तरुणांमध्ये सध्या ब्रँडेड कपडे खरेदी करण्याची एक वेगळी क्रेझ पाहायला मिळते. जो बघावं तो आपल्या ब्रँडेड कपड्यांबद्दल सांगू लागतो. हल्ली ब्रँडेड कपड्यांकडे एक स्टेट्स सिम्बॉल म्हणून पाहिले जाते. त्यामुळे शाळा, कॉलेजला जाणारे तरुण-तरुणीही वेगवेगळ्या ब्रँडचे कपडे खरेदी करताना दिसतात. पण जगात असे काही ब्रँड आहेत; ज्यांचे कपडे खूप महाग असतात. त्यामुळे ते श्रीमंत वर्गालाच परवडण्यासारखे असतात. अनेक श्रीमंत लोक छंद म्हणून महागडे कपडे खरेदी करतात. पण तुम्हाला माहीतेय का, ब्रँडेड कपड्यांचे मोठमोठे कारखाने नेमक्या कोणत्या देशात आहेत? चला तर, मग ब्रँडेड कपड्यांचे कारखाने कोणत्या देशात आहे ते आपण जाणून घेऊ….
जगभरात वेगवेगळ्या ब्रँड्सचे कपडे वापरले जातात; पण हे कपडे बांगलादेशातील गरीब कामगारांच्या हातून तयार होत आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, आपल्या इथे जे कपडे तयार करण्यासाठी हजार रुपये खर्च येतो, तेच कपडे तिथे अवघ्या १०० रुपयांत तयार होतात. जगातील अनेक मोठमोठे ब्रँड्स या देशातून त्यांचे कपडे तयार करून घेतात.
बांगलादेशमध्ये चार हजारपेक्षा जास्त कपड्यांचे कारखाने आहेत. त्यामुळे बांगलादेश जगातील सर्वांत मोठे कपड्यांचे उत्पादन करणारे केंद्र बनले आहे; जेथे ४० लाखांहून अधिक कामगार आणि कारागीर राहतात.
‘या’ ब्रँड्सचे कपडे होतात तयार
टॉमी हिलफिगर (Tommy Hilfiger), कॅप (Cap), केल्विन क्लेन (Calvin Klein), एच अॅण्ड एम (H&M), जिओर्जिओ अरमानी (Giorgio Armani), राल्फ लॉरेन (Ralph Lauren), ह्युगो बॉस ( Hugo Boss), झारा (Zara), मँगो (Mango), आउटलेट्स बीडी (Outlets BD) यांसारख्या अनेक ब्रँड्सचे कपडे बांगलादेशमध्ये बनवले जातात. त्यामागचे कारण म्हणजे इथे कपड्यांची किंमत फार कमी आहे. बांगलादेशात कापड उत्पादनात कुशल कर्मचाऱ्यांसह स्वस्तात मजूरही उपलब्ध होतात. त्यामुळे बांगलादेश कापड उत्पादनात प्रगत आणि स्वतात मजूर निर्माण करणारा देश बनला आहे.
बांगलादेशातील ढाका, चितगाव आणि शेजारच्या भागात पसरलेल्या बांगलादेशातील ५,५०० हून अधिक कारखान्यांमध्ये दररोज १.२५ लाखांहून अधिक टी-शर्ट तयार केले जातात. बांगलादेश जो एकेकाळी पूर आणि वादळामुळे अडचणीत सापडला होता, आज तिथे पुरुष आणि महिला दोघांसाठी टी-शर्ट, स्वेटर्स, पॅन्ट्स, शर्ट्स यांसारख्या वस्तूंचे उत्पादन तयार होत आहे. त्यामुळे बांगलादेश आता कपड्यांच्या उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठे निर्यातदार बनला आहे. जेरेमी सीब्रूक यांच्या ‘द सॉन्ग ऑफ द शर्ट’ या पुस्तकात नैसर्गिक आव्हानांचा सामना करणारा हा छोटा देश उद्योगातील सर्वांत मोठा निर्यातदार म्हणून कसा उदयास आला आहे, याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामुळे जागतिक फॅशन ब्रँडसाठी उत्पादन केंद्र म्हणून चीननंतर बांगलादेश आता दुसऱ्या क्रमांकावर आहे.