Indian Railway Station That Once Had No Platform Number 1: भारतीय रेल्वे म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचं साधन नाही. देशभर पसरलेल्या या विशाल रेल्वे जाळ्याशी अनेक रंजक कथा, ऐतिहासिक घटना आणि अनोख्या गोष्टी जोडलेल्या आहेत. काही रेल्वेस्थानकांची नावं ऐकून आश्चर्य वाटतं, तर काही स्थानकांची रचना आणि इतिहास कुतूहल निर्माण करतो. अशाच एका रेल्वेस्थानकाची गोष्ट काही वर्षांपूर्वी चर्चेत आली होती. कारण या स्थानकावर प्लॅटफॉर्म २, ३, ४ असे क्रमांक होते; मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक १च नव्हता!
आता प्रश्न पडतो की, पहिला प्लॅटफॉर्मच नसेल तर प्रवाशांचा गोंधळ होत नसेल का? आणि जर प्लॅटफॉर्म क्रमांक १ दुसरीकडे असेल तर तो नेमका कुठे होता? या सगळ्यामागे रेल्वेस्थानकाच्या जुन्या इतिहासाची एक रंजक कहाणी आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक १ का नव्हता?
या स्थानकाच्या इतिहासानुसार, १८८३ मध्ये येथे रेल्वेस्थानकाची सुरुवात झाली. त्या काळात रेल्वे वाहतूक आणि स्थानकांची रचना आजच्या तुलनेत खूपच वेगळी होती. या स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १चा वापर मालगाड्यांसाठी होत असल्याचे विविध वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
काळ बदलत गेला आणि प्रवासी वाहतूक वाढू लागली. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेने परिसरात आणखी एका स्थानकाची उभारणी केली.
आणि इथूनच सुरू झाला प्लॅटफॉर्म क्रमांक १चा विचित्र गोंधळ.
दोन किलोमीटर अंतरावर उभारलं दुसरं स्थानक
जुन्या स्थानकापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर नवीन बरौनी रेल्वेस्थानक उभारण्यात आले. या नव्या स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १ होता. दुसरीकडे जुन्या स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांकांची रचना वेगळी होती.
यामुळे अनेक प्रवाशांचा गोंधळ होऊ लागला. एखाद्या प्रवाशाला प्लॅटफॉर्म क्रमांक १वरून ट्रेन पकडायची असेल तर तो चुकीच्या स्थानकावर पोहोचण्याची शक्यता होती.
कल्पना करा, ट्रेन सुटायला काही मिनिटे बाकी आहेत आणि तुम्ही प्लॅटफॉर्म क्रमांक १ शोधत आहात; पण तो प्लॅटफॉर्म तुमच्या स्थानकातच नाही आणि दुसऱ्या स्थानकासाठी तुम्हाला तब्बल दोन किलोमीटर जावं लागणार आहे!
प्रवाशांची ही गैरसोय आणि संभ्रम टाळण्यासाठी जुन्या स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ हटवण्यात आल्याचे विविध वृत्तांत नमूद करण्यात आले, त्यामुळे जुन्या स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक २पासून क्रमवारी सुरू होत होती.
मग हे अनोखं स्थानक नेमकं कोणतं?
आता तुम्हाला उत्सुकता असेल की, भारतातील हे स्थानक नेमकं कुठे आहे? तर हे स्थानक बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील बरौनी जंक्शन आहे.
बरौनी जंक्शनशी संबंधित ही माहिती अनेक वर्षांपासून रेल्वेच्या अनोख्या तथ्यांमध्ये सांगितली जाते. दोन स्थानकांमधील अंतर आणि प्लॅटफॉर्म क्रमांकामुळे हा विषय विशेष चर्चेत आला होता.
पण आता परिस्थिती बदलली आहे!
इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ही माहिती जुन्या परिस्थितीशी संबंधित आहे. आता बरौनी जंक्शनवर प्लॅटफॉर्म क्रमांक १ आहे.
जून २०२३ मध्ये बरौनी जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांकांची पुनर्रचना करण्यात आली. त्यानंतर पूर्वीचा प्लॅटफॉर्म क्रमांक २ हा प्लॅटफॉर्म क्रमांक १ करण्यात आला, त्यामुळे पूर्वी २ ते ९ अशी असलेली क्रमवारी बदलून प्लॅटफॉर्म क्रमांक १ ते ८ अशी करण्यात आली.
म्हणजेच एकेकाळी बरौनी जंक्शनवर प्लॅटफॉर्म क्रमांक १ नव्हता; मात्र आता तो आहे, त्यामुळे आजच्या घडीला बरौनी जंक्शनवर प्लॅटफॉर्म क्रमांक १ नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. मात्र, काही वर्षांपूर्वी या स्थानकाची रचना आणि प्लॅटफॉर्म क्रमांकांची परिस्थिती नक्कीच वेगळी होती.
भारतीय रेल्वेच्या विशाल इतिहासात अशा अनेक रंजक गोष्टी दडलेल्या आहेत. काही स्थानकांची नावं अनोखी आहेत, काहींची रचना वेगळी आहे, तर काही स्थानकांमागे अशी ऐतिहासिक कारणं आहेत की ती ऐकल्यावर आपल्यालाही प्रश्न पडतो, रेल्वेच्या या जगात अजून किती गोष्टी आपल्याला माहीतच नाहीत!
