समजून घ्या सहजपणे : कोविड १९ रुग्णांसाठी डेक्सामेथॅसोनचा वापर

…तर ब्रिटनमध्ये रुग्णालयात वाचवता आले असते पाच हजार रुग्णांचे प्राण

– राजेंद्र येवलेकर

सध्या सगळीकडे डेक्सामेथॅसोन या औषधाची चर्चा आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या न्युफिल्ड डिपार्टमेंट ऑफ मेडिसीन या संस्थेत जे प्रयोग करण्यात आले त्यानुसार कोविड १९ म्हणजे करोनाच्या गंभीर रुग्णांवर हे औषध प्रभावी आहे. जे लोक ऑक्सिजन देण्याच्या पातळीवर आहेत त्यांच्यापैकी २० टक्के तर जे व्हेंटीलेटरवर आहेत त्यांच्यापैकी ३५ टक्के रुग्ण वाचू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. ब्रिटनमध्ये रुग्णालयात ३० हजार मृत्यू झाले त्यातील पाच हजार या औषधाने वाचवता आले असते असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या औषधाबाबत आशेचा किरण निर्माण झाला आहे. या औषधाविषयी आपण जाणून घेणार आहोत.

डेक्सामेथॅसोन हे नेमके काय आहे ?
डेक्सामेथॅसोन हे स्टेरॉइड प्रकारात मोडणारे औषध असून त्याचा वापर सूज किंवा वेदना कमी करण्यासाठी केला जातो यात शरीराची प्रतिकारशक्ती प्रणाली सुधारली जाते. १९६० पासून हे प्रजातीय औषध वापरात आहे. सूज निर्माण करणारी पेशी किंवा उतींमधील रसायने निर्माण होण्यास हे औषध प्रतिबंध करते. पांढऱ्या पेशींवर परिणाम करणारे हे औषध असून त्यामुळे प्रतिकारशक्ती प्रणालीची तीव्रता कमी केली जाते. प्रतिकारशक्ती प्रणालीच्या अतिरेकी प्रतिसादामुळे कोविड १९ चा रोग जास्त उग्र होत जातो, हे अनेकांना माहिती नसेल. त्यामुळे प्रतिकारशक्ती प्रणालीचा प्रतिसादही योग्य प्रमाणातच ठेवावा लागतो. डेक्सामेथॅसोन हे कॉर्टिकोस्टेरॉइड पद्धतीचे औषध असून कॉट्रिसॉल या आपल्या शरीरातील नैसर्गिक संप्रेरकाची ती नक्कल आहे. आंतरस्त्रावी ग्रंथी मानवी शरीरात हा स्त्राव तयार करीत असतात. हृदयाचा संधीवात व इतर रोगांवर त्याचा वापर केला जातो. रक्तवाहिन्यांची सूज व वेदना, त्वचाक्षय या रोगांवरही त्याचा चांगला उपयोग होतो. कर्करुग्णात रुग्णांना केमोथेरपीनंतर उलट्या होऊ शकतात, त्यातही याचा वापर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केला जातो.

कोविड १९ उपचारात त्याचा उपयोगी किती आहे ?
कोविड १९ रोगांवर अजूनही कुठला उपचार नाही ब्रिटनमध्ये डेक्सामेथॅसोनचा प्रयोग अनेक रुग्णांवर करण्यात आला त्यात जे रुग्ण गंभीर अवस्थेत होते, त्यांच्यावर त्याचा चांगला परिणाम दिसून आला. आता त्यावर इतर देशही प्रयोग करु लागले आहेत. कॉर्टिकोस्टेरॉइड उपचार पद्धती या प्रयत्नातून कोविड १९ ला लागू करून पाहिली जात आहे. ज्यांच्या श्वसन यंत्रणेत कोविड १९ मुळे गंभीर बिघाड होतात, त्यांच्यातच हे उपयोगी पडते इतर कमी लक्षणांच्या रुग्णात त्याचा उपयोग १३ टक्के आहे. २००३ मध्ये सार्सचा रोग पसरला त्यावेळी या उपचारांचा वापर करण्यात आला होता त्यामुळे फुफ्फुसाची हानी कमी होते. पण जागतिक आरोग्य संघटनेने २७ मे रोजी जी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत ती पाहता न्युमोनियासदृश रोगांवर कॉर्टिकोस्टेरॉइडचा वापर करु नये असे म्हटले आहे. सार्स सीओव्ही २, सार्स सोओव्ही व मर्स सीओव्ही यात कॉर्टिकोस्टेरॉइड फारसे प्रभावी नाहीत, असे आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणे टळत नाही. अतिदक्षता विभागात जाणे टळत नाही, असेही सांगण्यात आले आहे.

मग या संशोधनाच नवीन काय आहे.
ब्रिटनमध्ये डेक्सामिथेसोनचे काही प्रयोग करण्यात आळे त्यात २१०४ रुग्णांना हे औषध सहा मिलीग्रॅम मात्रेत दहा दिवस देण्यात आले. त्यामुळे व्हेंटिलेटर स्थितीतील रुग्णांचे मृत्यू एक तृतीयांश तर ऑक्सिजनवर ठेवण्याच्या पातळीवरील रुग्णांचे मृत्यू एक पंचमांशाने कमी झाले. या औषधाने मृत्यू दर २८ दिवसांच्या काळात १७ टक्क्यांनी कमी झाला.

या संशोधनाचे महत्त्व कितपत आहे ?
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या न्यूफिल्ड डिपार्टमेंट ऑफ मेडीसन या संस्थेने म्हटले आहे की, या औषधाने मृत्यूदर कमी होतो. पण गंभीर नसलेल्या रुग्णात त्याचा फारसा फायदा होत नाही. त्यामुळे जे गंभीर रुग्ण असतील त्यांच्यातच याचा वापर शक्य आहे.

कॉर्टिकोस्टेरॉइड थेरपी भारतात वापरली जाते का ?
हो, भारतात ही उपचार पद्धती वापरली जाते. मेथिलप्रेडनिसोसोलोन हे औषध त्यात वापरले जाते. जर ऑक्सिजन पातळी कमी होत असेल तर हे औषध तीन दिवस ०.५ ते १ मि.ग्रॅ. प्रमाणात दिले जाते. ज्यांच्यात प्रतिकारशक्ती जास्त उद्दीपित झाली असेल, त्यांच्यात हे औषध दिवसाला १ ते २ मिलीग्रॅम दिली जाते.

या औषधाचे दुष्परिणाम काय आहेत?
आरोग्य मंत्रालयाच्या मते ग्लुकोकॉर्टिकॉइड जास्त मात्रेत दिले तर करोना विषाणू जाण्यासाठी उलट जास्त वेळ लागतो. कॉर्टिकोस्टेरॉइडमुळे हाडाच्या उतींना रक्त बंद होऊन ऑस्टिओनेक्रिसीस रोग होतो. कोविड १९ रुग्ण गंभीर अवस्थेत असेल तरच त्याचा उपयोग करावा, असे जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार माइक रायन यांनी म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Covid 19 dexamethasone use action and what a recovery trial found pkd