Doctor Meaning in Marathi: व्यक्तीची प्रकृती बिघडली की, सर्वप्रथम आठवण येते ती डॉक्टरांची. जन्मापासून ते वृद्धापकाळापर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर डॉक्टरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. छोटासा ताप असो, एखादा अपघात असो किंवा गंभीर शस्त्रक्रिया… प्रत्येक वेळी आपण विश्वासाने डॉक्टरांकडे धाव घेतो. त्यामुळे डॉक्टर हा शब्द आपल्या दैनंदिन बोलण्यात इतका सहज मिसळून गेला आहे की, त्याचा मराठीत वेगळा पर्याय असू शकतो काय, हा प्रश्नच अनेकांच्या मनात कधी निर्माण होत नाही.

आपण शाळा, महाविद्यालय, कार्यालय किंवा घरातही बोलताना ‘डॉक्टरांकडे जाऊन येतो’, ‘डॉक्टरांनी औषध दिलं’, ‘डॉक्टरांचा सल्ला घ्या’ अशी वाक्यं अगदी सहजगत्या वापरतो. पण, डॉक्टर हा शब्द मूळचा मराठी नाही. तो इंग्रजीतून आपल्या भाषेत रूढ झाला आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न कायम घोळत असतो आणि तो म्हणजे डॉक्टरला शुद्ध मराठीत नेमकं काय म्हणतात?

मराठी भाषेत अनेक इंग्रजी शब्द इतके रूढ झाले आहेत की, त्यांचे मराठीतील पर्यायी शब्द मागे पडले आहेत. रेल्वे, स्टेशन, हॉस्पिटल, ऑफिस, मोबाईल, कॉम्प्युटर यांसारखे शब्द आपण सहजतेने वापरतो. अगदी त्याचप्रमाणे डॉक्टर हा शब्दही आपल्या दैनंदिन व्यवहाराचा भाग बनला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी असलेला मराठी पर्यायी शब्द आजही अनेकांना माहीत नाही.

भाषातज्ज्ञांच्या मते, एखाद्या भाषेची समृद्धी तिच्या शब्दसंपदेत असते. मराठी भाषेत जवळपास प्रत्येक संकल्पनेसाठी स्वतंत्र शब्द उपलब्ध आहेत. मात्र, इंग्रजीचा वाढता प्रभाव आणि बदलती जीवनशैली यांमुळे अनेक मराठी शब्दांचा वापर कमी होत चालला आहे. परिणामी, नवीन पिढीला अनेक शुद्ध मराठी शब्द अपरिचित वाटू लागले आहेत.

विशेष म्हणजे, सरकारी कागदपत्रे, साहित्य, जुने ग्रंथ आणि शैक्षणिक लेखन यांमध्ये आजही अनेक ठिकाणी इंग्रजीऐवजी मराठी शब्दांचा वापर केल्याचे आढळते. त्यामुळे भाषेची गोडी जपायची असेल, तर अशा शब्दांची माहिती असणे आवश्यक असल्याचे भाषाप्रेमी सांगतात.

सोशल मीडियावरही अलीकडे अशा शब्दांबाबत अनेक प्रश्न विचारले जातात. ‘पोलीसला मराठीत काय म्हणतात?’, ‘इंजिनीयरसाठी मराठी शब्द कोणता?’, ‘नर्सला मराठीत काय म्हणतात?’ अशा चर्चांप्रमाणेच ‘डॉक्टरला मराठीत काय म्हणतात,’ हा प्रश्नही अनेकांना पडतो. या प्रश्नावर वेगवेगळी उत्तरे दिली जातात. काही जण ‘वैद्य’ म्हणतात, तर काही जण दुसरे पर्यायी शब्द पुढे करतात. त्यामुळे नेमका योग्य शब्द कोणता, याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो.

आता जाणून घेऊया ‘याचे’ योग्य उत्तर

मराठीत ‘डॉक्टर’ या शब्दासाठी ‘चिकित्सक’ हा सर्वांत अचूक आणि औपचारिक शब्द मानला जातो. रुग्णांची तपासणी करून, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या व्यक्तीस ‘चिकित्सक’, असे संबोधले जाते. तर, वैद्य हा शब्दही मराठीत प्रचलित असून, तो पारंपरिक वैद्यकशास्त्र, विशेषतः आयुर्वेदाशी संबंधित माहिती देताना हा शब्द मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.

मात्र, आजच्या व्यवहारात एमबीबीएस किंवा आधुनिक वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या व्यक्तींसाठी ‘डॉक्टर’ हा शब्दच सर्वाधिक प्रमाणात वापरला जातो. तरीही मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेची माहिती जाणून घेताना ‘चिकित्सक’ आणि ‘वैद्य’ हे दोन्ही शब्द लक्षात ठेवायला हवेत. कारण- भाषा जितकी समृद्ध, तितकी आपली अभिव्यक्तीही अधिक प्रभावी आणि अचूक बनू शकते.