Why rose has its thorns: गुलाबाला काटे असतात, असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांनाच लगडून गुलाब असतो, असे म्हणत हसणे उतम. तुझे माझे गुलाबाचे जुळलेच नाही नाते, गुलाबाच्या गंधाहून काट्याचीच ओढ वाटे या आणि याच्यासारख्या अनेक कविता या गुलाबाच्या काट्यांवर लिहिल्या गेल्या. नाजूक गुलाबाच्या मध्ये येणारा हा काटा नेहमीच प्रत्येकाला खुपत आलेला आहे. दरम्यान, तुम्हालाही कधीतरी असा प्रश्न पडला असेल की, एवढ्या सुंदर गुलाबाला काटे का असतात? प्रेम व्यक्त करण्याचे सर्वोत्तम माध्यम गुलाबाचे फूल मानले जाते. अनेक शब्दांतून जे व्यक्त होऊ शकणार नाही, ते गुलाबाचे एक सुंदर फूल सांगून जाते. त्यामुळेच की काय, व्हॅलेंटाइनच्या दिवशी बहुतांश प्रेमी त्यांचे प्रेम गुलाबाचे फूल देऊन व्यक्त करीत असतात. बऱ्याच काळापासून अगदी आताच्या तरुणाईच्या आजी-आजोबांच्या काळापासून प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबाला पसंती मिळाली आहे. ताजे, टवटवीत, हलकेसे पाणी शिंपडलेले गुलाब हाती घेतल्यावर मन प्रफुल्लित झाल्याशिवाय आणि मनातील शब्द ओठांवर आल्याशिवाय राहत नाहीत. पण, प्रेमाच्या गुलाबालाही मधे मधे येणारे काटे का बरे असतात हे जाणून घेऊ. गुलाबाला काटे का असतात? गुलाबाला काटे असतात. कारण- गुलाबाचे काटे हे त्या फुलाचे नैसर्गिकपणे संरक्षण करीत असतात. काटे हे फुलांचे प्राणी खाण्यापासून संरक्षण करतात आणि अशा प्रकारे वनस्पती स्वतःचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. एका संशोधनात कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबोरेटरी (CSHL)ला असे आढळून आले आहे की, लाखो वर्षांच्या उत्क्रांती विभक्ततेनंतरही अनेक वनस्पतींमध्ये काटे पडण्यासाठी समान प्राचीन जनुकं आहेत. LOG नावाचं जनुक सामान्यतः संप्रेरक तयार करण्यासाठी जबाबदार असते; ज्यामुळे पेशी विभाजन आणि विस्तार होतो. हेही वाचा >>पुणेकरांनो ‘या’ मराठी माणसाने १०० वर्षांपूर्वी बांधला होता ऐतिहासिक ‘छत्रपती शिवाजी महाराज पूल’ गुलाबांच्या जन्माचा आणि प्रसाराचा इतिहास तसे पाहायला गेले, तर जीवाश्म संशोधनातून उपलब्ध झालेल्या पुराव्यानुसार गुलाब हे तीन कोटी ५० लाख वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहे. मात्र, गुलाबांची औपचारिक शेती करण्याची सुरुवात अंदाजे पाच हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये झाली. रोमन साम्राज्याच्या काळात मध्य आशियामध्ये मोठ्या प्रमाणात गुलाबांची लागवड केली जायची. गुलाबाच्या पाकळ्यांपासून सुगंधी अत्तरे, औषधे बनविण्याबरोबरच सजावटीसाठीही त्यांचा वापर त्या काळापासूनच मोठ्या प्रमाणात केला जात असे. सातव्या शतकामध्ये काही ठिकाणी तर गुलाबांना आणि गुलाबपाण्याला अनेक राजांनी औपचारिक चलन म्हणून घोषित केले. त्यामुळे गुलाबांच्या मदतीने तेव्हा व्यापार होत असे. जरी चीनमध्ये पाच हजार वर्षांपासून गुलाबाची लागवड होत असली तरी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात लागवडीचे गुलाब युरोपात दाखल झाले. हा झाला गुलाबांच्या जन्म आणि प्रसाराचा इतिहास.