ITR Refund Status : १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्याने करदात्यांना २०२४-२५ वर्षासाठी आयकर रिटर्न (ITR) भरावा लागणार आहे. तसेच, करनिर्धारण वर्ष २०२५-२६ साठी फायलिंग फॉर्म भरावा लागणार आहे. ज्या करदात्यांना त्यांच्या अकाउंटचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही, ते ३१ जुलैपर्यंत आयकर रिटर्न भरू शकतात.
आयकर रिटर्न लवकर भरण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी होणाऱ्या चुका टाळण्यास मदत होते. २०२५-२६ करनिर्धारण वर्षासाठी आयटीआर भरण्याची प्रक्रिया आयकर विभागाकडून फॉर्मच्या सूचनांनंतर सुरू होते. टप्प्याटप्प्याने त्याबाबतची माहिती दिली जाते आणि आयकर पोर्टलवर युटिलिटी सक्रिय झाल्यानंतर फायलिंग सुरू होते. सहसा, आयटीआर-१ आणि आयटीआर-२ साठी आवश्यक युटिलिटी एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सक्रिय केली जाते.

पगारदार कर्मचाऱ्यांसाठी फॉर्म १६ हे आयटीआर भरण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे कागदपत्र आहे. फॉर्म १६ मध्ये आर्थिक वर्षातील टीडीएसबद्दलची माहिती असते. हे पगारदार करदात्यांना त्यांचे एकूण कर दायित्व आणि परतावा सहजपणे मोजण्यास मदत करते.
हे लक्षात ठेवा की, आयकर रिटर्न भरण्यासाठी फॉर्म १६ अनिवार्य नाही. पगारदार करदाते त्यांचा आयकर रिटर्न भरण्यासाठी फॉर्म २६ एएस आणि पगार स्लिप यांसारख्या कागदपत्रांचासुद्धा वापर करू शकतात. आयकर रिटर्न अचूकपणे भरण्यासाठी तुमच्या उत्पन्नाचा दाखला आणि टॅक्स पेमेंटची नोंद ठेवणे महत्त्वाचे आहे. आयकर रिटर्न भरताना करदाते आयटीआर कायदा, १९६१ अंतर्गत विविध कपातींसाठी परतावा मागू शकतात.

आयकर परतावा कधी लागू होतो?

जेव्हा तुम्ही भरलेली कर रक्कम २०२४-२५ या आर्थिक वर्षात तुमच्या उत्पन्नानुसार एकूण कर दायित्वापेक्षा जास्त असते, तेव्हा कर परतावा लागू होतो. सध्या सुरू असलेला कर निर्धारण वर्षातील कपात आणि सूट विचारात घेऊन कर परताव्याची रक्कम ठरवली जाते. परतावा तुम्ही निवडलेल्या कर व्यवस्थेवरसुद्धा अवलंबून असतो. जुनी कर व्यवस्था आयकर कायद्याच्या विविध कलमांखाली अनेक कपातींची सुविधा देते; पण त्यात करांचे दर जास्त नसतात; तर दुसरीकडे नवीन कर व्यवस्था मर्यादित कपातीसह कमी कर दरांसह निर्बंध कमी करून कर स्लॅबची सुविधा देते.

तुम्हाला कर परतावा कधी मिळतो?

करदात्यांना जर कर परतावा मिळवायचा असेल, तर त्यांचे आयटीआर ई-व्हेरिफिकेशन असणे आवश्यक आहे. ई-व्हेरिफिकेशननंतर, चार ते पाच आठवड्यांत आय-टी विभागाकडून परतावा प्रक्रिया पूर्ण केली जाते.
जर चार ते पाच आठवड्यांनंतरही कर परतावा रक्कम जमा झाली नाही, तर आयटीआर फायलिंगमध्ये काही समस्या आहे का, हे तपासणे गरजेचे ठरते. कर परताव्यासंबंधित कोणतीही अद्ययावतता मिळविण्यासाठी तुम्ही तुमचा ईमेल नियमित तपासावा; तसेच तुम्ही आयटीआर पोर्टलवरदेखील माहिती तपासू शकता.

परतावा मिळण्यासाठी काही महत्त्वाचे घटक जसे की, आवश्यक कागदपत्रे जोडताना आयटीआर नीट भरणे आणि कपातीची तपासणी करणे गरजेचे आहे. भरलेला कर आणि कपात 26AS फॉर्म आणि वार्षिक माहिती विवरणपत्र (AIS) यांच्याशीही जुळणे गरजेचे आहे. कोणताही उशीर न करता परतावा मिळविण्यासाठी, तुमचे बँक अकाउंट हे पॅन कार्डशी जोडलेले आहे का, हेसुद्धा तपासणे महत्त्वाचे आहे.