर घर सोडून जातात. त्यानंतर जोडप्यांमध्ये समान उद्दिष्ट संपल्याची भावना निर्माण होते आणि ते विभक्त होण्याचा निर्णय घेतात. आर्थिक कारणांमुळे मतभेद निर्माण झाल्यासही जोडपी हा निर्णय घेतात. स्वतःच्या तत्त्वांवर आयुष्य जगण्याची इच्छा असल्यासही महिला विवाहबंधनातून बाहेर पाडण्याचा मार्ग स्वीकारतात. अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया, अरबाज खान व मलाईका अरोरा, बिल गेट्स व मेलिंडा गेट्स, आमिर खान व किरण राव या बॉलीवूड जोडप्यांचाही ग्रे डिव्होर्स झाला आहे. त्यांच्या घटस्फोटानंतरच अनेकांना ग्रे डिव्होर्स ही संकल्पना समजली. तज्ज्ञ काय सांगतात? या विषयावर 'लोकसत्ता ऑनलाइन'ने समुपदेशक, शैक्षणिक सल्लागार व लेखिका नीलिमा किराणे यांच्याबरोबर संवाद साधला. त्यांनी सांगितले की, काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या आहेत. पूर्वी एकमेकांबरोबर पटत नसूनसुद्धा जोडपी एकत्र राहायची. महिला कमावत्या नसल्याने त्यांना घटस्फोट घेण्याचा विचारही येत नव्हता. मात्र, आता महिलांमध्ये आर्थिक स्थैर्य आले आहे. दोघेही जण एकमेकांवर आर्थिकरीत्या अवलंबून नसल्याने असमाधानकारक विवाहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात. दुसरे कारण म्हणजे आपल्या जोडीदाराच्या सवयी बदलेल, अशी अपेक्षा करणे. परंतु, खूप काळ निघून गेल्यानंतर असे लक्षात येते की, समोरचा जोडीदार हा बदलणारच नाही. त्यामुळे वयाची ऐंशी गाठेपर्यंत मी यातच अडकून राहायला हवे का, असा प्रश्न निर्माण होतो आणि व्यक्ती दुसर्या पर्यायाचा विचार करतात. पूर्वी स्त्रियांकडे उपजीविकेचे साधन नव्हते आणि आता ते साधन मिळाले. त्यामुळेही घटस्फोटाचा विचार केला जातो. त्यामुळेच ग्रे डिव्होर्सच नाही तर एकूण घटस्फोटाचेच प्रमाण वाढले आहे. त्यांनी आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाविषयीही एक गोष्ट सांगितली. आमिर आणि किरण यांनी एका मुलाखतीत एकत्र राहण्यासाठी लग्नाची गरज नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे एकत्र राहण्यासाठी लग्नाची गरज नाही, असा समजही आजकाल जोडप्यांमध्ये निर्माण होत आहे. हा एक ट्रेंड होत चालला आहे, हेही म्हणणे चुकीचे ठरणार नाही. घटस्फोटानंतरची आव्हाने आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्या जोडीदारापासून वेगळे होण्याचा निर्णय सोपा नाही. घटस्फोटानंतर अशा जोडप्यांना अनेक आव्हानांचाही सामना करावा लागतो. मालमत्तेचे विभाजन करणे, विशेषत: सेवानिवृत्तीच्या निधीचे वाटप ही एक आव्हानात्मक गोष्ट असू शकते आणि याचा दोन्ही बाजूंच्या आर्थिक सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो. वयाचा एक टप्पा पार केल्यानंतर अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. घटस्फोटामुळे विमा संरक्षणासारख्या गोष्टींचेही विभाजन गुंतागुंतीचे होऊ शकते. हेही वाचा : लव्ह जिहादसाठी १० वर्षांची शिक्षा नव्हे, आता थेट जन्मठेपच? योगी सरकार घेणार कठोर निर्णय अशा घटस्फोटानंतर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. अनेक दशकांपासून एकत्र राहत असलेल्या वृद्धांसाठी घटस्फोट कठीण असतो. त्यांना कौटुंबिक स्थिरतेची भावना हरवल्यासारखे वाटू शकते. घटस्फोटामुळे सामाजिक वर्तुळात बदल होऊ शकतात. तसेच विभक्त झाल्यानंतर एकटेपणा जाणवू शकतो आणि नवीन मित्रांची गरज भासू लागते. राहणीमानातील बदलामुळे संसारातून बाहेर पडणे तणावपूर्ण असू शकते. त्यामुळे वृद्धापकाळात स्वतःला सांभाळणे अवघड होऊ शकते.